देशी बीज संवर्धनात ‘अ‍ॅग्रीकार्ट’ अग्रेसर

विवेक मराठी    20-May-2024
Total Views |

vivek
कुडाळ तालुक्यातील पणदूर येथील अ‍ॅग्रीकार्ट फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीने लोप पावत असलेल्या नव्वद देशी बियाण्यांची बीज बँक तयार केली आहे. 50 एकर क्षेत्रावर देशी बियाण्यांची लागवड करून जतन व संवर्धन करण्यात येत आहे. हा प्रयोग कुडाळ तालुक्याच्या कृषिवैभवात भर घालत आहे.
स्थानिक देशी बियाण्यांचे संवर्धन व्हावे व शेतमालाची मूल्यसाखळी निर्माण व्हावी, यासाठी प्रगतिशील शेतकरी संतोष गावडे, सचिन चोरगे या ज्येष्ठ संचालकांच्या मार्गदर्शनाखाली 2019 साली ’अ‍ॅग्रीकार्ट फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी’ची स्थापना करण्यात आली. सध्या कंपनीचे 516 सभासद आहेत. कंपनीकडून सध्या श्रीधान्य, कडधान्य, वेलवर्गीय पिके, भाजीपाला आदी पिकांच्या पारंपरिक धान्यांच्या संवर्धनात भरीव कार्य सुरू आहे. विशेष म्हणजे 30 हून अधिक देशी भात बियाण्यांचे संकलन केले आहे. संकलित केलेल्या सुगंधी भात बियाण्यांवर 36 एकरांवर प्रयोग करण्यात आले.
 
संपर्कः
 सचिन चोरगे
संचालक - अ‍ॅग्रीकार्ट फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी
पणदूर, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग
9819878271
 
2020 साली कुडाळ येथे बीज बँक तयार केली. या बँकेत सध्या नामशेष होत असलेली नव्वद देशी बियाणे आहेत. या माध्यमातून संकलित केलेल्या देशी बियाण्यांची लागवड करणे, त्यातून शुद्ध बीज निवड करणे आणि ते शेतकर्‍यांना उपलब्ध करून देण्याचे कार्य सुरू आहे. 50 एकर जमिनीवर देशी बियाण्यांची लागवड करून जतन व संवर्धन करण्यात येत आहे. सीड बँकेतून 2021 ते 2024 या काळात सुमारे दोन हजार किलोंहून अधिक देशी बियाण्यांची विक्री झाली आहे. देशी भात बियाण्याला सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, रायगड, पालघर, सांगली आदी जिल्ह्यांत मोठी मागणी आहे.
 

vivek 
याखेरीज शेतकर्‍यांकडून भात खरेदी व विक्री करून देशी बियाण्यांची मूल्यसाखळी निर्माण केली आहे. दुग्ध व्यवसाय, कृषी सेवा केंद्र, कॉमन सर्व्हिस सेंटर व कृषी अवजारे बँकेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना सेवा पुरविण्यात येत आहे. काजू, आंबाविक्रीचा प्रयोग कंपनीकडून करण्यात आला आहे. बियाणे संकलन, संवर्धन, बीजोत्पादन, प्रसार, उत्पादन आणि खरेदी या पद्धतीचा वापर करून कंपनीने कुडाळ तालुक्यात लौकिक मिळवला आहे.
- प्रतिनिधी