देवराईची यात्रा

विवेक मराठी    13-May-2024
Total Views |
@प्रणव पाटील 9850903005
 
yatra
डोंगरदर्‍यांमध्ये देवाच्या नावानं टिकून राहिलेल्या वनाला देवराई म्हणून ओळखलं गेलं. या देवराई कधी आणि कुणी लावल्या याचा शोध अजूनही लागत नाही. प्राचीन साहित्यात वाटसरूंच्या विश्रांतीचं ठिकाण म्हणून अशा वनांचा उल्लेख सापडतो. एकविसाव्या शतकातही श्रद्धेच्या जोरावर अशा देवराई टिकून आहेत. अशाच एका मावळ खोर्‍यातील देवराईच्या यात्रेविषयी पाहू या.
 
चैत्र महिना उगवला की आपल्याकडे गावोगावच्या यात्रा-जत्रांची लगबग सुरू होते. ज्याच्या भरवशावर गावशिवार वसलं त्या ग्रामदेवतेचा हा उत्सव असतो. अशा यात्रा-जत्रा बघायला, त्यात सामील व्हायला गावोगावचे लोक जमतात. या लोकमहोत्सवात अनेक धार्मिक विधी होतात. मानकरी सगळ्या चालीरीती सांभाळून त्यात पुढाकार घेतात. यातून जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे आपसूकच परंपरेचा वारसा येतो. त्यातून वर्षानुवर्षे या यात्रा खंड न पडता तशाच चालू राहतात.
 
 
अजिवली गाव
 
अशाच एका यात्रेचा अनुभव घेण्यासाठी पुण्याहून मी निघालो ते थेट अजिवली या लहानशा गावात. पुण्याहून जवळपास दीड-दोन तासांवर असणार्‍या या गावात कोळवणमार्गे हडशी आणि मग जवण असं जाता येतं. साधारण दुपारी चारच्या सुमारास उजव्या बाजूला पवना धरण मागे टाकून डाव्या बाजूला डोंगराच्या कुशीत वसलेल्या अजिवली गावात पोहोचलो.
 
गावात वाघजाईच्या दगडी बांधणीच्या मंदिराभोवती पसरलेली उतरत्या छपरांची घरं. कुठे कुठे नव्या बांधणीचीही घरं दिसत होती. गावाची वस्ती डोंगरउतारावर वसलेली होती. यात्रा असल्यामुळं मूळ गावचे, पण सध्या पुण्यामुंबईला स्थिरावलेले गावकरीही आलेले दिसत होते. त्यामुळं त्या लहानशा शांत गावचा परिसर फुलून गेला होता. गावाच्या तोंडालाच मधोमध वाघजाईचं भक्कम मंदिर आहे. या मंदिरासमोर सायरीचं भला मोठा बुंधा असणारं उंच झाड उभं आहे. आजूबाजूच्या परिसरांत या झाडाइतकं मोठं झाड दिसत नाही. या झाडाभोवती जुनीजाणती माणसं पांढरीफट नवीन कपडे आणि गांधी टोपी घालून बसली होती. गावच्या जत्रेचं नियोजन हीच मंडळी करत असावी. झाड आणि मंदिर यांच्या मध्ये रंगीत गुलाबी मांडव घातला होता. तरुण मंडळी रात्रीच्या रोषणाईसाठी मंदिरावर लाइटच्या माळा चढवायच्या कामात गुंतली होती. मंदिर वाघजाई या देवीचं असलं तरी दारात असलेला नंदी बघून आश्चर्य वाटलं. मंदिराच्या आत नक्षीदार लाकडी तुळया अजून शाबूत असल्याचं बघून बरं वाटलं. पूर्वेला तोंड करून मंदिराच्या मागच्या बाजूला वाघजाईचे दोन चांदीचे मुखवटे मूळ मूर्तीवर ठेवलेले होते. आजूबाजूला फुलांच्या हारांचे ढिगारे आणि त्याच्या खाली पुरणपोळीच्या नैवेद्याची ताटं ठेवलेली होती. देवीचं दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर गावकर्‍यांनी ‘देवराईतल्या वाघजाईला जाऊन या, अजून यात्रेला वेळ आहे,’ असं सांगितलं.
 
देवराई
 
अजिवलीची देवराई गावाच्या मागच्या बाजूला असणार्‍या डोंगराला लागून पूर्व-पश्चिम पसरलेली आहे. गावातल्या देवीचं मूळ ठिकाण देवराईत असल्याचं गावकरी सांगतात. गावातल्या मंदिराच्या डाव्या बाजूनं घरांच्या मधून देवराईला जातो तसाच आणखी एक रस्ता गावातून मंदिराकडे न जाता बाहेरच्या बाजूने आहे. हे दोन्ही रस्ते एकत्र होतात आणि पुढे देवराईकडे जाणारा मातीचा कच्चा रस्ता लागतो. साधारण तीन किलोमीटर असणार्‍या या रस्त्यानं देवराईत पोहोचलो.
देवराईची सीमा अस्पष्ट असली तरी आपल्याला गावातून येणार्‍या वाटेनं एखाद्या रहस्यकथेतल्या घनदाट जंगलात आल्याचा भास होतो. या जंगलात झाडांची घनता इतकी आहे की, दुपारची वेळ असली तरी संध्याकाळ वाटावी इतका अंधार होता. बहुतांश झाडं ही भेरली माडाची होती. संपूर्ण राईत माडाचीच झाडं जिकडेतिकडे दिसत होती. या झाडांच्या थंडगार सावलीतला मातीचा रस्ता तुडवत थोड्याशा चढावर असणार्‍या वाघजाई मंदिरात पोहोचलो. मंदिर अलीकडेच बांधल्याचं दिसत होतं. मंदिरात आत जाऊन पाहतो तर डोंगराच्या पोटात गेलेली भलीमोठी घळई होती- (लांब अरुंद गुहा). तिच्या लांबीचा अदमास येत नसला तरी रुंदी एक माणूसच कसाबसा जाऊ शकेल अशी आहे. या घळईच्या तोंडाला शेंदूर लावलेली अनघड शिळा वाघजाई देवी म्हणून पूजली जाते. यात्रा असल्यामुळं तिथे देवीची खणानारळाने ओटी भरल्याचं दिसत होतं. पुरणपोळीचा नैवेद्य, उदबत्तीचा धूर, फुलांचा खच आणि ती अंधारी घळई. त्यामुळं वातावरणात गूढ शांतता भरून राहिल्याचं जाणवत होतं. मंदिरात येणारे गावकरी सांगतात, या घळईत आतमध्ये खूप दूरवर पाण्याचं कुंड आहे, असं पूर्वीची लोकं सांगायची. मंदिराच्या उजव्या बाजूला थोडीशी वर एका झाडाच्या खोडाखाली अशीच एक नैसर्गिक घळई दिसते. गावातून बहुतेक लोक पायीच या देवराईतल्या देवीचं दर्शन घ्यायला येत होते.
 

yatra
 
या देवराईचा विस्तार साधारण बावीसशे एकरांमध्ये असल्याचं गावकरी सांगतात; परंतु प्रत्यक्षात त्यापेक्षा ही देवराई लहान असावी असं वाटतं. देवराईमध्ये असणार्‍या झाडांना सहसा हात लावला जात नाही. अजिवलीची देवराई माडाच्या झाडांची असल्यामुळे त्यांचा एक वर्षासाठी लिलाव होतो. यात वर्षभरात या माडाच्या झाडांची काळजी घेऊन त्यांच्यापासून उत्पन्न घेतलं जातं. हे उत्पन्न ग्रामपंचायतीकडे जमा करून त्या पैशांचा उपयोग गावच्या विकासासाठी केला जातो. साधारण वर्षाकाठी पंधरा-वीस लाखांचं उत्पन्न या माडीविक्रीतून गावाला मिळतं अशी माहिती मिळाली. अजिवली गावाच्या ग्रामनामाचा शोध घेतला असता ’अज’ म्हणजे स्वयंभू आणि वली हा शब्द पल्ली शब्दाचा अपभ्रंश आहे. पल्ली हा शब्द डोंगराच्या कुशीतल्या गावासाठी वापरण्यात येणारा शब्द आहे. याचा अर्थ अजिवली म्हणजे ’डोंगराच्या कुशीतले स्वयंभू स्थान’ असा होतो. स्वयंभू असलेली देवराई पाहता या गावाला मिळालेलं नाव सार्थ आहे असंच वाटतं.
यात्रा
काही वेळातच देवराईतल्या मंदिरात गावातले काही मानकरी जमले. त्यांनी देवीची पालखी घेऊन अजिवली गावच्या दिशेनं चालायला सुरुवात केली. त्याच वेळी गावात पालखी मार्गावर सगळीकडे रांगोळ्या काढून सगळे पालखी यायची वाट बघत बसले होते. एरवी बहुतांश गावकरी पुण्यामुंबईला असतात, त्यामुळे त्यांची बंद असलेली पिढीजात मावळी आज मात्र नटलेली दिसत होती. पालखी येताच घरांच्या उंबर्‍याबाहेर ताटकळत उभ्या असणार्‍या सुवासिनींनी पालखीच्या खांदेकर्‍यांचे पाय धुतले आणि देवीचं दर्शन घेतलं. पालखी मात्र गावातल्या मंदिरात न जाता मध्येच एका वस्तीवर थांबली. इथून ती रात्री सगळ्या गावची प्रदक्षिणा करून दुसर्‍या दिवशी मंदिरात जाणार होती.
 
 
दुसरीकडे गावातल्या यात्रेत मंदिराचा पुजारी आणि भगत यांच्याभोवती गावकरी जमले. या वाघजाई देवीची कथा अशी सांगतात, की या परिसरात महादेव कोळी या समाजातील एक भक्त होता. त्याच्या आग्रहाने कड्यावरच्या देवीने देवराईत ठाणं तयार केलं. वाघजाई म्हणजे वाघापासून रक्षण करणारी देवी. पुढे याच कोळी समाजातील भक्त जो देवीचा पुजारी झाला, त्याच्या वृद्धापकाळात देवीने त्याला त्रास होऊ नये म्हणून तो जिथे राहत होता तिथेच ठाणं तयार केलं. त्यामुळं कोळी समाजातील पुजारी असणार्‍या घराला मानपान आणि काही जमीन देवीची सेवा करण्यासाठी देण्यात आली.
 

yatra 
दरम्यान केंडे घराण्यातील भगत देवीसमोर भाकणूक करायला लागला होता. काही ग्रामस्थांनी या भगताला उचलून मंदिराची प्रदक्षिणा करून मंदिराखालच्या मोकळ्या जागेत आणलं. तिथे उघड्यावर एक लोकरीची घोंगडी अंथरण्यात आली. त्यावर भगत बसून कशाची तरी वाट बघत होता. तेवढ्यात आजूबाजूच्या गावांतून मानाच्या सासनकाठ्या ज्यांना देवकाठ्या असंही म्हणतात त्या वाजतगाजत मोकळ्या पटांगणात येऊ लागल्या. गावकरी सांगत होते, शेजारचं शिळीम, वाघेश्वर आणि जवण या गावांतून या देवकाठ्या येतात. या तिन्ही गावांत ग्रामदेवता भैरवनाथ आहे. त्यांची बहीण ही वाघजाई देवी आहे. तिला भेटायला म्हणून ते देवकाठ्यांच्या रूपानं येतात. भल्यामोठ्या उंच बांबूला रंगीत कापडी पताका लावून त्याच्या शेंड्याला आंब्याचा डहाळा तुरा म्हणून लावण्यात आला होता. त्या काठ्यांमध्ये देवाचा वास असतो म्हणून त्यांना देवकाठ्या म्हटलं जातं. त्या वाजतगाजत मोकळ्या पटांगणात आल्या. त्या वेळी मंदिराभोवती गावकर्‍यांची गर्दी जमली होती. बहुतेक गावकरी पुरुष पांढर्‍या वेशात दिसत होते. स्त्रिया मात्र सजून रंगीत साड्या नेसून नटून आलेल्या होत्या.
लहान मुलं नक्की काय घडतंय हे आपापल्या आयांना बिलगून बघत होती. गावातली काही तरुण मुलं ढोल वाजवत होती. अशा वातावरणात देवकाठ्या मोकळ्या जागी आल्या. त्यांनी मंदिराभोवती प्रदक्षिणा मारली आणि त्या मंदिरासमोरच्या सायरीच्या झाडाजवळ आल्या. देवकाठ्यांनी या झाडाला आलिंगन द्यावं तसं दोन-तीन वेळा त्यांना झाडाला टेकवण्यात आलं. यात काही विशेष असेल असं सुरुवातीला वाटलं नाही; परंतु गावकर्‍यांनी या सायरीच्या झाडात देव असल्याचं सांगितलं. त्यानंतर या सगळ्याचा उलगडा झाला. झाडात देवाचं अस्तित्व मानणारी आपली आदिम परंपराच या विधीतून समोर आली होती.
यानंतर पुजारी असलेल्या कोळी घराण्यातील एका तरुणाने बगाडाच्या लाकडी खांबाची पूजा केली. बगाडाचा जुना खांब मोडल्यामुळं बगाडा प्रथा दोन-तीन वर्षांपासून बंद झाली आहे असं समजलं. देवकाठ्यांची पूजा करून भगत, पुजारी आणि गावकरी मंदिरात परत आले. त्यांनी देवीची आरती सुरू केली, त्या वेळी मंदिर परिसर गर्दीने अगदी भरून गेला होता. सगळ्यांच्या समान श्रद्धा, त्यात जुनेजाणते वृद्ध ते लहान तरुण मंडळी मन लावून आरती करत होती. या वातावरणात लोकसंस्कृतीचा अंतःप्रवाह किती खळखळून वाहतोय याची जाणीव झाली. आरती झाल्यानंतर यात्रा सुरू झाली असं समजण्यात येतं. घरोघरी पुरणपोळीचा सुगंध दरवळत होता. वर्षभर विखुरलेली मंडळी यात्रेनिमित्त जमली होती.
वाघजाईच्या या यात्रेतून आणि गावात ऐकलेल्या कथा-कहाण्यांमधून अजिवलीचा इतिहास उभा राहिला, तो असा. कधीकाळी देवराईच्या कडेला वसलेल्या या वाडीला आजूबाजूच्या घनदाट जंगलातील हिंस्र प्राण्यांचा त्रास झाला असावा. त्यातून त्यांनी वाघासारख्या प्राण्यापासून संरक्षण देणार्‍या देवीची वनात स्थापना केली असावी. या प्राण्यांनी त्यांच्या मर्यादेत राहावं म्हणून त्या देवीभोवती असणारं जंगल राखीव ठेवलं असावं. त्यामुळं देवराईतल्या पशुप्राण्यांचा अधिवास सुरक्षित राहिला. तिथल्या जैवविविधतेबरोबर पाण्याचे स्रोत, औषधी वनस्पती टिकून राहिल्या. पुढे त्या जंगलाच्या शेजारच्या वाडीचं गाव झालं. पुढे त्या गावातील गाईगुरांवर जंगलातल्या प्राण्यांनी हल्ला करू नये म्हणून वाघजाई देवीची नियमित पूजा सुरू झाली असावी. दुष्काळात देवराईतल्या जलस्रोतांमुळे गावची तहान भागली. वेळप्रसंगी औषधोपचारांसाठी देवराईतल्या दुर्मीळ वनस्पती उपयोगी पडल्या असाव्यात. सगळ्यांना रोज राईतल्या देवीला जाणं शक्य नव्हतं म्हणून गावात देवीचं दुसरं मंदिर बांधण्यात आलं. राईतल्या माडाच्या झाडांची लोकांनी सामूहिक प्रयत्नातून काळजी घेतली, त्यातून गावाला उत्पन्न चालू झालं. या सगळ्यात गावच्या वसाहतीचा पाया घालणार्‍या महादेव कोळी समाजाला देवीच्या पुजारीपणाचा मान देण्यात आला. गाव जसं वाढलं तसं इतर घराण्यांना यात्रेत वेगवेगळे मानपान देण्यात आले. हा सगळा घटनाक्रम डोळ्यांसमोर तरळून गेला. झाडात देवत्व समजून त्याची पूजा करण्याच्या श्रद्धेने जंगलाचा भलामोठा भाग देवराईच्या नावाने टिकून राहिला होता. सध्या पर्यावरणाच्या अतिशय गंभीर समस्यांना आपण तोंड देत आहोत. अजिवलीच्या गावकर्‍यांनी मात्र त्यांच्या परिसरातील निसर्ग जपून ठेवला आहे. या निसर्गाकडे फक्त श्रद्धेने न पाहता देवराईतल्या झाडांची योग्य ती काळजी घेऊन आपला आर्थिक विकासही केला आहे.
संध्याकाळ झाली तसं गावातल्या वाघजाई मंदिरावरची रोषणाई उठून दिसायला लागली. गावकर्‍यांनी जेवणाचा आग्रह केला; परंतु प्रवास लांबचा असल्यामुळे त्यांचा निरोप घेतला. डोंगराच्या कुशीत वसलेल्या अजिवलीचं गाव रात्रीच्या अंधारात उजळून निघालं होतं. त्या गडद अंधाराच्या पार्श्वभूमीवर ते लहानसं अजिवली गाव जणू आशेचा किरण म्हणून चमकत उभं आहे असंच वाटत होतं.