राष्ट्रचिंतकाचे सम्यक दर्शन

विवेक मराठी    24-May-2024
Total Views |
@प्रसाद फाटक 9689942684
‘पुत्र ज्ञानदेवतेचा’ या गौरवग्रंथाच्या रूपाने बाळशास्त्रींच्या कर्तृत्वाचा पट वाचकांसमोर प्रस्तुत होत आहे. संपादक आशुतोष अडोणी यांनी प्रस्तुत ग्रंथाच्या प्रस्तावनेतून बाळशास्त्रींच्या विचारांचे सूत्र आणि चिंतनाची व्यापकता यांचे उत्कृष्ट विवेचन केले आहे.
 
book
 
चिंतन ही सर्वांच्याच मनामध्ये सतत चालू असणारी प्रक्रिया आहे; परंतु सखोल चिंतनाच्या आधारे आजूबाजूच्या वास्तवातील श्रेयस-प्रेयस, नीर-क्षीर असे फरक जाणणार्‍या आणि वैयक्तिक हिताच्या पलीकडे जाऊन समाजहितासाठी, राष्ट्रहितासाठी वावरणार्‍या व्यक्ती मात्र मोजक्याच असतात. महामहोपाध्याय बाळशास्त्री हरदास हे अशा व्यक्तींपैकीच एक. हिंदुत्व, हिंदू धर्म, भारतीय क्रांतिकारक आणि भारतीय इतिहासावर अधिकारवाणीने बोलणारा प्रगाढ अभ्यासक शास्त्रीबुवांवाचून मी दुसरा कोणताही पाहिलेला नाही, या शब्दांत आचार्य अत्रेंनी त्यांचा गौरव केला होता. अशा या बाळशास्त्रींच्या व्यक्तिमत्त्वाचे कीर्तनकार, इतिहास अभ्यासक, समीक्षक, कवी, तत्त्वचिंतक, संतसाहित्याचे जाणकार, पत्रकार, चरित्रकार, अमोघ वक्ता अशा अनेक लखलखत्या पैलूंचे दर्शन ‘पुत्र ज्ञानदेवतेचा’ हा ग्रंथ घडवतो.
 
 
30 ऑगस्ट 1918 रोजी नागपूर येथे जन्मलेल्या बाळने शालेय वयातच पंडितसम्राट वासुदेवशास्त्री घुले यांच्याकडे संस्कृतचे सखोल शिक्षण घेण्यास सुरुवात केली. तल्लख बुद्धीच्या बाळने ‘काव्यतीर्थ’, ‘वेदान्ततीर्थ’ आणि ‘साहित्याचार्य’ या परीक्षांचे शिखर सर केले. वयाच्या अठराव्या वर्षापासूनच बाळला प्रवचनासाठी बोलावणी येऊ लागली. बाळचे आता बाळशास्त्री झाले. आपले पांडित्य त्यांनी पोकळ वादविवादांमध्ये वाया न घालवता समाजाला दिशा देण्यासाठी वापरले.
 
 
एकीकडे कीर्तन, प्रवचन चालू असताना बाळशास्त्रींच्या मनात राष्ट्रचिंतनही सुरूच होते. डॉ. मुंजे, स्वा. सावरकर यांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी हिंदु महासभेच्या कार्यात योगदान द्यायला सुरुवात केली आणि हैदराबादच्या निजामाच्या जुलमी राजवटीविरुद्ध 1939 साली झालेल्या नि:शस्त्र लढ्यात तुरुंगवास भोगला. बाळशास्त्री रा. स्व. संघाचे स्वयंसेवक होते.
 
 
 
गांधीहत्येनंतर संघावर बंदी आल्यावर जेव्हा संघाने देशव्यापी सत्याग्रह केला, तेव्हाही बाळशास्त्रींना पुनश्च कारावास अनुभवावा लागला. या सर्व परिस्थितीतही त्यांची वैचारिक निष्ठा अविचल राहिली आणि पुढे बाळशास्त्रींनी संघाचे प्रचारक म्हणूनही काही काळ कार्य केले.
 
 
हे सर्व करत असताना बाळशास्त्रींच्या ज्ञानसाधनेत कोणताही खंड पडला नव्हता. या साधनेतूनच बहरास आलेल्या वक्तृत्व आणि लेखनामधून त्यांनी सदैव राष्ट्रहिताचे विषय कसे मांडले याबद्दल प्रस्तुत ग्रंथामधून विस्ताराने वाचायला मिळते. बाळशास्त्रींनी वयाच्या विशीतच राष्ट्रधर्म प्रसारक संस्थेची स्थापना केली होती. महापुरुषांची चरित्रे लिहून त्याद्वारे राष्ट्र पुनरुज्जीवित करण्याची कल्पना तरुणांसमोर ठेवून त्यांच्या मनःप्रवृत्तीला राष्ट्रीय वळण द्यावे, या उद्देशाने बाळशास्त्रींनी ही स्थापना केली होती. त्यांनी लिहिलेल्या ‘भाई परमानंद’, ‘डॉ. मुंजे’, ‘रासबिहारी बसू’ यांच्या चरित्रांमुळे त्यांना ‘चरित्रकार’ म्हणून ओळख मिळाली.
 
 
‘पुत्र ज्ञानदेवतेचा’ या ग्रंथाचे एकूण चार विभाग आहेत. त्यांची शीर्षके ज्ञानेश्वरीतील ओव्यांवरून चपखलपणे दिलेली आहेत. ‘भरोनि सद्भावांची अंजुळी’ या पहिल्या विभागात मान्यवरांनी बाळशास्त्रींबद्दलच्या आठवणी जागवल्या आहेत. बाळशास्त्रींच्या पत्नी वीणाताईंनी लिहिलेले बाळशास्त्रींचे चरित्र संक्षिप्त रूपाने या विभागात समाविष्ट केले गेले आहे. ‘ते ज्ञान पै गा बरवे’ या दुसर्‍या विभागात बाळशास्त्रींच्या व्यासंगाचे पैलू उलगडून दाखवणारे लेख आहेत. या विभागात ‘बाळशास्त्रींची इतिहासमीमांसा’, ‘संस्कृत ज्ञानगंगा आणि बाळशास्त्रींचे चिंतन’, ‘ज्ञानमीमांसेचा मानदंड’ इ. लेख आहेत. ‘स्फटिकगृहीचे डोलत दीप जैसे’ या तिसर्‍या विभागात विविध लेखकांनी बाळशास्त्रींच्या पुस्तकांचा परामर्श घेतला आहे. ‘थहरीं ख ीरु ळप इळहरी’, ‘रामायण आणि महाभारतातील राज्यानुशासन सिद्धांतांचा तौलनिक अभ्यास’, ‘भारतीय जीवनादर्शमाला’, ‘संतांचिये द्वारी’ इ. पुस्तकांचा त्यात समावेश आहे. ‘तत्त्वार्थीचा पायाळू देखणा जो’ या चौथ्या विभागात बाळशास्त्रींचे निवडक साहित्य पुनःप्रकाशित केले गेले आहे, ज्यामध्ये रासबिहारी बसू चरित्र, हरिपाठ रहस्य, बाळशास्त्रींनी मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष या नात्याने केलेले भाषण इत्यादीचा समावेश आहे.
 
 
बाळशास्त्रींच्या ‘1857 ते सुभाष’ आणि ‘रासबिहारी बसूंचे चरित्र’ या पुस्तकांवर आनंद हर्डीकर यांनी लिहिलेले समीक्षणात्मक लेख विशेष उल्लेखनीय आहेत. राष्ट्रीय स्वातंत्र्यलढ्याचे सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने झालेले असंख्य प्रयत्न एकाच दृष्टिक्षेपात न्याहाळणारा हा असामान्य बीजग्रंथ आहे, हे मान्य करावेच लागते, अशा शब्दांत हर्डीकरांनी ‘1857 ते सुभाष’ या ग्रंथाचा गौरव केला आहे. त्यांनी या दोन्ही पुस्तकांमधील गुणदर्शनासोबतच उणिवांचीही चिकित्सा केलेली आहे.
 
 
बाळशास्त्रींच्या व्यासंगाचा परमोच्च आविष्कार म्हणजे त्यांचे अमोघ वक्तृत्व! तिकीट लावून व्याख्यानमाला आयोजनाचा प्रयोग महाराष्ट्रात प्रथम त्यांनी केला. श्रीराम, श्रीकृष्ण, चाणक्य, छत्रपती शिवाजी महाराज या युगपुरुषांचे तसेच क्रांतिकारकांचे कार्य त्यांनी आपल्या ओजस्वी वाणीने जनमानसांत पोहोेचवले. ‘वेदांतील राष्ट्रदर्शन’ या विषयावरील व्याख्यानातून वैदिक राष्ट्राची उभारणी ज्या मूलतत्त्वांवर झाली, ती तत्त्वेच भारतीय राष्ट्राच्या एकात्मतेची आणि अस्मितेची सूत्रे आहेत, असे प्रतिपादन बाळशास्त्री करत. बाळशास्त्रींची व्याख्यानमाला काही आठवडे आणि काही वेळा तर तब्बल महिनाभर चालत असे! शब्दसामर्थ्य, पाठांतर, निर्भीडता ही बाळशास्त्रींच्या वक्तृत्वाची बलस्थाने होती. श्रीश हळदे यांनी ती बलस्थाने आपल्या लेखात सोदाहरण उलगडून दाखवली आहेत.
 
 
संपादक आशुतोष अडोणी यांनी प्रस्तुत ग्रंथाच्या प्रस्तावनेतून बाळशास्त्रींच्या विचारांचे सूत्र आणि चिंतनाची व्यापकता यांचे उत्कृष्ट विवेचन केले आहे. बाळशास्त्रींच्या तत्त्वचिंतनाबद्दल ते लिहितात, उथळ अभिनिवेशात न अडकता तुलनात्मक अभ्यासातून ते चिकित्सक पद्धतीने विषयाच्या मुळापर्यंत जात. भारतीय चिंतनातील जे चांगले आहे त्याचा ध्यास घेणारे शास्त्रीबुवा त्यातील उणिवांची कठोर चर्चा करण्यात कसूर करत नसत. प्राचीन भारतीय तत्त्वचिंतनाचा आधुनिक तत्त्वज्ञानाच्या कसोटीवर अभ्यास करण्यासाठी त्यांनी अज्ञेयवाद, जडवाद, संशयवाद, साम्यवाद, उपयुक्ततावाद यांचाही सखोल अभ्यास केला. कान्ट, हेगेल, स्पेन्सर, मिल यांचे ग्रंथ अभ्यासले. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी भारतीय तत्त्वज्ञान कसे श्रेष्ठ ठरते याचे तर्कशुद्ध प्रतिपादन केले. परंपरांचा वृथा अभिमान न बाळगता त्यांनी आधुनिक तत्त्वज्ञान व विज्ञानाच्या कसोटीवर भारतीय विचारांची चिकित्सा केली. अडोणी यांच्या विवेचनाची प्रचीती प्रस्तुत ग्रंथातील म. रा. जोशी, सच्चिदानंद शेवडे आणि आणि चंद्रशेखर साने यांच्या लेखांमधून येते. हे लेख अनुक्रमे बाळशास्त्रींच्या ‘साम्यवादाची चिकित्सा’ आणि ‘रामायणाचे वास्तव दर्शन’, ‘महाभारतावरील व्याख्याने’ या पुस्तकांवर लिहिलेले आहेत.
•
• संपर्क
पुत्र ज्ञानदेवतेचा - साहित्याचार्य, महामहोपाध्याय स्व. बाळशास्त्री हरदास गौरवग्रंथ
• संपादक : आशुतोष अडोणी
• प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ
• पृष्ठसंख्या : 512
• मूल्य : रु. 697
• संपर्क : शासकीय मुद्रणालये - https://sahitya.marathi.gov.in/2197/
 
बाळशास्त्रींच्या विचारांचे अधिकाधिक कोनांमधून दर्शन कसे होईल याचा विचार करून ज्येष्ठ अभ्यासकांसोबतच अनेक तरुण लेखकांचे लेखनही गौरवग्रंथामध्ये आवर्जून समाविष्ट केले गेले आहे. राम शेवाळकर, आशा बगे, शंकर अभ्यंकर, रूपा कुलकर्णी-बोधी, अक्षय जोग, रमा गर्गे, विनीता तेलंग, मंगला मिरासदार इ. मान्यवरांनी या असामान्य व्यक्तिमत्त्वाचे पदर उलगडून दाखवण्यास हातभार लावला आहे.
 
 
भारतीय संस्कृतीकडे कायम पाश्चिमात्य विद्वानांच्या चष्म्यातून पाहणार्‍यांची दृष्टी स्वच्छ करण्याची क्षमता बाळशास्त्रींच्या लेखनात आहे, याची जाणीव प्रस्तुत ग्रंथ वाचत असताना प्रकर्षाने होते. म्हणूनच अस्सल भारतीय विचारांचा परिपाक असलेले बाळशास्त्रींचे साहित्य अनुवादित होऊन मराठीबाहेरही जाणे अत्यावश्यक आहे.
 
 
आपल्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर एके काळी अवघ्या महाराष्ट्रावर गारूड करणार्‍या बाळशास्त्रींचे कर्तृत्व महाराष्ट्राच्या सामूहिक स्मृतीमधून पुसले जाते की काय, अशी साधार भीती वाटत असतानाच प्रस्तुत गौरवग्रंथाच्या रूपाने बाळशास्त्रींच्या कर्तृत्वाचा पट वाचकांसमोर येणे आनंददायी आहे.