सरला ठुकराल

विमान उडवणारी पहिली भारतीय महिला (8 ऑगस्ट 1914 - 15 मार्च 2008 )

विवेक मराठी    08-Apr-2024   
Total Views |
 
जागतिक आकडेवारीनुसार एकूण वैमानिकांमध्ये महिला वैमानिकांचं प्रमाण 5.8 टक्के आहे; पण महिला वैमानिकांच्या बाबतीत भारतानं जागतिक सरासरीला मागे टाकलं आहे. भारतात महिला वैमानिकांचं प्रमाण 12.4 टक्के आहे, जे जगात सर्वाधिक आहे. सरला ठुकराल या वयाच्या 22 व्या वर्षी पहिल्या व्यावसायिक भारतीय महिला पायलट बनल्या. 15 मार्च हा त्यांचा स्मृतिदिन. त्या दिनाच्या पार्श्वभूमीवर हा लेख.

vivek
 
विमान उड्डाण क्षेत्रातील अगदी सुरुवातीच्या काळातील भारतीय महिलांच्या नावांचा विचार करताना जी नावं चटकन डोळ्यासमोर येतात, त्यात आहेत प्रेम माथूर, दुर्बा बॅनर्जी आणि पद्मावती बंदोपाध्याय. 1947 मध्ये कमर्शियल पायलट बनलेल्या माथूर या पहिल्या भारतीय महिला वैमानिक, तर दुर्बा बॅनर्जी या 1956 मध्ये नियुक्त झालेल्या इंडियन एअरलाइन्सच्या पहिल्या महिला पायलट आणि पद्मावती बंदोपाध्याय या 2002 साली एअर व्हाइस मार्शल पदावर बढती मिळालेल्या भारतीय वायुसेनेच्या पहिल्या महिला अधिकारी.
 
या तिघींनी विमानोड्डाणाच्या क्षेत्रात आपली प्रतिमा निर्माण केली आणि आपल्याप्रमाणेच लाखो इतर भारतीय महिलांसाठी ते क्षेत्र खुलं केलं; पण माथूर, बॅनर्जी आणि बंदोपाध्याय यांच्यासारख्या महिला वैमानिकांचा मार्ग मोकळा करणारी त्याआधीची महिला होती सरला ठुकराल, जिचं नाव फारसं कुणाच्या ध्यानातही नाही; अगदी गुगलच्यादेखील. वृंदा झवेरी या कलाकारानं गुगल डुडल बनवलं ते सरला ठुकराल यांच्या 107 व्या जन्मदिनी. बहुधा त्यांच्या वयाची शंभरीदेखील गुगलच्या लक्षात आली नाही.
 
सरला ठुकराल यांचा जन्म 1914 सालचा, नवी दिल्लीमधला. त्यांच्या कुटुंबीयांविषयी, त्यांच्या बालपणाविषयी, त्यांच्या शालेय वा महाविद्यालयीन शिक्षणाविषयी फारशी माहिती कुठेच उपलब्ध नाही. माहिती मिळते ती इतकीच, की त्या ‘मति‘ या टोपणनावानं ओळखल्या जात असत. वयाच्या 16 व्या वर्षी सरलाचं लग्न लाहोरमधील पी. डी. शर्मा यांच्याशी झालं इतकीच माहिती मिळते. शर्मा स्वतः एअरमेल पायलट लायसन्स मिळालेले तत्कालीन अविभक्त भारतातले पहिले भारतीय पायलट होते. कराची ते लाहोर या दरम्यान एअरमेल नेण्या-आणण्याचं ते काम करीत.
 
शर्मा यांच्या घरात ते धरून एकूण नऊ पायलट होते. लग्नानंतर सरलानेही विमानोड्डाणाचं प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली आणि वयाच्या 21 व्या वर्षी, 1935 साली साडी नेसून कॉकपिटमध्ये बसून दुहेरी पंखाचं विमान तिनं एकटीनं उडवलं. त्या काळात ज्या मोजक्या महिलांनी विमानोड्डाणासाठीचं ‘ए‘ लायसन्स मिळवलं त्यात इम्तियाझ अली एक होत्या. त्यांना जून 1936 मध्ये लायसन्स मिळालं; पण भारतीय राष्ट्रीयत्व असलेली ए लायसन्स मिळवणारी पहिली महिला होती उर्मिला पारिख. तिला जून 1932 मध्ये लायसन्स मिळालं. सिला आणि रोडाबेन टाटा या जे.आर.डी. टाटांच्या बहिणींना ए लायसन्स मिळालं ते त्याच्याही आधी, 1929 साली; परंतु त्या दोघींचं राष्ट्रीयत्व ब्रिटिश होतं. सिला यांनीही एक हजार तासांचं उड्डाण पूर्ण केलं होतं; परंतु यातल्या कुणीही व्यावसायिक उड्डाण कधीच केलं नव्हतं, त्यामुळे सरला यांच्या उड्डाणाचं महत्त्व वाढतं.
 
गुगलनं साडी परिधान केलेले त्यांचे छायाचित्र डुडलवर वापरले. वृत्तपत्रांनीही त्यांच्या उड्डाणाचं ‘ग्राऊंडब्रेकिंग‘ या शब्दात भरभरून कौतुक केलं. लायसन्स मिळवताना सरला यांनी जिप्सी मॉथ जातीचं दोन आसनी विमान उडवलं होतं; परंतु एकदा लायसन्स हाती आल्यावर त्यांना लाहोर फ्लाइंग क्लबच्या मालकीचं विमान उडवण्याची संधी मिळाली आणि तिचा पुरेपूर फायदा उठवत एक हजार तासांचं उड्डाण पूर्ण करून मे 1936 मध्ये सरला यांनी ‘ए‘ लायसन्स मिळवलं. हे लायसन्स मिळालं तेव्हा सरला चार वर्षे वयाच्या मुलीची आई होत्या.
 
हे लायसन्स मिळवण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट इतके टोकाचे होते, की फक्त आठ तास आणि दहा मिनिटांच्या प्रशिक्षणानंतर एकट्यानं उड्डाण करण्यास त्या सक्षम असल्याचा निर्वाळा त्यांच्या प्रशिक्षकानं दिला होता. त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीची वृत्तपत्रांनी तर प्रशंसा केलीच, परंतु आता अवकाशावर केवळ पुरुषांचा एकाधिकार राहिलेला नाही, असे मत स्पष्टपणे नोंदवत भविष्यातील महिलायुगाच्या नांदीचे संकेतही दिले होते.
 
 
’ए’ लायसन्स मिळवल्यानंतर ’बी’ लायसन्स घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. दुर्दैवाने 1939 मध्ये एका उड्डाणादरम्यान शर्मा यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर सरलानं कमर्शियल पायलट लायसन्स मिळावं यासाठी अर्ज केला; परंतु दुसरं जागतिक महायुद्ध सुरू झालं होतं, नागरी उड्डाणांना स्थगिती मिळाली होती. मुलगी लहान असल्यानं सरलानं कमर्शियल पायलट बनण्याचा विचार सोडून दिला आणि त्या लाहोरला परतल्या. तिथल्या मेयो स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि बेंगाल स्कूल ऑफ पेंटिंग शिकत डिप्लोमा इन फाइन आर्ट्सचं शिक्षण पूर्ण केलं.
 
सरला ठुकराल आर्य समाजी होत्या. वेदांचं अध्ययन व अनुसरण करणारं त्यांचं कुटुंब होतं. पुनर्विवाहाला त्यांच्या समाजात मान्यता होती. सरला दोन मुलींसह दिल्लीला परत आल्या आणि आर. पी. ठुकराल यांच्याशी परिचय होऊन त्या 1948 साली विवाहबद्ध झाल्या. तब्बल साठ वर्षे त्यानंतर त्या जगल्या. एक यशस्वी उद्योजिका, चित्रकार आणि कपडे तसेच दागिने डिझायनर म्हणून त्यांनी नाव कमावलं. त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामासाठी ज्वेलरी मेकिंग, साडी डिझायनिंग, पेंटिंग आणि डिझायनिंगची कामं यशस्वीपणे हाती घेतली. त्यांची एक ग्राहक होती विजयालक्ष्मी पंडित! त्या म्हणत, मी कॉस्च्युम आणि ज्वेलरी डिझाईन करण्यात व्यग्र होते, जे काम मी कॉटेज एम्पोरियमसाठी 15 वर्षे केले. त्यानंतर मी ब्लॉक प्रिंटिंगला सुरुवात केली. मी डिझाइन केलेल्या साड्यांना चांगली मागणी असे. हे कामदेखील 15 वर्षे चालू राहिले. मग मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामासाठी डिझाइन करायला सुरुवात केली आणि सोबतच मी पेंटिंग करत राहिले.
 
सरला ठुकराल हा आत्मविश्वासाने भरलेला भारतीय स्त्रीचा नवा चेहरा होता. धैर्य आणि दृढनिश्चयाची ताजी झुळूक तिच्या व्यक्तित्वातून प्रकटत असे, जिनं पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली. त्या म्हणत असत, नेहमी आनंदी राहणं खूप महत्त्वाचं आहे. या एका ध्येयानं मला माझ्या आयुष्यातील संकटांवर मात करण्याची हिंमत दिली. 15 मार्च 2008 ला वयाच्या 94 व्या वर्षी त्यांचं निधन झालं.

सुधीर जोगळेकर

  सुधीर जोगळेकर हे ज्येष्ठ पत्रकार आहेत..