महिलांसाठी महिलांचा ट्रेकिंग ग्रुप...

विवेक मराठी    08-Apr-2024
Total Views |
 @अश्विनी भालेराव
रोजच्या रहाटगाड्यात घर, संसार, मुलंबाळं आणि नोकरी यांची तारेवरची कसरत करत असताना अनेक जणींना स्वतःसाठी वेळ द्यायला जमतच नाही. त्यातही निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवायला, मोकळ्या वातावरणाचा मनमुराद आनंद लुटायला वेळ कुठे असणार... मात्र, अशा साडेसातशे महिलांना एकत्रित आणून, त्यांना सातत्याने दुर्गभ्रमंती घडवून आणण्याचा आगळावेगळा उपक्रम नाशिकच्या ‘आयाम’ संस्थेच्या ‘दुर्ग दुर्गा’ या उपक्रमातून करण्यात येत आहे.
 
मुंबई - पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये सातत्याने विविध सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक उपक्रम, कार्यक्रम राबवले जात असतात. त्या तुलनेत नाशिकमध्ये अशा कार्यक्रमांचे, उपक्रमांचे प्रमाण काहीसे कमी असते. नाशिकमध्येही असे कार्यक्रम सातत्याने घडावे यासाठी कलासक्त आणि रसिकमनाच्या शुभदा देसाई, मिलिंद कुलकर्णी, जयेश आपटे आदी सात जणांच्या समूहाने एकत्र येऊन ‘आयाम’ या संस्थेची 2018 साली स्थापना केली. 2018 मध्येच संस्था रजिस्टर करून ’ट्रस्ट’चीदेखील स्थापना झाली.
 

Trekking

  
आयाम या संस्थेमार्फत अभिवाचन, काव्यवाचन, शॉर्ट फिल्म, व्याख्याने यांसारखे विविध उपक्रम आणि कार्यक्रम राबवले जाऊ लागले; पण संस्थेचा उद्देश फक्त सांस्कृतिक कार्यक्रम राबवण्याचा नसून त्याही पलीकडे जाऊन नाशिककरांना वेगळे काही देण्याचा, त्यांच्यासाठी करण्याचा प्रयत्न असल्याने, यासाठी संस्थेच्या पदाधिकार्‍यांमध्ये चर्चा, संवाद, विचारविनिमय घडून येऊ लागले, अनेक मुद्दे चर्चिले गेले. चर्चेत महिला फारशा ट्रेकिंग का करत नाही? असा प्रश्न उपस्थित झाला; परंतु तेव्हा मीटिंगमध्ये उपस्थितांच्या लक्षात आले की, कित्येकदा महिला ट्रेकिंग या साहसी क्रीडा प्रकाराकडे दुर्लक्ष करतात. ट्रेकची खूप आवड असलेल्या काही व्यक्ती त्यासाठी ग्रुप स्थापन करतात. मात्र, महिलांची संख्या यात 10 टक्केदेखील नसते. डोंगरावर जाऊन तेथील निसर्ग अनुभवावा, मोकळ्या हवेचा आनंद लुटावा, अशी इच्छा असली तरी अनेकांना त्यासाठी सहकारी मिळत नाहीत. शिवाय सर्वच प्रमुख ट्रेकिंग ग्रुप्स हे मिक्स स्वरूपाचे म्हणजेच ज्यात स्त्री-पुरुष एकत्र असलेले असतात. ज्यामुळे महिला अशा ग्रुप्समध्ये सहभागी होण्याचे टाळतात. त्यामुळे महिला या आनंदाला मुकतात. दुसरीकडे सर्व प्रकारचे ताणतणाव मात्र वाढत आहेत. यातूनच अनेक महिला डिप्रेशनच्या गोळ्या घेताना आढळतात. ट्रेकिंगमुळे हे सगळे बदलते. निसर्गाच्या सान्निध्यामुळे ताजेतवाने होता येते जे अत्यंत लाभदायी आहे. आयाम संस्थेच्या पदाधिकारी ‘शुभदा देसाई’ या 2000 सालापासून नियमितपणे ट्रेकिंग करत असल्याने, त्यांच्यासारख्याच इतरही अनेक महिलांनी सातत्याने ट्रेक करावे, असे चर्चेत काही जणांनी सुचवले. नाशिकमध्ये ट्रेकर महिलांचा असा एकही स्वतंत्र ग्रुप नाही आहे, जेणेकरून महिला आणि त्यांचे कुटुंबीय बिनधास्तपणे ट्रेकिंगला पाठवू शकतील, जाऊ शकतील. म्हणूनच शुभदा देसाई यांच्या नेतृत्वाखाली ‘आयाम’चा एक ट्रेकिंग ग्रुप असावा, असा विचार पुढे आला. यासाठी शुभदा देसाई, योगिता खांडेकर, हेमांगी दांडेकर, सुषमा मिसाळ, अमृता जतकर, विद्या करवंदे, संगीता बेनी, पूजा गायधनी व प्रीती दांडगे या ट्रेकिंग करणार्‍या, धडाडीच्या कार्यकर्त्या महिलांनी ’आयाम’अंतर्गत 2018 सालच्या मे महिन्यात ’महिलांसाठी महिलांचा ट्रेकिंग ग्रुप...’ हे ब्रीदवाक्य घेऊन महिलांचा ट्रेकिंग ग्रुप सुरू केला.
 
 
दुर्ग म्हणजे गड, किल्ला, डोंगर, तर दुर्गा हे प्रत्यक्षात भगवान शंकराची पत्नी आदिशक्तीचे रूप म्हणूनच ‘दुर्ग दुर्गा’ हे अर्थपूर्ण नाव या समूहाला ‘आयाम’ आणि ‘दुर्ग दुर्गा’च्या पदाधिकार्‍यांनी विचारांती दिले.
 
 
टीम तयार होताच; वेळ न दवडता टीममधल्या सगळ्या जणी कामाला लागल्या. त्यांनी मग डिजिटल मीडियाचा प्रभावी वापर करण्याचे ठरवले. यानुसार ‘दुर्ग दुर्गा’च्या वतीने नाशिकजवळील रामशेज या पहिल्यावहिल्या उपक्रमासाठी गुगल फॉर्म आणि सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले. अहो आश्चर्यम् !! या आवाहनाला दोनच दिवसांत इतका कमालीचा प्रतिसाद मिळाला की, हा हा म्हणता; 700 हून अधिक महिलांनी रामशेजवरील ट्रेकिंगसाठी रजिस्ट्रेशन केले. यामुळे अर्थातच व्हॉट्सअ‍ॅपचे चारही ग्रुप तुडुंब भरले. त्यामुळे कार्यकर्त्यांना काहीसे दडपण आले. आता एवढ्या जणींना घेऊन जाणे तर शक्य नाही. मग काय; संस्थेच्या वतीने नियमावली तयार करण्यात आली, कोण कोण ट्रेक करण्यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त आहे याआधारे माहिती घेऊन चाळण करण्यात आली.
 
 
Trekking
 
3 जून 2018 रोजी झालेल्या पहिल्या उपक्रमात ’रामशेज किल्ला’ सर करण्यासाठी किमान 200 महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रामशेजला आलेल्या किती तरी महिलांनी या आधी सोप्यातला-सोपादेखील कुठला किल्ला किंवा डोंगर चढला नव्हता; पण पहिल्याच अनुभवात ट्रेक सुखरूप आणि उत्तम पार पडल्याने त्यांच्यातही ट्रेक करण्याविषयी जिद्द निर्माण झाली. या वेळी कित्येक महिला ’शुभदा देसाई’ यांचे हात हातात घेऊन आनंदाने आणि समाधानाने रडल्या... एवढी मोकळी हवा, सूर्यप्रकाश, निसर्गाची अनुभूती त्यांना मनस्वी आनंद देत होती. अनेकींसाठी हा अनुभव अवर्णनीय होता. अनेकींनी दर महिन्याला ट्रेकिंगचे आयोजन करण्याची गळदेखील घातली. या अभूतपूर्व प्रतिसादामुळे आयोजक, कार्यकर्त्या आणि सहभागी महिलांचादेखील हुरूप वाढला. प्रयत्न म्हणून पहिला एक ट्रेक आयोजित करून बघूयात, या हेतूने सुरू झालेल्या या उपक्रमास प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने लगेचच जुलै महिन्यातल्या दुसर्‍या ट्रेकची तयारी सुरू झाली.
 
 
सगळ्या नवशिक्या ट्रेकर महिलांना ट्रेकिंग करणे सोपे जावे, या हेतूने दुसर्‍या ट्रेकसाठी जुलै 2018 मध्ये सापुताराजवळील आणि नाशिक जिल्ह्याच्या सुरगाणा तालुक्यातील ‘हतगड’ किल्ला निवडण्यात आला. हतगड हा सोपा आणि आटोपशीर चढणीचा असा हा किल्ला आहे. इथे एकमेव रस्ता असल्याने ना कुणी हरवू शकत होतं ना कुणी घसरून पडू शकत होतं. नाशिकपासून काहीसे लांबचे ठिकाण असतानादेखील ट्रेकसाठी तब्बल 100 महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यासाठी दोन मोठ्या बसेस बुक करण्यात आल्या होत्या. त्यानंतरच्या महिन्यांमध्ये अनुक्रमे अंजनेरी, कळसूबाई ट्रेकसाठीदेखील 65 ते 90 या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. कळसूबाई ट्रेकसाठी महिला या सर्वाधिक उत्सुक होत्या. यामुळेच कळसूबाई शिखरावरील ट्रेक हा ‘दुर्ग दुर्गा’च्या यशातील मैलाचा दगड ठरला.
 



vivek 
 
या सुरुवातीच्या चारही ट्रेक्समध्ये महिलांचे पुष्कळ प्रमाण होते. संयोजक शुभदा देसाई यांना ट्रेकचे संयोजन करण्याचा पूर्वानुभव या चारही ठिकाणी कामी आला; परंतु इतक्या मोठ्या प्रमाणावरील ट्रेकचे संयोजन करणे आणि महिलांच्या समूहाला हाताळणे अवघड जात होते. म्हणून शुभदा देसाई आणि संयोजक टीमने निर्णय घेतला की, इथून पुढचे ट्रेक आपण प्रथम प्राधान्य देत 40 जणींनाच घेऊन करायचे आणि यासाठी प्रत्येक ट्रेकला 2 स्थानिक धडधाकट वाटाडेदेखील सोबत घ्यायचे, जेणेकरून ट्रेक करणेदेखील सोपे जाईल आणि वेळ पडल्यास हीच मुले समर्थपणे मदत करू शकतील.
 
 
एकामागोमाग एक यशस्वी ट्रेक तर होतच होते. या दरम्यान ‘दुर्ग दुर्गा’तील काही महिलांनी हिमालय पर्वतावर ट्रेक करू या, अशी मागणी केली. यातील सगळ्याच महिला हिमालय, मनाली ट्रेकसाठी शारीरिकदृष्ट्या तितक्या सक्षम नसल्याने फिटनेसला महत्त्व देत निवडीसाठी विविध निकष ठरविण्यात आले. यात कुणालाही हाडांचा, स्नायूंचा, श्वास घेण्यासंबंधी आजार नसावा, असे काही प्रमुख निकष होते. साधारणतः यातील काही निकष ट्रेकसाठी ‘दुर्ग दुर्गा’कडून कायम लावण्यात येत असतात. यानुसार 20 जणींना निवडण्यात आले आणि त्यांच्यासाठी विशेष प्रशिक्षणवजा तालमी देण्यात येऊ लागल्या. यात श्वासाचे विविध व्यायाम, कठीण ट्रेक करण्याचा सराव आदी गोष्टींची पूर्वतयारी 4 ते 5 महिने करून घेण्यात आली. हा ‘हिमालय-मनाली’ ट्रेकदेखील अतिशय उत्तम पद्धतीने कुणालाच कुठलाच त्रास न होता यशस्वी झाला. इथेही त्यांनी तीन स्थानिक वाटाडे ट्रेकसाठी सोबत घेतले होते. या सफरीतदेखील महिलांनी खूप मजा, मस्ती, धमाल करत अनेक सुखद अनुभव गाठीशी बांधले. आत्तापर्यंत झालेल्या ट्रेकमध्ये जवळपास 650 महिलांनी सहभाग नोंदवला आहे. रामशेज, हतगड, अंजनेरी, गाळणा किल्ला, कावनई, त्रिंगलवाडी, मार्कंडेय पर्वत, डुबेरेगड, मनाली आणि अचलागड असे 30 हून अधिक ट्रेक यशस्वीपणे झाले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यातील सर्व ट्रेक हे शुभदा देसाई यांच्या टीमने आधी केलेले असतात. हे सर्व ट्रेक सोपे आणि मध्यम आव्हानांचे असावे यासाठी प्रयत्न केला जातो. एखाद्या ठिकाणी ट्रेकला जायचे आहे, पण तिथली काठिण्य पातळी माहिती नसेल तर संयोजक शुभदा देसाई स्वतः आधी तो ट्रेक करून पाहतात, त्यातील बारकावे समजून घेतात, मगच ‘दुर्ग दुर्गा’चा ट्रेक तिथे न्यायचा की नाही ठरवले जाते. प्रत्येक ट्रेकला ’दुर्ग दुर्गा’च्या 15 कार्यकर्त्या सोबत असतात. या कार्यकर्त्या दरवर्षी नव्याने निवडल्या जातात. यात कार्यकर्त्या म्हणून काम करण्यासाठी महिला खूप उत्सुक असतात. ‘दुर्ग दुर्गा’ ग्रुपचे सध्या 825 सदस्य असून यापैकी बहुतांश महिला या 40 ते 60 या वयोगटातील आहेत. आयुष्याच्या मध्यावरील या वयात, कौटुंबिक जबाबदार्‍या पार पडलेल्या असतात, त्यामुळे महिलांना स्वतःसाठी काही वेळ देता येतो. या ग्रुपमध्ये गृहिणी, व्यावसायिक, नोकरदार महिलांसह युवतींचाही तुरळक समावेश आहे. 825 पैकी प्रत्येक महिला एकदा का होईना कुठल्या तरी ट्रेकला येऊन गेली आहे. काही महिला सातत्याने ट्रेकला येतात, तर काही जिथे जास्त साहस असेल अशाच ठिकाणी आवर्जून येतात. मात्र ’दुर्ग दुर्गा’मध्ये 45-50 वयोगटाच्या पुढच्या महिलांसाठी ’वॉकिंग स्टिक’ ही अनिवार्य करण्यात आली आहे, जेणेकरून चालताना, डोंगर चढताना काठीचा आधार असावा.
 
 
Trekking
 
बरं, ‘दुर्ग दुर्गा’ची विशेष अशी नियमावली असून यात वक्तशीरपणाला, शिस्तीला आणि घरच्या पदार्थांना फार महत्त्व आहे. इथे जंकफूड, कोल्ड्रिंक्सला अजिबात परवानगी नाही. ट्रेकचे आयोजन करताना, त्याचा मेसेज ग्रुपच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर टाकला जातो व नावनोंदणी आणि पेमेंट होते. बसची व्यवस्था केली जाते. जेथे ट्रेक करायचाय त्या भागातील अनुभवी मार्गदर्शकांची मदत घेतली जाते. या प्रवासासाठी ‘मुंबई नाका‘ आणि ‘चोपडा लॉन्च’ हे दोन थांबे असून येथूनच महिलांना सोबत घेतले जाते. ट्रेकची बस सकाळी बरोबर 6 वाजून 5 मिनिटांच्या ठोक्याला निघते. प्रत्येकीने आपला टिफिन घरून घेतलेला असतो.
 
 
vivek
 
विशेष म्हणजे पहाटे 5:30 वाजता दर ट्रेकची वेळ असतानादेखील या महिला मध्यरात्री अडीच-तीन वाजता उठून, घरातील रोजचे काम उरकून, घरातील मंडळींचा वेगळा स्वयंपाक नि ट्रेकसाठीचा वेगळा खास डबा तयार करून आणतात. मुख्य संयोजक शुभदा देसाई सांगतात की, जर आम्ही ट्रेकसाठी नियम घालून दिले नसते किंवा शिस्तीबाबत कठोर झालो नसतो, तर मागच्या सहा वर्षांत हे एवढे जिकिरीचे प्रत्येक ट्रेक इतके यशस्वी झालेच नसते. म्हणूनच आम्ही नियमांना अनुसरूनच वेळप्रसंगी कठोर पावलेदेखील उचलत असतो. ट्रेकिंग आणि कौन्सिलिंग या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी आवडीच्या आहेत. ट्रेकिंगच्या निमित्ताने सतत विविध प्रकारच्या महिलांशी संवाद होत असतो. ग्रुपमधल्या महिला माझ्याशी हक्काने मनमोकळे बोलत असतात. त्यांच्या अडचणी जाणून घेत गप्पांमधून विचार बदलायला, उपाय शोधायलादेखील माझ्याकडून मदत करता येते, हे माझे भाग्यच आहे.
 

vivek 
 
रोजच्या धकाधकीच्या जीवनातील ताणतणाव हे गडावरील मनाला प्रसन्न करणारे वातावरण, निसर्गाची मुक्तहस्ते रंगरूपाची उधळण पाहून दूर होतात. गडावरील सौंदर्य पाहून भारलेले मन घेऊनच खाली आल्याशिवाय आपण राहत नाही. मनाची प्रसन्नता वाढते आणि ताणतणाव निवळायला मदत होते. दुर्ग सर करणार्‍यांना श्वसन, रक्तप्रवाह, गुडघे, छाती, पोट असे आजार होण्याची शक्यता फार कमी असते. आपल्या वैद्यकशास्त्रातदेखील याचे संदर्भ आढळतात. ’दुर्ग दुर्गा’च्या माध्यमातून ट्रेक आपल्यालाही जमू शकतो, हा आत्मविश्वास रुजला आहे, रुजतो आहे. यातील कित्येकींना फिजिकल फिटनेसचं महत्त्व आपोआप समजायला लागलं आहे. यातील कित्येक महिलांना घरातून पूर्वी ट्रेकिंगसाठी परवानगी मिळत नव्हती; पण आजच्या घडीला ’दुर्ग दुर्गा’विषयी आणि महिलांच्या ध्येयाविषयी त्यांच्या कुटुंबीयांच्या मनातदेखील विश्वास निर्माण झाला आहे. इतकेच नव्हे तर मार्च 2020 ते जून 2022 दरम्यान कोरोनामुळे ट्रेकिंग बंद ठेवावे लागले होते. त्या दरम्यान सहभागी महिलाच काय, पण त्यांच्या कुटुंबीयांनादेखील करमत नव्हते. त्यांनाही त्या वेळी असे झालेले की, कधी पुन्हा ट्रेकिंग सुरू होईल.
 
 
 
‘लोग पुछते है की क्या रखा है वो पहाडीओ मे, लेकीन क्या बताये की, वो सहारा है हम महिलाओंका... ’दुर्ग दुर्गा’मुळे महिलांना मोकळे आकाश मिळाले आहे, काहींचे आयुष्य बदलले आहे. यातूनच महिलांची सक्षमता शारीरिक आणि मानसिक सुदृढतेतूनच निर्माण होते, याची प्रचीती ’दुर्ग दुर्गा’त सहभागी सर्व नाशिककर महिला घेत आहेत.