आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत - एक फसवणूक

विवेक मराठी    05-Apr-2024   
Total Views |
 @अभिजित जोग
 
बारावीच्या पाठ्यपुस्तकातून इतके वर्षे शिकवण्यात आलेला ‘आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत’ हा चुकीचा असल्याचे यापुढे NCERT नमूद करणार आहे. ही बातमी आनंदाची. तिचे स्वागत करायलाच हवे.
 
 
vivek
ब्रिटिशांच्या भारतातील आगमनाच्या आधी आर्यांच्या आक्रमणाचा उल्लेखही भारतात कधी झाला नव्हता. किंबहुना प्राचीन काळात पश्चिमेकडून भारतावर मोठे आक्रमण झाल्याचा कुठलाही उल्लेख भारतातील प्राचीन साहित्यात व परंपरेत कधीही झालेला नाही. मग असं काय घडलं, की अचानक भारताच्या इतिहासात एक मोठा फेरफार करून ‘आर्यांचे आक्रमण’ हा अधिकृत इतिहास ठरविण्यात आला? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला सतराव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात जावे लागते. इ.स. 1614 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा एक अधिकारी सर थॉमस रो हा जहांगीर बादशहाच्या दरबारात आला आणि त्याने भारतात व्यापार करण्याची परवानगी मिळवली. व्यापाराच्या निमित्ताने अनेक ब्रिटिश लोक भारतात येऊ लागले. त्या वेळी युरोपात रेनेसाँसचे युग होते. वेगवेगळ्या विषयांचे ज्ञान मिळवण्याची तीव्र इच्छा आणि कुतूहल असलेले युरोपियन लोक विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य, कला अशा विविध क्षेत्रांमध्ये मोठी झेप घेत होते. असेच काही लोक ईस्ट इंडिया कंपनीबरोबर भारतात आले. त्यांनी जेव्हा भारतीय संस्कृती आणि परंपरा यांचा अभ्यास सुरू केला तेव्हा भारतीय संस्कृतीची प्राचीनता आणि वैभव यांच्या दर्शनाने ते थक्क झाले. एक विशेष गोष्ट त्यांच्या लक्षात आली. ती म्हणजे, भारतीय भाषा, त्यातही विशेषतः संस्कृत भाषेचं युरोपातील विविध भाषांशी असलेलं विलक्षण साम्य. हे साम्य वरवरचं नव्हतं, तर ते इतकं मूलभूत होतं, की दक्षिणेला श्रीलंका ते युरोपच्या उत्तरेला असलेल्या आइसलँडपर्यंत बोलल्या जाणार्‍या अनेक भाषा या एकमेकींच्या भगिनी आहेत हे त्यांच्या लक्षात आलं. भाषांच्या या गटाला त्यांनी ’इंडो युरोपियन भाषा’ असं नाव दिलं. ज्याचा आपण नंतर उल्लेख करणार आहोत त्या मॅक्समुल्लरनेही असं म्हटलं की, युरोपमधील भाषांमध्ये विलक्षण साम्य आहे हे आम्हाला जाणवत होतं; पण ते साम्य कसं आणि कुठून आलं हे मात्र कळत नव्हतं. जेव्हा आम्ही भारतात येऊन संस्कृतचा अभ्यास केला तेव्हा आमच्या लक्षात आलं की, युरोपियन भाषांमधलं साम्य त्यांच्या संस्कृतशी असलेल्या नात्यामुळे निर्माण झालं आहे. याचा अर्थ असा की, युरोपमधील भाषांची निर्मिती प्राचीन संस्कृतपासून झाली आहे हे त्यांनी मनोमन मान्य केलं. हा साक्षात्कार त्यांच्यासाठी तोपर्यंत गैरसोयीचा नव्हता
 
हजारो किलोमीटरवरील या खंडप्राय देशावर आपण केवळ लष्करी बळाच्या आधाराने फार काळ राज्य करू शकणार नाही. या दोन्ही अडचणींवर मात करण्यासाठी चलाख इंग्रजांनी असे ठरवले की, भारतीयांचा आत्मसन्मान आणि आत्मविश्वास नष्ट करायचा
जोपर्यंत भारतातील त्यांची महत्त्वाकांक्षा व्यापारापर्यंतच मर्यादित होती; पण जशी जशी त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा जागृत होऊ लागली आणि भारतावर आपण प्रदीर्घ काळ राज्य करू शकतो हे त्यांच्या लक्षात आलं, तशी ही बाब त्यांच्यासाठी गैरसोयीची ठरू लागली. आपली भाषा आणि संस्कृती यांचा उगम आपल्या गुलामांच्या भाषेतून झाला आहे हे मान्य करणे त्यांच्यासाठी अशक्य होते. त्याचबरोबर त्यांना हेदेखील माहीत होते की, हजारो किलोमीटरवरील या खंडप्राय देशावर आपण केवळ लष्करी बळाच्या आधाराने फार काळ राज्य करू शकणार नाही. या दोन्ही अडचणींवर मात करण्यासाठी चलाख इंग्रजांनी असे ठरवले की, भारतीयांचा आत्मसन्मान आणि आत्मविश्वास नष्ट करायचा, म्हणजे ते मेंढरांसारखे आपल्या मागे येतील आणि इंग्रजी राज्य हे आपल्यासाठी ईश्वरी वरदान आहे असे समजून गुलामीतच आनंद मानतील. हे साध्य करण्यासाठी त्यांनी आपल्या सुपीक मेंदूतून काढलेली एक युक्ती म्हणजे ’आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत’.
 
हा सिद्धांत असे सांगतो की, रशियाच्या दक्षिणेकडे असलेल्या ’युरेशियन स्टेप्स’ या डोंगराळ आणि गवताळ प्रदेशातून सोनेरी केसांचे, निळ्या डोळ्यांचे गौरवर्णीय आर्य मध्य आशिया, इराण यामार्गे भारतात आले आणि त्यांनी येथे संस्कृत भाषा आणि वैदिक संस्कृतीची निर्मिती केली. याचा अर्थ असा, ‘ऋग्वेद’ हा जगातील सगळ्यात प्राचीन ग्रंथ असला आणि संस्कृत ही श्रेष्ठ भाषा असली तरी त्यांची निर्मिती भारतीयांनी केली नसून पश्चिमेकडून आलेल्या गोर्‍या लोकांनी केली आहे. ईस्ट इंडिया कंपनीच्या चाकरीत असलेला मॅक्समुल्लर हा जर्मन विद्वान या सिद्धांताचा एक प्रमुख प्रवर्तक होता. त्याने आर्यांचे हे आक्रमण इ.स.पू. 1500 मध्ये झाले, तर ‘ऋग्वेद’ची निर्मिती इ.स.पू. 1200 मध्ये झाली असे ठरवले. गौतम बुद्धांचा काळ इ.स.पू. 550 असल्याचे ज्ञात होते. त्यामुळे इ.स.पू. 1200 ते 550 हा काळ इतर वेद, ब्राह्मणे, अरण्यके, उपनिषदे, सूत्रे या वैदिक वाङ्मयासाठीच अपुरा होता. इतर प्राचीन भारतीय वाङ्मय, परंपरा आणि आपल्या संस्कृतीत ज्यांना इतिहास मानलं जातं त्या ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ यांच्यासाठी तर वेळच उरला नाही. त्यामुळे ही सगळी वैभवशाली परंपरा या भाकडकथा (मायथॉलॉजी) आहेत, असं सांगून त्यांचा निकाल लावण्यात आला आणि असं सांगण्यात आलं की, इ.स.पू. चौथ्या शतकात अलेक्झांडरच्या आक्रमणाच्या वेळी जेव्हा तुमचा संबंध ग्रीक लोकांशी आला तेव्हा विज्ञान, तत्त्वज्ञान, साहित्य, कला यांच्याशी तुमची ओळख झाली. याचा अर्थ तुमच्याकडे जे काही चांगलं आहे ते तुम्हाला पश्चिमेकडून आलेल्या गोर्‍या लोकांनीच दिलेलं आहे. हीच तुमची परंपरा आणि इतिहास आहे. आता पश्चिमेकडून गोरे ब्रिटिश आले आहेत. त्यांच्या राज्याचा आणि वर्चस्वाचा स्वीकार करणे यातच तुमचं हित आहे. भारताची संस्कृती आणि आत्मसन्मान यांच्यावर झालेला हा एक मोठा आघात होता, ज्यातून भारतीयांच्या मनात न्यूनगंडाची भावना आणि ब्रिटिश साहेबाची चाकरी करण्यातच धन्यता मानण्याची मानसिकता निर्माण झाली.
 
 
महत्त्वाची गोष्ट अशी की, भारताच्या इतिहासात मोठी उलथापालथ घडवून आणणारा हा सिद्धांत पूर्णतः काल्पनिक असून तो सादर करताना त्यासाठी कुठलाही पुरावा देण्यात आला नाही आणि आजवर एकही पुरावा या सिद्धांताच्या समर्थकांना सादर करता आलेला नाही. तसेच आर्यांच्या या काल्पनिक आक्रमणाचा इ.स.पू. 1500 हा कालखंड पूर्णतः काल्पनिक असल्याचे स्वतः मॅक्समुल्लर यानेच नंतर मान्य केले. तो म्हणतो, वैदिक वाङ्मयाशी मी ज्या तारखा जोडल्या त्या पूर्णपणे काल्पनिक होत्या, हे मी वारंवार सांगितले आहे. वैदिक मंत्र इ.स.पू. 1000, 1500, 2000 का 3000 मध्ये रचले गेले हे जगातली कुठलीही शक्ती कधीही निश्चित करू शकणार नाही. असे असूनही आर्यांच्या आक्रमणाचा खोटा सिद्धांत आणि त्याचा इ.स.पू. 1500 हा काल्पनिक कालखंड अधिकृत इतिहास म्हणून आजही शिकवला जातो, यासारखे दुसरे दुर्दैव नाही.
 
Theory of Aryan Invasion
 
 
हा सिद्धांत मांडला गेला त्या वेळी सिंधू-सरस्वती संस्कृतीचा म्हणजेच हरप्पा संस्कृतीचा शोध लागला नव्हता. 1922 मध्ये मोहेंजोदारो व हरप्पा या ठिकाणी या प्राचीन संस्कृतीचा शोध लागला. यानंतर या संस्कृतीची जवळपास अडीच हजार ठिकाणे शोधण्यात आली आहेत आणि ही संस्कृती वीस लाख चौरस किलोमीटर प्रदेशात पसरलेली, साधारणतः दहा हजार वर्षांपासून अस्तित्वात असलेली जगातील एक प्राचीन संस्कृती आहे हे सिद्ध झाले आहे. या संस्कृतीचा विलय साधारणतः इ.स.पू. 1500च्या सुमारास झाला असावा असे लक्षात आले. हा काळ मॅक्समुल्लरने सांगितलेल्या आर्यांच्या आक्रमणाच्या काल्पनिक कालखंडाशी जुळत असल्यामुळे हा जणू काही आर्यांच्या आक्रमणाचा अंतिम पुरावा असल्याचे सांगून आक्रमक आर्यांनी या प्राचीन संस्कृतीचा विनाश केला, असे प्रतिपादन करण्यात आले. याचा वापर भारतात जास्तीत जास्त फूट पडण्यासाठी करण्यात आला. सिंधू-सरस्वती संस्कृती ही द्रविड संस्कृती होती, जिचा आक्रमक आर्यांनी विनाश केला आणि द्रविड वंशाच्या लोकांना दक्षिणेकडे ढकलून दिले, असे सांगण्यात आले. तसेच आक्रमक आर्य म्हणजे उत्तर भारतीय आणि उच्च जातींचे लोक, तर दक्षिण भारतीय आणि बहुजन समाजातील लोक म्हणजे भारतातील मूलनिवासी असा सिद्धांत मांडण्यात आला. त्यामुळे भारतात उत्तर विरुद्ध दक्षिण, संस्कृत विरुद्ध तमिळ, हिंदी विरुद्ध तमिळ, उच्च जाती विरुद्ध बहुजन समाज, आदिवासी विरुद्ध इतर असे अनेक संघर्षबिंदू निर्माण करून हा संघर्ष सतत भडकता राहील आणि भारतीय समाज एक होऊन ब्रिटिशांविरुद्ध उठाव करणार नाही असा प्रयत्न करण्यात आला. आजही ’भारत तोडो’ या अजेंड्यासाठी कार्यरत असलेल्या विविध शक्ती आर्यांच्या आक्रमणाच्या काल्पनिक सिद्धांताचाच आधार आपल्या कारवायांसाठी घेतात; पण सिंधू-सरस्वती संस्कृतीच्या उत्खननात आढळलेले पुरावे मात्र हे सगळे प्रतिपादन पूर्णतः चुकीचे असल्याचे सिद्ध करतात. या उत्खननात आढळलेल्या पुराव्यांवरून हे सिद्ध होते, की जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, कपडेलत्ते, धार्मिक रीतिरिवाज या प्रत्येक बाबतीत गेली दहा हजार वर्षे एक विलक्षण सातत्य भारतात आढळून येते. मध्येच येऊन परकीयांनी नवी संस्कृती लादल्याचे वा मोठी सांस्कृतिक उलथापालथ केल्याचे कुठलेही पुरावे आढळत नाहीत.
 
  राखीगढी येथील उत्खननात सापडलेल्या सांगाड्यातून काढलेल्या डीएनएचे विश्लेषण केले असता सिंधू- सरस्वती संस्कृतीतील लोकांचा डीएनए आणि आजच्या भारतातील सर्व जातींचा तसेच आदिवासींचा डीएनए एकच असल्याचे आढळून आले आहे. मध्ये बाहेरून आलेल्या लोकांच्या डीएनएची सरमिसळ झाल्याचा कुठलाही पुरावा आढळत नाही.
 
या संस्कृतीचा विलय इ.स.पू. 2200 ते 1900 दरम्यान पडलेल्या भीषण दुष्काळामुळे झाला, कारण या दुष्काळात सरस्वती नदी पूर्णतः कोरडी पडून लुप्त झाली असे आता सिद्ध झाले आहे. ‘ऋग्वेदा’त मात्र सरस्वती नदीचे वर्णन प्रचंड मोठी आणि महाशक्तिशाली नदी असे करण्यात आले आहे. या सिद्धांताप्रमाणे ऋग्वेद जर इ.स.पू. 1200 मध्ये लिहिला गेला असेल, तर त्याआधी 700 वर्षे म्हणजेच इ.स.पू. 1900 मध्ये लुप्त झालेल्या सरस्वतीचा उल्लेख त्यात ‘महाशक्तिशाली’ असा केलेला असणे हे अशक्यच आहे. हा एकच पुरावा आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत खोटा असल्याचे सिद्ध करण्यासाठी पुरेसा आहे. याशिवाय ‘ऋग्वेदा’त आर्य बाहेरून आल्याचा, त्यासाठी त्यांनी केलेल्या हजारो किलोमीटर प्रवासाचा, भारताबाहेरील त्यांच्या वास्तव्याचा एकही उल्लेख आढळत नाही. भारताच्या पश्चिमेकडील झाडे, नद्या, प्राणी, भौगोलिक प्रदेश यांचाही उल्लेख येत नाही. राखीगढी येथील उत्खननात सापडलेल्या सांगाड्यातून काढलेल्या डीएनएचे विश्लेषण केले असता सिंधू- सरस्वती संस्कृतीतील लोकांचा डीएनए आणि आजच्या भारतातील सर्व जातींचा तसेच आदिवासींचा डीएनए एकच असल्याचे आढळून आले आहे. मध्ये बाहेरून आलेल्या लोकांच्या डीएनएची सरमिसळ झाल्याचा कुठलाही पुरावा आढळत नाही.
 
 
अशा असंख्य पुराव्यांवरून आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत हा पूर्णतः काल्पनिक आणि खोटा असल्याचे आता वादातीतपणे सिद्ध झाले आहे. तरीही आजवर हाच फूटपाडा सिद्धांत अधिकृत इतिहास म्हणून NCERT पाठ्यपुस्तकांमधून शिकवला जात होता, कारण ब्रिटिश गेले तरी स्वतंत्र भारतात ’इतिहास’ या क्षेत्रावर डाव्यांची संपूर्ण पकड होती. भारताचे तुकडे करणे हेच त्यांचे मूळ उद्दिष्ट असल्यामुळे हा सिद्धांत त्यांच्यासाठी सोयीचा होता. हिंदू समाज जाती-जातींमध्ये विभागलेला असणे सत्ताधीश काँग्रेससाठीही सोयीचेच होते आणि म्हणून त्यांनी तो तसाच सुरू ठेवला. आता मात्र शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये हा सिद्धांत चुकीचा असल्याचे नमूद केले जाणार आहे, ही बातमी म्हणूनच अत्यंत आनंदाची आणि स्वागतार्ह आहे.
 
अभिजित जोग

अभिजित जोग

हे नामवंत लेखक असून भारताच्या इतिहासाची मोडतोड व विकृतीकरण याविषयीचे 'असत्यमेव जयते?' हे त्यांचे पुस्तक खूपच लोकप्रिय आहे. त्याच्या इंग्रजी, हिंदी व गुजराती आवृत्त्याही उपलब्ध आहेत. डाव्या विचारसरणीविषयी त्यांनी लिहिलेल्या 'जगाला पोखरणारी डावी वाळवी' या विषयाला अल्पावधीतच प्रचंड प्रतिसाद मिळाला असून त्याची इंग्रजी आवृत्ती नुकतीच उपलब्ध झाली आहे. भारताच्या सांस्कृतिक वारशाविषयी 'हेरिटेज फर्स्ट' या समाजमाध्यमांवरील पेजचे ते लेखन करतात. ते विख्यात ब्रँड कन्सल्टंट, जाहिराततज्ज्ञ व काॅपीरायटर असून त्यांचे 'ब्रँडनामा' हे ब्रँडिंगवरील मराठीतले पहिले पुस्तकही खूप वाचकप्रिय आहे. इतिहास, संस्कृती, राजकारण, ब्रँडिंग व भूराजकीय डावपेच हे त्यांचे आवडते विषय आहेत. या विषयांवर ते विविध वृत्तपत्रे, मासिके तसेच समाजमाध्यमांवर नियमित लेखन करतात, तसेच विविध व्यासपीठांवर व्याख्याने देतात.