की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने...

विवेक मराठी    23-May-2024
Total Views |
@ऋषिकेश ऋषी
हिंदूंचा, हिंदूंसाठी, हिंदूंनीच दिलेला पुरस्कार असे समर्पक स्वरूप म्हणून अक्षय्य हिंदू पुरस्कार सोहळा आकाराला आला आहे. यंदाचे या पुरस्काराचे दुसरे वर्ष. भारताच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या हजारो नामांकनांतून आयोजन समितीने चार रत्नांची निवड केली. शिवाय दोन विशेष पुरस्कारही जाहीर झाले आणि पुरस्कारप्रदान सोहळा पार पडला रविवार, 19 मे 2024 रोजी स.प. महाविद्यालयात.
hindu
 
 
सांप्रत काली हिंदुस्थानात ’उदंड झाले पुरस्कार, गल्लोगल्ली द्यावया’ अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. साधारणत: लोकसंख्यावाढीच्या दीडपट गतीने अशीच पुरस्कार संख्या वाढत गेली तर लवकरच ’इच्छुकाला पुरस्कार’ अशी एक खिडकी योजना सुरू करण्याचा प्रसंग सरकारवर येऊ शकतो. वाजपेयी सरकारच्या कार्यकालाचा सन्माननीय अपवाद सोडला, तर सरकारकडून दिल्या जाणार्‍या पुरस्कारांचेही प्रचंड अवमूल्यन आधीच्या सरकारांनी केले आहे. इतके की, तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस पद्म पुरस्कार देण्याच्या अधिकाराचा दुरुपयोग करीत असल्यामुळे 1969 साली लोकसभेत आचार्य कृपलानीसारख्यांनी या पुरस्कारविरोधात विधेयक आणले होते. देशाच्या सर्वोच्च पुरस्काराचे अवमूल्यन स्वत: पंतप्रधानांनी स्वत:चीच शिफारस करून पदरात पाडून घेण्याचा प्रकारही घडला आहे. नेहरू, इंदिरा गांधी यांना पंतप्रधान असताना दिला गेलेला (स्वत: घेतलेला) भारतरत्न आंबेडकर आणि सरदार पटेलांसारख्या दिग्गजांना मिळण्यास मात्र मरणोपरान्त पस्तीस-चाळीस वर्षे जाऊ द्यावी लागली.
 
ऑनलाईन पुस्तक खरेदी करण्यासाठी
क्रांती ऋचा – स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काव्याचे रसग्रहण
 
 
 
असे उदंड पुरस्कार झालेले असतानाही समाजातील खर्‍याखुर्‍या कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान होतो का? तर या प्रश्नाचे उत्तर ठामपणे होकारार्थी देता येणार नाही. त्याहून शोचनीय बाब म्हणजे पुरस्कार देण्यात होणारा दुजाभाव! तथाकथित अल्पसंख्याक धर्मांतील नुसती काडी इकडून तिकडे सरकावणार्‍या व्यक्तीसाठी पुरस्कार, सन्मान, बक्षिसांची रेलचेल असते; पण येथील एतद्देशीय बहुसंख्य हिंदू धर्मासाठी मेरू पर्वत उचलणार्‍या वीरांस जन्मभर अनामपणे आणि अनेकदा हलाखीत कार्य करून गुपचूप मिटून जावे लागते. गेल्या दशकांत ही परिस्थिती बदलत असली तरी दशकानुदशकांच्या सरकारप्रणीत मेंदुधुलाई (ब्रेनवॉशिंग) प्रक्रियेतून बनलेल्या समाजाच्या वृत्तीमुळे बहुसंख्य हिंदूंसाठी महत्तम कार्य करणार्‍या व्यक्तीकडे धर्मांध कृत्य केल्यासारखे पाहिले जाते. तरीही हिंदूंच्या उज्ज्वल वीर परंपरेला साजेसे वीर या समाजात निपजतात आणि प्रसिद्धी, सन्मान या मोबदल्याची तमा न बाळगता हिंदू धर्मासाठी आयुष्यातील महत्त्वाची वेळ समय देण्याचे असिधारा व्रत डोळसपणे स्वीकारतात. (त्यातील अनेक जण सावरकर किंवा संघाच्या मुशीतून घडलेले असतात, हा काही निव्वळ योगायोग नव्हे.)
 
hindu 
पुण्यातील  H.I.N.D.U. (Humanist Indian Nationalist Democratic Union)  संस्थेने अशाच डोळस समाजधुरीणांचा सन्मान करायचे ठरवले. शेफाली वैद्य, तुषार दामगुडे आणि सौरभ वीरकर यांसारख्या समाजमाध्यमात अग्रणी असणार्‍या मंडळींनी आपल्या हिंदुहितकारी साथीदारांसवे हा संकल्प केला 2003 साली. हिंदुत्वाशी आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाशी संबंधित अशा धर्मजागरण, धर्मप्रसार (घरवापसी, शुद्धी या अर्थाने), धर्मप्रचार, सामाजिक समरसता आणि सामाजिक उद्बोधन क्षेत्रामध्ये भरीव काम करणार्‍या, शक्यतो तरुण कार्यकर्त्यांना द्यावा, असे त्यांनी ठरवले. पुरस्कार केवळ लोकसहभागातून द्यायचे आणि जमिनीवर कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांनाच द्यायचे. शक्यतो राजकीय नेत्यांचा सहभाग टाळायचा, असेही संकल्प त्यांनी केले आणि त्याबरहुकूम 2023 साली पहिल्याच वर्षी अतिशय गुणवान, निरलस महानुभावांचा सन्मान धडाक्यात करण्यातही आला.
 
 
यंदाच्या दुसर्‍या पुष्पात गुणवान लोकांची निवड करण्यासाठी लोकसहभागातून नामांकने मागवली गेली. भारताच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या हजारो नामांकनांतून आयोजन समितीने चार रत्नांची निवड केली. शिवाय दोन विशेष पुरस्कारही जाहीर झाले आणि पुरस्कारप्रदान सोहळा पार पडला रविवार, 19 मे रोजी स.प. महाविद्यालयात. पुरस्काराला लागणारी आर्थिक मदतही हिंदू समाजाची, नामांकनेही समाजानेच दिलेली, कार्यक्रमासाठीही हजारो हात राबले - अशा प्रकारे हिंदूंचा, हिंदूंसाठी, हिंदूंनीच दिलेला पुरस्कार असे समर्पक स्वरूप आकारले गेले आहे.
 
hindu 
पूर्ण सोहळा दृष्ट लागावी इतका देखणा झाला. आयोजनापासून निवेदनापर्यंत आणि निवेदनापासून पुरस्कार सादरीकरणापर्यंत बरवेपण शिगेसी गेले होते. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांमध्ये अखिल भारतीय धर्म जागरण समन्वय प्रमुख शरदजी ढोले आवर्जून उपस्थित होते. पुण्यातील सांस्कृतिक विश्वाचे सांप्रत पालकत्व सांभाळणारे माजी खासदार प्रदीपदादा रावतही उपस्थित होते. सज्जनशक्ती संघटित करण्याचे आणि तिचा योग्य जागी व्यय करण्याचे त्यांचे कौशल्य वादातीत आहे. वनवासी कल्याण आश्रमाचे ज्येष्ठ प्रचारक आणि केंद्रीय संपर्क प्रमुख शरद चव्हाण खास या कार्यक्रमासाठी दिल्लीहून आले होते.
 
hindu 
सोहळ्याची सुरुवात वीरश्रीयुक्त गोंधळाने अशी झाली, की प्रत्यक्ष जगन्मातेचा संचार सभागृहात झाला. हर्षल गरुड, हरीश पाचंगे आणि लसुणकुटे यांनी हिंदूंच्या शुभचिन्हांना, देवीदेवतांना असे आवाहन केले की संपूर्ण सभागृह भारावलेल्या अवस्थेत होते.
तुडुंब भरलेल्या सभागृहात ऋषिकेश सकनूर (हिंदू एकता), प्रभाकर सूर्यवंशी (मीडिया), गुड्डी शिलू (जनजाती कल्याण) आणि आचार्य के. आर. मनोज (धर्म जागरण) या पुरस्कार विजेत्यांची हृद्य मुलाखत शेफाली वैद्यांनी घेतली. मुलाखतीमध्ये पुरस्कार विजेत्यांनी आपल्या कार्यामागच्या प्रेरणा, विचार, संघर्ष आणि कार्यव्याप्ती याचा सम्यक पट मांडला. त्यात त्यांचे ज्ञात-अज्ञात पैलूही प्रकर्षाने समोर आले. प्रभाकर सूर्यवंशींसारख्या समाजमाध्यमावर प्रसिद्ध असणार्‍या व्यक्तीचा जनजाती विकासासाठी केलेल्या धडपडीचा पैलू प्रकर्षाने समोर आला. आचार्य मनोज यांनी केरळसारख्या आता हिंदूंसाठी अतिशय प्रतिकूल असणार्‍या भूमीवर हिंदू धर्मप्रसार-जागरणाच्या कार्याची माहिती अनुवादिकेमार्फत दिली. बहुचर्चित ’केरला स्टोरीज’ या चित्रपटास आधार ठरलेल्या आचार्यांच्या कार्याबद्दल जाणून उपस्थित प्रेक्षक दिङ्मूढ झाले. गुड्डी शिलूदीदींनी आपल्या छिंदवाडासारख्या जनजातीबहुल भागातील मवेशी समाजातील कार्याची ओळख आपल्या ’थेठ देसी’ अंदाजात करून देऊन सर्वांची मने जिंकली.
 
hindu
 
विशेष पुरस्कारप्राप्त अनंत करमुसे यांनी प्रतिकूल लढ्याचा आलेख समोर ठेवला. एक सामान्य माणूस शिवछत्रपतींच्या प्रेरणेने माजलेल्या सत्ताधीशाशी झुंज कशी घेऊ शकतो आणि केवळ न्याय मिळविण्यासाठी काय काय खस्ता खाव्या लागल्या ते त्यांनी सर्वांसमोर मांडले. स्वाती मोहोळ वहिनींनी दुसरे विशेष पुरस्कारार्थी (मरणोपरान्त) पै. शरदभाऊ मोहोळ यांच्या आठवणी जागवत हिंदू धर्माकरिता शरदभाऊंनी सुरू केलेले कार्य थांबणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली.
 
 
 
सोहळ्याचे मुख्य अतिथी-वक्ते आधी अयोध्या रामजन्मभूमी आणि आता ज्ञानवापी काशी आणि मथुरेसाठी न्यायालयीन लढाई लढणारे सुप्रसिद्ध विधिज्ञ विष्णू जैन यांचा वाग्यज्ञ सुरू झाला. बाहेर मुसळधार पाऊस गर्जत होता आणि सभागृहात हा धर्म-विधि-शार्दूल कडाडत होता. एक तास अविरत आणि आवेशपूर्ण व्याख्यानातून विष्णूजींनी हिंदू मानाच्या तीन मानबिंदूंसाठी चाललेल्या न्यायालयीन संघर्षाचे, त्यामध्ये मुद्दाम आणलेल्या विघ्नांचे आणि त्या विघ्नांना पुरून उरलेल्या आपल्या निर्धाराचे इतके परिणामकारक चित्रण केले की, श्रोते त्यांना व्याख्यान आटोपते न घेण्याचा आग्रह करीत होते.
 
 
 
मग कार्यक्रम संपला असे वाटत असतानाच सोहळ्याचा चरमबिंदू ठरेल अशी अविस्मरणीय घटना घडली. पुरस्कार विजेत्यांचे छायाचित्र घेण्याचा कार्यक्रम सुरू होत असताना आचार्य मनोजजींनी आपल्या अकरा शिष्यांना मंचावर बोलावले - आणि त्या अहिल्येच्या लेकींच्या गतायुष्यातील फरपट त्यांनी मांडली. या धर्मकन्या विविध परिस्थितींतून हिंदू धर्म त्यागून परधर्मात गेल्या होत्या. आचार्य मनोजजी आणि आर्षविद्या समाजम् या संस्थेने अशा व इतर आठ हजार मुला-मुलींना प्रयत्नपूर्वक स्वधर्मपथावर आणले आहे; पण त्यांना समोर बघून, त्यांचे अनुभव ऐकून उपस्थित सर्व जण थरारून गेले होते.
 
 
 
सोहळा संपन्न जरी झाला तरी त्या स्वधर्मपरिवर्तित भगिनींचे अनुभव आणि जगदंबेला केलेल्या आवाहनाचे स्वर मनातून काही जात नाहीत. हा पुरस्कार म्हणजे उत्तम धर्मकार्य करणार्‍यांचे कौतुक करण्याबरोबरच, ’सारेच दीप कसे मंदावले’ म्हणत, हळहळत, कुंथत जगणार्‍या हिंदू समाजापुढे या अग्रणींचा आदर्श ठेवून एखाद्या ठिणगीला फुंकर घालण्याचा, विझलेल्या मनांना चेतविण्याचा, सुटलेल्या मुठींना एकवटण्याचा - आणि सुकत चाललेल्या धर्मचेतनेच्या रोपाला यथाशक्ती खत घालण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न अपेक्षेपेक्षा उत्तम परिणाम साधत आहे.