योद्धा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

विवेक मराठी    29-May-2024
Total Views |
योद्धा
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
द्रष्टा घराण्याचे वारसदार...
 
 
सावरकर प्रामाणिकपणे पचवायलासुद्धा बौद्धिक पात्रता असणे आवश्यक आहे. समाजाने बरेच टक्केटोणपे खाल्ल्यावर आता कुठे हळूहळू लोकांना सावरकरांच्या पुस्तकावरील धूळ झटकावी असे वाटू लागले आहे. हाही आशेचा किरणच होय. सावरकरांनी जे-जे प्रतिकूल भविष्य वर्तवले होते ते-ते खरे ठरत आले आहे. हा द्रष्टेपणाचा विजयच होय! 
 
savarkar
 
काही माणसे शंभर वर्षांपूर्वीच जन्माला येऊन गेली असती तरीही चाललं असतं. अशी माणसं उगीचच शंभर वर्षे उशिरा जन्माला येतात, त्यामुळे अशी माणसे विचाराने प्रचलित काळापेक्षा शंभर वर्षे मागे असतात. अशा माणसांचा सद्यःस्थितीत काहीही उपयोग नसतो. हा एक प्रकार झाला आणि दुसरा प्रकार म्हणजे काही लोकोत्तर माणसे आणखी शंभर वर्षांनी जन्माला यायच्या ऐवजी शंभर वर्षे अगोदरच जन्माला येतात. त्यामुळे असे लोकोत्तर महापुरुष आणि त्यांचे विचार समकालीन लोकांच्या पचनी पडणे अतिशय कठीण असते. महापुरुषांना समकालीन असणार्‍या माणसापेक्षा असे महापुरुष काळाच्या शंभर वर्षे पुढे असतात. अशा महापुरुषांना ’द्रष्टा’ असे म्हणतात. द्रष्टा म्हणजे भविष्यकाळ यथार्थ रीतीने जाणणारा. आपल्या देशात प्राचीन काळापासून निरनिराळ्या कालखंडांत निरनिराळे अनेक द्रष्टे होऊन गेले आहेत.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे अशा प्रकारच्या ‘द्रष्टा’ घराण्याचे वारसदार आहेत. कोणत्याही काळातील लोकांना समकालीन ‘द्रष्टा’ आणि त्याचे विचार आकलन होत नाहीत. हे दुर्दैव प्रत्येक द्रष्ट्याच्या नशिबी असते. सावरकरही त्याला अपवाद नाहीत.
सावरकरांचे विचार पचनी पडत नाहीत...
 
सावरकरांचे विचार अजूनही बहुसंख्य लोकांच्या पचनी पडत नाहीत. त्याची कारणे अशी- 1) काही लोकांना हे विचार कळलेलेच नसतात. 2) काही लोकांना कळतात; परंतु ते रूढीग्रस्त असल्यामुळे नवे विचार त्यांना पेलवत नाहीत. 3) काही लोकांना अशा महापुरुषांचे विचार आकलन होतात आणि पटतातसुद्धा; परंतु धीटपणाने विचारांचा आणि मतांचा पुरस्कार करण्याचे धाडस त्यांच्या अंगी नसते. 4) निरनिराळ्या राजकीय पक्षांची माणसे अशा महापुरुषांच्या विचारांचे विकृतीकरण करतात आणि त्यांच्या विचारांची दिशाभूल करणारा अपप्रचार करतात. 5) काही श्रद्धाळू माणसे महापुरुषांच्या नव्या विचारांची ‘पोथी’ करून तिची अंधश्रद्धेने नुसती पूजा करत बसतात. 6) काही काही लोकांना महापुरुषाचे काही विचार त्यांच्या मतलबापुरतेच मान्य असतात. 7) त्यांच्या विचारांवर केवळ संख्येच्या बळामुळे किंवा समर्थ पाठिंबा असल्यामुळे काही लोकसमुदाय अशा महापुरुषांच्या तत्त्वज्ञानावर ते स्वतःला सोयीस्कर अशी अपप्रचाराची लेबले लावून, चक्क चिखलफेक करतात. 8) कोणत्याही द्रष्ट्या पुरुषाला मोठ्या प्रमाणात अनुयायी मिळत नसतात. त्यामुळे त्यांचे तत्त्वज्ञान कितीही मोठे असले आणि ते स्वतः कितीही मोठे असले तरी ते समकालीन लोकांमध्ये एकाकी पडतात. ही खरी म्हणजे त्या त्या महापुरुषांची शोकांतिकाच असते.
 
समाजसुधारक सावरकर...
 
वर सांगितलेल्या कारणांमुळेच सावरकर त्यांच्या आयुष्यामध्ये इतर नेत्यांच्या मानाने खूपच एकटे पडले, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. राजकीय नेता हा चटकन मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होऊ शकतो; परंतु समाजसुधारक किंवा द्रष्टा पुरुष लोकप्रिय तर सोडाच, पण लोकांच्या द्वेषाचा विषय होतो. टिळक आणि गांधीजी या दोन महान राजकीय नेत्यांविषयी प्रांजळपणे भक्तिभाव व्यक्त करून मी असे म्हणतो की, टिळकांना समकालीन असणारे त्यांचे सहकारी समाजसुधारक आगरकर हे मात्र त्याच लोकांचे द्वेषाचे शिकार झाले होते. त्याचप्रमाणे गांधीजींचा जयजयकार करणारे लोक समाजसुधारक व तर्कशुद्ध विचार मांडणार्‍या सावरकरांना जणू काही समाजाचा शत्रू मानत असत. त्यामुळे आगरकर आणि सावरकर यांना समाजाच्या रोषाला बळी पडावे लागले. तसं पाहिलं तर प्रत्येक धर्मसंस्थापक त्यांच्या काळातल्या समाजाचा एक प्रकारे समाजसुधारकच असतो. तोही धर्माच्या आदेशाद्वारे काही नवे सामाजिक विचारच मांडत असतो; परंतु जनसामान्यांना नव्याचे वावडे असल्यामुळे त्या-त्या काळातील लोकांनी मुहम्मद आणि येशू ख्रिस्त यांचा छळ कसा केला हे सर्वांना माहीत आहे. सावरकरांचे घराणे नव्या विचारांसाठी छळ सोसणार्‍यांचे आहे.
युगंधर महापुरुष...
 
काल न पचलेला द्रष्टा पुरुष उद्याचा युगंधर पुरुष होत असतो. द्रष्ट्या पुरुषांना अशीसुद्धा दिव्य परंपरा आहे. सावरकर त्या जातकुळीचे आहेत. सावरकर प्रामाणिकपणे पचवायलासुद्धा बौद्धिक पात्रता असणे आवश्यक आहे. समाजाने बरेच टक्केटोणपे खाल्ल्यावर आता कुठे हळूहळू लोकांना सावरकरांच्या पुस्तकावरील धूळ झटकावी असे वाटू लागले आहे. हाही आशेचा किरणच होय. सावरकरांनी जे-जे प्रतिकूल भविष्य वर्तवले होते ते-ते खरे ठरत आले आहे. हा द्रष्टेपणाचा विजयच होय!
अजयकुमार तुकाराम जोगी (मुख्याध्यापक)
9594562262