नारळी, सुपारी बागेत बहरली मसाला शेती

विवेक मराठी    20-May-2024
Total Views |
बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या लाखी बागेचा नमुना कुडाळ तालुक्यातील तेंडोली येथील शेतकरी अच्युत तेंडोलकर यांच्याकडे पाहायला मिळाला. ते नारळ व सुपारी बागेत मसाला पिकांची उत्कृष्ट शेती करत आहेत.
 
 
kokan
अच्युत तेंडोलकर यांची 40 एकर शेती आहे. आधुनिक शेतीचा अंगीकार करून ते 1980 पासून शेतीत सुधारणा घडवून आणत आहेत. नारळ, सुपारी व काजू हे त्यांचे मुख्य पीक. नारळाची 1 हजार झाडे, सुपारीची 5 हजार झाडे, काजूची 2 हजार झाडे आणि आंब्याची 25 झाडे आहेत. या फळबागेत आंतरपीक म्हणून जायफळ, काळी मिरी, लवंग व वेलची आदी मसाला पिकांची नियोजनबद्ध लागवड केली आहे. दोन सिंचन विहिरी, तुषार ठिबक सिंचनाद्वारे बागेला पाणी देत असतात. मुख्य म्हणजे बागेच्या बाजूने छोटी नदी वाहते. या नदीतला गाळ काढला गेला आहे. त्यामुळे विहिरीची पाणी पातळी वाढली आहे. दापोली येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या लाखी बागेचा नमुना तेंडोलकरांच्या बागेत पाहायला मिळतो.
संपर्क 
 अच्युत तेंडोलकर
तेंडोली, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग
9421990299
 
kokan
 
जायफळ, काळी मिरी, लवंग, दालचिनी आदी रोपांची निर्मिती ते स्वतः करतात. त्यामुळे मसाला शेतीत त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्यांच्याकडे काळी मिरीची 200 रोपे, जायफळाची 250 रोपे, लवंगची 150 रोपे आणि वेलचीची 15 रोपे आहेत. दरवर्षी जायफळाचे दीड क्विंटल, काळी मिरीची दोन क्विंटल, लवंग 20 किलो उत्पादन निघते. उत्पादनाची गुणवत्ता उत्तम असल्याने व्यापारी जागेवर येऊन माल खरेदी करतात. त्यामुळे त्यांचा मालवाहतुकीचा खर्च वाचला आहे. वर्षाकाठी मसाला शेतीतून त्यांना एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. शेतीच्या कामासाठी 12 मजुरांना कायमस्वरूपी रोजगार मिळाला आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी तेंडोलकर यांच्या बागेला भेट देऊन त्यांचे कौतुक केले आहे. ही प्रयोगशीलता पाहण्यासाठी राज्य-परराज्यांतील शेतकरी भेट देतात. असा हा शेतकरी कुडाळ तालुक्याच्या कृषिवैभवात भर टाकत आहे.
- प्रतिनिधी