धर्मभास्कर छत्रपती संभाजी महाराज

विवेक मराठी    13-May-2024
Total Views |
 @अरुणचंद्र पाठक
 छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर तसेच अत्यंत परम तेजस्वी महापुरुष होते.म्हणून त्यांचे चरित्र व बलिदान संपूर्ण राष्ट्रासाठी चिरंतन प्रेरणादायी ठरणारे आहे.
 
vivek
 
प्राचीन संस्कृतीला व परंपरेला इस्लामिक आक्रमणानंतर धक्का बसला. विशेषत: रूढ असलेल्या परंपरा व श्रद्धास्थाने उद्ध्वस्त करून धर्मप्रचार करण्यास प्रारंभ झाला. या बाबीचा जाहीर प्रतिवाद करण्याचा प्रयत्न ‘नारदस्मृती’मध्ये प्रथम झालेला दिसतो; तर विद्यारण्य स्वामी यांनी मोहम्मद तुघलक याने बाटवलेले हरिहर व बुक्क यांना पुन्हा हिंदू धर्मात घेऊन त्यांच्या हस्ते विजयनगर साम्राज्याची स्थापना केली. (इ.स. 1336) त्यानंतर दुसरे ठळक उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले सरसेनापती नेताजी पालकर यांना शुद्ध करून घेऊन पुन्हा हिंदू धर्मामध्ये घेऊन महत्त्वाचे स्थान मिळवून दिले. हीच परंपरा छत्रपती संभाजी महाराजांनी पुढे चालविली. छत्रपती संभाजी महाराजांनी अत्यंत धैर्याने 11.03.1689 रोजी मृत्यू स्वीकारला. या संदर्भामध्ये स्वधर्माचा जाज्वल्य अभिमान व हिंदवी स्वराज्यस्थापनेसाठी व धर्मस्थापनेसाठी शिवरायांनी दाखविलेला मार्ग त्यांनी प्रशस्त केला व अन्यायाविरुद्ध लढताना त्यांनी आपल्या प्राणाची पर्वा केली नाही. त्यांचे हे बलिदान किती प्रेरणादायी होते याची साक्ष पुढे पंचवीस वर्षे, प्रत्यक्ष राजा नसतानासुद्धा महाराष्ट्राने औरंगजेबाविरुद्ध जो लढा दिला त्यातून मिळते.
 
 
छत्रपती संभाजी महाराजांचे संपूर्ण जीवन हे संकटाशी लढण्यासाठीच असावे असे वाटते. त्यांचा जन्म 14.05.1656 रोजी राणीसाहेब सईबाईंच्या पोटी झाला; पण त्यांना मातृसुख लाभले नाही. सईबाईसाहेब यांचा मृत्यू झाल्याने धाराबाईच्या दुधावर ते वाढले. वयाच्या आठव्या वर्षी 75 हजारांची मनसब स्वीकारण्याचा व आग्राभेटीचा प्रसंग त्यांच्यावर ओढवला. छत्रपती शिवराय गेल्यानंतर 20.06.1680 रोजी त्यांनी मंचकारोहण केले, तर 09.12.1680 रोजी त्यांचा राज्याभिषेक झाला. सर्व प्रतिकूल परिस्थिती असतानाही ते अत्यंत संयमाने वागले. त्यांना विष देण्याचा प्रयत्न झाला, तर त्यांच्याविरुद्ध बंडाचा प्रयत्नही झाला. याचा परिणाम म्हणून शेवटी अण्णाजी दत्तो, हिरोजी फर्जंद, बाळाजी आवजी यांना हत्तीच्या पायी दिले गेले. एका विशिष्ट मनःस्थितीत असताना संभाजी राजांनी औरंगजेबाचा पुत्र अकबर याला राजाश्रय देऊन मोगली सत्तेला आव्हान दिले. यवनाधिपती औरंगजेब याला कारागृहात अडकवणे, देवाची स्थापना करून सर्व धर्म व्यवस्थित चालू राहावा, ही त्यांची महत्त्वाकांक्षा होती. इतिहासकार सरदेसाईंनी नोंद केल्याप्रमाणे सिंहासारखे शूर अशा संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या बाबतीत कुठेही कचखाऊ धोरण स्वीकारलेले नाही. मोघल सैन्यातील अनेक रथी, महारथी यांना त्यांनी लोळवले. पोर्तुगीजांशी त्यांनी झुंज दिली. असे असताना 1.02.1689 रोजी शुक्रवारी ते रायगडकडे निघाले असताना, संगमेश्वर येथे ते पकडले गेले. तसेच कवी कलशासह अन्य काही साथीदारही पकडले गेले. या वेळी शेख निजाम मुक्रर खान याला शिर्क्यासारख्या स्वकीयांनी मदत केली. छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भात काफिखान यांनी स्पष्ट लिहिले आहे की, दक्षिण बंधाच्या प्रमुख प्रवर्तकास मारण्याची संधी औरंगजेब शोधत होता. त्यामुळेच या संदर्भात राजांनी सर्व गडकोट, किल्ले हवाली केले तरी जीवदान द्यावे यासारखी कुठलीही अट वा दरबारी सल्ला त्याने मानला नाही. त्याने हुकूम केला की, दोघांच्याही जिभा कापून टाका म्हणजे ते अपमानास्पद बडबड करणार नाहीत. नंतर डोळे काढण्याची आज्ञा केली व त्यानंतर पकडलेल्या महाराजांच्या सहकार्‍यांना क्रूर यातना देऊन मारले. शेवटी संभाजी महाराज व कवी कलश यांचे शिर कापून व कातडी सोलून त्यांच्या कलेवरांना वाद्य व तुतार्‍या वाजवून परिसरातील लहानमोठ्या शहरांत मिरवण्याचा हुकूम झाला. या सर्व प्रकारांत छत्रपती संभाजी महाराजांनी दाखविलेले धैर्य हे फार असामान्य होते. मोघली सत्तेपुढे मन न झुकवता, कठोर निश्चयाने हिंदवी स्वराज्यासाठी ते अग्निदिव्यास सामोरे गेले. परिणामी इ.स. 1707 पर्यंत संघर्ष करूनसुद्धा मराठी माणसांनी औरंगजेबाला दाद दिली नाही. या महाराष्ट्र भूमीनेच त्याला गिळंकृत करून टाकले. असा ’स्वधर्म निधनं श्रेये:’ अशी शिकवण स्वत:च्या अद्वितीय अशा आचरणातून छत्रपती संभाजी महाराजांनी महाराष्ट्राला दिली.
 
 
छत्रपती संभाजी महाराजांनी शेवटच्या क्षणी आपले राष्ट्रतेज प्रगट केले नाही तर एकूण त्यांच्या नऊ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी संघर्ष केला. एकीकडे मोघल सत्ता, पोर्तुगीज, सिद्धी या सर्वांना त्यांनी अंगावर घेतले व स्वधर्माभिमानाची ज्योत ही त्यांनी तेवत ठेवली. त्यांचा स्वधर्मविषयक अभिमान कसा जागृत होता याविषयीचे त्यांचे दिनांक 16.03.1686 चे एक पत्र उपलब्ध आहे. तत्कालीन मोगली सत्तेच्या आधिपत्याखाली असलेल्या औरंगाबाद (संभाजीनगर) प्रांतातील कस्बे हर्सूल येथील गंगाधर रंगनाथ कुलकर्णी यास मोगलांनी बळजबरीने बाटवले. त्यास तीन महिने कैदेत ठेवले. या काळात अन्नोदक संपर्क झाला. नंतर मनसब देऊन सात वर्षांपर्यंत चाकरीत ठेवले. मनसब व सत्ता मिळाली असली तरी धर्मांतर करावे लागले याची खंत असल्यामुळे गंगाधरपंत सतत पुन्हा स्वधर्मात येण्याचा हट्ट करीत होता. यासाठी त्याने अनेकदा रायगड येथे चकरा मारून प्रायश्चित्त घेण्याचा प्रयत्न केला. यासाठी कलुषा कबजी (कवी भूषण) याने मध्यस्थी करून ही बाब छत्रपती संभाजी महाराजांच्या नजरेस आणून दिली. तेव्हा तत्काळ राजांनी वृत्तनिवेदन करून प्रायश्चित्तविषयक आज्ञा केली. त्यानुसार उपाध्ये मोरेश्वर पंडितराव यांनी छंदोगभाष्य यांच्या सभेत वैदिकांच्या संमतीने मिताक्षरा या ग्रंथातील निबंध पाहून प्रायश्चित्तविषयक संकल्प सांगितला व त्यांना त्र्यंबकेश्वर येथे पाठवून तेथे 307 प्रदक्षिणा करण्यास सांगितले व त्या पूर्ण केल्यावर त्याची सत्यता पडताळून त्यास गंगाधर या पूर्वीच्या नावाने शुद्ध करून घेतले, हा वृत्तांत कवी कलशास सांगण्यात आला. त्या वेळी कारकून, न्यायाधीश यांच्या अनुमतीने पंक्तीस भोजन देऊन शुद्ध पत्र देण्यास आज्ञा केली. ’जो कोणी त्यांच्या ब्राह्मण्याविषयी संदेह मानेल तो देव, ब्राह्मण द्वेष असलेला व महापातकी जाणिजे’ असे मोरेश्वर पंडितराव यांनी 16 मार्च 1686 रोजी देशमुख, देशपांडे, ज्योतिषी, उपाध्ये व समस्त वेदमूर्ती कस्बे हर्सूल प्रांत औरंगाबाद तसेच समस्त महाराष्ट्र कोंकण, देशस्थ विद्वान गृहस्थांना पत्र पाठविले (याचे साक्षीदार पंडित शास्त्री अष्टप्रधान होते.) हे मूळ पत्र शंकर नारायण जोशी यांनी संभाजीकालीन पत्रसंग्रह, भारत इतिहास संशोधन मंडळ, पुणे शके 1871 (इ.स. 1949 रोजी प्रकाशित केलेले आहे. त्याचा पत्र क्रमांक 189 हा आहे.) यावरून छत्रपती संभाजी महाराजांची वीरवृत्ती, धर्मविषयक श्रद्धा व स्वराज्यनिर्मितीच्या मूळ संकल्पनेवर त्यांची असलेली निष्ठा स्पष्ट करते. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर तसेच अत्यंत परम तेजस्वी महापुरुष होते.म्हणून त्यांचे चरित्र व बलिदान संपूर्ण राष्ट्रासाठी चिरंतन प्रेरणादायी ठरणारे आहे.