इंटरन्याशनल

भावड्याची चावडी

विवेक मराठी    15-May-2024   
Total Views |
satire article
 अर्कचित्र - अमोघ वझे
  सोनीमावशीणं सॅमला फुडं क्येलं.. “आता ह्येला कुटं धाडनार तुम्मी..? आफ्रिका, चायणा का आरबस्ताण..? बगा तुमचं तुम्मी.. म्या चाल्ली.. माला जप करायाचा हाये..!” सोनीमावशीणं आतल्या खुलीत कल्टी हान्ली.. पप्या आनि पिंकी फुडल्या दाराणं सटाकले.. सॅम देव्याला युरेशियाला पाटवूया का कसं याचा इंटरन्याशनल इच्यार कराया लागला..!
 पप्या सोनीमावशीची मॉर्निंगची प्रेयर संपवून चॅप्पेलसमुरणं उठायचीच वाट पाहात हुता.. जश्शी सोनी मावशी उटली तस्सा पप्या तिच्या फुड्यात जाऊण हुबा र्‍हायला.. ह्ये कार्टं पुन्ना आंगूळ न करता द्येवापाशी आलं का काय म्हनून सोनीमावशी वयतागलीच.. पन पप्याच्या म्हागनं येक पांडर्‍या क्येसांचं काळ्या बोकडदाढीचं वानर दारातनं आत येताणी बगून तिची पाचावर धारन बसली.. तिच्या चेहर्‍यावरचा भ्याव बगून पप्या वराडला, “मम्मे, घाबरू नगंस.. आपले सॅम आंखल आलेत.. तूच बलावलं हुतंस णा त्यांला..!?” सॅम आंखलचं णाव आईकल्यावं सोनीमावशीच्या त्वांडावरणं भ्याव ग्येलं आनि संताप आला.. “तुमचं त्वांड हाये का काय हाये ओ..!?” सोनीमावशी भडकून बोल्ली.. सॅम माण खाली घालूण हुबा हुता.. “सेम टू सेम माकडावानी दिसत्यात ना सॅम आंखल..!?” पप्या पिंकीला टाळी द्येत मदीच बोल्ला.. त्यामुळं सोनीमावशी आजून भडाकली आनि पिंकीला म्हन्ली, “याला घिऊण आत जा बरं पिंके.. नायतं म्या याच्याबी टक्कुर्‍यात घालीन काय तरी..!” सॅमणं सोत्ताच्या डुईवरणं हात फिरवला आनि सोनीमावशीनं खरंच काई हानलं तं टक्कुरं फुटायाच्या भीतीणं दोण पावलं म्हागं सराकला.. “तुम्मी त्वांडाला यील त्ये बोल्ता का ओ सॅम..!? लोकांला हितं माला त्वांड द्यावं लागतं.. परवाधरनं गावातल्या लोकांणी वात आनलाय.. तुम्मी म्हन्ले साऊथकडची मानसं आफ्रिकन वाटत्यात..? त्ये शाजी बाप्पू आल्ते धा-पंदरा गाड्या घिऊण..! सम्दी तालमीतली पोरं आनल्याली उचलून.. म्हन्ले आमी कोनत्या पद्धतीणं तुम्ला आफ्रिकेचं वाटतू..? आमच्यातली काय काय पोरं तं तुज्या पप्यावानी गोरीगोमटी हैत..” पप्याणं लगीच नाकावं आंगटा ठिऊन बोटं नाचवत पिंकीला पिपानी वाजवून चिडावलं.. पिंकी चिडून लगीच सोनीमावशीपाशी यून म्हन्ली, “मम्मे.. आपल्या घरात फकस्त ह्योच गोरा हाय का..? आपन काय काळेढुस्स हाय का..?” ड्यामेज कंट्रोल करायचा चान्स भेटल्यावानी सॅम मदीच घुसला.. “नाय गं बाय.. तू तं आक्षी आज्जीवानी दिसतीस.. काय ती भुरूभुरू क्येसं, काय त्ये लांबसडक नाक.. डिट्टो आजीबायच..!” सोनीमावशीणं त्येचा मनसुबा हानून पाडत सॅमला पुन्ना फैलावं घेटलं.. त्यामुळं शायनिंग मारत आसल्याली पिंकी हिरमुसली.. पप्या पुन्ना दात काडून हासाया लागला.. सोनीमावशीनं तिकडं साफ इग्नोर मारला.. “शाजी बाप्पूला कासाबासा घालवला तंवर बुटक्या त्येची मानसं घिऊण आला आनि म्हन्ला आमी तं च्यानीजसारकं दिसतू.. तवा तुजी उगवतीकडली जिमीन आमच्या नावं कर.. आमी समदी तिकडं शेटल हुतो.. आता काय करावं म्या सांगा.. त्येला कसंबसं शांत क्येलं तं रातच्याला रश्मिआक्काचा फोन.. तिच्या पोरानं वात आनला तिला.. कोनी खपल्यावं घालायचा पांडरा पंजाबी ड्रेस आडकवून डुईवं पांडरा रुमाल टाकून त्यावं कुकरची काळी रिंग आडकवूण अरबासारका ‘वल्ला हबिबी’ करत बोलाया आनि घरभर हिंडाया लागल्याला.. आनि वर त्येच्या पप्पाला उंट बनवून त्येच्या पाठीवरणं रपेट मारायचा हट्ट करत हुता म्हनं.. आद्या तेच्या बापाच्या पाठीवं बसला आस्ता तं त्येचा बाप पुन्ना उटला नस्ता ह्ये म्हायती आसल्याणं रश्मिआक्कानं आद्याला कानफटवला.. त्या मारामारीत आद्याणं आरब दिसावं म्हनून डुईला लावल्याली कुक्करची रिंग तुटली.. ती बै कुक्करची रिंगबी भरून मागत हुती माज्याकं.. सेवटी तिचा कुकर दुरुस्त हुईस्तवर माजा इंपोर्टेड कुकर पाटवला तवा कुटं शांत जाली बया.. आज फाटं फाटं आंधारेची करिश्मा दारात यून ग्येली.. म्या दिसाय आफ्रिकन, वागाया च्यानीज आनि इच्यारांनी आरब हाये.. म्या कुटं जाऊ सांगा म्हन्ली.. ह्ये सम्दं माला तुमच्या त्या बोलन्यामुळं आयकून घ्यावं लागलंया.. आता माला सांगा, तुम्माला काय गरज हुती आसले आकलेचे तारे तुडायची..?” सोनीमावशीचं फायरिंग हुईस्तवर सॅमणं डुई वर काडलीच न्हाई.. धाडधाड बोलून सोनीमावशी शांत झाल्याली बगूण सॅमणं बरूबर ग्याप काहाडली.. “पन आपलीच प्वालिसी ए णा.. आदुगर डिव्हाइड आनि मंग रुल..! म्या तीच फॉल्लो क्येली..!” सॅमणं हाळूच येक आरग्यूमेण करून पाह्यली.. “व्हय की.. पन तुम्माला यकदम इंटरन्याशनल कुनी व्हाया सांगिटल्यालं..? हितल्या लोकांला आपसात भांडाया जातीजातीतली भांडनंबी चालत्यात.. किंबहुणा तीच आपल्या कामी येत्यात.. हे इंटरन्याशनल झेंगाट उगा म्हागं लावंल तुम्मी माज्या..’‘ तिचं ह्ये बोलनं हुईस्तवर लांबणं गलक्याचा आवाज आला म्हनून समद्यांनी खिडकीतणं भाईर पाह्यलं तं देव्या दाढीला घेऊण येत हुता.. सोनीमावशीणं सॅमला फुडं क्येलं.. “आता ह्येला कुटं धाडनार तुम्मी..? आफ्रिका, चायणा का आरबस्ताण..? बगा तुमचं तुम्मी.. म्या चाल्ली.. माला जप करायाचा हाये..!” सोनीमावशीणं आतल्या खुलीत कल्टी हान्ली.. पप्या आनि पिंकी फुडल्या दाराणं सटाकले.. सॅम देव्याला युरेशियाला पाटवूया का कसं याचा इंटरन्याशनल इच्यार कराया लागला..!

केदार दिवेकर

केदार अच्युत दिवेकर
व्यावसायिक संगीतकार म्हणून १४ वर्षे कार्यरत.
 
‘मीरा’ या आगामी मराठी चित्रपटासाठी कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन आणि संगीत अशा जबाबदाऱ्या सांभाळणारा कलाकार.