‘इस्रोची केवळ माहितीच नव्हे तर प्रेरणा देणारे पुस्तक’ - ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर

विवेक मराठी    02-May-2024
Total Views |

ISRO
 
 
पुणे : ’डॉ. सुरेश नाईक यांच्या पुस्तकात इस्रोची केवळ माहितीच नाही तर हे प्रेरणा देणारे पुस्तक आहे. वाचकांचे स्वारस्य शेवटपर्यंत टिकवून ठेवून त्यांनी विषय कथन केला आहे. उपग्रहांचे प्रकार, अग्निबाण क्षेत्रात वाटचाल आणि इस्रोच्या विश्वविक्रमी मोहिमा त्याचबरोबर सर्वांत महत्त्वाचे म्हणजे भविष्यातील मोहिमा अशी सर्वच माहिती या पुस्तकात आहे. मला वाटते, हे पुस्तक सर्व भाषांत असावे आणि सर्व शाळांत सर्व विद्यार्थ्यांपर्यंत जावे.’ अशा शब्दांत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी ’इस्रोची विस्मयजनक अवकाशयात्रा’ या वैज्ञानिक पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी आपले मत मांडून या उत्तम पुस्तक प्रकाशनाबाबत सा. विवेकचे अभिनंदन केले.
 
आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले, ’भ्रष्टाचारमुक्त भारत हाच खर्‍या अर्थाने 2047 मधील विकसित भारत असेल. तेव्हा ’भारत’ आणि ’इंडिया’, असा फरक नसेल. भारताने आधी भ्रष्टाचारमुक्त व्हावे, तरच विकसित भारत अर्थपूर्ण ठरेल. सुशासन, लोकशाही मूल्यांची जपणूक, सुरक्षेची ग्वाही असेल, तेव्हाच भारत हा लँड ऑफ आयडियाज पुरता मर्यादित न राहता लँड ऑफ अपॉर्च्यूनिटीज असेल.’
 
संपर्क 

इस्रोची – विस्मयजनक अवकाशयात्रा

लेखक : सुरेश नाईक | शब्दांकन : ऋता बावडेकर

• अवकाशातील अंतराळवीरांचं आयुष्य कसं असतं? अवकाशातील कचऱ्याचं पुढे काय होतं?

• आपल्या लँडर आणि रोव्हरचं आयुष्य कसं असतं ?

अवकाश पर्यटन नक्की कसं असेल?

आपल्याला पडणाऱ्या यासारख्या अनेक प्रश्नांची रंजक आणि माहितीपूर्ण उत्तरं जाणून घेण्यासाठी आजच आपली प्रत राखून ठेवा.

सवलत 150/-

https://www.vivekprakashan.in/books/isro-information-in-marathi/

 
 
विज्ञान भारतीचे माजी राष्ट्रीय संघटन सचिव स्वर्गीय जयंत सहस्रबुद्धे यांच्या जन्मदिनानिमित्त ’जयंतस्मृति’ व्याख्यान व पुस्तक प्रकाशनाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, विवेक प्रकाशन आणि विज्ञान भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (17 एप्रिल) रोजी सायंकाळी 5.30 वाजता एमईएस सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे येथे हा कार्यक्रम पार पडला.
 
याप्रसंगी ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे ’2047 च्या भारतासाठी धोरणात्मक आणि वैज्ञानिक कृती’ यावर विशेष व्याख्यान झाले. तसेच पश्चिम महाराष्ट्र विज्ञान भारतीचे माजी अध्यक्ष आणि इस्रोचे माजी समूह संचालक डॉ. सुरेश नाईक लिखित विवेक प्रकाशन प्रकाशित ’इस्रोची विस्मयजनक अवकाशयात्रा’ या वैज्ञानिक पुस्तकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते झाले. विवेकचे सहकार्यकारी संपादक दीपक जेवणे यांनी या पुस्तकाचा परिचय ओघवत्या भाषेत करून दिला. ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांची विशेष उपस्थिती कार्यक्रमाला होती. तसेच एमईएस नियामक मंडळ उपाध्यक्ष आनंदी पाटील, विज्ञान भारती पश्चिम महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. योगेश शौचे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एअरमार्शल भूषण गोखले (निवृत्त) होते.
 
 
यावेळी इंटर्नशिप पोस्टरचे विमोचनही मान्यवरांनी केले. पोस्टरविषयी डॉ. नंदिनी कोठारकर यांनी माहिती दिली. तसेच मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षेमध्ये पुणे जिल्ह्यातील विजेत्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा झाला.
 
 
डॉ. माशेलकर यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेकानेक उदाहरणे देत विकसित भारताची प्रतिमा श्रोत्यांसमोर उभी केली. ते म्हणाले, ’तंत्रज्ञानाच्या योग्य वापरातून आपण उत्पन्नाच्या पातळीवरील असमानता दूर करू शकतो. आपल्या युवा पिढीने समाजातील तळागाळाच्या हिताचे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. आपण धर्म, जात, भाषा, वंशाच्या नावावर विभाजित होत असल्याचे चित्र आहे. पण आपण प्रत्येकाने जातीमुक्त भारताचे स्वप्न पाहिले पाहिजे. स्वातंत्र्याच्या शताब्दीवर्षांतला भारत हा सुसंस्कृत, सुशिक्षित, सुरक्षित, समृद्ध आणि स्वानंदी असावा, असे मला वाटते’.
 
डॉ. कीर्ती बडवे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला व डॉ. योगेश शौचे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. कौस्तुभ साखऱे यांनी जयंतराव सहस्रबुद्धे यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले. डॉ. भटकर यांनी जयंतराव सहस्रबुद्धे यांच्या आठवणींना उजाळा दिला. ’जयंतराव सर्वसामान्यांच्या सेवेसाठी समर्पित होते. त्यांची विज्ञानाकडे पाहण्याची दृष्टी निराळी होती. त्यांचे समाजासाठीचे योगदान अविस्मरणीय होते, त्यांनी दिलेली दृष्टी आणि दिशा पकडून आपण काम केले पाहिजे’, असे भटकर म्हणाले.
 
भूषण गोखले यांनी अध्यक्षीय समारोपात जयंतरावांचे स्मरण केले. डॉ. मानसी माळगावकर यांनी ऋणनिर्देश केला डॉ. सुनील कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.