214 एकरांवर मिश्रशेतीचा अनोखा पॅटर्न

विवेक मराठी    20-May-2024
Total Views |
@विवेक मुतालिक 9422381378
जिद्द आणि कष्टाच्या बळावर प्रगतिशील शेतकरी बाजीराव झेंडे यांनी सुमारे 214 एकर क्षेत्रावर मिश्रशेतीचा अनोखा प्रयोग यशस्वी केला आहे. प्रयोगशीलता, आधुनिकतेचा अवलंब, आर्थिक नियोजन व बाजारपेठांचे संशोधन यातून त्यांनी मिश्रशेतीत यश मिळविले आहे.
kokan
 
डाळ तालुक्यातील हिर्लोक येथील प्रयोगशील शेतकरी बाजीराव झेंडे यांची ही अफलातून कहाणी आहे. झेंडे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगरचे. वडील कोकणात शिक्षक होते. हिर्लोक येथे त्यांनी 30-35 वर्षांपूर्वी 214 एकर शेती विकत घेतली. 1996 साली बाजीरावांनी बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून बी.एस्सी. अ‍ॅग्रिकल्चरचे शिक्षण घेतले. कृषी पदवीधर होेऊन वडिलोपार्जित शेती करणे, हा त्यांचा मुख्य उद्देश होता. काही वर्षांपूर्वी ते पारंपरिक पिके घेत. पारंपरिक शेतीला फाटा देत मिश्र पीक पद्धतीचा अंगीकार केला. 214 एकरांवर नारळ, आंबा, काजू, कोकम, बहडोली जांभूळ, ऑइल पाम, श्वेत व रक्तचंदन शेती, बांबू आणि कलिंगड अशा प्रकारची मिश्रशेती विकसित केली आहे.
 
47 एकरांवर ‘ऑइल पाम‘ची लागवड
ऑइल पाम तेलाच्या पिकाला ‘जादूई पीक’ असे म्हटले जाते. लागवडीनंतर दीड-दोन वर्षांनंतर शेतकर्‍यांना हमखास उत्पन्न देणारे हे पीक आहे. 1990-92 साली कोकण विकास महामंडळअंतर्गत कोकणात सुमारे एक हजार ऑइल पाम वृक्षाची लागवड करण्यात आली होती. या माध्यमातून झेंडे यांनी 35 एकरांवर ऑइल पाम वृक्षाची लागवड केली. कालांतराने महामंडळाचा येणारा निधी थांबला. त्यामुळे ऑइल पाम वृक्षाची बाजारपेठेची समस्या निर्माण झाली. 35 एकरांवरची वृक्षतोड करणे हे झेंडे यांना परवडणारे नव्हते. नाउमेद न होता गोव्यातील एका मित्राच्या मदतीने ऑइल पामची बाजारपेठ शोधली. पुढे 18 एकरांवर ऑइल पामची लागवड केली. असा एकूण 47 एकरांवर या वृक्षाचा विस्तार आहे. एका वृक्षाला वर्षभरात 10 घड येतात. एक घड सरासरी 10 ते 70 किलोपर्यंत असतो. वर्षाला 350 टन ऑइल पामचे उत्पादन होेते. हे उत्पादन ते गोदरेज व इतर कंपन्यांना विकतात. या पिकातून वार्षिक खर्च वजा जाता 30 ते 40 लाख रुपये कमवत आहेत.
 
kokan 
कलिंगडाचे 35 टन उत्पादन
पीक पद्धतीमध्ये खरीप हंगामानंतर कलिंगडाची गेली दहा वर्षे सातत्याने लागवड करत आहेत. कोकणातील वातावरण कलिंगड पिकास पोषक आहे. त्यामुळे कलिंगडातून आर्थिक बस्तान बसवले आहे. यंदा तीन एकरांवर कलिंगडाची लागवड केली. यातून सुमारे एकरी 35 टन उत्पादन मिळाले आहे. एकरी खर्च वजा जाता एक लाख रुपयांचा त्यांना निव्वळ नफा मिळाला आहे.
फळपिकांची मुबलकता
 
कोकण म्हटले की, आंबा, काजू, नारळ, सुपारी, कोकम, जांभूळ, बांबू इ. फळपिके आली. झेंडे यांच्या शेतात नारळाची दीड हजार झाडे, काजूची पाच हजार झाडे, आंब्याची एक हजार झाडे, बहडोली जांभळाची शंभर झाडे, सुपारीची तीन हजार झाडे, बांबूची तीन हजार झाडे, रक्तचंदन व श्वेतचंदनाची प्रत्येकी शंभर झाडे आणि काळी मिरीची एक हजार रोपे आहेत. या सर्व फळपिकांतून वर्षाकाठी 15 ते 20 लाखांचा नफा मिळवतात.
 
 
या शेतीबरोबरच त्यांच्याकडे एक खिलार गाय व दोन स्थानिक जातीच्या गाई आहेत. शिवाय चार म्हशी आहेत. दूध व्यवसायातून त्यांना समाधानकारक पैसे मिळतात. या सर्व कामांसाठी 17 लोकांना कायमस्वरूपी रोजगार मिळाला आहे. शेतीच्या कार्याबद्दल झेंडे यांना 2004 साली महाराष्ट्र शासनाचा शेतीनिष्ठ पुरस्कार मिळाला आहे. झेंडे यांची शेती पाहण्यासाठी विविध भागांतील शेतकरी येत असतात. कोकणवासीयांसाठी झेंडे यांची कहाणी निश्चितच प्रेरणा देणारी आहे.