वात्सल्यमूर्ती

विवेक मराठी    23-May-2024
Total Views |
 @श्रद्धेंदू जोशी
 
संघविचारांच्या घरातील गृहिणीचे हे हृद्य व्यक्तीचित्र जवळच्या नातेवाईकाने मृत्युपश्चात रेखाटलेले. अंतर्बाह्य संघविचार जगणे म्हणजे काय असते याचे यथार्थ दर्शन घडविणारे आहे.
 
vivek
 
दिनांक 14 मार्च 2024 ला रात्री सव्वा दोन वाजता चिरंजीव सुमंत्रचा मोबाइल वाजला; पलीकडून त्याचा मामा बोलत होता, एक मिनिटात बोलणे संपले आणि सुमंत्रने मला सांगितले की, ‘बाबा... हिंगणघाटची आजी वारली.’
हिंगणघाटची आजी म्हणजे एक वात्सल्यमूर्ती, अन्नपूर्णा, लोकसंग्राहक, मायेचा झरा असलेल्या सौभाग्यवती माधवी रमेश धारकर, पूर्वाश्रमीच्या मीनाक्षी बाळकृष्ण इंदूरकर. 16 जून 1949 ला हिंगणघाटला इंदूरकरांच्या घरी जन्मलेल्या मीनाक्षी बाळकृष्ण इंदूरकर यांचा विवाह 10 जून 1970 ला झाला आणि हिंगणघाटच्याच रा. स्व. संघाचे स्वयंसेवक असलेल्या रमेश गंगाधर धारकरांची त्या अर्धांगिनी झाल्या.
 
त्यांचं व्यक्तिमत्त्व देवघरातल्या समईसारखं प्रसन्न होतं, शांत होतं, मंगल होतं. त्यात टोचणारं, खुपणारं काही नव्हतं. वागण्या-बोलण्यात कमालीचा सरळपणा आणि मोकळेपणा होता. चेहर्‍यावर सदैव हसरा भाव, डोळ्यांत कणव आणि मनात मनापासूनचा लळा, जिव्हाळा होता. परोपकार हा त्यांचा स्वभाव होता आणि त्याकरिता वेळप्रसंगी पदरमोड करायची तयारीही होती. त्यामुळेच लग्न झालं आणि त्या धारकरांच्या घराशी सहजपणे एकरूप झाल्या. सख्खे चुलत दोन्ही सासू-सासरे, दीर-नणंदा, भावजया, जावा, सार्‍यांच्या लाडक्या झाल्या. आला-गेला, पै-पाहुणा, सण-वार यांची धुरा खांद्यावर घेत खंबीरपणे ती निभावली. त्यांच्या कोणत्याही कृतीत अहंपणा नव्हता. निरपेक्ष प्रेमाची पखरण होती. त्यांच्याकडे प्रेमाच्या, आपुलकीच्या धाग्यांनी माणसं कायमची घट्ट बांधून ठेवण्याची किमया होती. बोलण्यामध्ये विलक्षण गोडवा होता आणि लोकसंग्रह म्हणाल तर हेवा करावा असा होता. कुणालाही खाऊ घालण्यासाठी, शाबासकी देण्यासाठी, मदत करण्यासाठी, त्यांचे हात आणि कुणाचंही मनापासून विनाअपेक्षा कौतुक करणे हा त्यांचा स्थायीभाव होता. खरं तर त्यांच्या जीवनात अलौकिक अशा घटना नाहीत, झगमगाट नाही, प्रसिद्धीही नाही; परंतु आजकाल कुटुंबांमध्ये क्वचितच सापडणारा जिव्हाळा, माणूसपण, आईपण हे मात्र भरपूर होतं. अगदी ओसंडून वाहावं इतकं होतं.
 
 
एका उन्हाळ्यात घराच्या कुंपणापाशी एका डुकरिणीने पिल्लांना जन्म दिला. विदर्भातल्या अति उन्हामुळे त्यातील एक पिल्लू दगावलं, तर डुकरिणीइतकीच ही माऊलीदेखील कासावीस झाली. हिने लगोलग गव्हाचे रिकामे पोते ओले करून कुंपणाशी त्याचा आडोसा केला आणि सतत पुढचे 4-5 दिवस त्या मायलेकरांची काळजी घेत राहिल्या. घरातल्या गाई, बैलं, वासरं, कालवडी, पोपट, कुत्रे या सार्‍यांनीच त्या माऊलीच्या हातच्या प्रेमळ स्पर्शाचा भरभरून अनुभव घेतला आहे, तर अंगणातले लहानगे रोपटे, नाजूक वेली, फुलझाडं, फळझाडं प्रत्येक जण तिच्या मायेच्या झर्‍यात चिंब भिजलेले आहेत. तिच्या प्रेमामुळेच असावं कदाचित सारी मुकी जनावरंदेखील तिच्या आज्ञेत होती.
 
 
एकदा मा. नितीनजी गडकरी सहकुटुंब हिंगणघाटला घरी आलेले असताना, खोलीच्या खिडकीतून एक भला मोठा साप घरात शिरला. या माऊलीने ते बघितलं आणि हात जोडून म्हणाल्या,‘या, तुम्हाला पण आत्ताच यायचं होतं,’ असं म्हणायचा अवकाश, की ते जनावर आल्या पावली परत गेले आणि पुढचा सगळा कार्यक्रम निर्विघ्न पार पडला.
 
 
मोठा गोतावळा असलेलं घर, वाढत्या वयाची मुलं, त्यांच्या शाळा, अभ्यास, दुखणीखुपणी यांचं करताना दिवस मावळायचा. पण त्यातही सवड काढून त्या व्रतवैकल्यं करायच्या. चैत्रापासून फाल्गुनापर्यंतचे सारे सणवार करायच्या. कार्तिकस्नान व काकडआरती कधीच चुकली नाही की घराजवळच्या स्वामी समर्थ मंदिरात रोजच्या आरतीसाठी लागणार्‍या महिनाभराच्या फुलवाती तुपात भिजवून पाठवायचा नेमही कधी चुकला नाही. कमावलेलं सगळंच आपलं नसतं, त्यात समाजाचाही वाटा असतो म्हणून वाणवसा करायच्या. घरी सतत येणार्‍या-जाणार्‍यांचा राबता असायचा. तरीपण ते घर आणि तिथली ही सदाफुली येणार्‍या-जाणार्‍यांचं हसत स्वागत करायची आणि जाणार्‍यांना निरोप देता देता ‘या हं परत’ असं परत येण्याचं वचन घेऊन बसायची. असा समरस होऊन संसार करत असतानादेखील बाहेरच्या घडामोडींकडे, सामाजिक घटनांकडे त्यांचे बारीक लक्ष असायचे. त्याचे चिंतनदेखील त्या करत असत. घरात सासरे गंगाधरपंत धारकर हे त्या काळी हिंगणघाट काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यामुळे घरात संघाला विरोध होता; परंतु पती रमेशराव धारकर हे संघाचे दायित्वधारी कार्यकर्ते आणि त्या काळी हिंगणघाटात संघकार्य फारसे रुजले नसल्याने बोटावर मोजण्याइतकीच संघ स्वयंसेवकांची घरे होती. त्यामुळे प्रचारक, प्रवासी कार्यकर्ते इत्यादींची निवास व भोजनाची व्यवस्थादेखील घरीच असायची. अगदी सुरुवातीला तर प्रचारकांचे खोटे आडनाव सांगून त्यांना जेवताना मौन ठेवायचे आहे, असं सांगून सासर्‍यांची समजूत काढायचे कामसुद्धा ही माऊली करीत असे. पुढे सासर्‍यांचा विरोध मावळला व हे घर स्वयंसेवकांची पंढरी बनले. घरात संघ नसतानादेखील प्रचारकांचा सहज वावर असायचा तो या माऊलीमुळेच! ज्येष्ठ व श्रेष्ठ प्रचारक स्व. यशवंतराव बाजारे व रामभाऊ बोंडाळे हे घरी मुक्कामाला असायचे. एकदा या माऊलीचे दोरीवर वाळत असलेल्या स्व. यशवंतरावांच्या बंडीकडे लक्ष गेले. ती विरली होती, तेव्हा या माऊलीने पती रमेशरावांना बोलावले, सोबत मापासाठी ती विरलेली बंडी दिली आणि कापड विकत घेऊन शिंप्याकडून अर्जंट नवीन बंड्या शिवून आणायचा आदेशच दिला. बंड्या लगोलग शिवून आल्या. या माऊलीने लागलीच त्या भिजवल्या, कापडातली खळ निघून गेल्यावर त्या बंड्या वाळवल्या आणि त्यांच्या बॅगेमध्ये ठेवून दिल्या, अगदी बिनबोभाटपणे.
 
ऑनलाईन पुस्तक खरेदी करण्यासाठी
क्रांती ऋचा – स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काव्याचे रसग्रहण
https://www.vivekprakashan.in/books/poems-of-freedom-fighter-savarkar/
 
 
 
प्रचारकांना स्वत:चे कपडे स्वत: धुवायची सवय असते, तेही साबण काटकसरीने वापरून. ही माऊली प्रचारकांचे कपडे त्यांनी धुऊन वाळत घातल्यावर, त्यांच्या नकळत दोरीवर वाळत असलेले कपडे काढायची, ते नीळ घातलेल्या पाण्यातून काढायची व पुन्हा वाळत घालायची. प्रचारकांची साबणाची वडी संपत आलेली दिसली, तर त्यांच्या बॅगेत नवीन वडी न विसरता ठेवत असत.
 
 
श्रीशजी देवपुजारी, स्व. प्रकाशजी काळे, स्व. प्रभाकरराव आंबुलकर, गंगाधरराव पारडीकर, सुनीलजी कुळकर्णींपासून तर अगदी आजच्या प्रचारकांपर्यंत अनेकांनी ही मायेची ऊब, हा जिव्हाळा प्रत्यक्ष अनुभवला आहे. सुनीलजी कुलकर्णी सांगत होते, एकदा प्रवासात असताना ते हिंगणघाटला घरी मुक्कामाला होते, तेव्हा त्यांचा गणवेश जरासा मळलेला होता व तो या माऊलीला दिसला. तेव्हा हिने त्यांच्या नकळत तो गणवेश कधी धुतला, वाळवला, मुलांकरवी तो धोब्याकडून इस्त्री करून आणला व परत त्यांच्या बॅगेत ठेवून दिला अगदी तत्परतेने व कुठलाही गाजावाजा न करता, हे सांगताना त्यांचाही कंठ दाटून आला होता. एकदा सुनीलजी आजारी असताना या माऊलीने त्यांना 15 दिवस प्रवास करू न देता, घरी विश्रांतीसाठी ठेवून घेतले आणि नंतर बरे वाटल्यावर अशक्तपणा जावा म्हणून सुक्या मेव्याचे लाडू सोबत बांधून दिले.
 
 
 
घर सांभाळूनदेखील कर्तृत्व प्रकट करता येतं, हे या माऊलीने वेळोवेळी दाखवून दिलं, तेही स्वत:च्या उदाहरणातून. प.पू. डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी वर्षात पती रमेशराव धारकरांना प्रवास करावा लागत असे. अशा वेळी घराकडे दुर्लक्ष व्हायला नको, म्हणून ते काही प्रवास टाळू पाहत होते. ते लक्षात येताच या माऊलीने सांगितले, उद्यापासून मी तुमच्यासोबत मोटरसायकलवर येणार व अलिपूर, समुद्रपूर इ. ठिकाणी सोबत जाऊन ही माऊली स्वतंत्रपणे महिलांच्या बैठका घेत असे. ती खर्‍या अर्थाने सहयोगिनी होती. 1992 च्या कारसेवेच्या वेळी घरातून ही माऊलीच फक्त अयोध्येला पोहोचली होती आणि नुसती पोहोचलीच नाही तर ढाचा पडल्यावर नवीन मंदिर बांधकामासाठी कारसेविका बनून सिमेंटचे घमेले वाहून नेत होती. अयोध्येहून परत आल्यावर बघितले तर पती रमेशरावांवर काही समाजकंटकांनी तलवारीने प्राणघातक हल्ला केला होता, तेव्हा न डगमगता खंबीरपणे शक्तिरूपा बनून मुलांच्या पाठीशी उभी राहिली. अलीकडच्या काळात प्रकृती पाहिजे तशी साथ देत नव्हती. तरीदेखील आपल्या वेदना लपवत हास्यवदनाने आल्या-गेल्याचे स्वागत करीत असत. भ्रमणध्वनीद्वारा सगळ्यांची सतत ख्यालीखुशाली घेत असत. जेव्हा दिव्यातील तेल संपत आल्याची त्यांना चाहूल लागली तेव्हा भेटायला आलेल्या मुली व नातीच्या हाती पैसे ठेवत बांगड्या भरून घ्या, असे सांगितले व ही माझ्याकडून शेवटची भेट स्वीकारा, हे सांगायला त्या विसरल्या नाहीत.
 
 
त्यानंतर आठवड्याभरात त्यांची प्राणज्योत निमाली. पाठीमागे फक्त आठवणींचा सुगंध आणि तीन दिवस तेवणारी पणती ठेवून गेली. त्यांच्या जाण्याने कौतुकाचे बोल, काळजीयुक्त विचारणा आता विराम पावली आहे आणि नेमकी हीच जाणीव जास्त दु:खकारक आहे. तरीदेखील त्यांनी जो वारसा दिला आहे तो चिरंजीव आहे, अक्षय आहे आणि आम्ही तो पुढे चालवू शकू, हा आम्हाला विश्वास आहे.