संग्रहालये - राष्ट्रगौरवाची शैक्षणिक दालने

विवेक मराठी    25-May-2024
Total Views |
@भुजंग रामराव बोबडे  9405048556
संग्रहालयातील साहित्याचे अत्याधुनिक प्रकारे केले जाणारे प्रदर्शन इतकेच आता मर्यादित न राहता विविध प्रकारच्या ऐतिहासिक व संग्राह्य साहित्याचे जतन, संवर्धन, संगणकीकरण, डिजिटायजेशन या सर्वच क्षेत्रांत होत गेले आहे. तसेच लोक संग्रहालयाला भेट देण्यासाठी येतील न येतील; परंतु आपण लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, या उद्दिष्टाने तात्पुरती प्रदर्शने व फिरती संग्रहालये, विविध प्रसंगांच्या निमित्ताने विशेष प्रदर्शने आयोजित करण्याचे कार्यही सुरू झाले आहे. याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करू या...

Indian Museum
 
 
एखाद्या विषयाशी संबंधित वस्तूंचा व्यवस्थितपणे संग्रह व प्रदर्शन करणारी संस्था म्हणजे संग्रहालय होय. काही संग्रहालयांत एकाहून अधिक विषयांशी संबंधित वस्तूही असतात. संग्रहालये ही वस्तू, शिल्प वगैरेंना असलेली ऐतिहासिक परंपरा, त्या वस्तूंच्या निर्माणकाळाची पुरातन संस्कृती व पार्श्वभूमी असा इतिहास जतन करण्यात मदत करतात. नानाविध वस्तूंचा संग्रह जिथे व्यवस्थितपणे ठेवलेला असतो अशा स्थानाला संग्रहालय किंवा वस्तुसंग्रहालय म्हणतात.
 
 
म्युझियम या इंग्रजी संज्ञेसाठी (शब्दासाठी) वापरलेला संग्रहालय किंवा वस्तुसंग्रहालय हा मराठी प्रतिशब्द होय. विविध विषयांतर्गत दुर्मीळ व नावीन्यपूर्ण वस्तू आणि सामग्री यांचे परिरक्षण, जतन, संवर्धन, प्रदर्शन व अर्थबोधन करणारी एक संस्था.
 
 
छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, मुंबई
Indian Museum
 
24 ऑगस्ट 2007 रोजी ICOMच्या ज्यास आपण यानंतर आयकॉम (आंतरराष्ट्रीय वस्तुसंग्रहालय संस्था) असे म्हणू, तिच्या ऑस्ट्रिया देशातील व्हिएन्ना येथे झालेल्या 22 व्या आमसभेत संग्रहालयाची व्याख्या पुढीलप्रमाणे करण्यात आली - संग्रहालय ही एक नफेखोरी न करणारी एक कायस्वरूपी अशी संस्था जी लोकांसाठी खुली असते, जेथे साहित्याचे संकलन, जतन, संशोधन केले जाते तसेच भौतिक व अभौतिक रूपातील मानवतेचा ऐतिहासिक वारसा प्रदर्शित केलेला असतो ज्याचा उद्देश शैक्षणिक, अध्ययन व आनंदप्राप्तीचे वातावरण निर्माण करणे हा आहे. यात शेकडो सुंदर शिल्पे (मूर्तिलेखासह असलेली शिल्पे) व शिलालेखांसह उभारण्यात आलेली मंदिरेही असू शकतात (ज्यांचा आधुनिक कालखंडात, संग्रहालयशास्त्रीय संकल्पनेत Open Air Museum असा उल्लेख केला जातो.) तसेच माहितीसह प्रदर्शित करण्यात आलेल्या चित्रविथिकाही असू शकतात.
 
Indian Museum 
 
इतिहास जाणून घेण्याचे महत्त्वाचे माध्यम
 
इतिहासासारखा विषय शिकताना अगदी पहिला पाठ शिकविला जातो तो म्हणजे इतिहासाची साधने, मग तो प्राचीन कालखंड असो, मध्ययुगीन असो वा आधुनिक कालखंड. जिथे कच्च्या वा भाजलेल्या मातीच्या वस्तू, विविध प्रकारच्या विटा, जीवाश्म (फॉसिल्स) अशा पुरातत्त्वीय वस्तू, मूर्ती, नाणी, विविध प्रकारची आयुधे, वस्त्राभूषणे, संगीत वाद्ये, दगडी शिल्प व धातुमूर्ती, शिलालेख-ताम्रपट, ताडपत्र, भुर्जपत्र वा इतर हस्तलिखित ग्रंथ साधने, नकाशे, छायाचित्रे, रंगचित्रे वा इतर अनेक प्रकारच्या कलाकृती या सर्व केवळ मनोरंजनासाठी वा केवळ शोसाठी ठेवलेली साधने नसून दृश्यस्वरूपात एखाद्या राष्ट्राचा/राज्याचा/ राजाचा/संस्कृतीचा, इतिहासाचा पट उलगडून दाखवणारी दालने असतात.
 
 
उपरोक्त सर्व प्रकारच्या वस्तू कशा तयार केल्या जात असत याचे रासायनिक वा भौतिक विज्ञान, त्या वस्तू तयार करण्यासाठीची वैज्ञानिक व गणितीय परिमाणे हे सर्व अनेक विद्याशाखांचे अभ्यासाचे विषय आहेत. तसेच एखाद्या संस्कृतीची निर्मिती - उत्थान कसे झाले व ती लयाला कशी गेली असेल, एखादी प्राणिसृष्टी काळाच्या उदरात कशी गडप झाली असेल याची अध्ययन सामग्री यात आपणास सापडू शकेल.
 
 
Indian Museum
 
उपरोक्त विषयांव्यतिरिक्त अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध प्रकारच्या कलेची मानवाने जी साधना केली आणि केवळ ज्या साधनेमुळे तो अनेक दुर्गुणांपासून दूर राहिला, नव्हे त्याबद्दल विचार करण्यासही त्यास वेळ मिळाला नसेल इतक्या उत्तमोत्तम व आजच्या तथाकथित प्रगत तंत्रयुगातही आश्चर्य वाटाव्या अशा वस्तूंची निर्मिती मानवाने केली. उदा. बिहार संग्रहालयातील दीदारगंज यक्षीची मूर्ती, भारतीय संग्रहालय कोलकाता येथील भारहूतचे अप्रतिम सुंदर शिल्पपट, काडीपेटीत मावेल इतकी छोटी साडी, कर्नाटकातील बेलूर-हळेबीड, हम्पीसारख्या मंदिरांच्या शेजारी असलेल्या संग्रहालयातील अप्रतिम सुंदर अशा पाषाणालंकारांनी मढवलेली हजारो शिल्पे, राष्ट्रीय संग्रहालय दिल्ली येथील हस्तिदंती कलात्मक शृंगारपेट्या, थ्रीडी-प्रिंट करतानाही अवघड वाटावी अशी अद्भुत रंगचित्रे आणि सुंदर वळणदार अक्षरे असणारी ताडपत्र-हस्तलिखित ग्रंथ साधने. अशा किती म्हणून वस्तूंचे ज्ञान या संग्रहालयांच्या जगात आपणास सहजपणे प्राप्त होते. या बाबी पाहणे, त्यांचा कलात्मक आस्वाद घेणे व त्या निर्माण करण्यास शिकणे, ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.
 
 
प्राचीन भारतीय शिल्प, चेर-चोल-पांड्य-पल्लव यांच्या धातुमूर्ती, राजस्थानी-बुंदी-माळवा या शैलीतील चित्रे, भारतीय संगीतजगतात तयार झालेली वीणा-सितार-तबला-मृदंग-ढोल ही वाद्ये तसेच इतरही अनेक अप्रतिम सुंदर अशा भारतात तयार झालेल्या या वस्तू आज आपणाला भारतातील व भारताबाहेरील संग्रहालयातदेखील मोठ्या अभिमानाने मिरवताना दिसून येतात व आपण एक भारतीय आहोत याचा स्वाभिमान वाटून मन आनंदाने भरून येते.
 
 
Indian Museum
 
केवळ जन्म-मृत्यूच्या घटना, खान-पानाचे शौक यांच्याशी संबंधित वस्तूंची दालने म्हणजे संग्रहालये नव्हेत, तर पराक्रम व शौर्यगाथा सांगणारी दालने म्हणजे वस्तुसंग्रहालय, ज्ञानपरंपरांची प्रतीके, संस्कृतीची गाथा वर्णन करणारे ताडपत्र ग्रंथ, हस्तलिखिते आणि त्याचा आस्थेने सांभाळ करणारी समृद्ध दालने म्हणजे संग्रहालये, जी या आपल्या भारत देशात ठायी ठायी वसलेली आहेत.
 
संग्रहालयातील ऐतिहासिक
साहित्याची जतन प्रक्रिया
 
अशा उपयुक्त, मौल्यवान संग्रहालयांची, पुराभिलेखागारांची, ग्रंथालयांची आणि कलादालनांची धूळधाण होताना अनेक ठिकाणी दिसते. संग्रहालय - हे शिक्षणाचे एक महत्त्वाचे साधन बनण्यासाठी तेथील लोकांची मानसिकता बदलणे हेदेखील एक मोठे कार्य आहे.
 
 
संग्रहालयात ऐतिहासिक साहित्याचे जतन-संरक्षण/संवर्धन कसे केले जाते, हा बहुतांश लोकांसाठी कुतूहलाचा विषय असतो. संवर्धनाचे दोन भिन्न प्रकार आहेत: उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक.
 
 
उपचारात्मक (किंवा ’हस्तक्षेपी’) संवर्धन - ही मूळ पृष्ठभाग प्रकट करण्यासाठी, पुनर्संचयित करण्यासाठी आणि नाजूक घटक मजबूत करण्यासाठी, वस्तूंची साफसफाई आणि संवेदनशील दुरुस्ती करण्याची प्रक्रिया आहे. काही वस्तूंना योग्य वेळी काही कालांतराने विविध रसायनांचा लेप दिला जातो वा विविध प्रकारची धुरी दिली जाते (ज्यास फ्युमिगेशन असे म्हणतात). ही प्रक्रिया वस्तूंना अधिक स्थिर बनवते आणि त्यामुळे त्या वस्तू प्रदर्शनास आणि हाताळण्यास अधिक योग्य होतात.
 
Indian Museum 
 
प्रतिबंधात्मक संवर्धन - हे भौतिक वातावरणाचे नियंत्रण आहे ज्यामध्ये वस्तू प्रदर्शित केल्या जातात आणि संग्रहित केल्या जातात. संग्रहालयातील ऐतिहासिक दुर्मीळ वस्तूंचा र्‍हास टाळण्यासाठी त्या वस्तूंना ज्यापासून तयार केल्या आहेत (उदा. माती, विविध धातू, हस्तिदंत वा कापड इ. पासून) त्याचा विचार करून विशिष्ट आर्द्रता आणि तापमान यांचे नियंत्रण असलेल्या ठिकाणी ठेवणे आवश्यक असते. इतर महत्त्वाच्या बाबी म्हणजे दृश्यमान प्रकाश, अतिनील प्रकाश, इतर प्रदूषक आणि कीटकांचे, धूर व धूळ यांचेही नियंत्रण करणे आवश्यक आहे. या सर्व बाबींचा अत्यंत बारकाईने संग्रहालयात विचार केला जातो.
 
Indian Museum 
 
भारतातील महत्त्वाची संग्रहालये व त्यांची सुरुवात
 
 
इ.स. 1535 मध्ये भारतात तंजावर येथे सरस्वती महाल ग्रंथालयाची स्थापना झाली ज्यात हजारो हस्तलिखित ग्रंथ, दुर्मीळ नकाशे, पेंटिंग्ज, मूतीर्र् व नाणी यांचा अक्षरशः खजिना उपलब्ध आहे; परंतु त्याआधीही रामायणात जेव्हा भरत रामाला भेटायला आला तेव्हा तो सरळ चित्रशाळेत आला असे संदर्भ येतात, तसेच ‘विष्णुधर्मोत्तरपुराण’, ‘मृच्छकटिकम्’, ‘तिलकमंजिरी’ इ. इतर भारतीय साहित्यकृतींमध्येही अशा प्रकारच्या संग्रहांची वर्णने येतात.
 
 
पाश्चात्त्य संकल्पनेवर आधारित संग्रहालय स्थापनेची सुरुवात भारतात सर विल्यम जोन्स यांच्या पुढाकाराने स्थापित ’एशियाटिक सोसायटी’पासून झाली असे मानले जाते. 1814 साली कलकत्ता एंपिरियल म्युझियम म्हणून ओळखले जाणारे संग्रहालय आता ’इंडियन म्युझियम’ या नावाने ओळखले जाते. त्यानंतर शासकीय संग्रहालय, त्रिवेंद्रम - 1857, शासकीय संग्रहालय, बंगलोर - 1866 आणि केंद्रीय संग्रहालय, जयपूर - 1876 ही तीन प्रेक्षणीय संग्रहालये स्थापन झाली.
 
 आशिया खंडातील सर्वात महत्त्वाचे ‘भारत कला भवन संग्रहालय’, वाराणसी
Indian Museum
 
भारतातील काही महत्त्वाची संग्रहालये व त्यांची स्थापना म्हणजे शासकीय संग्रहालय, चेन्नई (तमिळनाडू, 27 नोव्हेंबर, 1851); नेपियार संग्रहालय, तिरुअनंतपुरम (केरळ - 1855); राज्य संग्रहालय, लखनौ (उत्तर प्रदेश - 1863); शासकीय संग्रहालय, मथुरा (उत्तर प्रदेश - 1874); अल्बर्ट हॉल संग्रहालय, जयपूर (राजस्थान - 1876); बापू संग्रहालय, विजयवाडा (आंध्र प्रदेश - 1887); महात्मा फुले संग्रहालय, पुणे (महाराष्ट्र - 1890); पुरातत्त्व स्थळ संग्रहालय, गोल घुमट, विजयपूर (कर्नाटक - 1892); लक्ष्मी विलास राजवाडा संग्रहालय, वडोदरा (गुजरात - 1894); श्री. प्रतापसिंग संग्रहालय, श्रीनगर (जम्मू काश्मीर - 1898); सारनाथ संग्रहालय, सारनाथ (उत्तर प्रदेश - 1904); भुरी सिंग संग्रहालय, चंबा (हिमाचल प्रदेश - 1908); लाल किल्ला पुरातत्त्व संग्रहालय (दिल्ली - 1909); पुरातत्त्व संग्रहालय, खजुराहो, जिला छत्तरपूर (मध्य प्रदेश - 1910); पुरातत्त्व संग्रहालय, नालंदा (बिहार - 1917); राष्ट्रीय संग्रहालय (दिल्ली - 1949) अशी काही महत्त्वाची नावे सांगता येतील. अगदी अलीकडे स्थापन झालेले व सर्वात महत्त्वाचे एक संग्रहालय म्हणजे वाराणसी येथील भारत कला भवन संग्रहालय. बनारस हिंदू विद्यापीठात याची स्थापना 1950 साली झाली असून या संग्रहालयात 1 लाखाहून अधिक दुर्मीळ वस्तूंचा संग्रह आहे. तो 13 दालनांमध्ये प्रदर्शित करण्यात आलेला आहे. आशिया खंडातील सर्व विद्यापीठांमध्ये हे सर्वात मोठे संग्रहालय आहे, ज्यात फक्त पेंटिंग्जचीच संख्या ही 12 हजार आहे.
 
संग्रहालय पाहायला जातानाची आपली पूर्वतयारी

केवळ पिकनिक, पर्यटन म्हणून संग्रहालयात जाताय का? थोडं थांबा आणि एकदा फक्त नीट विचार करून पाहा - संग्रहालयात ठेवलेल्या अत्यंत दुर्मीळ अशा वस्तूंचे निर्माते शेकडो-हजारो वर्षांपूर्वी कुठल्या शाळेत, कोणत्या विद्यापीठात शिकले असतील बरे? कलासाधना आणि गुरुकुल हीच त्यांची पाठशाळा, विद्यापीठे होती. शिकवणारा समोर नाही, ही भावनाही मनात येऊ न देता, शिकण्याची तळमळ, ही खरी साधना होती. अंतरात्म्याची विश्वनिर्मात्याशी तादात्मकता ही त्या साधनेची फलश्रुती होती, जी आजही या संग्रहालयातील जतन केलेल्या वस्तूंच्या रूपाने आपल्या समोर प्रकट होते. गरज आहे ती संग्रहालय हे पर्यटनाचे स्थळ नाही तर आपला इतिहास, कला व ज्ञानपरंपरा जाणून घेण्याचे महत्त्वाचे माध्यम आहे हे समजण्याची.
 
 
महाराष्ट्राचा विचार केला तर 1855 मध्ये व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालय, मुंबई या संग्रहालयाची स्थापना करण्यात आली जे आता डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय या नावाने ओळखले जाते. 1863 मध्ये ’अ‍ॅन्टेक्वेरियन सोसायटी ऑफ सेंट्रल प्रोव्हिनन्स’ या संस्थेच्या शिफारशीने नागपूर येथे ’सेंट्रल म्युझियम’ म्हणजेच मध्यवर्ती संग्रहालय स्थापन झाले. महाराष्ट्राचा विचार करता राज्यातील हे सर्वात जुने शासकीय संग्रहालय ठरते. 10 जानेवारी 1922 रोजी छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, मुंबई या संग्रहालयाची स्थापना झाली. पुणे येथे 1920 साली वैयक्तिक संग्रहांपैकी सर्वात मोठा संग्रह असणारे राजा दिनकर केळकर संग्रहालय व धुळे येथे 1931 साली राजवाडे इतिहास संशोधन मंडळ या संस्थेची स्थापना झाली ज्यांनी पुढे आपल्याकडे असलेल्या दुर्मीळ ऐतिहासिक साहित्यांची संग्रहालये अभ्यासकांसाठी खुली केली.
 
Indian Museum 
 
सुरुवातीच्या काळात सर्वच वस्तुसंग्रहालये ही अनेक वर्षे केवळ एक प्रदर्शनीय स्थळ अशा भूमिकेत राहिलेली आहेत, जेथे केवळ ऐतिहासिक साहित्याचे संकलन व प्रदर्शन होत राहिले; परंतु कालांतराने त्यात बदल होत गेले. हे बदल संग्रहालयातील साहित्याचे अत्याधुनिक प्रकारे केले जाणारे प्रदर्शन इतकेच मर्यादित न राहता विविध प्रकारच्या ऐतिहासिक व संग्राह्य साहित्याचे जतन, संवर्धन, संगणकीकरण, डिजिटायजेशन या सर्वच क्षेत्रांत होत गेले. तसेच लोक संग्रहालयाला भेट देण्यासाठी येतील न येतील; परंतु आपण लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, या उद्दिष्टाने तात्पुरती प्रदर्शने व फिरती संग्रहालये, विविध प्रसंगांच्या निमित्ताने विशेष प्रदर्शने आयोजित करण्याचे कार्यही सुरू झाले. उदा. दरवर्षी 18 मे या आंतरराष्ट्रीय वस्तुसंग्रहालय दिनाच्या निमित्ताने मध्यवर्ती संग्रहालय, नागपूरसह जवळपास महाराष्ट्रातील सर्वच वस्तुसंग्रहालयांत काही विशेष कार्यक्रमांचे आयोजन मागील काही वर्षांपासून केले जात आहे. तसेच वस्तुसंग्रहालयातील साहित्याचे डिजिटायझेशनचे कार्यही काही ठिकाणी प्रगतिपथावर आहे. सामाजिक स्वयंसेवी संघटना व व्यक्तींच्या माध्यमातून पुरातत्त्वीय स्थळांचे जतन व संवर्धनाचे कार्य जे नुकतेच सुरू झाले आहे तसेच काम वस्तुसंग्रहालयातसुद्धा सुरू करण्यात आले आहे.
 
 
याव्यतिरिक्त एक महत्त्वाची बाब म्हणजे संग्रहालयांची शैक्षणिक क्षेत्रातील जी भूमिका आहे तिच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्रातील वस्तुसंग्रहालये व परिसरातील महत्त्वपूर्ण शैक्षणिक संस्था यांच्यात सामंजस्य करार करण्याचा स्तुत्य प्रयत्नही सध्या सुरू असलेला दिसतो.
 
 
लेखक भारतीय ज्ञानपरंपरा विभाग रिसर्च फॉर रिसर्जन्स फाऊंडेशन, नागपूर येथे निदेशक या पदावर कार्यरत आहेत.