युगपुरुषाचं पितृतुल्य व्यक्तिमत्त्व!

विवेक मराठी    03-May-2024
Total Views |
@रेणुका देशकर
छंद म्हणून सुरू झालेले सूत्रसंचालन व्यवसायात रूपांतरित झाले. या प्रवासात नवचेतना, ऊर्जा देणारी काही रमणीय आणि सुंदर विश्रामस्थळं असतात. असाच, परमोच्च आनंदाचा आणि कृतज्ञतेचा क्षण म्हणजेच भारताचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भव्य सभेचं चंद्रपूर इथे केलेलं सूत्रसंचालन!
 
modi
 
छंदातून धंदा (व्यवसाय) आणि धंद्यातून मिळणारं छंदाचं साफल्य...! हा आयुष्यातला एक सुंदर प्रवास! या प्रवासात नवचेतना, ऊर्जा देणारी काही रमणीय आणि सुंदर विश्रामस्थळं असतात. असाच, परमोच्च आनंदाचा आणि कृतज्ञतेचा क्षण म्हणजेच भारताचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भव्य सभेचं चंद्रपूर इथे केलेलं सूत्रसंचालन! या कार्यक्रमाचा अनुभव वाचकांसोबत शेअर करताना मनस्वी समाधान मिळतंय.
 
‘स्वराली’चा कार्यक्रम सुरू होता. सायंटिफिक हॉलमध्ये फोन सायलेंट मोडवर करून प्रेक्षकांमध्ये बसले होते. काही गाणी झाल्यानंतर सहज बघावं म्हणून फोन बॅगेतून बाहेर काढला, तर सहा मिस कॉल्स... लागोपाठ! हॉलमधून बाहेर आले आणि त्या मिस कॉलवर फोन केला. चंद्रपूरहून हरीशजींचा फोन होता. “मॅडम, कुठे आहात? एक कार्यक्रम करायचा आहे. येत्या 8 एप्रिलला आहे. भव्य आहे. तुम्हाला यायचंच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आहे. उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी प्रचारार्थ!” खूप आनंद झाला मला!
 
आपण आपल्या कामाला सुरुवात करतो तेव्हा काही स्वप्नं, काही उद्दिष्टं डोळ्यांसमोर ठेवतो ना! त्यातलं एक म्हणजे पंतप्रधान मोदी यांना बघणं, त्यांना भेटणं आणि त्यांच्या सभेचं सूत्रसंचालन करणं. मी ताबडतोब हो म्हटलं. आधार कार्ड, फोटो आणि सिक्युरिटीची सगळी औपचारिकता पूर्ण केली. सभेच्या आदल्या दिवशी संध्याकाळीच मी चंद्रपूरला जाऊन पोहोचले. भव्य असा सभामंडप, भव्य रंगमंच आणि आकर्षक बॅकड्रॉपच्या दोन्ही बाजूला केशरी रंगाचे झुळझुळीत पडदे! मंचाच्या मागील बाजूस, उजवी-डावीकडून स्टेजवर चढणारे दोन जिने! एक सर्वसामान्यांसाठी आणि एक केवळ खुद्द पंतप्रधानांसाठी. मागच्या बाजूला एक लहानसा अतिविशिष्ट कक्ष... सगळं कसं शिस्तबद्ध, व्यवस्थित!
 
modi
 सूत्रसंचालन करताना युगपुरुष पितृतुल्य व्यक्तिमत्त्वाचा अनुभव
 
मी सगळी माहिती घेतली. स्टेजवर कोण कोण असणार, कोण कोणाचं स्वागत करणार, असा मिनिट टू मिनिट प्रोग्राम नोंदवून घेतला. रात्री काहीशा विचारांमध्येच हॉटेलमध्ये झोपले; पण खरं सांगते, मोदीजींना साक्षात पाहायला मिळणार, याचा इतका आनंद होता की, झोप अशी लागलीच नाही. खूप ऐकलं होतं, खूप वाचलं होतं, त्यांची भाषणं ऐकली होती. एक युगपुरुष, देशाला नवीन व्हिजन देणारा एक नेता... संपूर्ण जगात देशाचं नाव प्रकर्षाने झळकावणारा, सगळ्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास जागृत करणारा हा नेता प्रत्यक्ष कसा दिसत असेल? आणि आपण नेमकं त्यांना कुठलं विशेषण लावायचं, काय बोलायचं, हा विचार मनात सुरू होता. दुसर्‍या दिवशी दुपारी 1 वाजताच सभास्थळाकडे निघाले. मोदीजींची येण्याची वेळ 5 वाजताची होती. प्रचंड सिक्युरिटी होती आणि लोकांचं येणं सुरू झालं होतं. हळूहळू सभामंडप फुलायला लागला. 4 वाजले आणि जवळपास एक लाख लोक त्या सभामंडपामध्ये येऊन बसले. लवकरच इतर नेतेमंडळी मंचावर आली आणि सभा सुरू झाली. सगळ्यांचं लक्ष मात्र मोदीजींच्या वाटेकडे लागलं होतं आणि अर्थात माझंही!
 
नियोजित वेळेच्या पाच मिनिटे आधी आकाशामध्ये चॉपरची घरघर ऐकू आली. लोकांमध्ये एक नवीन चेतना, उत्साह संचारला होता. चॉपर उतरलं आणि आदरणीय पंतप्रधान सभास्थळाकडे निघाले. आता कुठल्याही क्षणी त्यांचं मंचावर आगमन होणार होतं आणि अर्थातच मला सगळ्यांच्या वतीने बोलून त्यांचं स्वागत करायचं होतं. मन आनंदित होतं, उत्साही होतं, अधीर झालं होतं, त्यांना प्रत्यक्ष बघण्यासाठी, त्यांचे शब्द ऐकण्यासाठी! माझ्याप्रमाणेच इतरांच्याही मनाची अवस्था अशीच होती. प्रचंड सिक्युरिटीमध्ये मागे असलेल्या दोन पडद्यांपैकी एक पडदा बाजूला सारला गेला. अचानक मंचावरचं वातावरण बदललं. सिंहासारखी चाल, प्रचंड आत्मविश्वास, कधी सभेला हात दाखवत, तर कधी नमस्कार करत या युगपुरुषाचं आगमन झालं. धीरोदात्त पावलं टाकत माननीय मोदीजी रंगमंचाच्या मध्यभागी उभे राहिले. देशाला विशिष्ट दिशा दाखवणारा हा नेता लाखो लोकांच्या समोर प्रत्यक्ष उभा होता आणि आपण त्यांना अगदी जवळून बघतोय, याचा आनंद काय वर्णावा! सभामंडपामध्ये प्रचंड जोश आणि उत्साह होता. ‘मोदी... मोदी‘च्या घोषणा सुरू होत्या. मोदीजी लोकांना हात दाखवत होते, नमस्कार करत होते आणि मला मात्र क्षणाचाही वेळ न दवडता सभा पुढे न्यायची होती. ‘कर्मयोगी, विकसित भारताच्या स्वप्नांना साकार करणारे पंतप्रधान‘ असं म्हणत लगेच त्यांच्या स्वागताकडे वळले.
 

modi 
त्यानंतर लागोपाठ आणखी दोन ठिकाणच्या सभेचं सूत्रसंचालन करण्याचा योग आला. या वेळी मात्र, मोदीजी मंचाच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत लोकांना अभिवादन करीत फिरले. तीच धीरोदात्त पावलं टाकणारी सिंहासारखी चाल, तीक्ष्ण नजर, एक तेज:पुंज आणि दैवी शक्ती असलेली व्यक्ती आपल्यासमोर उभी आहे, अशी भावना! आत्मविश्वास आणि स्वाभिमान, करारी बाणा आणि कृतज्ञता, विश्वव्यापकता आणि तळागाळातील माणसापर्यंत पोहोचणारे, चंद्रावर जाण्यास उत्सुक, तेवढंच भारतभूमीच्या प्रत्येक कणावर प्रेम करणारे... ‘परित्राणाय साधूनां, विनाशाय च दुष्कृताम्...‘ असं हे पितृतुल्य व्यक्तिमत्त्व! 
 
खरं सांगतेय मी, तब्बल 24 वर्षांपासूनच्या कार्यक्रमाच्या विविध अनुभवांतील हा एक दुर्लभ आणि अतिविलक्षण अनुभव होता.
 
 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आपण असतो तर त्यांना पाहिल्याचा जसा आनंद झाला असता, सावरकरांच्या काळात असतो तर स्वातंत्र्यवीरांना पाहण्याचा जो आनंद झाला असता, तसाच आनंद माननीय मोदीजींना प्रत्यक्ष जवळून बघताना व ऐकताना झाला. हे करारीपण, ही तेजस्विता... नि:स्पृहतेतून येते. ‘मैं नहीं, तू ही‘ आणि ‘राष्ट्राय स्वाहा, राष्ट्राय इदं न मम्...‘ असा सगळ्या गुणांचा सुंदर समुच्चय मोदीजींच्या असण्यामध्ये होता. इंग्रजीमध्ये ‘ऑरा‘ म्हणतात तसा एक विलक्षण भाव या मंचाने अनुभवला. तिथे उपस्थित लाखो लोकांनी अनुभवला. माननीय मोदीजींचं प्रेरणादायी मार्गदर्शन झालं. ‘भारतमाता की जय‘ म्हणत, सगळ्यांना अभिवादन करत, नमस्कार करत, मोदीजी हेलिकॉप्टरमध्ये बसून निघून गेले आणि स्टेजवर असलेले सगळे भारावल्यागत आपण मोदीजींना भेटलोय, या आनंदात मग्न होते. त्यांच्यातलीच एक मीसुद्धा!
 
साभार - नागपूर तरुण भारत