कुडाळ तालुक्याचे कृषिवैभव

कुडाळ कृषी उद्योग विशेष

विवेक मराठी    16-May-2024
Total Views |
अमोल करंदीकर
9423684095
 
 
Agricultural
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ हा एक महत्त्वाचा तालुका. भात, नाचणी या पिकांसह काजू, नारळ, सुपारी, कोकम, जांभूळ या फळबागांत हा तालुका अग्रेसर आहे. 2024-25 अंतर्गत 100 हेक्टर क्षेत्रावर बांबूची लागवड करण्यात येणार आहे. येत्या काळात या तालुक्यात फळबागेची मूल्यसाखळी निर्माण झाली, तर शेतकर्‍यांची आणखीन उन्नती होण्यास वाव आहे.
तळकोकणातला सिंधुदुर्ग हा महत्त्वाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहेत. शुक, कर्ली, गडनदी, तेरेखोल, आचरा, तिल्लिरी, देवगड नद्या आहेत. या जिल्ह्याला समुद्रकिनारा लाभला आहे. पर्यटन, मासेमारी, आंबा, काजू व फणस हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत. जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील कृषी क्षेत्रातील प्रगती देदीप्यमान आहे. काजू, नारळ, सुपारी, कोकम, जांभूळ आणि मसाला शेती हे कुडाळ तालुक्याचे मुख्य बलस्थान आहे. त्यामुळे तालुक्याचे अर्थकारण कृषी उद्योगाशी निगडित आहे.
कुडाळचे कृषी विश्व
 
कुडाळ तालुक्यातील भौगोलिक क्षेत्र 85 हजार हेक्टर क्षेत्र आहे. कर्ली ही एक महत्त्वाची नदी तालुक्यात वाहते. भाताखाली खरीप हंगामात 14 हजार हेक्टर क्षेत्र आहे. दोनशे हेक्टर नाचणी, आंबा 3 हजार 300 हेक्टर, काजू 12 हजार हेक्टर, नारळ 1700 हेक्टर, सुपारी 400 हेक्टर, जांभूळ 400 हेक्टर, कोकम 150 हेक्टर क्षेत्रावर लागवड आहे. (कुडाळच्या कोकमास भौगोलिक मानांकन मिळाले आहे.) असा तालुक्याचा कृषी आलेख आहे. 2023च्या आंतरराष्ट्रीय श्रीधान्य वर्षानिमित्ताने तालुक्यातील प्रायोगिक तत्त्वावर राळा, कांगणी सहधान्यांची लागवड करण्यात आली होती. भातामध्ये नवीन जातींची लागवड करण्यासाठी शेतकर्‍यांना प्रोत्साहित करण्यात येत आहे. काजू हे कुडाळ तालुक्याचे मुख्य बलस्थान आहे. हा तालुका कोरडवाहू आहे. त्यामुळे येथील माती काजू पिकास पोषक आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगअंतर्गत तालुक्यातील 55 लाभार्थ्यांना लाभही मिळालेला आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत गत तीन वर्षांपासून 1 हजार हेक्टर क्षेत्रावर फळबागेची लागवड केली आहे. 2024-25 कालावधीत 100 हेक्टर क्षेत्रावर बांबूची लागवड करण्यात येणार आहे. शिवाय हेक्टरी तांदळाचे 35 क्विंटलपर्यंत उत्पादन नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. केंद्र सरकारने भाताला रु. 2,150/- हमीभाव दिला. त्यामुळे तालुक्यात भाताचे क्षेत्र वाढून भाताची मोठी विक्री होत आहे.
 

Agricultural 
कृषी वैशिष्ट्यपूर्ण गावे
 
तालुक्यात कृषी क्षेत्रात काही वैशिष्ट्यपूर्ण गावे आहेत. यामध्ये निरूखे व आकेरी हे दोन जांभळासाठी प्रसिद्ध आहेत. डोंगराळ भागातील भरणी, पांग्रड, उसगाव, गिरगाव आणि बावबांभुळी या गावांत उन्हाळी कांद्याची लागवड केली जाते. हा कांदा चवीला रुचकर आणि कमी तिखटाचा आहे. त्यामुळे हा कांदा या परिसरात लोकप्रिय आहे. तेंडोली व मडगाव या गावांत चिबुड या वेलवर्गीय पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. माणगाव खोरे हे बांबूसाठी प्रसिद्ध आहे. मसाले शेतीसाठी तेंडोली हे गाव प्रसिद्ध आहे. आंदुर्ले गावात कोकमापासून तेलनिर्मिती केली जाते. बिंबवणे गावात गेल्या दहा वर्षांपासून कलिंगडाची लागवड केली जात आहे. निवजे हे गाव कृषी पर्यटन, बायोगॅसनिर्मिती, दुग्ध उत्पादनात अग्रेसर आहे.
 
गावासह तालुक्यातील काही प्रयोगशील शेतकरी आहेत. यामध्ये झाराप येथील शरद धुरी हे उत्कृष्ट भात उत्पादक आहेत. मुळदे येथील ज्ञानेश्वर मायनीकर हेदेखील भात पिकात उत्तम काम करत आहेत. वेताळ बांबर्डे येथील उदय वेलणकर यांची चाफ्याची उत्कृष्ट शेती आहे. रानबांबुळी येथील संतोष खोत हे बांबू उत्पादनात उत्तम काम करत आहेत. तालुक्यात काही शेतकरी उत्पादक कंपन्या नव्याने स्थापन झाल्या आहेत.
 
भविष्यवेध
 
येत्या काळात कुडाळ तालुक्याच्या कृषी क्षेत्रासमोर विविध आव्हाने आहेत. यामध्ये शेतकर्‍यांच्या असंख्य जमिनी वनसंज्ञेअंतर्गत फॉरेस्ट म्हणून दप्तरी नोंद झाल्या आहेत. या जमिनी शेतकर्‍यांना मिळणे आवश्यक आहेत. शेतीची तुकडी करणे ही एक समस्या आहे. एका सातबार्‍यावर 20 ते 25 जणांची नावे असतात. यामुळे शासनाच्या योजनेचा लाभ घेता येत नाही. याशिवाय वन्यजीवामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. तालुक्यात पाटबंधारे विभागाचे काही प्रकल्प रखडलेले आहेत. हे प्रकल्प मार्गी लागले तर तालुक्याचा काही भाग ओलिताखाली येईल. याशिवाय कृषी विकास घडवून आणायचा असेल तर प्रत्येक पिकाची मूल्यसाखळी निर्माण झाली पाहिजे.
 
- लेखक कुडाळ तालुक्याचे कृषी अधिकारी आहेत.