बालविधवा - दुःस्थिती कथन

विवेक मराठी    25-May-2024
Total Views |
‘बालविधवा दुःस्थिती कथन’ या कवितेतून स्त्री समानतेसाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांची तळमळ दिसते. त्यांनी रत्नागिरीच्या स्थानबद्धतेत म्हणजेच 1925 नंतर स्त्रीप्रश्नांवर अधिक काम केले. या दृष्टीने ही कविता या विचारांचा पाया म्हणता येईल. अशा सावरकरांच्या निवडक काव्यांचे रसग्रहण ‘क्रांती ऋचा’ या ‘सा. विवेक’ प्रकाशित आगामी पुस्तकात आपणास वाचायला मिळतील. याच पुस्तकातील हे एक प्रकरण.
savarkar
 
सावरकर एक क्रांतिकारक म्हणून सगळ्यांनाच परिचित आहेत; पण ते एक कृतिशील समाजसुधारकसुद्धा होते. ‘सामाजिक सुधारणा झाल्यावाचून स्वराज्य मिळाले तर तीन दिवससुद्धा टिकणार नाही.’ ह्याची जाणीव त्यांना होती. क्रांतिकारक सावरकर मोठे, की समाजसुधारक सावरकर मोठे, की तत्त्वज्ञानी म्हणून मोठे, की कवी म्हणून ते मोठे, असे अनेक प्रश्न सावरकर अभ्यासताना पडतात. याचं उत्तर एकच, सावरकर विभूतीमत्व होते. भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायात विभूतीयोगात श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो,
 
यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा ।
तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोंऽशसम्भवम् ॥
 
थोडक्यात अर्थ सांगायचा तर, जे काही विभूतीयुक्त आहे, तो माझा अंश तू जाण. सावरकरांसारखी विभूती पुन्हा न होणे.
 
सावरकर बुद्धिवादी, विज्ञाननिष्ठ सुधारक होते. धर्मग्रंथप्रामाण्याला त्यांचा विरोध होता. जातिप्रथा, अस्पृश्यता त्यांना अमान्य होती. स्त्रियांच्या बाबतीतसुद्धा त्यांचे विचार क्रांतिकारक होते. प्रा. स. गं. मालशे यांनी स्थानभेदावरून सावरकरांच्या कवितेचे वर्गीकरण केले आहे. पहिला विद्यालयीन कालखंड जेव्हा ते मित्रमेळ्यासाठी काम करत होते, त्यांची कविता त्या वेळी कवनांच्या स्वरूपात होती. दुसरा क्रांतीचा कालखंड, जेव्हा त्यांच्या भावनेचा वेग शिगेला पोहोचला होता. तिसरा कालखंड अंदमानचा, जेव्हा त्यांची वृत्ती अंतर्मुख झाली होती आणि चवथा कालखंड रत्नागिरीचा स्थानबद्धतेचा जेव्हा त्यांची कविता प्रचारकी थाटाची आहे. ‘बालविधवा दुःस्थिती कथन’ ही कविता त्यांनी वयाच्या 19 व्या वर्षी लिहिली. दुसर्‍या कालखंडात लिहिलेली ही कविता चवथ्या कालखंडात बसणारी आहे. त्यांच्या विचारांचा- सामाजिक विचारांचा पाया पूर्वीपासूनच किती मजबूत होता हे दिसतं. 1902 साली लिहिलेली ही कविता लिहिण्यामागे काही प्रयोजन असले तरी फार पूर्वीपासूनच समाजसुधारणेची आवश्यकता त्यांना जाणवत होती.
 
 
ऑनलाईन पुस्तक खरेदी करण्यासाठी

क्रांती ऋचा – स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काव्याचे रसग्रहण
 
 
मुंबईच्या हिंदू युनियन क्लबच्या हेमंत व्याख्यानमाला कमिटीने काव्य स्पर्धा आयोजित केली होती. विषय होता, प्रस्तुत सुरू असलेल्या ग्रांथिक सन्नीपाताने ज्या हिंदू स्त्रियांवर अल्प वयात वैधव्याचा घाला पडला आहे, त्यांच्या स्थितीचे वर्णन करून, त्यांचे दुःख कमी करण्यासाठी उपाय योजण्यास झटावे, अशा नव्या-जुन्या मतांच्या लोकांस कवीने प्रोत्साहनपर विनंती करणे. या स्पर्धेसाठी अनेक कविता आल्या. विजेत्यास 20 रुपयांचे बक्षीस होते. रा. श्रीपाद नारायण मुजुमदार आणि सावरकर या दोघांची कविता समान योग्यतेची वाटल्यामुळे दोघांनाही प्रथम पारितोषिक जाहीर केले. रकमेमध्ये आणखी 10 रुपयांची भर घालून दोघांना 15 रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले.
 
 
आज कोरोनाच्या संसर्गामुळे संपूर्ण जगच त्रासलेलं आहे. दुसर्‍या लाटेमध्ये एकही घर असं नव्हतं ज्या घरात माणसं दगावली नाहीत. तेव्हा विचार येतो की, ज्या काळी देश पारतंत्र्यात होता, पुरेशा वैद्यकीय सुविधा नव्हत्या, शिक्षणाचा अभाव होता, लोकांना जागृत करायला प्रसारमाध्यमं नव्हती अशा काळी प्लेगसारखा जीवघेणा आजार आल्यावर लोकांनी कसा सामना केला असेल? कवितेच्या विषयाला सुरुवात करताना सावरकर म्हणतात-
 
पाया परवशता ज्या, दुष्काळाच्या शिलांहि जो रचिला,
 
अवनति-कृतांत-केलि-प्रासादा प्लेग कळस त्या खचिला
 
प्लेगचा मुंबई, पुणे, त्र्यंबकेश्वर, पंचवटी इथे झालेला विस्तार आणि प्रवास करताना सावरकरांचा मातृभूमीविषयी असलेला अभिमान आणि आदर सार्थ व्यक्त होतो. ‘जननी जन्म भूमिश्च स्वर्गादपि गरियसी’ म्हणणार्‍या श्रीरामाची आठवण आल्याशिवाय राहात नाही. उदाहरणादाखल दोनच ओळी देते-
 
नंदनवनसम मोहक सृष्टीचा सारभूत हा देश
 
किंवा
 
पाहुनि भुलला खुलला; वदला : मोहक न भू अशी अन्या
 
सावरकरांचं काव्य विशेषत्वाने वीररस प्रसवणारं आहे. अगदी अल्प प्रमाणात शृंगाररससुद्धा आहे. या कवितेचं वेगळेपण हेच की, ही कविता करुणरस परिपोष करते. प्लेगच्या वर्णनात भयानक रस आहे. सगळी नगरे वैराण करणार्‍या ह्या प्लेगला दयामाया नाही.
 
केलीं भयाण नगरे, नगरासम दाट सर्व वन वसते
दमले नमले गमले हतसत्वचि मंत्र तंत्र सुनवस ते
लाल गुलाले आणिक ओतियलेल्या समग्र कावडीने
आरक्त नगरमार्गी रक्तप्रिय नाचताति आवडीने
बोलो भाई राम ध्वनि हाचि दिगंत सर्व नभभर तो
वातावरणस्थाही प्लेगजनक काय तापभर भरतो
अनाथ झालेलं लहान मूल, पत्नी गेलेला विधुर यांचा विलाप अस्वस्थ करणारा आहे. उदा.
हे कांते! हे कांते! दे ओ! तव कांत मारि हाकेला
कैसा संसाराचा जड गाडा लंगडा अहा केला
 
आणि
 
बाबा, आई गेली टाकुनिया काल, तो तुम्ही मजला
आजचि या बालाला त्यजुनीया जावयासि कां सजलां
 
यानंतर मात्र सावरकर कवितेच्या मूळ विषयाकडे वळतात. कोवळ्या वयात आलेल्या वैधव्याच्या दुःखाने एका स्त्रीचा विलाप सावरकर वर्णन करतात. क्षणभर ती तिच्या संसारातील सुखद आठवणीत रमून जाते, भानावर आल्यावर अधिकच दुःखाचा उमाळा येतो.
 
पोटीं रागनसोनिहि उगिच अबोले कितीकदा व्हावे,
 
उभयासही न कळता कैसे तत्काल बोलु लागावे
 
क्षुल्लकशा मानास्तव कोपे क्षणिके रुसोनिया बसलो,
 
दृष्टीस दृष्टि मिळता हेतु व्यतिरिक्त उभयही हसलो
 
या कवितेत वारंवार स्त्रीला ‘अबला’ असं म्हटलं आहे. सावरकर वास्तविक काळाच्या पुढचा विचार करणारे आहेत. ज्या समानतेने आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहेत, ह्याच्याही पुढचा विचार सावरकरांनी केलेला असताना कवितेतला ‘अबला’ हा शब्द जरा खटकतोच; पण याला काळाच्या संदर्भात बघावं लागेल. त्या काळी देश पारतंत्र्यात, स्त्रियांना सामाजिक प्रतिष्ठा नाही, आत्मनिर्भरता नाही, स्त्री शिक्षणाचा विषय नवीन आणि सगळं आयुष्य नवर्‍याच्या आणि पुढे जाऊन मुलांच्या आधारावर काढायचं अशी दीन, पराधीन अवस्था! अशा वेळी स्त्रीला वैधव्य आलं तर तिची अवस्था सावरकर म्हणतात तशी,
 
जाता नाथ स्त्रीचा ती गाईहूनि गाय मानावे
सुटका अबलांची त्या करण्या घेसी न कां यमा नावे?
 
किंवा
 
शय्या भूमि निजाया, अशन अहोरात्रि एक लागावे
 
जित काममोह असती, सतिमालाकीर्तनी जिला गावे
 
तन्मुख अपशकुनास्पद, शुभवदना विश्वयोषिता गणती
 
सुरभिला भेसुर ते, सौंदर्यागार गर्दभी म्हणती!
 
सामाजिक न्यायाबद्दल बोलताना त्यांनी विधुर आणि विधवा यांना देण्यात येणार्‍या वागणुकीची तुलना केली आहे. विधवेचे मुखदर्शन अशुभ, विधुरांना कुठेही मुक्त संचार! विधवांनी कदान्न खायचं, मात्र विधुरांनी षड्रस चाखायचे. विधवांनी हलकी वस्त्रं नेसायची, विधुर मात्र उंची वस्त्र आणि अलंकार घालणार! विधुरांना पुन्हा लग्न करण्याचा अधिकार, निपुत्रिक असेल तर मूल दत्तक घेण्याचा अधिकार. अशी विषमता असताना सावरकर समाजातील सनातनी लोकांना याबद्दल प्रश्नांची सरबत्ती करून जाब विचारतात.
 
हा न्याय कोण? कां हो विधवा-विधुरात भेद हा असला?
 
कसल्या अपराधाचा अबलांना क्रुर दंड हा बसला?
 
श्रुति काय अनुज्ञेतें देते विधवांसि अशुभ लेखाया?
 
सांगाल काय तच्छलहा संमत होय निगनलेखा या?
 
किंवा स्मृती कथीती? किंवा दे धर्मशास्त्र संमतिला?
 
सदसद्विचारपूर्वक किंवा हे न्याय्य गमतसे मतिला?
 
पत्निनिधन विधुराचा सामाजिक हक्क नाश करिना
 
स्त्रीचे समाज-संमत पतिनिधने नष्ट कां तरि नातें?
 
‘शास्त्राने उपेक्षलेल्या, रूढींनी छळलेल्या’ या विधवांच्या उद्धारासाठी ते लोकांना आवाहन करतात. धनंजय कीर समाजसुधारक आणि समाजक्रांतिकारक यातील फरक सांगताना म्हणतात, समाजसंस्थेचा जुना पाया उद्ध्वस्त करून नव्या आधुनिक पायावर ती समाजसंस्था उभी करणे ही समाजक्रांती आहे व ती करणे आंबेडकर-सावरकरांचे ध्येय होते. समाजाचा जुना पाया उद्ध्वस्त करणे म्हणजे धर्मग्रंथप्रामाण्य, श्रुतिस्मृतिपुराणोक्त प्रवृत्ती उद्ध्वस्त करणे. धर्मग्रंथ हे माणसाने निर्माण केले आहेत आणि आता ते कालबाह्य झाले आहेत. सावरकरांना ही धर्मसंस्था बुद्धिवादाच्या बळावर विज्ञानाच्या पायावर उभी करायची होती. त्यांनी कवितेत एक महत्त्वाचा विचार मांडला आहे.
 
धर्माभिमान म्हणजे काही सुविवेकशून्यता नाही
कालस्थितीवश धर्मही आहे हे तत्त्व मान्य मान्यांही
 
धर्माने नाकारले तरी विवेक काय सांगतो हे महत्त्वाचे आहे. धर्म ही एक प्रवाही संकल्पना आहे. कालस्थितीप्रमाणे जुन्या गोष्टींचा त्याग हा व्हायलाच हवा, अशा मताचे सावरकर आहेत. सावरकरांना जेव्हा 50 वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा झाली तेव्हा आपली सुटका अशक्य आहे हे पाहून त्यांनी त्यांच्या पत्नीला दुसरा विवाह करून सुखाने संसार करायला सांगितलं. सावरकर हे असे कृतिशील सुधारक होते. विधवांच्या उद्धारासाठी त्यांनी विधवांचा पुनर्विवाह करून द्यायला हवा, असं सांगितलं. तसंच त्यांच्यासाठी अनाथ बालिकाश्रम स्थापण्यात यावेत, त्यांना शिक्षण देण्यात यावं, असं ते सुचवतात. एवढ्यावरच ते थांबत नाहीत; स्त्रिया म्हणजे अर्धा समाज आहे. लहान वयात वैधव्य आलेल्या मुलींना नीतिव्यवहारातील थोर कथा सांगून त्यांच्या विचारांना योग्य वळण देता येईल, असंही सुचवतात.
 
 
सावरकरांनी सप्तबंदींना विरोध केल्याचे माहीतच आहे. या सप्तशृंखला तोडण्यासाठी ते झटले. या काव्यात त्यांनी विधवांच्या या बिकट स्थितीलासुद्धा ‘बेडी’ असं म्हटलं आहे. ही शृंखला तोडण्यासाठी ते लोकांना त्वेषाने आवाहन करतात.
 
तोडा दुःस्थिती - बेडी अबला तारोनी धवल यश जोडा
धर्मा तारायाला, अज्ञाना रुढीच्या हरायाला
 
सावरकरांचं काव्य अनेक अलंकारांनी सजलेलं असतं. या काव्यात पदोपदी जाणवणारा एक अलंकार म्हणजे श्लेष! उदा.
प्रेमाने बोलविण्या ‘क्षण माझ्या आज बाइ ओका या’
 
नाहीं कोणी उरलें मायेचे दुःख काहि ओकाया
 
किंवा
 
व्यर्थचि दुरुक्तवचने द्याया विधवांचिया मना चटका
 
सजते ती न झडावी खलजिव्हा दुष्टकामना चट का?
 
किंवा
 
ऐसें पुसाल हांसुनि की स्त्री पुरुषांसि हा समान वधी
 
स्त्रीचाचि द्रव कां हो? जाणु न शकणार खास मानव - धी
 
 
अनेक काव्यगुण असणारी सावरकरांची कविता कठीण शब्दरचनेमुळे अनेकदा आस्वादामध्ये अडथळे आणते, आकलनाला कठीण होते. उदाहरणार्थ अस्मद्धर्माचार्य, तत्प्रतिषेधा, सच्छीक्षावृष्टिने, मत्सौभग्यश्री इत्यादी. मोरोपंतांचा सावरकरांच्या काव्यावर मोठा परिणाम झाला. या काव्यासाठी त्यांनी मोरोपंतांप्रमाणे आर्या वृत्त वापरलं आहे. सावरकर भाषाशुद्धीसाठी आग्रही होते, तरीही काव्यामध्ये इन्स्पेक्शन, दिसिन्फेक्षणसारखे शब्द वापरले आहेत. सावरकरांच्या मते साथीच्या वेळी हे शब्द प्रत्येकाच्या तोंडी असावेत आणि हे शब्द पूर्वीपासून रूढ नसल्या कारणाने त्यांनी वापरले असावेत. सावरकरांनी ‘यत्ने कृते न सिध्यति को दो’ यासारखी संस्कृत म्हणसुद्धा वापरली आहे.
 
 
आणखी एका ठिकाणी ‘परि हाय! हृदयदाही मंजुळरवसंघ थोर हंबरडे’ अशी ओळ आहे. स्त्रीचे रडणे म्हणून जर ते मंजूळ असेल, मात्र हंबरडा मंजूळ नसतो. तो सावरकर म्हणतात तसा हृदयदाही, भयंकर, कधी बीभत्स किंवा भीतीदायक असतो. इथे मंजुळरव हा शब्द खटकतो.
 
 
डॉ. प्र. ल. गावडे म्हणतात, या कवितेत दुःस्थितीतून कारुण्य उत्पन्न करण्याऐवजी सावरकरांनी धर्मविषयक तत्त्वमंथनच अधिक केले आहे. ‘सुज्ञाने सुविचारे स्थित्यनुसारे स्वधर्म सुधारावा’ अशा प्रचारात्मक आदेशाला ‘कालस्थितीवश धर्मही आहे’ असा बुद्धिनिष्ठ तत्त्वाचा आधार त्यांनी दिला आहे
 
 
प्रा. दत्तात्रय केशव केळकर ह्या कवितेबद्दल बोलताना म्हणतात की, ‘बालविधवा दुःस्थिती कथन’ म्हणून जी कविता आहे तिच्यात बालविधवांच्या वकिली कैफियतीचा थाटच अधिक दिसतो. प्रासंगिक म्हणून मुद्दाम तयार केलेल्या काव्यांचा सामान्यतः हाच प्रकार असतो. सावरकर कुटुंब प्लेगच्या साथीमध्ये होरपळलं होतं. वडील आणि काका दोघेही या साथीमध्ये दगावले. धाकट्या आणि थोरल्या बंधूंनासुद्धा प्लेग झालेला, मात्र ते थोडक्यात बचावले. गावंच्या गावं ओस पडायची. अशा वेळी आजूबाजूच्या घटनांचा सावरकरांच्या कोवळ्या आणि संवेदनशील मनावर नक्कीच परिणाम झाला असेल. या कवितेतून स्त्री समानतेसाठी त्यांची तळमळ दिसते. त्यांनी रत्नागिरीच्या स्थानबद्धतेत म्हणजेच 1925 नंतर स्त्रीप्रश्नांवर अधिक काम केले. या दृष्टीने ही कविता या विचारांचा पाया म्हणता येईल. ही कविता वाचल्यावर ताराबाई शिंदे (1850-1910) यांच्या ‘स्त्री-पुरुष तुलना’ या पुस्तकाची आठवण येते.
 
 
पुस्तक नोंदणीसाठी संपर्क 9594961858