‘मनस्वी कार्यार्थी...’ नेवेकाका...

विवेक मराठी    24-May-2024
Total Views |
@गोविंद यार्दी
 9763725729
नेवेकाका संघरचनेत कोणत्याही मोठ्या पदावर नव्हते; परंतु त्यांची संघशरणता व समर्पण अविस्मरणीय, अनुकरणीय व त्यामुळे प्रेरणादायी आहे. संघ साहित्याचे वितरण हे आर्थिक लाभ होण्याकरिता नसून संघविचार समाजात पोहोचवण्याचे साधन आहे, ही संघसमर्पित दृष्टी नेवेकाकांची होती.
neve kaka
 
सुधाकर गणेश नेवे हे नाव घेतल्याशिवाय गेल्या 50 वर्षांतील नाशिकच्या संघकार्याचा विचार पूर्ण होऊच शकत नाही. ’असु आम्ही सुखाने पत्थर पायातील’ या पंक्ती साक्षात जगलेले नेवेकाका संघरचनेत कधीही कोणत्याही मोठ्या पदावर नव्हते; परंतु त्यांची संघशरणता व समर्पण अविस्मरणीय, अनुकरणीय व त्यामुळे प्रेरणादायी आहे.
 
 
वास्तविक एक प्रिंटिंग प्रेस कर्मचारी म्हणून त्यांनी नाशिकमध्ये वावरताना आपले स्वयंसेवकत्व कधी लपवले नाही वा आपल्या सामान्य आर्थिक स्थितीचा न्यूनगंडही बाळगला नाही. अत्यंत उत्साहाने व तळमळीने सोपवलेल्या जबाबदारीला पूर्ण न्याय मिळेल अशा पद्धतीने त्यांनी संघकार्यातील आपला वाटा उचलला. पुढे जाऊन व्यवसाय वाढवून स्वतःचा प्रेसही सुरू केला.
 
 
कोणतेही सार्वजनिक कार्य उभे राहाते ते अशा ध्येयनिष्ठ, ध्येयवेड्या कार्यकर्त्यांच्याच आधारावर. असा ध्येयवेडा कार्यकर्ता आपल्या कार्यात इतका धुंद होऊन जातो, की त्याला आपल्या परिवाराकडेही लक्ष देण्यास सवड होत नाही. आपले कार्य व ध्येय याबद्दलची आपली भावना असा कार्यकर्ता आपल्या कुटुंबीयांमध्ये संक्रमित करू शकतोच असे नाही. त्यामुळे कुटुंबात ताणतणाव निर्माण होऊन कुटुंबीयात मात्र सुरुवातीला उपेक्षा व पुढे जाऊन विरोधही होऊ लागतो. अशी बरीच उदाहरणेही आहेत. नेवेकाकांचे वैशिष्ट्य हे आहे की, आपले संघकार्य व ध्येय याबाबतची भावना त्यांनी आपली पत्नी, तीनही मुले, दोन्ही सुना यांच्यातही संक्रमित केली. त्यामुळे त्यांचा एक मुलगा संदीप गेल्या 18 वर्षांपासून प्रचारक आहे. त्याच्या प्रचारक म्हणून जाण्याने सुरुवातीला त्यांच्या प्रेसच्या व्यवसायात काही समस्याही उत्पन्न झाल्या होत्या हेही मला माहीत आहे; परंतु त्यासंबंधी ना काकांनी ना त्यांच्या कुटुंबीयांनी कधी तक्रार केली ना आपले संघकार्य न करण्यासाठी सबब सांगितली. पूर्वीच्याच उत्साहाने ते कार्यात सहभागी होत राहिले
 
संघाच्या शाखेत स्वयंसेवकाने किती दिवस जात राहावे, या प्रश्नाला उत्तर देताना आपले पूर्व प्रांत संघचालक कै. मा. बाबाराव भिडे म्हणाले होते, ’‘चालता येऊ लागल्यापासून ते चालता येत असेपर्यंत.” याचे प्रात्यक्षिकच नेवेकाकांनी आम्हाला करून दाखविले आहे. निधनाच्या आधी केवळ महिनाभर ते शाखेत येऊ शकले नव्हते. हालचाल करणे शक्य होते तोपर्यंत सुधेश वा सुजित त्यांना शाखेत घेऊन येत असे व शाखा सुटल्यावर एकदोघांकडे जाऊन मगच ते घरी जात. म्हसरूळ परिसरात त्यांचा प्रचंड जनसंपर्क होता. शाखा परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरिक संघ, मित्रमंडळे, निरनिराळ्या संस्था आणि प्रतिष्ठित व्यक्ती, मंगल कार्यालयांचे संचालक यांच्याशी त्यांचा घनिष्ठ स्नेह व संपर्क होता. त्यामुळे म्हसरूळ परिसरात होणारे संघाचे कार्यक्रम, उत्सव प्रत्येक वेळी निरनिराळ्या ठिकाणी होतात. या संपर्कामुळे सार्वजनिक संस्थांमार्फत नियुक्त करण्यात येणार्‍या नगरसेवकांमध्ये त्यांनाही निवडले गेले होते. कोणीही विरोध करू शकले नव्हते. नगरसेवक असल्याचा व्यक्तिगत फायद्यासाठी उपयोग तर सोडाच, पण त्याचा अभिमान वा गर्वही त्यांच्या वागण्या-बोलण्यातून कधीही प्रकट झाला नाही, हेही त्यांचे वैशिष्ट्य होते.
 
neve kaka 
 
ते रोजच्या शाखेत नुसतेच जात नव्हते, तर त्या शाखेला निरनिराळे कार्यक्रम देऊन, सहली काढून सर्वांना कार्यप्रवृत्तही करत असत. अलीकडच्या काळात प्रभात शाखेत प्रौढ (सेवानिवृत्त) स्वयंसेवक जास्त असतात. त्यांना साजेसे व भावतील असे कार्यक्रम ते करवून घेत असत. चार-पाच वर्षांपूर्वी त्यांच्याबरोबर स्टॅच्यू ऑफ युनिटीला जाण्याचा योग आला होता. तो एक संस्मरणीय अनुभव होता. शाखा सुटल्यावर काही वाचन करावे, ही त्यांचीच कल्पना गेल्या किमान दहा वर्षांपासून राबविली जाते आहे. यात पू. गुरुजींच्या भाषणातील अंश असलेले नित्य प्रेरणा, गोंदवलेकर महाराजांची दैनिक प्रवचने, एकात्मता स्तोत्राचे विवरण, मा. माधवराव चितळे यांची रामायणावरची प्रवचने, गीतेच्या बाराव्या व पंधराव्या अध्यायाचे पठण, गेल्या वर्षप्रतिपदेला संपेल अशा पद्धतीने कै. चं.प. भिशीकरांनी लिहिलेले पू. डॉ.चा जीवन परिचय करून देणार्‍या पुस्तिकेचे वाचन शाखेवर केले गेले, अशी कार्यक्रमांची कल्पना करून ते घडवून आणण्याची त्यांची हातोटी होती.
 
 
वैयक्तिक जीवनात ते अतिशय श्रद्धाळू व निरनिराळी व्रतवैकल्ये करणारे होते. नाशिकचे जुने संघ कार्यालय म्हणजे सोमेश्वर मंदिर तिळभांडेश्वर गल्लीत होते. दरवर्षी श्रावण महिन्यात तेथे होणार्‍या धार्मिक कार्यक्रमात ते नियमितपणे सहभागी होत असत. सोळा सोमवारचे व्रतही त्यांनी दोन वेळा केल्याचे मला आठवते आहे. त्यांच्या प्रेसजवळच असलेल्या इंद्रकुंड देवस्थानच्या विश्वस्त मंडळावरही ते अनेक वर्षे होते. नुकत्याच होऊन गेलेल्या हनुमान जयंतीलाही ते स्वतः एकच दिवस आधी रुग्णालयातून परत आले असतानाही इंद्रकुंड देवस्थानी गेले होते. माजी उपमहापौर गुरमीत बग्गा यांची नेवेकाकांवर विशेष श्रद्धा होती व त्यांच्याविषयी आदरही.
 
 
पेठ तालुक्यातील पिठंदी पाड्यावर रा. स्व. संघ जनकल्याण समितीद्वारे चालविल्या जाणार्‍या साप्ताहिक आरोग्य केंद्राशीही ते सुरुवातीपासूनच म्हणजे जवळजवळ 28 वर्षांपासून जोडले गेले होते. पुढे अनेक वर्षे ज.क.स.चे अध्यक्ष राहिलेले कै. डॉ. दायमा हेही नेवेकाकांमुळेच मिळाले होते. डॉ. दायमा ज.क.स.मुळे संघाशी जोडले गेले व पुढे त्यांनी विशेष प्रथम वर्ष बडोदा व विशेष द्वितीय वर्ष बिलासपूर येथे जाऊन केले होते. हा जसा संघकामाचा प्रभाव होता तसाच तो नेवेकाकांच्या सहवासाचाही होता. पिठंदी केंद्रावर केल्या जाणार्‍या दिवाळीच्या विशेष कार्यक्रमासाठी ते निधी संकलन, फराळाच्या पदार्थांचे संकलन करत असत; पण दिवस दिवस बसून पॅकिंगही करत असत.
 
 
संघ आणि संघसृष्टीतील सर्व संस्था यांच्यासाठी होणार्‍या विविध कार्यक्रमांत व आंदोलनांतही नेवेकाका सक्रिय असत, हिरिरीने भाग घेत असत. राम जन्मभूमी आंदोलनातील शिलापूजनापासून ते प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण देण्यासाठी ते घरोघरी हिंडताना आम्ही बघितले आहे. सा.‘विवेक’चे वा ‘तरुण भारत’चे वाचक संपर्क अभियान वा वर्गणीदार अभियानातही ते सक्रिय असत. एवढेच नव्हे तर यांचे वितरणही घरोघरी जाऊन ते करीत. ते सांस्कृतिक वार्तापत्राचेही वितरक होते. हे काम करीत असताना त्यांच्या डोळ्यासमोर त्यातून होणारा आर्थिक लाभ नव्हता, तर संघविचार समाजात पोहोचवण्याचे साधन म्हणून ते याकडे बघत असत. दिवसरात्र त्यांच्या मनात संघ आणि संघकार्य याचाच विचार असे.
 
 
एक अत्यंत मृदुभाषी, वीतरागी या श्रेणीत बसवावे असे व्यक्तिमत्त्व असलेले नेवेकाका आपल्याला सोडून गेले आहेत; परंतु कार्यकर्ता कसा असावा याचा वस्तुपाठ देऊन गेले आहेत. भर्तृहरींनी कार्यकर्त्याविषयी म्हटले आहे की-
 
‘क्वचित् भूमौशायी, क्वचिदपिच पर्यंक शयनं
क्वचित् शाकाहारी क्वचिदपिच शाल्योऽदनरुचिः
क्वचित् कंथाधारी क्वचिदपिच दिव्यांबरधरं
मनस्वी कार्यार्थी गणयति न दुःखं न च सुखम्’
 
हे वर्णन सर्वार्थाने लागू पडणार्‍या सुधाकर गणेश नेवे नावाच्या या मनस्वी कार्यकर्त्याला ही शब्दरूप आदरांजली. आम्हीही त्यांच्याचप्रमाणे संघकार्यात सक्रिय राहाणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
 
लेखक जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत पूर्व संस्कार आयाम प्रमुख आहेत.