पूर्णब्रह्माचे शुचिर्भूत साधक तेलंगी आचारी

विवेक मराठी    24-May-2024
Total Views |
@प्रकाश एदलाबादकर  9822222115
तेलंगणातील पाककुशल आचारी हे नागपूर-विदर्भाचे अत्यंत आवडते बल्लव. हरदासी कथेत कथन केल्याप्रमाणे भीमाची स्वयंपाकाची भांडी तेलंगणातील मंथनी या गावी पडली. हा देवाचा संदेश आहे म्हणून आपल्या गावातील लोकांनी आता पाकसिद्धीचे व्रत घेतले पाहिजे. तेव्हापासून या गावातील पुरुष उत्तम स्वयंपाकी झाले, हेच ते तेलंगी आचारी.
vivek
 
नागपूर शहर हे पूर्वीपासूनच ‘खवय्यांचे गाव’ म्हणून ओळखले जाते. नागपुरी शैलीतील आणि वर्‍हाडी थाटाचे अनेक चविष्ट पदार्थ हे नागपूरचे वैशिष्ट्य आहे. तेलंगण हे राज्य विदर्भाचे सख्खे शेजारी. या तेलंगणातील पाककुशल आचारी हे नागपूर-विदर्भाचे अत्यंत आवडते बल्लव. आताशा त्यांचे प्रस्थ कमी झाल्यासारखे आहे. काळाचा महिमा दुसरे काय? परंतु एके काळी तेलंगी आचारी किंवा अय्या ही नागपूरची शान होती. (होय, आता ’होती’ असेच म्हणायचे.) नरसैय्या, महादेवअय्या, रामैय्या, अनंतअय्या, कृष्णा, नारायणअय्या असे नावाजलेले अय्ये एके काळी नागपुरात होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महालमधील मुख्यालयातील महादेवअय्याला कुणी विसरू शकत नाही.
 
 
महालातील बडकस चौक ते अयाचित मंदिर आणि सीताबर्डीवरील सोनी गल्ली या परिसरांत या बल्लवाचार्यांचा मुक्काम असे. ही मंडळी मूळची तेलंगणातील. त्यातही ’मंथनी’ हे तेलंगणातील पेदापल्ली जिल्ह्यातील, दक्षिण गंगा-गोदावरीच्या काठावरचे गाव हे यांचे मूळ स्थान सांगितले जाते .
 
 
तेलंगी आचार्‍यांच्या हातचा स्वयंपाक ज्याने खाल्ला आहे, तो जन्मात ती चव विसरूच शकत नाही. साधारण 1980 पासून नागपुरात, उभ्याने जेवण्याचे बुफे, स्वरुची भोजन किंवा बाजीराव भोजन या स्वरूपाचे प्रकार सुरू झाले. तोपर्यंत लग्न, मुंज, व्रताचे उद्यापन, यज्ञ समारंभातील भोजन आणि तत्सम मोठ्या कौटुंबिक समारंभांसाठी हे आचारी म्हणजे पहिली पसंती असत. ऐन लग्नसराईच्या काळात हे खूप व्यग्र असत. पाकसिद्धी करावयाची त्यांची स्वतःची शस्त्रास्त्रे असत. बुंदी ठोकायचा झारा, मोठे सराटे आणि पळ्या इत्यादी. ही शस्त्रे आणि पाककौशल्य यांच्या मिलाफातून मोठमोठ्या चुलाणांवर शिजलेले ते षड्रसयुक्त अन्न पोटात जाण्यासाठी निदान आजघडीला तरी पूर्वपुण्याईच हवी.
 
vivek 
 
अत्यंत स्वच्छ राहाणी असे या मंडळींची! समारंभाच्या मंगल कार्यालयात ज्या जागी स्वयंपाकघर असे, त्या जागी क्वचितच कुणाला प्रवेश असे. पांढरी स्वच्छ लुंगी, पांढराच सदरा किंवा बंडी, बारीक कापलेले केस, शेंडी, गळ्यात सहापदरी जानवे, एखादा ताईत असे या आचारी मंडळींचे रूप असे. प्रत्येकाच्या खांद्यावर लाल पंचा कम्पलसरी!! त्यांची एक टीमच असायची पाच-सहा जणांची. लग्नाच्या आदल्या दिवशी म्हणजे सीमान्त पूजनापासून किंवा कधी तर त्याच्याही आदल्या दिवशीपासून त्यांचा राबता लग्नघरी असे. त्या वेळचे, निदान नागपूर-विदर्भातील तरी, विवाह समारंभ अत्यंत ऐसपैस, अघळपघळ, पाहुण्यांनी गजबजलेले, कमीत कमी चार-पाच दिवस गाजणारे, खास देशस्थी थाटाचे असत. आजच्यासारखी ’वन डे इंटरनॅशनल’ किंवा अल्ट्रा मॉडर्न पद्धतीची कौतुकवाणी ’ट्वेन्टी ट्वेन्टी’ असे संकुचित (कॉम्पॅक्ट या अर्थाने) स्वरूप विवाह समारंभांना आले नव्हते. चांगली एका दिवसाच्या ’रेस्ट डे’सह सहा दिवसांची टेस्ट मॅच असायची नागपुरी लग्न म्हणजे!!
 
 
टेबल-खुर्च्यांवरच्या पंगती किंवा उभ्या-उभ्याचे बुफे नावाचे जेवण हे प्रकार अजून यायचे होते. मंडळी छानपैकी जमिनीवर मांडी ठोकून बसत. इकडे लग्नाची मंगलाष्टके सुरू असत आणि तिकडे सर्व वर्‍हाडी मंडळींचे लक्ष पहिल्या पंगतीकडे असे. अय्या मंडळींच्या रुचकर स्वयंपाकाचा सुगंध स्वयंपाकघराचा उंबरठा ओलांडून लग्न मंडपात पोहोचला की, भूक चाळवत असे. पहिल्या पंगतीत गरमागरम अन्नब्रह्माचा आस्वाद घ्यायला सर्व जण तयार असत. इकडे भटजींच्या तोंडून ‘तदेव लग्नम सुदिनं तदेव, ताराबलं चन्द्र बलन्तदेव...’ असे ऐकू आले आणि त्याच्यापाठोपाठ ‘वाजवा रे वाजवा...’ ही हाळी ऐकू आली की, घाईघाईने सुलग्न लावून मंडळींचे पाय भोजनाच्या पंगतीच्या दिशेने आपोआप वळत.
 
 
काय वैशिष्ट्ये होती या बल्लवाचार्यांची? आपल्या आयुधांसह ही आचारी मंडळी मंडपात आली की, स्वयंपाकघराचा ताबा घेत. किती माणसांचे अन्न शिजवायचे आहे याचा अंदाज घेत. स्वयंपाकाची भांडी योग्य आहेत की नाही हे आवर्जून तपासत. चुलीची साग्रसंगीत पूजा करीत. त्यांचा समूह नायक आपल्या तेलुगु वळणाच्या मराठीत आणि भरड्या आवाजात शिधा काढून मागे. लग्नाचे कोठीघर सांभाळणार्‍या व्यक्तीला त्यानुसार शिधा द्यावा लागे. माझ्या एका बहिणीच्या लग्नात मी कोठीघर सांभाळले होते, तोही अनुभव गाठीशी आहे. चिटणीसपुर्‍यातील बाळकृष्ण मंगल कार्यालयात लग्न होते. (नागपुरातील मंगल कार्यालयांचा इतिहास हासुद्धा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे. त्यावरही कधी तरी लिहीन.)
 
 
परंतु महादेवअय्याचा एक अनुभव सांगितल्याशिवाय राहवत नाही. 1971-72 या सत्रात मी बी.एड.ला होतो. आमचे कुटुंब त्या वेळी गोंदियाला होते. त्याच सत्रात 1971 साली गोंदियाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे तिसरे विदर्भ प्रांत अधिवेशन झाले होते. माझ्याकडे भोजन विभाग होता. पहिलाच अनुभव! सोबतीला कार्यकर्त्यांची टीम होतीच. मी माझ्या आकलनानुसार स्वयंपाकाची भांडी आणली. पाकसिद्धीला नागपूरहून महादेवअय्या येणार होते. त्यांनी भांडी बघितली. मला म्हणाले, “रोज किती माणसं शिजवायचे हायेत?” मी म्हणालो, “तीनशे ते साडेतीनशे.” त्यांनी माझ्याकडे भेदक नजरेने पाहून विचारले, “मग या बोळक्यात अन्न शिजवायचे का?” मी समजलो. ताबडतोब गोंदियाच्या हलवाई होटल असोसिएशनच्या कार्यालयातून मोठाली भांडी आणली. भोजन विभाग सांभाळणे हे प्रचंड मेहनतीचे काम असते. तिन्ही दिवस सकाळी महादेवअय्यांनी मला चांगला मोठा कप भरून साय खाऊ घातली होती.
 
 
लग्नाच्या आदल्या दिवशी सीमांतपूजन असे. त्या रात्रीच्या भोजनात फोडणीचे वरण आणि साखरभात हा मेनू असे. ते वरण आम्ही वाट्यांनी अक्षरशः पीत असू. ज्याने हा साखरभात खाल्ला नाही आणि जो हे वरण प्यायला नाही त्याला मोक्ष मिळणार नाही, अशी आमची समजूत होती. दुसर्‍या दिवशीच्या पंगतीत बुंदीचा लाडू असेल तर, सीमांतपूजनाच्या रात्रीच यांचा बुंदी ठोकायचा कार्यक्रम होई. शेवटची पंगत झाली की, त्या बुंदीचे लाडू वळण्यासाठी घरातील मायमाऊल्या, मोठ्या मुलीबाळी आणि पुरुषमंडळीही कामाला लागत. या लाडुबंधन कार्यक्रमातील गप्पा आणि हसणे-खिदळणे ज्याने अनुभवले नाही तो दुर्दैवी!
 
 
दुसर्‍या दिवशीचा मेनू म्हणजे या मंडळींच्या हातची पातळ भाजी, मसालेदार अशी वांग्याबटाट्याची भाजी, तर्रीदार अशी लाल भोपळ्याची भाजी, तळलेल्या बटाट्यांचा आणि वर खोबर्‍याचा कीस पेरलेला, वरून शुद्ध तुपाची धार असलेला मसालेभात म्हणजे असा की, कोणत्याही जगप्रसिद्ध बिर्याणीच्या थोबाडीत मारेल. चविष्ट अशी दाट कढी किंवा जिलबी असेल तर मठ्ठा! आश्चर्य म्हणजे यांचे मीठ-मसाल्यांचे अंदाज कधी चुकत नसत. पदार्थांमधील मसाल्याचे प्रमाण अचूक असे. कितीही मंडळी असोत, क्वालिटी कधीच घसरली नाही. अय्या मंडळींच्या हातच्या पोळ्या हा खाण्यापेक्षा दर्शनीय प्रकार असे. साधारण 10 इंच व्यासाच्या जाडजूड, खरपूस भाजलेल्या पोळ्याचे सराट्याने तुकडे करीत. पानात पडलेला असा एक तुकडा म्हणजे आपल्या घरच्या नॉर्मल पोळीच्या अडीचपट असे. ऐन उन्हाळ्यातील समारंभ असेल तर, उपरिनिर्दिष्ट एवंगुणविशिष्ट जेवण करून पानतंबाखूचा तोबरा भरला की, हेच ते स्वर्गसुख असे वाटे. मंडपातील एखादा रिकामा कोपरा पकडायचा, उशाला एखादा लोड घ्यायचा आणि दे ताणून! ब्रह्मानंदी लागली टाळी, मग देहाते कोण सांभाळी? अशी अवस्था होई.
 
 
ज्या ठिकाणी हे आचारी स्वयंपाक करीत तिथे जेवत नसत. त्यांचे आपापसातील बोलणे तेलुगू भाषेत होई. त्यातील अवाक्षरही अन्यांना समजत नसे.
 
 
असे हे तेलंगी आचारी आता फार कमी दिसतात. त्यांची जागा आता उत्तर प्रदेशातून किंवा रीवा येथून आलेल्या ’महाराज’ मंडळींनी घेतली आहे. पंगतीच्या जागी उभ्याने जेवण आले आहे; परंतु ती तेलंगी स्वयंपाकाची चव यांना नाही. निदान आमची पिढी तरी ती चव मरेपर्यंत विसरू शकत नाही. काय रहस्य आहे यांच्या हाताच्या चवीचे?
 
 
जाता जाता एक गोष्ट सांगतो. ही कीर्तनातील हरदासी कथा म्हणजे आख्यायिका आहे. गंमत म्हणून स्वीकारा. पांडवांचा विराटाकडील अज्ञातवास संपला. बृहन्नडेचा अर्जुन झाला, कंकभट्टाचा युधिष्ठिर झाला. बल्लवाचार्याचा भीम होण्याअगोदर, स्वतः भीम म्हणे श्रीकृष्णाकडे गेला. त्याला म्हणाला, “तुझ्या सल्ल्यानुसार मी इथे स्वयंपाकी झालो. त्यासाठी मी आणलेले हे झारे, पळ्या, खलबत्ते, पाटा-वरवंटा, सराटे, कढया यांचे काय करू?” भगवान म्हणाले, “ते सर्व एका मोठ्ठ्या फडक्यात गुंडाळ. त्याची गाठोडी कर. गरागरा फिरव आणि फेकून दे.” भीमाने तसे केले. ते गाठोडे म्हणे तेलंगणातील मंथनी या गावी रात्री येऊन पडले. सकाळी उठून गावकरी बघतात तो काय? गावाच्या चौकात गाठोडे. त्यात स्वयंपाकाची भांडी. गावातील वृद्ध मंडळी म्हणाली, “हा देवाचा संदेश आहे. आपल्या गावातील लोकांनी आता पाकसिद्धीचे व्रत घेतले पाहिजे. ती देवाची आज्ञा आहे.” तेव्हापासून या गावातील पुरुष उत्तम स्वयंपाकी झाले. प्रत्यक्ष भीमाच्या हाताची चव त्यांच्या हाताला आली. गोष्ट खरी की खोटी या भानगडीत न पडता मथितार्थ लक्षात घ्या.
 
 
असे हे सर्वगुणसंपन्न तेलंगी आचारी. माझ्या आठवणीतील लिहिले.
 
 
नागपूरच्या चिटणीसपुर्‍यातील संत सोनाजी महाराज मंगल कार्यालय (सोनबाजीची वाडी) येथे ज्येष्ठ शुद्ध एकादशी शके 1897, गुरुवार, दिनांक 5 जून 1975 रोजी माझा विवाह झाला. स्वयंपाकाला अर्थात तेलंगी आचारीच होते. त्यांचे फोटो तर माझ्या जवळ नाहीत; परंतु त्या अन्नब्रह्माचा आनंद पंक्तीत बसून मंडळी कसा लुटत असत याचे 49 वर्षांपूर्वीचे छायाचित्र मुद्दाम देतोय. आता कुठे खायला मिळतोय तो स्वयंपाक आणि कुठे लुप्त झाल्या त्या भरदार-भारदस्त पंक्ती? कालाय तस्मै नमः
 
‘वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे ।
सहज हवन होते नाम घेता फुकाचे ।
जीवन करि जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म ।
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ॥
 
॥ नमः पार्वतीपते हर हर महादेव ॥’
 
बसा मंडळी, बसा... उशीर झालाय... सावकाश होऊ द्या... आणारे इकडे जिलेबी...