भारतातील सामाजिक क्रांती आणि सावरकरांचे योगदान

विवेक मराठी    28-May-2024   
Total Views |
 सावरकरांच्या मनात हा सगळा विचार करताना प्रथम आणि अंतिमही हिंदू राष्ट्राचा विचार होता. त्यांच्या सगळ्या कामाचं ते अधिष्ठान होतं. अखंड, एकजिनसी आणि एकात्म हिंदू समाज त्यांना अपेक्षित होता. जातिभेद आणि अस्पृश्यता संपवताना या एकात्मतेला तडा जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असं त्यांना वाटत असे. दुर्बलांचा समाजापासून वेगळा केलेला प्रवाह त्यांना अपेक्षित नव्हता. सवर्ण आणि पददलित असं समाजाचं विभाजन झालं, तर त्यातून अनास्था प्रसंग ओढवतील असं त्यांना वाटत असे. म्हणूनच सावरकरांनी लेखणी, वाणी आणि प्रत्यक्ष कृती यांच्या आधारे सामाजिक चळवळीत मूलगामी योगदान दिलं.
 
 
savarkar
 
 
हिंदू समाजात आजवर जे कालसुसंगत परिवर्तन झालं आहे ते होण्यामागे अनेक सामाजिक विचारवंतांचं, सामाजिक कार्यकर्त्यांचं योगदान आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे त्यातलं महत्त्वाचं नाव .
 
सामाजिक परिवर्तनासंदर्भातील सावरकरांचे विचार अभ्यासताना लख्खपणे जाणवतं ते त्यांचं द्रष्टेपण. काळाच्या पुढचा विचार करताना, ते 2024 मधल्या आपल्यापेक्षाही किती योजनं पुढे आहेत याची जाणीव त्यांचं साहित्य, त्यांचं चरित्र वाचताना होते.
 
 
अनेक तरुण देशभक्तांच्या मनात मातृभूच्या पायातल्या दास्याच्या शृंखला तोडण्यासाठी क्रांतीचं स्फुलिंग चेतवणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे अंदमानात जाण्याअगोदरचं त्यांंचं एक रूप... आणि अंदमानातून सुटका झाल्यानंतर ज्या रत्नागिरीत त्यांना स्थानबद्धतेत ठेवण्यात आलं, तिथे सामाजिक सुधारणांचं हाती घेतलेलं कार्य हे त्यांचं दुसरं रूप. हे रूप त्यांच्यातल्या कृतिशील विचारवंताचं आहे.
 
 
राजकीय क्रांतीइतकीच हिंदू समाजाला सामाजिक क्रांतीची गरज आहे. देशाचं स्वातंत्र्य आणि समाज सुधारणा या समांतर गतीने झाल्या, तर मिळालेलं स्वातंत्र्य राखता येईल याबद्दल त्यांची पक्की खात्री होती आणि म्हणूनच स्वातंत्र्याची पहाट होण्याची वाट न पाहता त्यांनी सामाजिक सुधारणांच्या कामाला सुरुवात केली.
 
 
तत्पूर्वी रत्नागिरीत दाखल होण्याआधी अंदमानच्या तुरुंगात असताना सावरकरांनी केलेलं काम म्हणजे या वाटेवरची पहिली पावलं आहेत, असं म्हणावं लागेल. अंदमानच्या तुरुंगात हिंदूंमधल्या कनिष्ठ जातीच्या लोकांची दयनीय अवस्था सावरकरांनी जवळून पाहिली होती. कनिष्ठ जातीतले लोक त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाला कंटाळून धर्मांतराला तयार होत असत. एखादा हिंदू मुसलमानांच्या पंक्तीत जेवायला बसला तरी त्याचं धर्मांतर झाल्याचं मानलं जात असे. याचा विपरीत परिणाम हिंदूंची लोकसंख्या घटण्यावर होत आहे. अशा गोष्टींनी एखाद्याचा धर्म बदलू लागला, तर आणखी काही वर्षांनी हिंदूंचं अस्तित्वच नामशेष होण्याच्या मार्गावर जाऊ शकतं, हे सावरकरांच्या लक्षात आलं. हिंदूंच्या आजवरच्या इतिहासात परकीयांकडून हिंदूंचे जे पराभव झाले त्याची प्रमुख तीन कारणं होती. पहिलं म्हणजे हिंदू समाजाचं जातीपातींमध्ये झालेलं विभाजन. भौतिकदृष्ट्या असलेलं मागासपण आणि लष्करीदृष्ट्या असलेलं दुबळेपण. या पार्श्वभूमीवर एकात्मता, विचार-आचारांमधली अत्याधुनिकता आणि सैनिकी सुसज्जता ही तत्त्वत्रयी सावरकरांनी लोकांसमोर ठेवली. ‘अंतर्गत राजकीय स्थैर्यासाठी आणि महासत्ता म्हणून आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेसाठी’ ही तीन उद्दिष्टं गाठण्याचा सर्वतोपरी निकराचा प्रयत्न झाला पाहिजे, असं आवाहन लेखन आणि प्रत्यक्ष संवादातून केलं.
 
 
हिंदू म्हणून एक राहायचं असेल, तर धर्मात असलेल्या तर्कविसंगत रूढी, कुप्रथा, चुकीच्या चालीरीती बंद व्हायला हव्यात. जातीच्या उतरंडीमध्ये प्रत्येक वरच्या पायरीवरच्या जातीतल्या लोकांच्या मनात तथाकथित खालच्या पायरीवरच्या जातीतल्या लोकांबद्दल असलेला हीनभाव, तुच्छता आणि अवमानास्पद वागणूक याला मूठमाती दिली गेली पाहिजे, हा विचार कृतीत उतरवण्यासाठी सावरकरांनी रत्नागिरीतील स्थानबद्धता कारणी लावली.
 
 
चुकीच्या व्याख्येत शतकानुशतकं अडकलेल्या आणि त्याचे विपरीत परिणाम भोगणार्‍या हिंदू धर्माला बाहेर काढण्याचा प्रयत्न सावरकरांनी या सामाजिक कामाच्या माध्यमातून केला. चातुर्वर्ण्य, जातीय विषमता आणि त्यातून आपापसांत निर्माण होणारी तेढ या बेड्यांतून हिंदू धर्माची मुक्तता करून; इहवाद आणि बुद्धिनिष्ठा या दोन मुद्द्यांच्या आधारे धर्माची पुनर्मांडणी करण्याची गरज त्यांनी आग्रहाने प्रतिपादन केली. ही गरज फक्त हिंदू धर्मालाच नसून बुरसटलेल्या विचारांमध्ये अडकलेल्या मुस्लीम धर्माचीही आहे. त्या धर्माचीही आधुनिक काळानुसार पुनर्मांडणी करायची गरज असल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं.
 
 
विचार बदलणं म्हणजे त्यानुसार आचारात बदल करणं, प्रत्यक्ष जीवनात त्याचा आविष्कार करणं, हे सावरकरांना अभिप्रेत होतं. धार्मिक कर्मकांडविरहित शुद्ध विज्ञानाचा आधार असलेलं हिंदू राष्ट्र असू शकतं, असं त्यांचं ठाम मत होतं.
 
 
सनातन धर्म म्हणजे त्यातले कायम स्वरूपात राहणारे नियम, तत्त्वं आणि मूल्यं होत. धर्मतत्त्वात कोणालाही बदल करता आले नाहीत तरी धर्मातल्या रूढी, परंपरा, प्रथा आणि समजुती तर्काच्या कसोटीवर घासून ग्रह्य-अग्रह्य ठरवता येतात.
 


savarkar 
 
सावरकरांच्या मते धर्मातले काही नियम, तत्त्वं आणि मूल्यं ही शाश्वत सत्यस्वरूप असतात, अपरिवर्तनीय असतात. ती काळाबरोबर किंवा बदलत्या परिस्थितीनुसार बदलत नाहीत, तर काही नियम किंवा तत्त्वं ही परिवर्तनीय असतात. ती कालसापेक्ष, परिस्थितीसापेक्ष बदलतात. जातिव्यवस्था ही मनुष्यनिर्मित, परिस्थिती आणि कालसापेक्ष असलेल्या आचारधर्माचा एक भाग आहे आणि स्वाभाविकच ती परिवर्तनशील आहे. सध्याच्या काळात जातिव्यवस्थेचं कार्य केवळ संपलेलं नसून ते हिंदू समाजासाठी विघातकही आहे म्हणून ती संपुष्टात आणायला हवी, असं त्यांचं मत होतं.
 
 
जगातल्या कोणत्याही धर्मात जातिव्यवस्था नव्हती. ते आपल्या धर्माचं व्यवच्छेदक लक्षण होतं. अखिल विश्वात हिंदू समाजाची ती वैशिष्ट्यपूर्ण ओळख बनली. त्यातून हिंदू समाजाची अस्मिता प्रतिष्ठित झाली. त्या वेळच्या हिंदूंच्या राष्ट्राला ही गोष्ट पोषक होती. प्राचीन काळातल्या हिंदू समाजधुरीणांनी जातिव्यवस्थेचा जो प्रयोग केला त्यामागे त्यांचा हेतू वाईट नव्हता. त्यामुळे त्यांना दोषीही मानता कामा नये किंवा त्याची लाज बाळगण्याचंही कारण नाही. मात्र ही जातिव्यवस्था आज हिंदू समाजाच्या एकीकरणातला अडथळा ठरत असेल, तर तिचं ओझं न वाहता ती मोडीत काढली जायला हवी, असं सावरकरांना वाटत असे.
 
 
त्यांचे हे विचार समाजरचनेला धक्का देणारे, विधायक बदलासाठी आवाहन करणारे आणि क्रांतिकारक होते. मात्र या पूर्ण मांडणीत त्यांच्या सर्व विचारांना हिंदू धर्माची भक्कम चौकट होती. तिला कधी सावरकरांनी हात लावला नाही. याचं कारण म्हणजे त्यांची स्वधर्मावर असलेली डोळस श्रद्धा आणि यातूनच विश्वकल्याणाचा मार्ग जातो याबद्दल त्यांच्या मनात असलेली शतप्रतिशत खात्री. असं असलं तरी या धर्माचं सत्त्व शाबूत राखताना, त्यातली फोलपटं बाजूला केलीच जायला हवीत याबाबत ते आग्रही होते आणि या आग्रहाला मूर्तरूप देताना स्वधर्मावर कठोर प्रहार करतानाही त्यांनी कधी मागेपुढे पाहिलं नाही. ही शस्त्रक्रिया त्यांच्या मते आवश्यक होती.
 
 
हिंदू राष्ट्राचं अस्तित्वच जातिनिर्मूलनावर अवलंबून आहे, असं त्यांचं मत होतं. पोथीप्रामाण्यता आणि पोथीनिष्ठा हिंदुहितासमोर गौण मानली पाहिजे, याच भूमिकेतून, हिंदू एकतेसाठी ‘श्रुति स्मृति पुराणांनी’ पुरस्कारलेली जन्माधिष्ठित जातीची संकल्पना सावरकरांनी धुडकावून लावली. केवळ ब्राह्मण कुटुंबात जन्म झाल्याने व्यक्ती ब्राह्मण होत नाही आणि गुणवत्ता ही केवळ आनुवंशिकतेने प्राप्त होत नाही, हा आपला युक्तिवाद पटवून देण्यासाठी ते काही उदाहरणं देत...
 
 
* देव मानले जाणारे सूर्य, इंद्र, सोम हे पूर्वजन्मात पशू होते, असं वैदिक वाङ्मयात लिहिलेलं ग्राह्य मानलं, तर पशुजीवनात पाप-पुण्य कमावण्याचा काही प्रश्न नव्हता. म्हणजेच एखादा माणूस ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य किंवा शूद्र असणं याचा पूर्वजन्मातल्या पाप-पुण्याशी काही संबंध नाही. तेव्हा नवं शरीर धारण करताना जातीचं गुणलक्षण आपल्याबरोबर आणत नसल्याने जात जन्माधिष्ठित असते, हे विधान तर्कसुसंगत नसल्याचं सावरकरांनी दाखवून दिलं.
 
 
* ब्राह्मण्य ही वृत्ती आहे. तिचा त्या जातीत जन्म होण्याशी काही संबंध नाही, असं सावरकरांचं मत होतं. त्यासाठी ते द्रोणाचार्य, कौशिक मुनींची शूद्र आई, विश्वामित्र मुनींची चांडाळ आई, गणिकेचं अपत्य असलेले वशिष्ठ ऋषी यांची उदाहरणं देतात. तरीही त्यांचं श्रेष्ठत्व समाजाने मान्य केलं होतं. त्यामुळेच जात जन्माने ठरत नसून कर्माने ठरते, असं ते आग्रहाने मांडत.
 
 
* सवर्ण स्त्री आणि शूद्र पुरुषाने चोरून संबंध ठेवल्याने संतती झाली आणि त्या सवर्ण स्त्रीला मूल झालं तर ते सवर्णच समजलं जातं. तत्त्वाने जरी ती संतती शूद्र असली तरी तिला समाजमान्यता सवर्ण म्हणूनच मिळते. तेव्हा व्यवहार आणि समाजमान्यता महत्त्वाची ठरत असल्याने जातीचा जन्मापेक्षा समाजमान्यतेशी अधिक संबंध आहे... अशी सावरकरांनी मांडणी केली.
 
 
* ब्राह्मणाने आचारधर्म सोडला, की त्याचं ब्राह्मण्य शिल्लक राहत नाही, असं जर वैदिक वाङ्मयात असेल तर ब्राह्मण्याचा संबंध जन्माशी नसून तुमच्या कर्माशी आहे, असं सावरकरांनी सांगितलं.
 
 
* जिज्ञासू वृत्ती हा प्रत्येक व्यक्तीचा नैसर्गिक गुण आहे. म्हणजेच आकलन किंवा ग्रहणशक्तीत व्यक्तीनुसार फरक पडला तरी ज्ञान ही काही एका विशिष्ट जातीची मक्तेदारी असू शकत नाही. त्यामुळे ज्ञान हे ब्राह्मणांपुरतं मर्यादित असतं, असं मानणं हे वस्तुस्थितीला सोडून आहे, असं सावरकरांचं मत होतं.
 
 
* सदाचार आणि सद्विचार हे ब्राह्मणेतर लोकांमध्येही दिसून येतात. हे जर ब्राह्मणत्वाचे निकष असतील तर अशा सगळ्यांचीच गणना ब्राह्मण म्हणून व्हायला हवी, असं सावरकरांनी प्रतिपादन केलं.
 
 
* शरीरशास्त्राचे नियम लावले तर सगळी माणसं सारखीच, हे सिद्ध होतं, मग हे भेदाभेद कशासाठी? असे विविध तार्किक मुद्दे जातिभेदावर टीका करताना सावरकरांनी उपस्थित केले होते.
 
 
सावरकरांच्या दृष्टीने हिंदूंचं संघटन हा समाजपरिवर्तनाचा एकमेव मार्ग होता. त्यासाठी जन्माधिष्ठित जातिव्यवस्थेचा अडथळा पार करणं त्यांना गरजेचं वाटत होतं. प्रत्येक मनुष्यात काही आनुवंशिक गुण असतात, तर काही प्राप्त गुण असतात. आनुवंशिक गुणांची कल्पना न नाकारताही सावरकरांनी प्राप्त गुणांना अधिक महत्त्व दिलं. गुण प्राप्त करण्यात जातीचा अडथळा असता कामा नये. परिस्थितीचा असू शकतो; पण अनेकदा परिस्थितीलादेखील जातीचा अडथळा असतो. तेव्हा हे अडथळे दूर करून सर्वांना माणूस म्हणून आपला विकास साधता आला पाहिजे, असं त्यांना वाटत असे.
 
 
या जातिव्यवस्थेमुळे समाजव्यवहारात काही बंधनं निर्माण झाली होती. ही बंधनं म्हणजे समाजाच्या विकासप्रक्रियेतल्या बेड्या आहेत, अशी मांडणी सावरकरांनी केली. ही मांडणी सप्तशृंखला या नावाने प्रसिद्ध आहे.
 
 
यातली सगळ्यात महत्त्वाची बेडी म्हणजे वेदबंदी. वेद वाङ्मय हे ब्राह्मण वर्गापुरते मर्यादित केले गेल्याने वेदांचं अध्ययन आणि अध्यापन फक्त ब्राह्मण वर्गच करत असे. यातून समाजात ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर अशी भलीमोठी दरी निर्माण झाली होती.
 
 
दुसरी बंदी होती व्यवसायबंदी. जात जशी जन्माने ठरते तसा व्यवसायही जन्माने ठरत असे. व्यक्तीच्या गुणकर्मानुसार जात आणि व्यवसाय न ठरण्यामुळे अनेक दुष्परिणाम झाले, असं सावरकरांचं मत होतं. व्यक्तीला त्याच्या अंगच्या गुणांनुसार कामधंदा करू न देणं, हे न्यायाला धरून नाही, असं ते म्हणत असत. बुद्धिप्रधान आणि श्रमप्रधान असे कामाचे ढोबळमानाने दोन प्रकार गृहीत धरले, तर समाजातल्या काहींकडे आनुवंशिकतेने बुद्धीप्रधान काम येतं, तर काहींकडे श्रमप्रधान आणि अशा विभागणीमुळे समाजाचे पुन्हा तुकडेच पडतात. त्यातून श्रेष्ठ-कनिष्ठ भाव निर्माण होतात, त्याचा व्यक्ती आणि समाजावर अपरिहार्यपणे विपरीत परिणाम होतो. त्यामुळे अशा प्रकारे उपजीविकेच्या व्यवसायाची निश्चिती होणं हे हानीकारक असल्याचं सावरकरांचं मत होतं.
 
 
 
समाजासाठी तिसरी घातक बंदी ही स्पर्शबंदी आहे, अशी सावरकर मांडणी करत. हिंदूंच्या सामाजिक व्यवहारात, त्यातही मुख्यत: ब्राह्मण जातीत सोवळंओवळं, स्पृश्यास्पृश्यतेच्या कल्पना अधिक कठोर होत्या. माणसांचं माणूसपणच नाकारणार्‍या होत्या. या कल्पना केवळ भावनिक किंवा मानसिक असून त्याचा अध्यात्माशी कोणताच संबंध नाही.
 
 
अस्पृश्यता हा हिंदू धर्माला लागलेला कलंक आहे. आचारधर्म म्हणून अस्पृश्यतेचा पुरस्कार करणार्‍या वाङ्मयाला सावरकरांनी तर्कशुद्ध आव्हान दिलं. या भाबड्या कल्पना हिंदू राष्ट्रनिर्मितीत अडथळा निर्माण करतात, असं त्यांचं स्पष्ट मत होतं.
 
 
हिंदूंसाठी आत्मघातकी ठरलेली चौथी बंदी म्हणजे सिंधुबंदी. समुद्र पर्यटन हिंदूंसाठी निषिद्ध मानलं गेल्याने हिंदू समाजाचं अतोनात नुकसान झालं. त्यामागे एक कारणही होतं. समुद्रात चाचेगिरी करण्यात अरब लोकांची मक्तेदारी होती. मात्र या अरबांनी जेव्हा मुस्लीम धर्म स्वीकारला तेव्हा त्यांच्या तावडीत जे हिंदू सापडायचे त्यांचं ते सक्तीने धर्मांतर करत. तेव्हा हे धर्मांतर टळावं यातून समुद्रबंदी घालण्यात आली. मात्र या बंदीमुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराला खीळ बसली आणि आरमारही दुर्लक्षित राहिलं. ही बंदी नसती तर पश्चिमेकडच्या देशांकडून भारताला भौतिक प्रगतीच्या अनेक गोष्टी शिकता आल्या असत्या. जगातल्या एकूण ज्ञानविज्ञानातल्या प्रगतीबरोबर भारताला राहता आलं असतं. या बंदीने राष्ट्रीय स्वरूपाच्या विधायक कार्यात अडथळा निर्माण केला, असं सावरकरांना वाटत असे.
 
 
हिंदू धर्मातून बाहेर पडून परधर्मात प्रवेश केलेल्या व्यक्तीला पुन्हा स्वधर्मात यावंसं वाटलं, तर त्याला शुद्धीबंदीचा अडथळा होता. हा अडथळा म्हणजे सावरकरांच्या मते पाचवी बेडी होती. अनेक धर्मांतरित लोक हे अज्ञानातून किंवा जोरजबरदस्तीतून अहिंदू झालेले असत; पण त्यांच्यासाठीही हिंदू धर्माचे दरवाजे बंद होते. अन्य धर्मीयांमधल्या इच्छुकांची तर बातच नको. भारतातल्या इस्लाम धर्मीयांची संख्या यातूनच वाढत गेली तरी हिंदू धर्मीयांना यातलं गांभीर्य जाणवलं नाही. सावरकरांनी मात्र ही शुद्धीबंदीची बेडी तोडण्यासाठी आग्रही प्रचार केला.
 
 
स्पर्शबंदी किंवा विटाळाच्या कल्पनेमुळे असेल, पण हिंदू धर्मीयांमध्ये आंतरजातीय सहभोजनाला बंदी होती. अशा भोजनांमुळे जातींची शुद्धता नष्ट होते, अशी भावना होती. धर्माचं केंद्र पोट नसून हृदय आहे, असं आपल्या लेखनातून ठासून सांगत सावरकरांनी अशा सहभोजनाचे कार्यक्रम जाणीवपूर्वक आखले. असं करण्यासाठी इतरांनाही उत्तेजन दिलं.
 

savarkar 
 
बेटीबंदी अर्थात विवाहबंदी ही सातवी बंदी होती. हिंदू धर्मात आंतरजातीय विवाहाला बंदी होती. अशा वेळी शील, गुण आणि चारित्र्य चांगले असेल तर आंतरजातीय विवाहाला कोणीही अटकाव करू नये, अशी भूमिका सावरकरांनी मांडली आणि त्याचा पाठपुरावा केला.
 
 
 
या सगळ्या सामाजिक विचारांना सावरकरांनी रत्नागिरीतल्या स्थानबद्धतेच्या कालखंडात मूर्तरूप दिलं. जातिभेद निर्मूलनाचं उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून कार्यक्रमांचा धडाका लावला. एकाच वेळी दोन्ही गटांतल्या लोकांच्या मानसिकतेला हादरा द्यायला सुरुवात केली. अस्पृश्य घरांतल्या लोकांशी प्रत्यक्ष संपर्क सुरू केला. ते सवर्णांच्या घरी येतील आणि त्यांना तिथे सन्मानाने वागवलं जाईल अशा कार्यक्रमांची रचना केली. सुरुवातीला विरोध दोन्हींकडून झाला. मकरसंक्रांत आणि दसरा यांसारख्या हिंदू सणांच्या दिवशी सवर्ण आणि अस्पृश्यांमध्ये मिठाईची देवाणघेवाण सुरू केली. कोणत्याही मिरवणुकीत अस्पृश्याने सहभागी व्हावे यासाठी प्रयत्न सुरू केले. सार्वजनिक गणेशोत्सवात अस्पृश्याच्या हातून गणपतीच्या मूर्तीची पूजा करावी अशी योजना केली.
 
लहान वयापासूनच जातिभेदाचे संस्कार मुलांवर होऊ नयेत म्हणून शासकीय आणि नगरपालिकांच्या शाळांमधून अस्पृश्य मुलांना प्रवेश देण्याचे प्रयत्न केले. सवर्ण आणि अस्पृश्यांच्या मुलामुलींना शाळेत एकत्र बसवण्यात यावं यासाठी प्रयत्न केले. सहभोजनाच्या कार्यक्रमांची लाट निर्माण केली. सवर्ण आणि अस्पृश्य महिलांचे एकत्रित हळदीकुंकवाचे कार्यक्रम सुरू केले. नाटकाला येणार्‍या प्रेक्षकांनाही ठरवून एकत्र बसवण्याचा प्रयोग केला.
 
 
मागास जातीच्या बांधवांना मंदिरबंदी होती. तेव्हा भागोजी कीर या श्रीमंत कार्यकर्त्याच्या सहकार्यातून रत्नागिरीत पतितपावन मंदिराची उभारणी केली. सर्व जातींच्या लोकांसाठी हॉटेल्स उभारून तिथे सर्वांना मुक्त प्रवेश ठेवला.
 
 
या 14 वर्षांच्या स्थानबद्धतेच्या काळात अस्पृश्यता निवारणाच्या कार्यातला एक मापदंड सावरकरांनी रत्नागिरीत उभा केला. सैद्धांतिक विचारांना प्रत्यक्ष कृतीचं पाठबळ दिलं. साधारण 100 वर्षांपूर्वीचा कालखंड, त्या वेळची आपली सामाजिक स्थिती डोळ्यासमोर आणली, तर सावरकरांच्या कार्याची महत्ता लक्षात येते. यातल्या अनेक गोष्टी आज समाजात सहजपणे होताना दिसतात... मग ते मंदिरप्रवेश असो, सहभोजन असो, की सहशिक्षणाचा प्रयोग असो किंवा समुद्र ओलांडून जाणं असो.
 
एकाच कालखंडात या सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी तीन महापुरुष प्रयत्न करत होते. त्यातले एक स्वातंत्र्यवीर सावरकर, दुसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तिसरे महात्मा गांधी. जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता या बाबतीत तिघांचे विचार आणि त्यासाठीचा कृतिकार्यक्रम भिन्न होते. तिघांनाही समाजातली विषमता डाचत होती. सामाजिक न्याय प्रस्थापित व्हावा, अशी तिघांचीही तळमळ होती. उद्दिष्ट एक मात्र मार्ग भिन्न अशी तिघांची स्थिती होती.
 
सावरकरांच्या मनात हा सगळा विचार करताना प्रथम आणि अंतिमही हिंदू राष्ट्राचा विचार होता. त्यांच्या सगळ्या कामाचं ते अधिष्ठान होतं. अखंड, एकजिनसी आणि एकात्म हिंदू समाज त्यांना अपेक्षित होता. जातिभेद आणि अस्पृश्यता संपवताना या एकात्मतेला तडा जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असं त्यांना वाटत असे. दुर्बलांचा समाजापासून वेगळा केलेला प्रवाह त्यांना अपेक्षित नव्हता. सवर्ण आणि पददलित असं समाजाचं विभाजन झालं, तर त्यातून अनास्था प्रसंग ओढवतील असं त्यांना वाटत असे. म्हणूनच सावरकरांनी लेखणी, वाणी आणि प्रत्यक्ष कृती यांच्या आधारे सामाजिक चळवळीत मूलगामी योगदान दिलं. सवर्णांच्या जाती-अहंकारावर घणाघाती आघात करतानाच दलितांमधली न्यूनगंडाची भावना कमी करण्याचा प्रयत्न केला. धर्माची संकल्पना देश किंवा समाज यापेक्षा आपापल्या जातीपुरती संकुचित झाली होती अशा कालखंडात सावरकर प्रबोधन करत होते. लोकांच्या मनातल्या धर्मकल्पनेला संकुचिततेच्या कोशातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते.
  
सावरकरांचे हे वैचारिक योगदान त्यांच्या अन्य कार्याइतकेच महान आहे.

अश्विनी मयेकर

https://twitter.com/AshwineeMayekarमुंबई तरुण भारतमध्ये रविवार पुरवणी संपादक म्हणून पत्रकारितेला सुरुवात. दूरदर्शन- सह्याद्री वाहिनीवर वृत्त विभागात काम. गेली काही वर्षं साप्ताहिक विवेकची कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी. भारतीय स्त्री शक्ती तसेच ज्ञान प्रबोधिनी या सामाजिक संघटनांच्या माध्यमातून सामाजिक कामात सक्रिय सहभाग.