फातमा बेगम

विवेक मराठी    16-May-2024   
Total Views |
भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिली महिला दिग्दर्शिका
(1892-1983)
vivek 
अभिनेत्री, दिग्दर्शिका, निर्माती, पटकथालेखक अशा चित्रपट क्षेत्रातील बहुतांश जबाबदार्‍या लीलया पेलणारी हरहुन्नरी कलाकार म्हणजे फातमा बेगम. मोजक्याच चित्रपटांच्या कारकीर्दीत बिग बजेट फिल्म, ट्रिक सीन्स आणि स्पेशल इफेक्ट्ससारखी तंत्रे वापरून चित्रनिर्मिती करणारी दिग्दर्शिका म्हणून तिचा नावलौकिक होता.
चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांना स्त्री भूमिकांसाठी पुरुष पात्रं वापरावी लागत होती, अशा काळात अभिनयासाठी स्वतःहून उपलब्ध झालेली, पुढे अभिनयापेक्षा चित्रपटनिर्मिती आणि दिग्दर्शनात उतरलेली आणि मोजक्याच चित्रपटांच्या कारकीर्दीत बिग बजेट फिल्म, ट्रिक सीन्स आणि स्पेशल इफेक्ट्ससारखी तंत्रे वापरून चित्रनिर्मिती करणारी दिग्दर्शिका हिंदी चित्रपटसृष्टीत 1922 ते 1929 या अवघ्या सात वर्षांच्या काळात होऊन गेली, यावर आज कुणाचा विश्वासही बसणार नाही. विश्वास न बसायचं मुख्य कारण म्हणजे त्या काळातील बहुतांश चित्रपटांच्या प्रती आज उपलब्ध नसणं. तो काळ होता चित्रपटांची रिळं सुरक्षित ठेवण्यासाठीचं तंत्र विकसित न झालेला. त्यामुळे एका अर्थानं काळाच्या उदरात दडल्या गेलेल्या इतिहासातलं असं हे व्यक्तिमत्त्व.
 
या दिग्दर्शिकेचं आणि निर्मातीचं नाव फातमा बेगम. इंग्रजीत तिचं नाव लिहिलं जातं ऋरीांर असं; पण देवनागरीत लिहिताना ते फातमा आणि फातिमा अशा दोन्ही पद्धतीनं लिहिलं जातं. फातमा कोण नव्हती? ती अभिनेत्री होती, दिग्दर्शिका होती, निर्माती होती आणि पटकथालेखकही होती. तत्कालीन भारतातील एका उर्दू भाषिक मुस्लीम कुटुंबात तिचा जन्म झाला. सुरुवातीला उर्दू रंगभूमीवर सक्रिय असणारी फातमा वयाच्या 19 व्या वर्षीच आई झाली. सुलताना, झुबेदा आणि शहजादी अशा तीन मुलींना पाठीशी घेऊन फातमा बेगमनं आपला चित्रपटसृष्टीतला प्रवास सुरू केला. असं म्हणतात की, फातमाची तीन लग्नं झालेली होती; पण ती तीनही अपयशी ठरली होती. चित्रपटसृष्टीला चंदेरी दुनिया असंही म्हणतात; पण फातमा बेगमला सुरुवातीला भाकरीच्या चंद्रासाठीही झगडावं लागलं.
 
आजच्या गुजरात राज्यातील सुरत परगण्यात सचिन नावाचं एक संस्थान त्या काळी होतं. त्या सचिन संस्थानचा नबाब सिद्दी इब्राहिम मुहम्मद याकूत खान तिसरा याच्याशी फातमाचा एक निकाह लागला होता, अशी एक वदंता आहे. त्या नबाबापासून फातमाला झुबेदा, सुलताना आणि शहजादी अशा तीन कन्या झाल्या. नबाबानं आपलं हे लग्न कधीच सार्वजनिकरीत्या मान्य केलं नाही, त्यामुळे त्यानं कधी त्या मुलींना आपलंसंही केलं नाही. तिघी जणी आईकडेच लहानाच्या मोठ्या झाल्या.
 
1892 ला एका उर्दू मुस्लीम कुटुंबात जन्मलेल्या फातमाचा अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका आणि लेखिका बनण्याचा प्रवास उर्दू रंगभूमीवरून सुरू झाला. हा प्रवास आणि तिचं स्वत:चं आयुष्य अनेक वळणं घेत पुढे जात राहिलं. फातमाला 91 वर्षांचं आयुष्य लाभलं. 1983 साली ती गेली. तिचा चित्रपटसृष्टीचा वारसा झुबेदानं जपला. भारतातील पहिला बोलपट ‘आलम आरा’मध्ये तिनं भूमिका केली, त्याशिवाय ‘आलम आरा’आधीच्या मूकपटांमध्येही तिनं कामं केली. फातमानं वयाच्या तिसाव्या वर्षी अर्देशीर इराणी यांच्या ‘वीर अभिमन्यू’ या मूकपटात पहिली भूमिका केली. त्याशिवाय ‘सती सर्दबा’, ‘पृथ्वी वल्लभ’, ‘काला नाग‘ आणि ‘गुल-ए-बकावली’ या 1924 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्येही भूमिका केल्या..
 
पुढच्याच वर्षी 1925 साली ‘मुंबई’ नि ‘मोहिनी’ या चित्रपटांतही ती चमकली. 1926 साल फातमासाठी आणखी महत्त्वाचं होतं. या वर्षी फातमानं ‘बुलबुल-ए-परिस्ताँ’ या तिच्या पहिल्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. त्याच वर्षी तिनं फातिमा फिल्म्स ही तिची चित्रपटनिर्मिती कंपनी लाँच केली. 1928 मध्ये फातिमा फिल्म्सनं स्वतःचं प्रॉडक्शन हाऊस सुरू केलं. त्याचं नाव तिनं व्हिक्टोरिया-फातिमा फिल्म्स असं ठेवलं.
 
आपल्या तिघी मुलींना घेऊन फातमा बेगम अर्देशीर इराणी यांच्या तंबूत दाखल झाल्या. अर्देशीर म्हणजे चित्रपटसृष्टीतलं बडं प्रस्थ. इम्पिरिअल फिल्म्स नावाच्या मोठ्या चित्रपटसंस्थेचे ते मालक, दिग्दर्शक, लेखक, अभिनेते. फातमा बेगम यांना 1922 मधील ‘वीर अभिमन्यू’ या मूकपटात सुभद्रेची भूमिका मिळाली. यातील उत्तरा या अभिमन्यूच्या पत्नीची भूमिका फातमाच्या मुलीनं म्हणजे सुलतानानं केली होती. तो काळ स्त्री भूमिका पुरुषांनी करण्याचा होता, त्या प्रकाराला धक्का दिला तो फातमानं.
 
फातमाला सहजपणे भूमिका मिळत गेल्या. फातमा बेगम वर्णानं अत्यंत उजळ असल्यामुळे तिला सेपिया टोनचा मेकअप करावा लागे, कारण चित्रपट कृष्णधवल रंगात असत. प्रत्यक्ष जीवनातला आयुष्य नावाचा तारा काहीसा झाकोळलेला असताना, फातमा बेगम मूक चित्रपटाच्या सुपरस्टार बनल्या. नवाब सिद्दी इब्राहिम महम्मद याकूत खान तिसरे यांनी जरी तिच्या अस्तित्वाची दखल देहापुरतीच घेतली असली, तरी रंगदेवतेनं मात्र तिची, तिच्या कामाची योग्य दखल घेतली.
 
फातमाची सक्रिय कारकीर्द तशी अवघी सात-आठ वर्षांची; पण त्यातही तिनं वैविध्य जपलं. ‘बुलबुल-ए-परिस्ताँ’ हा एका पर्शियन कथेवरचा चित्रपट तिनं बनवला. ती कथा आहे एका राणीची, जी आपल्या राज्याची घडी बसविण्यासाठी जादूचा उपयोग करते. त्या काळातला तो बिग बजेट चित्रपट ठरला. त्यात फातमानं स्पेशल इफेक्ट्ससाठी ट्रिक सीन्स फोटोग्राफीचा उपयोग केला. दुर्दैवानं त्या चित्रपटाची एकही प्रिंट कुठेच कुणाकडेही उपलब्ध नाही; पण त्या सिनेमाला जे अभूतपूर्व यश लाभलं, त्यामुळे ‘अल्लाउद्दिन आणि जादूचा दिवा’ यांसारख्या फँटसी चित्रपटांचा मार्ग खुला झाला. तो चित्रपट बनवला अर्देशीर इराणीनं, जो तिचा एके काळचा सहकारी होता. स्त्री कलाकारांना मध्यवर्ती भूमिका देऊन तिनं काही चित्रपट बनवले. 1927 मध्ये ‘गॉडेस ऑफ लव्ह’, 1928 मध्ये ‘हीर रांझा’, ‘चंद्रावली’. त्यानंतर 1929 मध्ये ‘कनकतार’, ‘मिलन दिनार’, ‘नसीब नी देवी’ (‘गॉडेस ऑफ लक’) आणि ‘शकुंतला’ हे चित्रपट फातमानं बनवले.
 
फातमानं कोहिनूर स्टुडिओज, इम्पिरियल स्टुडिओज यांच्याकडेही कामं केली आणि आपल्या तीनही कन्यांना साजेसे चित्रपट मिळवून दिले. 1929 नंतर फातमा सिनेमात फारशी दिसली नाही, अपवाद फक्त दोन-तीन सिनेमांचा. 1934 मध्ये तिनं नानूभाई वकील यांच्या ‘सेवा सदन’मध्ये काम केलं. 1937 मध्ये ती जी. पी. पवार यांच्या ‘दुनिया क्या है’ या चित्रपटात आणि होमी मास्टर यांच्या ‘पंजाब लान्सर्स’ या चित्रपटांमध्ये दिसली, तेवढीच. सायन्स फिक्शन फिल्म हॉलीवूडमध्ये बनली ती साधारणपणे 1902 च्या सुमारास, त्या तुलनेत फातमानं पहिली सायन्स फिक्शन फिल्म भारतात बनवली ती 1926 मध्ये.
 
भारतीय सिनेमात व्हीएफएक्स तंत्राचा अवलंब सर्वप्रथम केला तोही फातमानं. 1922 मध्ये सिनेमा माध्यमाशी संबंध आलेल्या फातमाचा 1937 च्या ‘पंजाब लान्सर्स’ आणि ‘दुनिया क्या है’नंतर मात्र सिनेमाबरोबरचा संबंध पुरता संपला. ‘गॉडेस ऑफ लक’ हा बहुधा तिचा शेवटचा चित्रपट. त्यानंतर तब्बल 53 वर्षे ती जगली; पण ती चित्रपट माध्यमाच्या जवळपासही फिरकल्याचे उल्लेख कुठे सापडत नाहीत. 1920 नंतरच्या दशकात इतकी मोठी कारकीर्द प्रस्थापित करणारी फातमा वयाच्या 91 व्या वर्षी, 1983 साली गेली, ती जवळपास कुणीही दखल न घेता.

सुधीर जोगळेकर

  सुधीर जोगळेकर हे ज्येष्ठ पत्रकार आहेत..