वोकिझमच्या हल्ल्याला ओलाचा टोला..

विवेक मराठी    15-May-2024   
Total Views |
.
ओला कंपनीचे संस्थापक भाविश अगरवाल यांनी ’लिंक्ड-इन’ या सामाजिक माध्यमांमधील अग्रगण्य कंपनीच्या कृत्रिम प्रज्ञेच्या (AI) प्रोग्रामला स्वतःविषयी प्रश्न विचारला. एआयकडून आपल्याविषयी काय माहिती सांगण्यात येते याविषयीचं कुतूहल यामागे असणार. मान्यवर उद्योजक असल्याने ही माहिती लिंक्ड-इनच्या एआयकडे होती; पण ही माहिती देताना भाविशविषयी He हे सर्वनाम वापरण्याऐवजी They हे सर्वनाम वारंवार वापरलं गेलं. अशी ’लिंगनिरपेक्ष’ सर्वनामं वापरणे हा सध्या गाजत असलेल्या ’वोकिझम’ या विचारसरणीचा एक महत्त्वाचा भाग आहे. या आग्रहामागचा उद्देश काय, तो भाविश अगरवालला का आक्षेपार्ह वाटला, हे समजून घेण्याआधी या संपूर्ण प्रकरणाची थोडी पार्श्वभूमी जाणून घेऊ या.
 
 
ola
 
अमेरिका व पश्चिम युरोपातील भांडवलशाही राष्ट्रे बंदुकीच्या नळीतून येणार्‍या, कामगारांच्या मार्क्सप्रणीत रक्तरंजित क्रांतीला स्वीकारत नाहीत हे लक्षात आल्यावर, मार्क्सवाद्यांनी या देशांना वाळवीसारखं आतून पोखरून टाकत त्यांच्या संस्कृतीचा विध्वंस घडवून आणण्याची दीर्घकालीन योजना आखली. या देशांमधील लोकांच्या, विशेषतः तरुण पिढीच्या मनात आपला धर्म, आपली संस्कृती, आपला इतिहास या सगळ्यांविषयी हीनत्वाची भावना आणि द्वेष निर्माण करायचा आणि या देशांमधील लोकशाहीचा वापर त्यांच्याविरुद्धच करून त्यांचा हळूहळू, टप्प्याटप्प्याने विध्वंस घडवून आणायचा, अशी ही योजना होती. समाजात गरीब विरुद्ध श्रीमंत किंवा भांडवलदार विरुद्ध कामगार असा संघर्ष भडकावून अराजक निर्माण करणे, हा मार्क्सवादी विचाराचा गाभा, ज्यात संघर्षाचा आधार आर्थिक असतो. याऐवजी सांस्कृतिक आधारावर संघर्ष घडवून आणण्याची ही नवी योजना असल्यामुळे तिला ’सांस्कृतिक मार्क्सवाद’ असं म्हटलं जातं. यासाठी हल्ली ’वोकिझम’ हा शब्दही वापरला जातो. संस्कृतीचं रक्षण आणि पोषण करणारा सगळ्यात मोठा आधार म्हणजे कुटुंबव्यवस्था. म्हणूनच सांस्कृतिक मार्क्सवादात कुटुंबव्यवस्थेच्या विध्वंसाला सर्वाधिक प्राधान्य दिलं जातं. हा विध्वंस आम्ही कसा साध्य करणार, हे या योजनेच्या प्रवर्तकांनी शंभर वर्षांपूर्वी म्हणजे 1920 च्या दशकातच लिहून ठेवलं आहे. यातील प्रमुख मुद्दे आहेत, अतिरेकी व्यक्तिवाद, विकृत स्वरूपातील स्त्रीवाद, लैंगिक स्वैराचार आणि ट्रान्सजेंडरिझम. या चारही गोष्टींमुळे, पाश्चात्त्य समाजातील कुटुंबव्यवस्था कशी मोडकळीला आली आहे हे आपण बघतो. सगळ्यात धक्कादायक गोष्ट अशी, की हे सगळं आपोआप, निसर्गतः घडत नसून एका व्यापक योजनेच्या आधारे, शंभर वर्षांच्या घातक प्रयत्नांद्वारे ते ठरवून घडविण्यात आलं आहे. यातला आपला आजचा विषय आहे ट्रान्सजेंडरिझम.
 
 
स्त्री आणि पुरुष यांच्यातील फरक जीवशास्त्रानुसार ठरणारा नैसर्गिक फरक आहे, तसेच जीवनाचा प्रवाह सुरू ठेवणे हे निसर्गाचे प्रमुख उद्दिष्ट असल्यामुळे निसर्गाने हा फरक जाणीवपूर्वक जपला आहे, तोच निसर्गनियम आहे. कधी तरी काही व्यक्तींच्या बाबतीत असं घडतं की, स्त्री म्हणून जन्माला आलेल्या व्यक्तीची वागणूक, विचार आणि भावना या पुरुषी असतात, तर काही पुरुष म्हणून जन्माला आलेल्या व्यक्तींमध्ये स्त्रीसुलभ व्यवहार आढळतो. हे निसर्गतःच घडत असलं तरी हे क्वचित घडणारे अपघात असतात. स्त्री-पुरुषांचे स्वतंत्र जीवशास्त्रीय अस्तित्व हाच निसर्गनियम असतो. अपघाताच्या या घटनाही निसर्गतःच घडत असल्यामुळे अशा व्यक्तींना गुन्हेगार न ठरविता, त्यांच्याशी कुठलाही दुजाभाव व अन्याय न करता त्यांना समाजात सन्मानाने जगता यावं हे नक्कीच. आपल्या भारतीय परंपरेत किन्नर या नावाने ओळखल्या जाणार्‍या अशा व्यक्तींना स्वतंत्र स्थान आणि काही विशेष अधिकारही देण्यात आले आहेत; पण सांस्कृतिक मार्क्सवादाने मांडलेल्या ’क्रिटिकल जेंडर थिअरी’नुसार या अपघाताने घडणार्‍या घटनेला नियम ठरवून भयंकर उलथापालथ घडवण्यात येते आहे. या थिअरीनुसार सेक्स आणि जेंडर या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. व्यक्तीचे लिंग (सेक्स) जन्मतः काहीही असले तरी तिचे जेंडर तिच्या मनातल्या भावनांवरून ठरते. आपण पाहिले त्यानुसार सेक्स व जेंडर एकच असणे हा निसर्गनियम आहे, तर वेगवेगळे असणे हा अपघात; पण या अपघातालाच नियम बनवण्याचा डाव कुटुंबव्यवस्थेच्या व समाजाच्या विध्वंसासाठी रचला गेला आहे.
 
 
क्रिटिकल जेंडर थिअरीनुसार नवजात शिशूचे जेंडर त्याला त्याचे पालक व डॉक्टर ’बहाल’ करतात (Assigned at birth). म्हणजेच नवजात शिशूचे जेंडर कोणते, हा जीवशास्त्रीय निर्णय नसून सामाजिक निर्णय (Social construct) आहे. यापुढे हे ओघानेच येते की, व्यक्तीला तिच्यावर समाजाने लादलेले जेंडर स्वीकारण्याची जबरदस्ती न करता तिला ’मनातून वाटते’ ते जेंडर निवडण्याचे स्वातंत्र्य असायला हवे. म्हणजेच व्यक्तीचे जेंडर हे ’वस्तुनिष्ठ वास्तव’ (Objective reality) नसून तिच्या भावनांप्रमाणे बदलणारा (Subjective) निर्णय आहे. या Fluid Gender  संकल्पनेनुसार जेंडरची संख्या किती असावी यावरही काही मर्यादा नाही. ज्याला जे वाटेल ते त्याचे जेंडर.
 
 
या अट्टहासापायी विचित्र आणि विकृत प्रकार घडू लागले आहेत. एखादा पुरुष आता ’मी स्त्री आहे असं मला वाटतं’, असं म्हणून स्त्रियांच्या स्पोर्ट्समध्ये सहभागी होण्याची मागणी करू शकतो. ’होमोफोब’ हा शिक्का आपल्यावर बसू नये, या दहशतीपायी त्याला असा प्रवेश नाकारणे अवघड करू लागले आहे. यामुळे स्त्रियांनी मोठ्या मेहनतीने उभं केलेलं ’वुमेन्स स्पोर्ट्स’चं विश्व उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे. नुकतेच ब्रिटनमधील एका रेपिस्टने तो स्त्री आहे, असं जाहीर केल्यामुळे त्याला महिलांच्या तुरुंगात जागा देण्यात आल्याचं प्रकरण खूप गाजलं होतं. हे चुकीचं आहे हे स्पष्ट दिसत असूनही अशा मागण्यांसमोर मुकाट्याने मान तुकवावी लागते, कारण ’मी स्त्री आहे’ असं म्हणणार्‍या पुरुषाला किंवा ’मी पुरुष आहे’, असं म्हणणार्‍या स्त्रीला 'Biological evidence' मागणं हा ’होमोफोबिया’ नामक भयंकर अपराध ठरवून, जहरी टीका करून त्या व्यक्तीला आयुष्यातून उठवलं जातं (Cancel Culture). स्त्री आणि पुरुष यांच्यात कुठलाही नैसर्गिक अंगभूत फरक नसतोच, हे पूर्णपणे अवैज्ञानिक प्रतिपादन अमेरिका व काही पश्चिमात्य राष्ट्रांमध्ये रुजवण्यासाठी सांस्कृतिक मार्क्सवाद्यांनी दडपशाही, धाकदपटशा, छद्मविज्ञान, संबंधित व्यवस्थांमधील घुसखोरी यांचा वापर करून ’फ्लुइड जेंडर’ या संकल्पनेविरुद्ध उघड भूमिका घेणे तर सोडाच; पण त्याविषयी एखादा ’पॉलिटिकली करेक्ट’ नसलेला शब्दही उच्चारणे अशक्य करून टाकले आहे. याचा अनुभव भाविश अगरवाल यांना कसा आला हे आपण बघणारच आहोत.
 
 
सगळ्यात घातक गोष्ट म्हणजे या सिद्धांताच्या समर्थकांनी हे प्रस्थापित केलं आहे की, आपल्याला ’मनातून वाटणारं’ आपलं लिंग कुठलं याचा निर्णय वयाच्या तिसर्‍या-चौथ्या वर्षीच होतो. यासाठी क्रिटिकल जेंडर थिअरीचं शिक्षण शाळांमध्ये सुरू करून तीन-चार वर्षांच्या मुलामुलींना, त्यांना ’कुठलं लिंग हवं आहे’ हे विचारून त्याचा निर्णय करण्यास उद्युक्त केलं जात आहे. अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये आज बारा-तेरा वर्षांच्या मुला-मुलींना हार्मोनची इंजेक्शने आणि शस्त्रक्रिया यांच्याद्वारा लिंगबदल करून घेण्यासाठी पालकांच्या परवानगीचीही गरज नसते. पालकांनी यासाठी आक्षेप घेतल्यास त्यांच्यावरच खटले दाखल करण्यात येतात. मुलं आणि पालक यांच्यामध्ये संशयाची भावना आणि संघर्ष निर्माण करून कुटुंबव्यवस्थेचा घात करण्याची ही योजना पश्चिमात्य जगतात मोठ्या प्रमाणात यशस्वी होते आहे.
 
स्वतःला ट्रान्सजेंडर घोषित करणार्‍या मुलामुलींची संख्या प्रचंड प्रमाणात वाढते आहे. हे असेच सुरू राहिले तर कुटुंबव्यवस्थेचाच नव्हे तर संपूर्ण मानवी सभ्यतेचा विनाश होण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकेल. डाव्या वाळवीला हेच हवे आहे. 
 
शाळेतील मुलांना गोष्टी सांगण्यासाठी स्त्रियांसारखी वेशभूषा व मेकअप केलेल्या पुरुषांना (त्यांना ड्रॅग क्वीन्स असं म्हटलं जातं) पाचारण केलं जातं व ट्रान्सजेंडरिझमचं प्रदर्शन केलं जातं. कॅनडामधील ओकव्हिल इथल्या ट्रॅफलगार हायस्कूलमधील एक ट्रान्सजेंडर स्त्री शिक्षिका (स्वतःला स्त्री ’समजणारा’ पुरुष) मेकअप करून, टाइट ब्लाऊजमध्ये मोठे नकली स्तन घालून, मिनी स्कर्ट घालून मुलांना शिकवते. याविषयी पालकांनी आक्षेप घेतला असता शाळेने त्या शिक्षिकेच्या ’ट्रान्सजेंडर राइट्स’चा विचार करून पालकांचा आक्षेप फेटाळून लावला. ट्रान्सजेंडरिझमच्या या उघड मार्केटिंगमुळे स्वतःला ट्रान्सजेंडर घोषित करणार्‍या मुलामुलींची संख्या प्रचंड प्रमाणात वाढते आहे. हे असेच सुरू राहिले तर कुटुंबव्यवस्थेचाच नव्हे तर संपूर्ण मानवी सभ्यतेचा विनाश होण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकेल. डाव्या वाळवीला हेच हवे आहे.
 
 
ट्रान्सजेंडरिझमनुसार हल्ली he/him/his किंवा she/her/hers याऐवजी ze/zer/zirs यांसारखी ’जेंडर न्यूट्रल’ सर्वनामं स्वीकारण्याचा प्रघात पडला आहे. हे फॅड अशासाठी निघालं आहे, की He, She सारखी सर्वनामं स्त्री व पुरुष ही दोन स्पष्टपणे वेगळी जेंडर्स असल्याचं दर्शवतात. यामुळे यापैकी एका जेंडरशी ’आयडेंटिफाय’ न करणारे लोक दुखावले जातात व त्यांच्यासाठी हे अन्यायकारक ठरते. यासाठी सर्वनामंच नव्हे तर इतरही अनेक शब्दांच्या जागी नवे ’जेंडर न्यूट्रल’ शब्द वापरण्याची पद्धत पडू लागली आहे. उदाहरणार्थ पालकांना पेरेंट्स न म्हणता फोक्स म्हणावं, असा आदेश देण्यात आला आहे, कारण पेरेंट्स म्हटलं की, एक स्त्री आणि एक पुरुष असा अर्थ ध्वनित होतो. मासिक पाळी येणार्‍या स्त्रियांना Menstruating People  किंवा बाळाला दूध पाजणार्‍या स्त्रियांना माता न म्हणता Milking Parent म्हटलं जावं, असा आग्रह होऊ लागला आहे. तसेच फक्त स्त्रिया बाळाला जन्म देऊ शकतात असं नाही, तर ट्रान्सजेंडर्स म्हणजे जीवशास्त्रीयदृष्ट्या स्त्री, जी स्वतःला पुरुष समजते किंवा नॉन-बायनरी लोक, जे स्वतःला स्त्री किंवा पुरुष असे एकच काही समजण्याला नकार देतात तेदेखील प्रेग्नंट होऊ शकतात आणि बाळाला जन्म देऊ शकतात. म्हणूनच ’प्रेग्नंट वुमन’ किंवा ’मदर’ असं न म्हणता ’बर्थिंग पीपल’ असं म्हटलं पाहिजे, असा वोक फतवा निघाला आहे.
 
 
कल्चरल मार्क्सिझम किंवा वोकिझमचा सर्वाधिक प्रभाव आहे तो अमेरिकेतील विद्यापीठांवर. गुगल, फेसबुक, लिंक्ड-इन यांसारख्या टेक-कंपन्यांमध्ये या विद्यापीठांमधून शिकून बाहेर पडलेले लोकच काम करतात. त्यामुळे या कंपन्यांवर वोक विचारांचा संपूर्ण पगडा असतो. म्हणूनच लिंक्ड-इनच्या ए.आय.नी भाविश अगरवालसाठी परस्परच They हे जेंडर न्यूट्रल सर्वनाम वापरलं. वोकविचारांची वाळवी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून स्लो पॉयझनिंगसारखी पसरवली जावी यासाठीच हे केलं जातं हे उघड आहे. सर्वसमावेशकतेचा आकर्षक मुखवटा असला तरी त्यामागे हे नेमकं कशासाठी केलं जातं आणि त्याचे परिणाम किती भयानक आहेत याची भाविशला जाणीव असल्यामुळे त्याने याविषयी लिंक्ड-इनकडे तक्रार केली असता त्यांनी सरळ त्याच्या पोस्ट डिलीट केल्या. या वैचारिक दडपशाहीसमोर मान न तुकवता भाविशने त्याविरुद्ध आवाज उठवताना सांगितलं की, त्याच्या ओला कंपनीचा फक्त महिलांनी चालवलेला एक कारखाना आहे जिथे पाच हजार महिला काम करतात. त्यामुळे सर्वसमावेशकतेचे धडे आम्हाला अमेरिकन टेक कंपन्यांकडून घेण्याची गरज नाही. तसंच भारतीय संस्कृतीने नेहमीच ट्रान्सजेंडर्सचा स्वीकार आणि सन्मान केला आहे. त्यामुळे याविषयीदेखील कोणी आम्हाला शिकवावे अशी परिस्थिती नाही. अमेरिकन टेक कंपन्यांच्या कॅन्सल कल्चरची वैचारिक दहशत मोडून काढण्यासाठी भारतीय टेक प्लॅटफॉर्म्स उभे करण्याचा निर्धारही भाविशने जाहीर केला.
 
 
ही जागृती आणि लढाऊ वृत्ती अत्यंत अभिनंदनीय आहे, कारण वोकिझमच्या वाळवीचं पुढचं लक्ष्य भारत हेच आहे. कुटुंबव्यवस्था आणि संस्कृती यांच्यावर होणारं हे आक्रमण थोपवून त्याला पराभूत करायचं, तर हा धोका समजून घेणं आणि त्याविरुद्ध ठाम भूमिका घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. फ्रान्स, हंगेरी, इटली, चीन, रशिया यांसारख्या अनेक देशांनी ’ही वाळवी आमच्याकडे नको’ ही जाहीर भूमिका घेतली आहे. चीनने तर अमेरिकन टेक प्लॅटफॉर्म्सना परवानगी नाकारून स्वतःचे प्लॅटफॉर्म्स विकसित केले आहेत. भारतानेही वेळीच जागं होऊन अशी पावलं उचलायला हवीत.
 

अभिजित जोग

हे नामवंत लेखक असून भारताच्या इतिहासाची मोडतोड व विकृतीकरण याविषयीचे 'असत्यमेव जयते?' हे त्यांचे पुस्तक खूपच लोकप्रिय आहे. त्याच्या इंग्रजी, हिंदी व गुजराती आवृत्त्याही उपलब्ध आहेत. डाव्या विचारसरणीविषयी त्यांनी लिहिलेल्या 'जगाला पोखरणारी डावी वाळवी' या विषयाला अल्पावधीतच प्रचंड प्रतिसाद मिळाला असून त्याची इंग्रजी आवृत्ती नुकतीच उपलब्ध झाली आहे. भारताच्या सांस्कृतिक वारशाविषयी 'हेरिटेज फर्स्ट' या समाजमाध्यमांवरील पेजचे ते लेखन करतात. ते विख्यात ब्रँड कन्सल्टंट, जाहिराततज्ज्ञ व काॅपीरायटर असून त्यांचे 'ब्रँडनामा' हे ब्रँडिंगवरील मराठीतले पहिले पुस्तकही खूप वाचकप्रिय आहे. इतिहास, संस्कृती, राजकारण, ब्रँडिंग व भूराजकीय डावपेच हे त्यांचे आवडते विषय आहेत. या विषयांवर ते विविध वृत्तपत्रे, मासिके तसेच समाजमाध्यमांवर नियमित लेखन करतात, तसेच विविध व्यासपीठांवर व्याख्याने देतात.