पाहावा नायजेरिया

विवेक मराठी    08-Apr-2024
Total Views |
@शिल्पा श्रीकांत भावे
 अमेरिका, इंग्लंड, युरोप अशा प्रसिद्ध देशांवर अनेक प्रवासवर्णने वाचायला मिळतात; पण एक असा देश ज्याबद्दल मी तरी फारशी पुस्तके बघितली नाहीत. ते नाव म्हणजे नायजेरिया. हे नुसतंच प्रवासवर्णन नाही, तर ही लेखकाची एक छोटीशी कहाणी आहे. फारसा नावारूपाला न आलेला असा हा नायजेरिया. लेखक राजेश कापसे यांनी आरोग्य विभागातील नोकरी करून तिथली माणसं, परंपरा, चालीरीती समजून घेऊन हे पुस्तक लिहिले आहे.
 
book
 
 
नायजेरियातील एका भारतीय संस्थेतील सार्वजनिक आरोग्य केंद्रातून हा प्रवास सुरू होतो. विमानाने नायजेरियाला पोहोचल्यानंतर आवश्यक असणार्‍या वस्तूंबद्दलची माहिती करून घेताना लगेचच लक्षात येतो तो भारतीयांबद्दल नायजेरियन लोकांना असलेला आदर आणि कुतूहल. कलाबालमधून नोकरीची सुरुवात झाल्यानंतर लक्षात यायला लागलं की, इथली आरोग्य व्यवस्था ही फारशी काही चांगली नाही, कारण आरोग्य केंद्र बघताना प्रकर्षाने जाणवलेल्या दोन गोष्टी म्हणजे वीज आणि पाण्याचा अभाव. झरिया, कलाबार, योला अशा अनेक ठिकाणी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील पीपीपी मॉडेलमधल्या कामात सक्रिय काम केलं आहे. कलाबारनंतर झारियामध्ये गेल्यानंतर समजून घेतली ती तिथली भाषा. आपल्याकडे प्रामुख्याने जशी हिंदी भाषा बोलली जाते तशी उत्तरेकडील साधारण सर्व राज्यांत हौसा भाषा बोलली जाते.
 
आपल्याकडे लग्नात काही ठिकाणी अजूनही मुलीकडून हुंडा घेण्याची प्रथा दिसून येते; पण नायजेरियामध्ये मुलींना भावी संसारासाठी लागणार्‍या वस्तू विकत घेण्याकरिता मुलाकडच्यांनी मुलीला हुंडा देण्याची पद्धत आहे. मुलगी ही आपल्याच कुटुंबाचा एक भाग आहे, ही भावना लक्षात घेण्यासारखी आहे. वंशाला दिवा (मुलगा) च हवा, असा हट्ट इथल्या लोकांमध्ये दिसून येत नाही म्हणूनच कदाचित स्त्री भ्रूणहत्या ऐकिवात नाही. हा एक सामाजिक बदल आपल्याला वाचायला मिळतो.
 
प्रत्येक देश, राज्याची खाद्यसंस्कृती असते. तसंच नायजेरियातील पारंपरिक पदार्थ म्हणजे गारी. आपल्याकडे केल्या जाणार्‍या उपम्यासारखा हा पदार्थ करतात. बेन्वे हे नायजेरियातील उत्तर-मध्य भागातील एक कृषीप्रधान राज्य आहे. या राज्याला नायजेरियाचे फळांचे आगार संबोधले जाते.
 
आपल्याकडे असलेल्या नृत्य प्रकारांसारखेच इग्योह, स्वानगे, अँगे असे विविध नृत्य प्रकार आहेत. कठपुतळीसारखा क्वाहिर या नाट्याविष्कारातून विविध प्रकारच्या प्रबोधनपर गोष्टींमधून मनोरंजन केले जाते.
 
  
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आपल्याकडे जशी स्वागतयात्रा काढली जाते तसा नायजेरियातला कलाबार कार्निव्हल. सगळ्यांनी एकत्र येऊन आनंद साजरा करणे इतकाच त्यामागचा हेतू. इंग्लंड असो वा अमेरिका, पाश्चात्त्य देशांमध्ये भारतीय लोकांचे एखादे तरी मराठी मंडळ असतं. तसंच नायजेरियातही अनेक मराठी मंडळी आहेत आणि लेगॉस शहरात त्यांचं एक मराठी मंडळही आहे हे वाचूनही आपल्याला सुखद धक्का बसतो.
 
नायजेरियातील होणारी गुलामगिरी ही खूप भयानक आहे. तेथे दिली जाणारी वागणूक वाचतानाच अंगावर काटा येतो, तर त्याचे पुस्तकात दिलेले चित्र बघण्याचे धाडसही होत नाही. ‘स्लेव्ह म्युझियम’ या प्रकरणात इ. स. 1864 मध्ये जॉर्डन नावाच्या व्यक्तीने तब्बल 32 वर्षे गुलाम म्हणून काम केले होते. त्याने त्याच्या जुन्या मालकाला (मास्टरला) ‘टू माय ओल्ड मास्टर एका मुक्त गुलामाचे त्याच्या मालकाला पत्र’ असे एक सुंदर पत्र लिहिले आहे. तो म्हणतोे, मी गुलामगिरीतून मुक्त झाल्याचे रीतसर कागदपत्र मला सरकारकडून मिळाले आहे. आता मी एक स्वतंत्र, मुक्त व्यक्ती आहे. पुढे तो म्हणतो, मी आणि माझ्या पत्नीने तुमच्याकडे केलेल्या कामाचा इतका मोबदला होतो आहे. त्यात आजपर्यंतचे व्याज जोडा आणि आमच्या कपड्यांवर, आमच्या आजारपणात केलेला खर्च या सगळ्याचा हिशोब करून उरलेली रक्कम ताबडतोब पाठवून द्या. एक गुलाम असूनही त्याने त्याच्या मालकाशी केलेल्या आदर्श व्यवहाराचे हे एक सुंदर उदाहरण आहे. स्लेव्ह म्युझियमच्या निमित्ताने समजणारा आफ्रिकेतील गुलामगिरीचा कलंकित इतिहास वाचताना मनाला यातना होतात. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय या सगळ्याचा प्रत्यक्ष अनुभव घेत राजेश कापसे यांनी नायजेरियाबद्दलचे कुतूहल, नायजेरिया बघण्याची उत्सुकता या पुस्तकात मांडली आहे.
 
 
पुस्तकाच्या मुखपृष्ठावरून फळबागा, शेती, खनिज आणि तेलाचा साठा, भव्य बंदरे अशा अनेक गोष्टींनी भरभराट असलेला देश लक्षात येतो, तर मलपृष्ठावरून नायजेरियातील दारिद्य्र आणि आर्थिक शोषण दिसून येते.
 
• पुस्तकाचे नाव - नायजेरिया
 
• लेखक - राजेश कापसे
 
• पुस्तक प्रकाशक - सायली क्रिएशन्स
 
• पृष्ठसंख्या - 133
 
• किंमत - 200/-