सन 2014 नंतर आमूलाग्र बदललेला भारत

विवेक मराठी    14-May-2024
Total Views |
@प्रा. अशोक मोडक

modi
यापूर्वीच्या लेखात सन 2014 नंतर भारतात झालेल्या परिवर्तनाची आपण दखल घेतली. प्रस्तुत लेखात या परिवर्तनांच्या मुळाशी असलेल्या वेगवेगळ्या कल्पक उपक्रमांची माहिती आपण करून घेणार आहोत.
 
गेल्या दहा वर्षांत नरेंद्र मोदींच्या अनोख्या कार्यशैलीमुळे जगाला कळून चुकले आहे की, मोदी महाशय सरधोपट आणि रूढ मार्गाने जाण्यात रुची दाखवत नाहीत. त्यांना मुळात भारतभूचा तोंडवळा सन 2047 पर्यंत पूर्णपणे बदलण्याच्या ध्यासाने झपाटले आहे. म्हणूनच सन 2014 मध्ये पंतप्रधान झाल्याबरोबर नरेंद्रभाईंनी हिंदुत्वाची विकासप्रक्रियेशी सांगड घातली. इथल्या नागरिकांना स्वत्वाची जाणीव झाली, की ते विकसित भारताची स्वप्ने पाहू लागतील, ही खूणगाठ मनाशी बांधून मोदी सरकार भव्यदिव्य उपक्रमांना व्यवहारात उतरविण्यास सिद्ध झाले. दुसरे म्हणजे भारताची आध्यात्मिक आणि भौतिक प्रगती साकार करण्यासाठी जनमानसावर उचित संस्कार केले पाहिजेत, हा ध्यास मोदी शासनाने बाळगला. तिसरे म्हणजे अभिजन आणि बहुजन एकाच दृष्टिकोनातून भारताच्या भूतकाळाचा व भविष्यकाळाचा वेध घेतील या दिशेने नवनिर्वाचित शासक मार्गक्रमणा करू लागले. हिलाल अहमद यासंदर्भात खालील पुरावा देतात, तो किती बोलका आहे. ‘वर्तमानात शशी थरूर आणि पवन वर्मा हे गैर संघवालेसुद्धा हिंदू संस्कृतीने मध्ययुगात मोगल राजवटीशी जे युद्ध केले त्याचा गौरव करू लागले आहेत.’ (संदर्भ : 'A new politics of religion', in The Indian Express, 6 January 2022, p.15 )
 
 
भाजपाचे बुद्धिवान प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी संसदेमध्ये एका भाषणात मार्मिक भाष्य केले. ते भाष्य असे - ‘भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून अयोध्येतली रामलला मूर्ती आणि देशाची अर्थव्यवस्था कडीकुलपात कोंडल्यामुळे आतल्या आत धुमसत होत्या. त्या सन 1992 मध्ये मुक्त झाल्या... सन 2003 मध्ये अटलजींचे सरकार सत्तेत आले व भारत एक सक्सेस स्टोरी म्हणून विख्यात झाला.’ सन 2019 मध्ये न्यायालयीन निर्णयामुळे रामजन्मभूमीवर मंदिरनिर्मितीचा रस्ता प्रशस्त झाला आणि भारताची अर्थव्यवस्था शासनाची समृद्ध तिजोरी, भ्रष्टाचार निर्मूलन, पायाभूत सोयीसुविधांची वेगवान उभारणी, बँकांमधल्या बुडीत खात्यांवर यशस्वी अंकुश, कल्याणकारी योजनांचे लाभ थेट गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचविण्याचे यश वगैरे वैशिष्ट्यांमुळे जगात वेगाने प्रशंसनीय ठरली.
 
 
सन 2014 मध्येच 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून भाषण देताना नवनिर्वाचित पंतप्रधान मोदींनी ‘स्वच्छ भारत अभियाना’चा उद्घोष केला. ‘महात्मा गांधी यांची दीडशेवी जयंती सन 2019 मध्ये पक्की शौचालये बांधून साजरी करायची, हा निर्धार नरेेंद्र मोदींनी पंचावन्न देशांच्या प्रतिनिधींसमोर व्यक्त केला. युनायटेड नेशन्सचे तत्कालीन सरचिटणीस अंतोनिया गुतेरस यांनी भारत सरकारची साहजिकच मुक्तकंठाने प्रशंसा केली. ‘स्वच्छ भारत अभियान’ भारत सरकारच्या पुढाकारामुळे साकार झाले; पण थेट विश्व बँक, बिल गेट्स प्रतिष्ठान अशा जागतिक संस्थांप्रमाणेच भारतातल्या ग्रामपंचायती, स्वयंसेवी संघटना, शालेय व महाविद्यालयीन छात्र-छात्रा वगैरेंच्या भरीव सहकार्यामुळे या अभियानात प्राणशक्ती संचारली.
 
 
मोदी सरकारने सन 2014 पासून नवनिर्माणक्षम सर्जनशीलता दाखवली ती तर थक्क करणारी ठरली आहे. सुप्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकरांनी या सर्जनशीलतेचे केलेले कौतुक इथे उल्लेखनीय आहे - ‘नवनिर्माणक्षम नेतृत्व म्हणून मोदीजी मला भावतात. या ठिकाणी इनोव्हेशन म्हणजे फक्त तंत्रज्ञानातल्या नवनव्या कल्पना अभिप्रेत नाहीत, तर व्यावसायिक आणि व्यवस्थापकीय प्रारूपं, प्रशासकीय कामकाज, कार्यसंस्कृती, धोरणे यांच्यात नवकल्पना राबविणं म्हणजे इनोव्हेशन्सच! या सगळ्या नवकल्पनांमुळे विकासात्मक बदल होत असतात. नरेंद्र मोदींना हे पूर्णत: समजले आहे आणि म्हणून ते वेगाने हे बदल साकार करीत आहेत. त्यांच्या कार्यकाळापूर्वी भारत हा दुसर्‍या देशांचे अनुकरण करणारा भूभाग होता; पण सन 2014 नंतर इथल्या भावविश्वाला अनुरूप बदल घडत आहेत. अतिशय वेगाने होत असलेली इथली डिजिटल क्रांती, स्वच्छ भारत अभियानापासून कॉर्बनमुक्त पर्यावरणापर्यंत वेगाने राबविले जाणारे विविध निर्णय, स्टार्टअप नेशनपासून वेगाने विकसित होणार्‍या राष्ट्रापर्यंत भारताचा जो प्रवास वर्तमानात झालेला आज दिसत आहे, त्यातली ही उदाहरणे भारावून टाकणारी आहेत. डिजिटल क्रांतीमुळे आर्थिक सर्वसमावेशकता साधणे शक्य झाले आहे. मोदी शासनाने जनधन योजना, आधार आणि मोबाइल यांची अनोखी मोट बांधली आहे. त्यामुळे कोट्यवधी लोकांची बँक खाती अल्पावधीत उघडण्यात आली. तेरा लाख लोकांना आधारकार्डाद्वारे स्वत:ची डिजिटल ओळख ‘कधीही आणि कुठेही’ या स्वरूपात मिळाली. सन 2016 मध्ये युनिफाइड पेमेन्ट इन्टरफेस नामक घोषणेमुळे क्यूआर कोड स्कॅन करून डिजिटल व्यवहार करणे सुकर झाले. एप्रिल ते जून 2022 या तीन महिन्यांत वीस दशलक्ष ऑनलाइन व्यवहारांमुळे पेमेन्ट नेटवर्क असलेला भारत यासंदर्भात जगात पाचव्या क्रमांकाचा मानकरी ठरला.’ (संदर्भ : डॉ. सागर देशपांडे लिखित ‘दुर्दम्य आशावादी डॉ. रघुनाथ माशेलकर’, पाने 410 ते 412)
 
 
या विविध सर्जनशील उपक्रमांमुळे भारताच्या आर्थिक विकासाचा वेग काय सांगावे, प्रतिवर्षी आठ टक्क्यांपर्यंत झेप घेऊ शकतो, असे अनुमान जाणकार अर्थशास्त्री करीत आहेत. एकविसाव्या शतकातल्या या विकासदरालाच खर्‍या अर्थाने Hindu Growth Rate म्हणता येईल.


modi
 
भारताची एकसंधता सुदृढ व्हावी हाच ध्यास
 
भारत मुक्त झाला, ब्रिटिश राजवट संपुष्टात आली. त्यानंतर 75 वर्षे उलटली आहेत. या वर्षांमध्ये प्रदीर्घ काळ काँग्रेसचीच सत्ता देशावर प्रभुत्व गाजवत होती; पण उत्तर आणि दक्षिण यांच्यात खरे मनोमीलन घडावे या हेतूने काँग्रेस सरकारने विशेष प्रयास केले नाहीत. परिणामत: केरळ कम्युनिस्टांकडे, आंध्र प्रदेश तेलुगू देशमकडे, तर तमिळनाडू द्रविड मुन्नेत्र कझगमकडे जणू आंदण देण्यात आले. निवडणुका आल्या की, त्या त्या पक्षांशी साटेलोेटे करून आपली सत्ता केंद्रस्थानी सुखेनैव कशी नांदेल हीच काळजी काँग्रेसी पुढार्‍यांनी केली. ईशान्य भारतात फुटीरता, अलगता वाढत होती. बंगाल, त्रिपुरा, जम्मू काश्मीर या प्रांतांमधूनही स्थानिक सुलतान मग्रूर झाले होते... या सुलतानांना भारतमातेशी एकनिष्ठ बनविण्याची गरज होती; पण ‘काँग्रेसमधल्या घराणेशाहीशी तुम्ही निष्ठा बाळगा अन् मग तुमचे चाळे चालू ठेवा’ अशी देवाणघेवाण करणेच काँग्रेसला श्रेयस्कर वाटले. या काँग्रेसमध्ये इंडियन व नॅशनल असे शब्दप्रयोग या पक्षाच्या शीर्षकातच उल्लेखिले गेलेले आहेत; पण काँग्रेसी नेत्यांना व कार्यकर्त्यांना इंडियन अन् नॅशनल या विशेषणांचा विसर पडला. फार पूर्वी शहर काँग्रेस, तालुका काँग्रेस, जिल्हा स्तरावरील काँग्रेस अशी साखळी कार्यरत होती. आता ही साखळीच गायब झाली आहे. निवडणूक आली की, ती जिंकून सत्ता मिळवायची आणि त्या एकमेव उद्देशाने खटपट-लटपट करायची हाच रिवाज केवळ काँग्रेसमध्ये नव्हे, तर सर्व गैर भाजपा पक्षांमध्ये धुमाकूळ घालतोय. परिणाम भीषण आहे. सध्या लोकसभेमध्ये निर्वाचित सदस्यांची संख्या 543 आहे अन् इंडियन नॅशनल काँग्रेसने जेमतेम 328 जागांवरच उमेदवार उभे केले आहे. महाराष्ट्रात उद्धव सेनेने काँग्रेसपेक्षाही अधिक उमेदवार रिंगणात उतरविलेले आहेत. सन 2024 मधल्या काँग्रेसने भिन्न भिन्न राजकीय पक्षांकडे मदतीचा जोगवा मागितला व त्या त्या पक्षांची शिरजोरी सहन करून स्वत:च्या स्थानिक अस्तित्वावर बोळा फिरविला. मंडल राजनीतीमुळे उत्तर प्रदेश, बिहार वगैरे प्रांतांतून काँग्रेस नामशेष झाल्यासारखी आहे.
 
modi
 
या पृष्ठभूमीवर भाजपाच्या वाटचालीचे विश्लेषण केले तर या पक्षाची खासियत अधोरेखित करता येईल. काँग्रेसने गेल्या 75 वर्षांमध्ये ‘महान ते लहान’ या दिशेने प्रवास केला आहे. कैक विरोधी पक्ष राष्ट्रीय स्तरावरचे स्वत:चे स्थान गमावून बसले आहेत, तर आणखी अनेक पक्ष स्वर्गवासीच झाले आहेत. याउलट पूर्वाश्रमीच्या जनसंघाने म्हणजे भाजपाने आपल्या जन्मानंतर केवळ पंधरा वर्षांत ‘अखिल भारतीय’ दर्जा प्राप्त केला आणि वर्तमान अवस्थेत तर भाजपाने केंद्रात सत्ता प्राप्त केली व कैक राज्यांतून स्वत:चे गड-किल्ले उभे केले. याहून विशेष म्हणजे कुठलीही अल्पसंतुष्टता उद्भवणार नाही हे पथ्य पाळून तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळ तसेच ओरिसा व पश्चिम बंगाल या राज्यांमधूनही भाजपाची वाढ व्हावी म्हणून भगीरथ प्रयत्न भाजपा नेत्यांनी सुरू केले आहेत. पैकी तमिळनाडूत हिंदीविरोधाने मूळ धरले आहे आणि द्रविड संस्कृतीच्या झेंड्याखाली वेगळी चूल मांडण्यात आली आहे. नरेंद्र मोदींनी तमिळनाडूतला सेंगोल राजदंड अवघा भारताचा प्रेरणास्रोत आहे, हे जाहीर केले आहे. चेन्नई व काशी यांच्यात एक आगळेवेगळे नाते आहे, या भूमिकेचा प्रसारही विद्यमान पंतप्रधानांनी जोमात चालविला आहे. पन्नास वर्षांपूर्वी कच्चथिवू बेट काँग्रेस आणि डी.एम.के. यांच्या संयुक्त पुढाकाराने श्रीलंकेला देण्यात आले. या घटनेचा गवगवा वर्तमानात दवंड्या पिटून केला जात आहे. प्राचीन काळापासून प्रचारात असलेली तमिळ भाषा अवघ्या भारतवर्षासाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांना 15 ऑगस्ट 1947लाच तिरुववदुथुरल अधीनम् या शैवपंथीय मठाकडून सेंगोल राजदंड भेट म्हणून देण्यात आला, पण नेहरूपुत्राने हा राजदंड वस्तुसंग्रहालयात ठेवून दिला. भाजपाने मात्र नव्या संसद भवनात त्याला सन्मानाचे स्थान दिले. ‘संपूर्ण भारतवर्षात तिरुवल्लुवर संस्कृती केंद्रे उभी केली जातील’ ही घोषणाच भाजपाने जाहीरनाम्यात केली आहे. हैदराबादेत माधवी लता या कर्तृत्वसंपन्न महिलेस असदुद्दिन ओवेसीच्या विरोधात भाजपाने उमेदवारी दिली आहे, तर केरळात ख्रिश्चन बंधुभगिनींनीच भाजपाची पाठराखण करण्याचे ठरविले आहे. ईशान्य भारतातही नागरिकत्व (दुरुस्ती) विधिनियमाच्या प्रकाशात बांगलादेशातून आलेल्या हिंदू शरणार्थींना भारतीय नागरिकत्व दिले जात आहे. त्रिपुरा काय वा पश्चिम बंगाल काय, मार्क्सवादी कम्युनिस्टांना ‘दे माय, धरणी ठाय’ करण्यासाठी तसेच ममतादीदीने पोसलेल्या इस्लामिक आतंकवाद्यांना जन्माची अद्दल घडविण्यासाठी भाजपा सदस्य सज्ज झाले आहेत. भारतवर्ष हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत अखंड आहे, हे सिद्ध करण्यासाठी फुटीर शक्ती ठेचून काढल्याच पाहिजेत, म्हणून तर शहरी नक्षलवादी-माओवादी वृत्ती-प्रवृत्तींच्या विरोधात आपण ठाम उभे राहिले पाहिजे, हा निर्धार यापूर्वी आपण कधी पाहिला होता का? ‘साहसं पुनरारुह्य, यदि जीवतिः पश्यति।’ (साहसाने संकटांवर आरूढ होऊन मार्गक्रमणा केली पाहिजे. या व्रतात जिवंत राहिलो तरच ईश्वरी कृपाप्रसाद पाहण्यास मिळेल.) हे वचन महाभारतात आहे. भाजपाने ते आधुनिक भारतात खरे करून दाखविण्याचा चंग बांधला आहे. सर्व विषयांकडे केवळ निवडणुकीच्या चष्म्यांमधून पाहणारे नकली सेक्युलॅरिस्ट्स ‘अवघा भारत एकसंध करायचा’ या निर्धाराच्या भाजपाप्रणीत प्रकटीकरणासमोर पराभूत होणार आहेत.
 
 
भारताच्या विदेशनीतीत नवे मानदंड
 
भाजपानेच सन 2017 मध्ये भूतानजवळ डोकलामला, सन 2020 मध्ये गलवानच्या खोर्‍यात आणि सन 2022 मध्ये यांगत्सीच्या पठारावर कुटिल चिनी राज्यकर्त्यांसमोर पुरुषार्थ दाखविला. जवाहरलाल यांनी सन 1959 मध्ये भारत-चीन सीमेवर 43 पोलीस ठाणी उभी करण्याचा जो प्रयत्न केला होता तो जरा आठवून पाहा. ‘गृहपाठविरहित कोशीश शेंदाड शिपायाला तोंडघशी पाडते अन् परिणामत: सन 1962 मध्ये शत्रूकडून चिरडली जाते,’ या वाक्प्रचाराचे प्रमाणच अनुभवण्यास मिळेल. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केवळ चीन सीमेवर नाही, तर पाकी सीमेवर तसेच तिन्ही बाजूंनी वेढणार्‍या सागरी सीमांवर अष्टौप्रहर गस्त घातली जात आहे. सैनिकांना सदैव सुसज्ज ठेवले जात आहे.
 
modi 
रस्ते, पूल, बोगदे बांधले जात आहेत. भूदल, नौदल व वायुदल अशा तिन्ही दलांना अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसह अद्ययावत तैनात केले जात आहे. सन 1959 नंतर तीन वर्षे उलटल्यावर भारताची जगभर नाचक्की झाली. मग नतद्रष्ट कम्युनिस्ट हे नेव्हिल मॅक्सवेललिखित 'India China War' या पुस्तकाचे प्रचारक बनले. सन 2017 मध्ये आपण डोकलामला चिनी सैन्याला आव्हान दिले अन् नंतरच्या तीन वर्षांत तर नवनवे चौकार, षटकार मारण्याचा धडाका लावला. या अर्जुनाला खरगे कुलोत्पन्न मल्लिकार्जुन म्हणे आव्हान देत आहेत. कुठे ती तीन वर्षे (सन 1959 ते 1962) अन् कुठे सन 2017 पासून सन 2020 पर्यंत उलगडत गेलेली ही तीन वर्षे?
 
 
भारताच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या क्षेत्रात सन 1957 ते सन 1962 ही पाच वर्षे काँग्रेससाठी व तेव्हा काँग्रेसच सत्ताधीश असल्यामुळे भारतासाठी अतिशय क्लेशकारक ठरली आहेत. याउलट सन 2017 पासून क्रमाक्रमाने प्रकटलेली सन 2022 पर्यंतची पाच वर्षे! तुलना करून पाहा. भगवान श्रीकृष्ण गीतेच्या दुसर्‍या अध्यायात अर्जुनाला सांगून मोकळे झाले आहेत. ‘क्षुद्रं हृदय दौर्बल्यम् त्यक्त्वोऽत्तिष्ठ परन्तप।’ सन 2022 पूर्वीच्या पाच वर्षांत याच उपदेशाच्या प्रकाशात भारतीय जवान पराक्रमी पाऊलवाटेने पुढे गेले आहेत. त्यांना भक्कम पाठबळ देणारे राज्यकर्ते नवी दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत...
 
 
आता केवळ आपल्या देशाच्या सीमांवर आणि दक्षिणेला हिंदी महासागरातच पाय रोवून उभे राहायचे नाही, तर थेट दक्षिण चीन समुद्रात, पीत समुद्रात आणि तैवानच्या सामुद्रधुनीतही संचार करायचा आहे. चीनमुळे हवालदिल झालेल्या तैवान, फिलिपाइन्स, व्हिएतनाम, मलेशिया याही देशांशी मैत्रीचे सेतू बांधायचे, काही देशांना थेट ब्राह्मोस क्षेपणास्त्रेही पुरवायची, चीन बांधत असलेल्या भूपृष्ठीय आणि सागरी पृष्ठावरच्या तथाकथित रेशीम मार्गाला नि:संदिग्ध आव्हान द्यायचे, चीनच्या राक्षसी व्यूहरचनेमुळे संत्रस्त झालेल्या देशांना दिलासा देण्यासाठी खंबीर पावले उचलायची; G20 परिषदेच्या अध्यक्षपदावर आरूढ होऊन जगाच्या दक्षिण गोलार्धातल्या विकासोन्मुख देशांची प्रामाणिक पाठराखण करायची, व्हायब्रन्ट गुजरात परिषदेच्या माध्यमातून अवघ्या विश्वाला आवाहन करायचे की, सागरी मार्गांवर निर्विघ्न वाहतूक झाली पाहिजे. या उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी आपण संघटित झाले पाहिजे. म्हणून तर नित्यनियमाने वेगवेगळ्या देशांच्या नौदलांची संचलने व कवायती योजून चीनला इशारे देण्याची आवश्यकता आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान या देशांबरोबर दोस्ती करून चतुष्कोनी चौकटीचा आकृतिबंध सुदृढ करण्याची आता निकड आहे.
सन 2014 नंतरचा भारत अंतर्बाह्य, आमूलाग्र बदलला आहे. अर्थात, ही नांदी आहे. खरे नाट्य वर्तमान अमृतकालाच्या अखेरीस सन 2047 मध्ये रंगणार आहे. या नाट्याचा आविष्कार अनेक अर्थांनी आनंददायी होणार आहे. सन 2024ची संसदीय निवडणूक या दृष्टिकोनातून ऐतिहासिक आहे, हेच खरे!