भाजपा समर्पित कार्यकर्ता - विश्वास गांगुर्डे

विवेक मराठी    18-May-2024
Total Views |
@माधव भांडारी
दलित समाजातून आलेल्या विश्वास गांगुर्डे यांनी संघप्रणीत राजकीय संघटनेने नेतृत्व करणे हे जेवढे अप्रूप होते, तेवढेच ते राजकीय आव्हानही होते; परंतु हे आव्हान विश्वासरावांनी चांगल्या पद्धतीने झेलले व महाराष्ट्रभर गावोगाव प्रवास करून नवे तरुण कार्यकर्ते हुडकून संघटनेची उभारणी केली. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे यासाठी सुरू झालेल्या नामांतर चळवळीत त्यांनी सक्रिय भाग घेतला. पानशेत पूरग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. पुढे पुण्याच्या पर्वती भागातून ते आमदार झाले. आपल्या राजकीय कारकीर्दीत भाजपासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. अशा भाजपा समर्पित कार्यकर्त्याला श्रद्धांजली अर्पण करणारा लेख...
 
vivek
 
विश्वास गांगुर्डे यांच्या निधनामुळे महाराष्ट्रात भाजपाची उभारणी करणारी जी पहिली पिढी होती, त्या पिढीतील आणखी एक बिनीचा शिलेदार काळाच्या पडद्याआड गेला आहे. गेली काही वर्षे विश्वासराव राजकारणापासून दूर होते. कवितालेखन व संगीताचे कार्यक्रम यामध्ये त्यांनी स्वतःला गुंतवून घेतले होते. त्यामुळे अलीकडच्या काळातील भाजपा कार्यकर्त्यांना व जनतेलासुद्धा ‘विश्वास गांगुर्डे’ या नावाची व व्यक्तिमत्त्वाची ओळख नव्हती; पण आपली साधी राहणी व मृदुभाषी स्वभाव यांच्या आधाराने किमान तीन दशके त्यांनी भाजपाच्या उभारणीत मोलाचे योगदान दिले होते.
 
 
विश्वासरावांचा पिंड हा जन्मतःच कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्त्याचा होता. त्यांचे वडील कृष्णराव गांगुर्डे हे स्वा. वीर सावरकरांचे निकटचे सहकारी होते व ते हिंदू महासभेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष होते. विश्वासरावांना स्वतःला लहान वयातच स्वा. वीर सावरकरांचा सहवास मिळाला होता. त्यांचे ‘विश्वास’ हे नाव स्वतः सावरकरांनी ठेवलेले होते. घरातील या वातावरणामुळे विश्वासराव लहान वयातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाकडे आकर्षित झाले होते. रा. स्व. संघाचे ‘कै. मा. बाबाराव भिडे’ यांच्या अत्यंत विश्वासातल्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा समावेश होता. भारतीय जनसंघाचे तत्कालीन संघटनमंत्री ‘कै. वसंतराव भागवत’ यांच्या प्रयत्नांमुळे विश्वास गांगुर्डे जनसंघाच्या कामात सक्रिय होते. आणीबाणीच्या काळात विचारस्वातंत्र्यासाठी लढल्या गेलेल्या लढ्यात भूमिगत चळवळ उभी करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. 1978 साली जनता पार्टीअंतर्गत ‘भारतीय जनता युवा मोर्चा’ या युवक संघटनेची स्थापना झाली, तेव्हा त्या संघटनेच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षपदाची जबाबदारी विश्वासरावांवर सोपवण्यात आली. ज्या काळात राष्ट्रसंघ, जनसंघ ही नावे घेण्याचीसुद्धा चोरी होती; संघ, जनसंघ या मूठभर उच्चवर्णीयांच्या शेटजीभटजींच्या संघटना आहेत, असे आरोप होऊन या संघटनांवर केवळ वैचारिक अथवा शाब्दिक नाही, तर हिंसक शारीरिक हल्लेसुद्धा केले जात होते, त्या काळात दलित समाजातून आलेल्या विश्वास गांगुर्डे यांनी अशा पद्धतीने संघप्रणीत राजकीय संघटनेने नेतृत्व करणे हे जेवढे अप्रूप होते, तेवढेच ते राजकीय आव्हानही होते; परंतु हे आव्हान विश्वासरावांनी चांगल्या पद्धतीने झेलले व महाराष्ट्रभर गावोगाव प्रवास करून नवे तरुण कार्यकर्ते हुडकून संघटनेची उभारणी केली. 1980 मध्ये जेव्हा भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली, तेव्हा भा. ज. यु. मो.ची ही तयार संघटना भाजपाच्या उभारणीसाठी उपयुक्त ठरली. त्यानंतरच्या काळात महाराष्ट्र भाजपाच्या सरचिटणीसपदाची जबाबदारीदेखील विश्वासरावांनी अतिशय सक्षमरीत्या पार पाडली. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे यासाठी सुरू झालेल्या नामांतर चळवळीत त्यांनी सक्रिय भाग घेतला. या मागणीसाठी लोकमत तयार करण्याच्या उद्देशाने त्यांनी संपूर्ण मराठवाड्यात पदयात्रा केली. त्या पदयात्रेने मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीला अधिक धार चढली. मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर केले गेले. यामध्ये विश्वासराव गांगुर्डे यांचे योगदान कधीच विसरता येणार नाही.
 दलित समाजातून आलेल्या विश्वास गांगुर्डे यांनी अशा पद्धतीने संघप्रणीत राजकीय संघटनेने नेतृत्व करणे हे जेवढे अप्रूप होते, तेवढेच ते राजकीय आव्हानही होते; परंतु हे आव्हान विश्वासरावांनी चांगल्या पद्धतीने झेलले
 
भाजपाच्या कामात प्रदेश स्तरावर वेगवेगळ्या जबाबदार्‍या पार पाडत असतानाच विश्वासराव पुणे शहराच्या स्थानिक राजकारणातही सक्रिय होते. 1978 साली महापालिकेच्या खुल्या प्रभागातून निवडणूक लढवून ते नगरसेवक म्हणून निवडून आले. पुणे महापालिकेत दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या विश्वासरावांनी नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी खूप परिश्रम घेतले. विशेषतः पानशेत पूरग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. पूरग्रस्तांची एक संघटना बांधून त्या संघटनेच्या माध्यमातून विविध आंदोलने करून विश्वासरावांनी त्या प्रश्नांवर सरकारला जागे ठेवण्याचे काम केले. त्यामुळे पानशेत पूरग्रस्तांच्या काही प्रश्नांची सोडवणूकसुद्धा झाली. मध्यंतरीच्या काळात पुणे शहर भाजपाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर आली होती.
 
विश्वासरावांचे सर्व प्रकारचे योगदान लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीने त्यांना विधानसभा निवडणूक लढवण्याची संधी दिली; परंतु पहिल्या दोन प्रयत्नांत त्यांना अपयश आले. मात्र तिसर्‍या वेळेला ते पर्वती मतदारसंघातून विधानसभेत निवडून गेले. आमदार या नात्यानेसुद्धा त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली; परंतु नंतरच्या काळात झालेल्या मतदारसंघ फेररचनेचा फटका त्यांना बसला व पुढील निवडणुकीत ते पराभूत झाले. त्यानंतर मात्र राजकारणातून त्यांचा वावर कमी कमी होत गेला.
 
मा. अटलजींच्या कवितांचे गायन करण्याचे कार्यक्रमदेखील ते करत असत. त्यांच्या या दोन्ही कार्यक्रमांना रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असे.
 
विश्वास गांगुर्डे हे चांगले कवी आणि गायक होते. स्वतःच्या कवितांबरोबरच नव्या कवींच्या कवितांना चाल लावून त्या सादर करण्याचे कार्यक्रम विश्वासराव करत असत. त्याचबरोबर मा. अटलजींच्या कवितांचे गायन करण्याचे कार्यक्रमदेखील ते करत असत. त्यांच्या या दोन्ही कार्यक्रमांना रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असे. अगदी शेवटच्या आजारापर्यंत या उपक्रमांमध्ये विश्वासराव व्यस्त होते.
 
 
मला 1978 सालापासून विश्वासरावांचा सहवास लाभला. भारतीय जनता युवा मोर्चा ही संघटना स्थापन करण्यामध्ये आम्ही सगळे बरोबर होतो. त्यामुळे विश्वासरावांना मी जवळून ओळखतो. त्यांचा निगर्वी स्वभाव, सौम्य बोलणं आणि परिश्रम करण्याची तयारी ही वैशिष्ट्ये कायम लक्षात राहणारी होती. महाराष्ट्रातील भाजपाच्या पक्षसंघटनेच्या बांधणीमध्ये विश्वासरावांनी दिलेले योगदान कधीच विसरता येणार नाही. 1980च्या दशकात भाजपाच्या उभारणीत जे तरुण कार्यकर्ते पुढे आले, त्यापैकी विश्वास गांगुर्डे हे प्रमुख होते. त्यांच्या आणि माझ्या वयात बरेच अंतर असले तरी आमची चांगली मैत्री होती. शेवटपर्यंत आमचा एकमेकांशी संपर्क होता. सुरुवातीच्या काळात महाराष्ट्रातील भाजपाची उभारणी करणार्‍या कार्यकर्त्यांची पिढी दुर्दैवाने एकेक करून काळाच्या पडद्याआड जात आहे. विश्वासराव गांगुर्डे यांच्या निधनाने त्या पिढीतील आणखी एका खंद्या कार्यकर्त्याने आपला निरोप घेतला आहे. विश्वास गांगुर्डे यांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी होत असताना मी त्यांना मनःपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो.
 
शब्दांकन - सिद्धी सावंत