सन 2014 नंतर आमूलाग्र बदललेला भारत

विवेक मराठी    04-May-2024
Total Views |
@प्रा. अशोक मोडक
सन 2014 पूर्वीच्या तीस वर्षांमध्ये कोणत्याही पक्षाला संसदीय निवडणुकांमध्ये निर्भेळ सत्ता मिळाली नव्हती. परिणामत: कडबोळी-आघाडी सरकारे या तीन दशकांमध्ये अर्थशून्य अरेरावी करीत होती. सन 2014 मधल्या संसदीय निवडणुकीत मात्र मतदारांनी या अराजकाला संपुष्टात आणण्यासाठी भाजपाच्याच पारड्यात भरघोस मते टाकली. मग भाजपानेही या संधीचे सोने केले.
 
 
modi
सन 2024च्या संसदीय निवडणुकांना प्रारंभ झाला आहे व केवळ हिंदुत्वनिष्ठ नागरिकच नव्हे, तर राजकीय पक्षांपासून अंतर ठेवून, प्रसंगी हिंदुत्वविचारावर सडकून टीका करणारे विचारवंतही या निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टीच प्रचंड मताधिक्याने विजयी होईल, असे भाकीत वर्तविण्यासाठी पुढे आले आहेत, असे दिसते. ‘लोकनीती सेंटर फॉर दि स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज्’ या संस्थेने केलेल्या निवडणूकपूर्व सर्वेक्षणावर सुहास पळशीकर यांनी लेख लिहून भाजपाला या निवडणुकीत भरघोस यश मिळेल, असा अभिप्राय नोंदवला आहे. बद्री नारायण म्हणजे प्रयागराजच्या ‘गोविंद वल्लभ पंत इन्स्टिट्यूट’चे प्रमुख यांनीही भाजपाची सामाजिक अभियांत्रिकीच (सोशल इंजिनियरिंग) या पार्टीला दिल्लीत सत्ताधीश बनवील, असे भविष्यकथन केले आहे. सत्यजित रे स्मृती जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित झालेला पश्चिमी अभिनेता मायकेल डग्लस काय वा ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या स्तंभलेखिका तवलीन सिंग काय, यांनीसुद्धा हाच सूर वक्तविला आहे. राष्ट्र सेवा दलाचे एक प्रमुख विचारवंत व ‘साधना’ साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाट यांनी तर समान नागरी कायदा अमलात आणू इच्छिणारी भाजपाच काँग्रेस वगैरे पक्षांना पराभूत करून दिल्लीत पुन्हा सत्तास्थानी विराजमान होईल, असे म्हटले आहे.
सन 2014 मध्ये भाजपा निर्भेळ मताधिक्याने स्वत:चे सरकार केंद्रात सुप्रस्थापित करण्यात यशस्वी झाली आणि मग पुढच्या दशकभरात या पक्षाने व नरेंद्र मोदींनी कैक विक्रम प्रस्तुत करण्याचे अनोखे चमत्कार करून दाखवले हे वास्तव आहे. या वास्तवाचेच सप्रमाण विवेचन या लेखात करत आहोत.
11 जून 2014 रोजी संसदेत भाषण करताना नरेंद्र मोदींनी 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारत बाराशे वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला, हा विचार मांडला, तेव्हा अब्दुल गफूर नूराणी यांनी ‘फ्रंटलाइन’ नियतकालिकाच्या एका अंकातल्या लेखाद्वारे मोदींवर खरपूस टीका केली व आश्चर्य व्यक्त केले की, मोदींच्या या भूमिकेवर संसदेतल्या कोणत्याही सदस्याने का झोड उठवली नाही? बिचारे नूराणी विसरले की, सन 2014च्या संसदीय निवडणुकीने भारताचा चेहरामोहराच आमूलाग्र बदलला आहे. वर्तमान भारत एडवर्ड व औरंगजेब या दोघांना आपले शत्रू मानत आहे व इस्लामपूर्व शतकांशी स्वत:ची नाळ जोडत आहे. सन 2019 मध्ये भाजपा तर आणखी बलिष्ठ झाली व हिंदुत्वाला विरोध करणार्‍या दैनिक ‘हिंदू’ वृत्तपत्राला 24 मे 2019च्या अंकातल्या अग्रलेखातून अभिप्राय द्यावा लागला तो असा- ‘सन 2019च्या निवडणूक निकालाद्वारे भारतीय मतदारांनी वीर सावरकरप्रणीत हिंदुत्व विचारांवर घसघशीत शिक्कामोर्तब केले आहे.’
सन 2014 मधली संसदीय निवडणूक मनमोहन सिंह शासनाच्या भ्रष्टाचारयुक्त आणि अस्थिर कारभाराच्या पृष्ठभूमीवर मतदारांना सामोरी गेली, तेव्हा या निवडणुकीत मतदारांनी जे मतदान केले ते प्रतिक्रियात्मक होते, असे विरोधक सांगू लागले; पण सन 2019ची संसदीय निवडणूक तर भाजपाच्या केंद्र सरकारच्या कामगिरीच्या बळावर नागरिकांकडे मतांची याचना करीत होती. सामान्यत: सत्तारूढ पक्ष पूर्वीच्या आणाभाका विसरतो, काही चुका करतो.
परिणामत: या पक्षाला मतदारांच्या रोषाला तोंड द्यावे लागते; पण भाजपाने तर आपल्या कामातून स्वच्छ कारभाराचे प्रतिमानच सादर केले. परिणामत: सन 2019 मध्ये मतदारांनी विरोधकांच्या अभिनिवेशाला नव्हे, तर भाजपा शासनाच्या कार्यपद्धतीला पूर्वीपेक्षाही अधिक मतांचा अनुकूल आहेर मतपेट्यांमधून सादर केला. तात्पर्य, हिंदुत्वाचा विचार टीकाकारांच्या लेखी भले प्रतिगामी, कालबाह्य व बुरसटलेला असेल; पण सामान्य मतदारांनी मात्र याच विचारांवर भक्कम पाठिंब्याची मोहोर उठवली. आज नरेंद्रभाई सांगत आहेत की, सन 2014च्या निवडणूक प्रचारात हिंदुत्वनिष्ठांनी लोकांच्या आशाआकांक्षा जागविल्या, तर पाच वर्षे उलटल्यावर याच ध्येयनिष्ठ मंडळींनी नव्या सरकारविषयीचा विश्वास जागविला आणि वर्तमानकाळात हेच कार्यकर्ते सुखी भविष्याची हमी देत आहेत. म्हणजे हिंदुत्वाचा विचार भारताला एकसंध व सुखसमृद्ध करीत आहे. तो नित्य पुरातन आणि तितकाच नित्य अद्यतन आहे. त्या विचाराला कालबाह्य रूढींवर प्रहार, प्रयत्नवादाचा पुरस्कार आणि बुद्धिनिष्ठेचा प्रसार या त्रिसूत्रींवरचा भरवसा जागवायचा आहे, हा विश्वास मतदारांमध्ये जागविण्यात भाजपा यशस्वी झाली.
सन 2014 नंतर संघाला व भाजपाला सदैव कोंडीत पकडू पाहणार्‍या तथाकथित सेक्युलॅरिस्ट आणि प्रोग्रेसिव्ह व वामपंथीय पक्षांचे तसेच विचारवंतांचे पितळ उघडे पडले. हे सर्व महाभाग नकली व बेगडी सेक्युलॅरिस्ट आहेत, हा समज पाच वर्षांत मतदारांमध्ये पक्का रुजला. ‘टाइम्स ऑफ इंडिया’चे तत्कालीन संपादक दिलीप पाडगावकर यांनी सन 2014च्या 31 मेच्या अंकात ‘उद्विग्न उदारमतवाद्यांना उद्देशून लिहिलेले पत्र’ या मथळ्याचाच उत्कृष्ट अग्रलेख लिहिला. ‘प्रागतिक उदारमतवाद्यांनो, या निवडणुकीत आपणा सर्वांचा दारुण पराभव झालाय हे मान्य करू या. या निवडणुकीच्या निमित्ताने ‘भाजप विजयी झाला तर देशात अनर्थ ओढवेल’ असा भयकंप मतदारांमध्ये उत्पन्न करण्यासाठी आपण आपापली लेखणी व वाणी झिजवली. मोदी-शहा यांची रा. स्व. संघाशी नाळ जोडली गेली आहे अन् म्हणून अल्पसंख्याकांचे इथे अस्तित्व संपेल, अशी अफवा आपण उठविली; पण मतदारांनी आपल्या शेर्‍याताशेर्‍यांची पर्वा केली नाही. परिणामत: काँग्रेसचे पानशेत झाले, डावे पक्ष पार धुतले गेले व यापैकी कुणाच्याही कुबड्या न घेता भाजपा राज्यशकट हाकेल अशी चिन्हेच मतदारांनी दर्शविली.’ योगेंद्र यादव म्हणाले की,‘इथल्या संस्कृतीकडे, भावविश्वाकडे पाठ फिरवली हा केवढा मोठा प्रमाद आपण केला.’ सबा नकवी या मुस्लीम महिलेने सरळ सरळ लिबरल व प्रोग्रेसिव्ह पक्षांचे बुरखे फाडले. ‘तुम्ही मंडळींनी मुसलमानांच्या कल्याणाकडे दुर्लक्ष करून या मतदारांना मुल्लामौलवींच्या आणि मस्तवाल गुंडांच्या हाती सोपवले. मिर्झा गालिबने ज्या मुल्लामौलवींवर घणाघाती घाव घातले आहेत, त्यांनाच तुम्ही मिठ्या मारल्यात.’ (संदर्भ : ‘टाइम्स ऑफ इंडिया’, 21 मार्च 2017)
 
 
modi
 
खरं म्हणजे उत्तर प्रदेशातल्या विधिमंडळ निवडणुकीत भाजपाने एकाही मुस्लीम नागरिकाला उमेदवारी दिली नव्हती व तरीही 400 पैकी 325 जागांवर भरघोस यश मिळवले होते. याचा अर्थ, भाजपाने शहाजोग सेक्युलॅरिस्टांकडून मुसलमानांना देण्यात आलेला नकाराधिकार र्(ींशीें िेुशी) तर नाकारलाच शिवाय याच मुस्लीम बंधुभगिनींच्या खर्‍या मानवाधिकाराचे आपण पाठीराखे आहोत, हे सन 2014 नंतरच्या अडीच वर्षांत सिद्ध करून दाखवले. म्हणून तर नेहरू, गोविंद वल्लभ पंत, मुलायम सिंह, नरेंद्र देव यांच्यामुळे ओळखला जाणारा उत्तर प्रदेश संघवाल्यांच्या जयजयकाराने दुमदुमू लागला.
 
इथे लक्षात ठेवण्याजोगा मुद्दा वेगळाच आहे. सन 1942च्या हिंदू महासभेच्या कानपूर अधिवेशनात अध्यक्ष या नात्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एका उद्घोषाने स्वत:च्या भाषणाला पूर्णविराम दिला. तो उद्घोषच पंचाहत्तर वर्षे उलटल्यावर योगी आदित्यनाथांनी कृतीत उतरविला, ‘राजकारणाचे हिंदुकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण’ हाच तो उद्घोष होय. अर्थात, भाजपाने आपल्या व्यवहारातून ‘हिंदू’ शब्दाची व्याप्ती लांब-रुंद वाढविली व ए.पी.जे. अब्दुल कलाम, अरीफ मोहम्मद, सिकंदर बख्त, मौलाना वहिदुद्दिन खान इत्यादी सच्च्या देशभक्त मुसलमानांनाही श्रेष्ठ सन्मान दिले, तर अतिक अहमद नामक इरसाल आतंकवाद्याला सरळ वठणीवर आणले. सत्प्रवृत्त अहिंदूंना आपल्याबरोबर घेऊन हिंदुमात्र संघटित झाला. शतकानुशतके वंचित व बहिष्कृत झालेल्या पिछड्या दलित बंधुभगिनींवर भाजपाने अपरंपार माया केली. ‘त्यांच्यापर्यंत सर्व सरकारी योजनांचे लाभ थेट बँक खात्यातून पोहोचवले, तर अवघ्या भारतवर्षाचे भले करण्यात आपण सफल होऊ’ या आत्मविश्वासाने सन 2014 नंतर भाजपा कार्यकर्ते कामाला भिडले... तत्पूर्वीच्या काँग्रेस शासनाच्या व तथाकथित पुरोगामी पक्षांच्या कार्यकाळात ‘घूस, घपला, घोटाला और घमंड’ हे ‘घ’कारच कारभार करीत होते. हिंदुत्वनिष्ठ शासक या भ्रष्ट व्यवहारापासून सहस्रो योजने दूर राहतात याची मतदारांना प्रचीती आली. कुठला मंडल-कमंडल वाद अन् कुठले अगडे-पिछडे वाद!
 
 
बहुजन समाज पार्टी म्हणजे मायावतींची पार्टी. या पार्टीची पूर्वीची घोषणा होती- ‘तिलक, तराजू और तलवार। इनको मारो जूते चार॥’ या घोषणेच्या पूर्वार्धात ब्राह्मण, वैश्य आणि क्षत्रिय यांचा उल्लेख होता व या सगळ्यांना पादत्राणांनी तुडवा, असा आदेशच उत्तरार्धातून देण्यात आला होता; पण भाजपाने सकारात्मक, विधायक उक्तीतून व कृतीतून मायावतींना मंत्रबदल करण्यास भाग पाडले. वर्तमानात मायावतींची पार्टी खालील घोषणा अशी आहे,
हाथी नाही गणेश है। ब्रह्मा, विष्णु, महेश है॥
ब्राह्मण शंख बजाएगा । हाथी दिल्ली जाएगा ॥
सगळ्याच पक्षांनी सन 2014 नंतर सौम्य हिंदुत्व कवटाळण्यात पुढाकार घेतला आहे. ममताबाई दुर्गासप्तशतीचा पाठ म्हणत आहेत, अरविंद केजरीवाल हनुमान चालीसा आळवत आहेत, शरद पवार ‘अयोध्येतल्या रामललाच्या मूर्तीशेजारी सीतामाईंची मूर्ती का नाही’ म्हणून शोक व्यक्त करताहेत. वस्तुत: याच शरद पवारांनी सन 2018 मध्ये ‘अयोध्येला जन्मभूमीवर मशीदच उभी राहावी’ अशी इच्छा तत्रस्थ मुसलमानांच्या सभेत व्यक्तविली होती व नंतर मुसलमानांकडून खालील सल्लाही मिळवला होता. ‘साहेब, कृपया असे तारे इथे तरी तोडू नका, कारण आम्हाला इथेच सगळ्यांबरोबर गुण्यागोविंदाने राहायचे आहे.’ दस्तुरखुद्द थोरल्या पवारांनीच त्यांच्या तत्कालीन पक्षाच्या नियतकालिकाच्या एका अंकात ही माहिती दिली आहे. (संदर्भ : ‘राष्ट्रवादी’ मासिकाचा डिसेंबर 2018चा अंक, पान 77) सर्व पुढार्‍यांमध्ये कमाल केली ती युवराज राहुल गांधी यांनी. या पठ्ठ्याने शर्टावर जानवे घातले व ते मिरवीत मठांचे, मंदिरांचे उंबरठे झिजवले.
सन 2014 पूर्वीच्या नव्वद वर्षांत म्हणजे खिलाफत चळवळीपासूनच्या काळात हिंदुमात्रांची उपेक्षा, तर मुसलमानांची मनधरणी हाच आपल्याकडच्या राजकारणात जणू रिवाज होता. हिंदू, हिंदू धर्म, हिंदुत्व या शब्दांच्या प्रयोगावर तेव्हा बहिष्कार होता. मुसलमानांचे मात्र कोडकौतुक उतू जात होते. किंबहुना प्रादेशिक राष्ट्रवादाची आरती-भूपाळी या कौतुकामुळेच प्रचलित होती. सन 2014 पूर्वीच्या तीस वर्षांमध्ये कोणत्याही पक्षाला संसदीय निवडणुकांमध्ये निर्भेळ सत्ता मिळाली नव्हती. परिणामत: कडबोळी-आघाडी सरकारे या तीन दशकांमध्ये अर्थशून्य अरेरावी करीत होती. सन 2014 मधल्या संसदीय निवडणुकीत मात्र मतदारांनी या अराजकाला संपुष्टात आणण्यासाठी भाजपाच्याच पारड्यात भरघोस मते टाकली. मग भाजपानेही या संधीचे सोने केले. ज्या एतद्देशीय नागरिकांनी आपल्या मातृभूमीला तीर्थभूमी मानून अपरिमित त्याग केला, त्यांची उपेक्षा, अवहेलना संपवायची हे व्रतच मग व्यवहारात उतरविले गेले. चांगली गोष्ट म्हणजे एतद्देशीय मंडळींच्या संस्कृतीचा, सभ्यतेचा सत्कार सुरू झाला; पण इस्लाम व ख्रिश्चनिटी या पंथांच्या अनुयायांनाही न्यायाने वागविण्याचा रिवाज भारतीय संस्कृतीच्या प्रकाशात रूढ झाला. यातून बहुसंख्याकवादाविषयीची भीती निरर्थक ठरली. गेल्या दहा वर्षांत भारतवर्षामध्ये जातीय दंगेधोपे झाले नाहीत. मुसलमान व ख्रिश्चन वाढत्या प्रमाणात भाजपाचे समर्थन करण्यासाठी पुढे आले. काँग्रेस असो वा समाजवादी अथवा साम्यवादी पक्ष असो, या बेगडी सेक्युलॅरिस्ट पक्षांना ना हिंदू किंमत देतात, ना अहिंदू मानमान्यता देतात. म्हणजे ‘इदं नास्ति, परं न च लभ्यते’ या म्हणीची दारुण अनुभूती भाजपाविरोधकांच्या भाळी लिहिली गेली. ‘न घरका, न घाटका’ या म्हणीचादेखील पुरावा वर्तमानात नकली सेक्युलॅरिस्ट पक्षांच्या उदाहरणांवरून रेखांकित करता येईल.
 
सारांश, हिंदुत्वविचारांचा गौरव, इस्लामपूर्व भारतवर्षाच्या इतिहासाची कदर, बेगडी पुरोगामित्वाचा पंचनामा आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाची चढती भाजणी ही आगळीवेगळी वैशिष्ट्ये भाजपाच्या दशकभराच्या कारकीर्दीत तुम्हीआम्ही अनुभवली.
सन 2024च्या निवडणुकीत म्हणून तर भारतीय जनता पार्टीचे पुढारी व कार्यकर्ते उदंड हिमतीने प्रचारकार्यात व्यग्र दिसत आहेत... भाजपाविरोधक अक्षरश: सैरभैर झाले आहेत.
नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह, देवेंद्र फडणवीस सन 2047 मध्ये स्वातंत्र्याची शताब्दी ‘आम्हीच सत्तेच्या मखरात बसून साजरी करणार’ हा उद्घोष करीत आहेत. या मंडळींचे विरोधक मात्र ‘भविष्यात आपण कुठे असू?’ या प्रश्नामुळे चिंतातुर जंतू बनले आहेत.
या दहा वर्षांत (सन 2014 ते सन 2024) भाजपा शासकांनी जी धोरणे राबवली, जे विक्रम-पराक्रम केले त्यांची जंत्री खूप मोठी आहे. त्यांचे विवेचन पुढच्या लेखात आपण वाचणार आहोत.