समाज घडविणारे मार्मिक व प्रासंगिक विशेषांक...

विवेक मराठी    04-May-2024
Total Views |
@पल्लवी अनवेकर
9594961849
‘हिंदी विवेक’ मासिक हे राष्ट्र व समाजप्रबोधनासाठी व्रतस्थ असून चौदा वर्षांपासून त्याची वाटचाल अविरत सुरू आहे. ‘हिंदी विवेक’ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांवर चालणारे मासिक आहे. संघाला अभिप्रेत असलेले राष्ट्रीय आणि सामाजिक विषय समाजापर्यंत पोहोचवणे आणि वाचकांच्या मनात रुजविणे हे काम ‘हिंदी विवेक’ने सातत्याने सुरू ठेवले आहे. ‘तीर्थंकर भगवान महावीर’ विशेषांक याच परंपरेतील पुढील टप्पा आहे. ‘तीर्थंकर भगवान महावीर’ विशेषांकाचे आतापर्यंत पुणे आणि मुंबई अशा दोन ठिकाणी प्रकाशन कार्यक्रम झाले आहेत, त्या कार्यक्रमांचा वृत्तांत..
vivek
 
यंदाचे वर्ष हे ‘हिंदी विवेक’ मासिक पत्रिकेचे पंधरावे वर्ष आहे. मागील चौदा वर्षांत ‘हिंदी विवेक’ची ओळख उत्तम विषय आणि विषयाची परिपूर्ण मांडणी करणारे मासिक म्हणून देशभरातील वाचकांमध्ये तयार झाली आहे. या काळात ‘हिंदी विवेक’ने समाजमनातील विषयांवर नुसतेच अंक प्रकाशित केले नाहीत, तर त्या अंकांच्या माध्यमातून समाजाला सकारात्मक विचार करण्यासही प्रवृत्त केले आहे.
 
 
आपला नियमित अंक, विशेषांक, पुस्तके व ग्रंथांच्या माध्यमातून आजवर ‘हिंदी विवेक’ने वेळोवेळी समाजात घडणार्‍या घटनांवर मार्मिक आणि मुद्देसूद भाष्य केले आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजेे नुकताच प्रकाशित झालेला ‘तीर्थंकर भगवान महावीर’ विशेषांक. हे वर्ष भगवान महावीर यांचे 2550 निर्वाण वर्ष आहे. यानिमित्ताने ‘हिंदी विवेक’ने ‘तीर्थंकर भगवान महावीर’ विशेषांक प्रकाशित केला आहे.
 
 
भगवान महावीर यांच्या या 2550व्या निर्वाण वर्षी संघ स्वयंसेवक जैन बांधवांसोबत वेगवेगळ्या उपक्रमांत सामील होतील, अशी घोषणा पू. सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी केली होती. ‘हिंदी विवेक’ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांवर चालणारे मासिक आहे. संघाला अभिप्रेत असलेले राष्ट्रीय आणि सामाजिक विषय समाजापर्यंत पोहोचवणे आणि वाचकांच्या मनात रुजविणे हे काम ‘हिंदी विवेक’ने सातत्याने सुरू ठेवले आहे. ‘तीर्थंकर भगवान महावीर’ विशेषांक याच परंपरेतील पुढील टप्पा आहे. भगवान महावीर यांनी अडीच हजार वर्षांपूर्वी मांडलेले विचार आजही समाजाला दिशा देण्याचे काम करत आहेत. त्यांनी मांडलेल्या सत्य, अहिंसा, अचौर्य, अनेकांतवाद अशा विचारांची आजही समाजाला तितकीच गरज आहे जितकी अडीच हजार वर्षांपूर्वी होती; किंबहुना आज ही गरज जास्त भासत आहे. संपूर्ण विश्व आज युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे. केवळ आपलेच म्हणणे योग्य, अशा भूमिकेत व्यक्ती, समाज आणि राष्ट्रे येत आहेत. अशा वेळी भगवान महावीर यांचा अनेकांतवाद हा अत्यंत उपयुक्त ठरतो. परम सत्य एकच आहे; परंतु त्यापर्यंत पोहोचण्याचे मार्ग वेगवेगळे असू शकतात, हे भगवान महावीरांनी पटवून दिले आहे.
 
 

vivek
 
भारतात भगवान महावीर यांच्यासारखे बरेच संतमहात्मे होऊन गेले आहेत. त्यांनी त्या त्या काळानुसार लोकांना दिशादर्शन करण्याचे कामही केले आहे. त्यांचे शरीर जरी नश्वर असले तरी त्यांचे विचार आजही समाजाला सन्मार्ग दाखवण्याचे काम करत आहेत. आज अशी गरज आहे की, त्यांनी दिलेल्या विचारांची वर्तमान काळाशी सांगड घालून त्याचे उपयुक्त प्रतिपादन करण्याची. ‘तीर्थंकर भगवान महावीर’ विशेषांकात ‘हिंदी विवेक’ने नेमके हेच केले आहे. या अंकात भगवान महावीर यांचा वारसा पुढे चालवणारे जैन संत, आचार्य, मुनी, जैन तत्त्वाचे अभ्यासक इत्यादी लोकांनी भगवान महावीर यांचे विचार, त्यांचा वैज्ञानिक आधार आणि समाजमनावर त्यांच्या विचारांचा होणारा प्रभाव अशा विविध पैलूंवर लेखन केले. आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित विषय विशेषांकात असल्याने जैन मंडळींसोबत इतर समाजातील वाचकांनीही या विशेषांकाला भरभरून प्रतिसाद दिला आहे. विषयांची निवड, त्यांची मांडणी व त्यांना समर्पक चित्र अशा सर्व गोष्टींमुळे विशेषांक सर्वांगसुंदर झालेला आहे, ही भावना वाचकांच्या प्रतिसादातून जाणवते.
 
 
‘हिंदी विवेक’ एखाद्या विषयावर सर्वांगीण माहिती देणारे विशेषांक फक्त प्रकाशित करून थांबत नाही, तर त्याचे प्रकाशन कार्यक्रम करून ते विचार समाजापर्यंत वेगवेगळ्या माध्यमांतून कसे पोहोचवता येतील असाही प्रयत्न करत असतो. ‘तीर्थंकर भगवान महावीर’ विशेषांकाचे आतापर्यंत पुणे आणि मुंबई अशा दोन ठिकाणी प्रकाशन कार्यक्रम झाले आहेत. पुण्याच्या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर, तर मुंबईच्या कार्यक्रमाला राष्ट्रसंत परम गुरुदेव नम्रमुनीजी महाराजसाहेब मुख्य वक्ता म्हणून उपस्थित होते.
 

vivek 
 
‘हिंदी विवेक’ विचारप्रबोधनाचे माध्यम आहे. अचूक अध्ययन करून सतत ‘हिंदी विवेक’च्या माध्यमातून समाजासमोर वेगवेगळे विषय ठेवले जातात. वर्तमानात व भविष्यात निर्माण होणार्‍या समस्यांचे समाधान हवे असेल तर भगवान महावीरांच्या विचारांवर चालले पाहिजे. मानवकल्याणासाठी केलेली तपस्या जन्मोजन्मांतरची साधना त्यातून या मार्गांचे निर्माण झाले आहे. संतमहात्म्यांनी आपल्या विचारांतून राष्ट्राला मजबूत बनवले. आपल्या पूर्वजांनी मानवकल्याणाच्या या विचारांवर विश्वास ठेवून विदेशी संकटांपासून राष्ट्राला वाचवले. संघर्षकाळात राष्ट्राच्या जीवनमूल्यांना आत्मसात केले. या मूल्यांना आत्मसात केल्यानेच व्यक्ती चरित्रवान होतो. अशा शब्दांत पुण्याच्या कार्यक्रमात सुनील आंबेकर यांनी ‘हिंदी विवेक’ मासिक पत्रिकेच्या परिवाराचे अभिनंदन केले. पुण्याचा कार्यक्रम मार्केट यार्ड येथील जैन समाजाच्या मंडळींनी मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न केला.
 
 
मुंबईत झालेल्या प्रकाशन कार्यक्रमात राष्ट्रसंत परम गुरुदेव नम्रमुनीजी महाराजसाहेब यांनी, “जीवनामध्ये दोन शब्दार्थ आहेत, एक आहे विनय आणि दुसरा विवेक. परमात्मा महावीर यांच्या विचारांचा आदर करणे म्हणजे विनय आणि त्याच परमात्म्याला हृदयात विराजमान करून आजच्या परिस्थितीत काय करायला पाहिजे, कोणत्या वेळी काय योग्य आहे ते करणे म्हणजे विवेक. आज ’हिंदी विवेक’ने भगवान महावीरांचे 2550 व्या निर्वाण वर्षानिमित्त आपले उत्तरदायित्व समजून खर्‍या अर्थाने ‘विवेक’ने कर्तव्य पार पाडले,” या शब्दांत ‘हिंदी विवेक’चे कौतुक केले.
 
 
हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष पद्मश्री रमेश पतंगे म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघामार्फत संपूर्ण देशभर तीर्थंकर भगवान महावीर निर्वाण वर्ष साजरे करून त्यांचे स्मरण करण्यात येत आहे. भारताची प्रतिमा ‘वसुधैव कुटुंबकम’ आहे आणि आपण त्याचे एक अंग आहोत. सत्याकडे बघण्याचे अनेक दृष्टिकोन आहेत, सत्याच्या व्याख्या प्रत्येक जण आपापल्या परिने व्यक्त करतो; परंतु हेच भगवान महावीरांनी अनेकांतवादामध्ये स्पष्ट केले. क्वांटमचा जन्म 1920 मधला, परंतु 2550 वर्षांपूर्वी महावीरांनी हा सिद्धांत सांगितला आहे. भारतात वैचारिक ज्ञान विपुल आहे, हे विचारधन म्हणजेच भारताची श्रीमंती. ‘धर्मो रक्षति रक्षितः’ जो धर्माची रक्षा करेल, धर्म त्याची रक्षा करेल. आपल्यातील चांगल्या विचारांचे आदानप्रदान केले पाहिजे, त्यामुळे विचारांचा प्रसार होतोे, कर्माच्या माध्यमातून केलेली सेवा हीच ईश्वरसेवा आहे.
 
 
दोन्ही कार्यक्रमांना जैन व अन्य समाजातील प्रतिष्ठित मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. कार्यक्रमांचे एकंदरीत स्वरूप आणि ‘हिंदी विवेक’चे विशेषांक या दोन्हींना त्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. वैविध्यपूर्ण विशेषांकाच्या माध्यमातून समाजाच्या वेगवेगळ्या घटकांपर्यंत पोहोचण्याच्या ‘विवेक’च्या प्रयत्नांना त्या त्या घटकांचा मोठ्या प्रमाणात उत्साहाने प्रतिसाद मिळतो. हे दोन्ही कार्यक्रम त्याच परंपरेतील होते. अशा प्रतिसादांमुळेच चौदा वर्षांपूर्वी राष्ट्र व समाजप्रबोधनासाठी घेतलेल्या ‘हिंदी विवेक’च्या व्रताला उत्साहाने पुढे चालविण्यासाठी आत्मिक शक्ती मिळत आहे.
 
 
लेखिका ‘हिंदी विवेक’च्या कार्यकारी संपादक आहेत.