भारतीय निवडणूक प्रक्रियेचे दर्शन विदेशी शिष्टमंडळाला

विवेक मराठी    13-May-2024
Total Views |
@विजय चौथाईवाले
भारत ही लोकशाहीची जननी आहे आणि भाजपा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे. भारतातील लोकसभा निवडणुकीबद्दल जगभर कुतूहल आहे. म्हणूनच भाजपाचा प्रचार आणि प्रसार कसा होतो हे विविध देशांतील राजकीय पक्षांना दाखवण्याची एक योजना तयार करण्यात आली. त्यानुसार अनेक विदेशी राजकीय पक्षांना भाजपाद्वारे निमंत्रण देण्यात आले. 10 देशांमधील 18 राजकीय पक्षांनी या निमंत्रणाचा स्वीकार केला.
 
political
 
दोन वर्षांपूर्वी भाजपा स्थापना दिवसाच्या मुहूर्तावर भाजपा अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी एका विशेष कार्यक्रमाची सुरुवात केली. त्याचे नाव Know BJP असे आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश भारताबाहेरच्या जगाला भाजपाची माहिती करून देणे हा आहे. या कार्यक्रमाचे नियोजन करण्याची जबाबदारी भाजपाच्या विदेशी विभागाला देण्यात आली.
 
 
या कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत अनेक नवीन उपक्रम करण्यात आले आहेत. त्यातील सर्वात प्रमुख उपक्रम म्हणजे भारतात जे विदेशातील राजदूत आहेत, त्यांना छोट्या छोट्या गटांमध्ये भाजपा कार्यालयात बोलावणे आणि राष्ट्रीय अध्यक्षांसोबत त्यांचा मुक्त संवाद आयोजित करणे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुमारे 70 देशांच्या नवी दिल्लीस्थित राजदूतांनी भाजपा कार्यालयात येऊन नड्डाजींसोबत संवाद केला.
 
 
याशिवाय काही देशांच्या राष्ट्रप्रमुखांचीही नड्डा यांनी भेट घेतली. अन्य काही प्रमुख राजकीय नेत्यांनाही भाजपाद्वारा आमंत्रण दिले गेले. उदाहरणार्थ सध्याचे नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल उर्फ प्रचंड हे विरोधी पक्षनेते असताना भाजपाच्या निमंत्रणावरून खास भारतभेटीसाठी आले होते. या भेटीमुळे त्यांचे भाजपासंबंधीचे अनेक गैरसमज दूर झाले.
 

political 
 
याच उपक्रमांंतर्गत भाजपाने विदेशातील अनेक राजकीय पक्षांच्या शिष्टमंडळाला भारतभेटीसाठी आमंत्रण दिले होते. त्यात दक्षिण आफ्रिकेहून आफ्रिकन नॅशनल काँग्रेस, टान्झानियाची सत्ताधारी पार्टी, बांगलादेशची अवामी लीग, नेपाळमधील नेपाळी काँग्रेस आणि माओवादी, अशा अनेक पक्षांचा समावेश होता.
 
 
याच उपक्रमाचा पुढचा भाग म्हणून गेल्या दोन वर्षांत झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपा प्रचार कसा करतो हे दाखवण्यासाठी भारतात असलेल्या दूतावासांमधील अधिकार्‍यांचे छोटे शिष्टमंडळ भाजपाद्वारा या राज्यांमध्ये नेण्यात आले. तेथे या शिष्टमंडळाने भाजपाच्या प्रचाराची व्याप्ती आणि नियोजन याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
 
 
भारत ही लोकशाहीची जननी आहे आणि भाजपा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे. त्यामुळे भारतातील लोकसभा निवडणुकीबद्दल जगभर कुतूहल असणे स्वाभाविकच आहे. त्यामुळे विविध देशांतील राजकीय पक्षांना भाजपाचा प्रचार आणि प्रसार कसा होतो हे दाखवण्याची एक योजना तयार करण्यात आली. त्यानुसार अनेक विदेशी राजकीय पक्षांना भाजपाद्वारे निमंत्रण देण्यात आले. 10 देशांमधील (ऑस्ट्रेलिया, व्हिएतनाम, रशिया, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, इस्रायल, युगांडा, टांझानिया व मॉरिशस) 18 राजकीय पक्षांनी या निमंत्रणाचा स्वीकार केला. काही पक्ष त्यांच्याच देशात निवडणुका असल्यामुळे येऊ शकले नाहीत. या कार्यक्रमांमध्ये फक्त सत्तारूढ पक्ष नव्हे, तर विरोधी पक्षांनाही निमंत्रण देण्यात आले.
 

political 
 
हे सर्व प्रतिनिधी 1 मेपर्यंत नवी दिल्लीत येऊन दाखल झाले. त्याच दिवशी दुपारी भाजपा कार्यालयामध्ये त्यांची प्राथमिक बैठक घेण्यात आली. त्यात भाजपाचा एक माहितीपट (डॉक्युमेंटरी) दाखवल्यानंतर निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाची भूमिका आणि त्यांचे अधिकार त्याचप्रमाणे आचारसंहितेविषयीही माहिती देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यापक जनसंपर्कामध्ये ‘नरेंद्र मोदी अ‍ॅप’चा फार मोठा वाटा आहे. या राजकीय नेत्यांना नरेंद्र मोदी अ‍ॅप दाखवण्यात आले. त्या अ‍ॅपमधील विविध पैलू बघून हे शिष्टमंडळ आश्चर्यचकित झाले. त्यानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी भाजपाचा वचननामा तयार करण्यामागची भूमिका, प्रयत्न आणि भाजपाने काय वचने दिली आहेत याची सविस्तर मांडणी केली. त्यानंतर या शिष्टमंडळाने राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, विदेशमंत्री डॉ. एस. जयशंकर आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना भेटून त्यांच्यासोबत मुक्त चर्चा केली.
 
 
 
दुसर्‍या दिवशी या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाचे तीन गट करण्यात आले व एक अहमदाबादला, दुसरा रायपूरला, तर तिसरा भोपाळला गेला. या तिन्ही ठिकाणी चालू असलेला भाजपाचा प्रचार-प्रसार दाखवणे, हा एक मुख्य उद्देश होता. सर्व ठिकाणी पारंपरिक पद्धतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. गुजरातमध्ये गेलेल्या शिष्टमंडळाने आणंद येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. एवढी मोठी सभा त्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच बघितली असावी. जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद बघून त्यांना अतिशय विस्मय वाटला. त्याच प्रकारे मध्य प्रदेशात गेलेले शिष्टमंडळ राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांच्या सभेला उपस्थित राहिले आणि त्यांनाही हाच अनुभव आला. याव्यतिरिक्त तिन्ही शिष्टमंडळांनी भाजपच्या उमेदवारासोबत दोन-तीन तास राहून उमेदवार प्रत्यक्ष प्रचार कसा करतो, छोट्या सभांना कसे आवाहन करतो आणि घरोघरी जाऊन प्रचार कसा करतो याचाही प्रत्यक्ष अनुभव घेतला. भाजपाच्या त्या राज्यातील निवडणूक कार्यालयांना भेट देणे, भाजपाचे निवडणूक तंत्र कसे सांभाळले जाते आणि त्यात समन्वय कसा साधला जातो, भाजपाची मीडिया वॉर रूम तसेच सोशल मीडियाबद्दलही या शिष्टमंडळांना माहिती देण्यात आली. तिन्ही राज्यांतील त्या त्या राज्यांचे मुख्यमंत्रीदेखील या शिष्टमंडळांना भेटले आणि ‘राज्यातील राजकीय परिस्थिती आणि भाजपाचा प्रचार’ या विषयावर विस्तृत चर्चा केली.
 
 
या सर्व कार्यक्रमांमुळे भाजपाच्या प्रचार यंत्रणेचा प्रत्यक्ष अनुभव या शिष्टमंडळाला आला. भाजपाच्या प्रचाराची व्याप्ती, भारताची लोकसंख्या आणि एकेका मतदारसंघात असलेले मतदार हे सर्वच या प्रतिनिधींसाठी आश्चर्यजनक होते. निवडणूक प्रचारातील एवढी सखोल रचना, योजना आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी हाही अनुभव त्यांच्यासाठी नवीन होता. आम्ही आमच्या निवडणुकांमध्ये यापैकी बर्‍याचशा गोष्टी करत नाही, असे अनेकांनी प्रांजळपणे नमूद केले आणि या कार्यक्रमातून मिळालेले धडे काही प्रमाणात का होईना, पण आम्ही प्रत्यक्षात अमलात आणण्याचा प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया ही बर्‍याच प्रतिनिधींकडून ऐकायला मिळाली.