“गाव तिथे कृषी उद्योग निर्माण व्हावेत”- दादा लाड

विवेक मराठी    04-May-2024
Total Views |
krushivivek
 
परभणी - शेती हा उद्योगधंद्यासाठी लागणारा कच्चा माल निर्माण करण्याचा मुख्य स्रोत आहे. कच्च्या मालावर प्रक्रिया करणारे उद्योग जर प्रत्येक गावात निर्माण झाले, तर खेड्याची होणारी अवनती रोखता येईल, असे प्रतिपादन भारतीय किसान संघाचे महाराष्ट्र, गोवा व गुजरात प्रांताचे संघटनमंत्री दादा लाड यांनी केले.
 
 
सोमवार, दि. 29 एप्रिल 2024 रोजी परभणी येथील शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात विवेक प्रकाशित ’कृषी विवेक’ व ’कमल ग्रुप’च्या संयुक्त विद्यमाने ’परभणी कृषी उद्योग विशेष’ पुरवणीचे प्रकाशन प्रसिद्ध शेतकरी तथा कृषिभूषण कांतराव देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते.
 
 
याप्रसंगी भारतीय किसान संघाचे महाराष्ट्र, गोवा व गुजरात प्रांताचे संघटनमंत्री दादा लाड, ज्येष्ठ विधिज्ञ तथा ‘सा. विवेक’चे जिल्हा पालक माधवराव भोसले, विभाग संघचालक डॉ. रामेश्वर नाईक व ‘कृषी विवेक’चे संचालक आदिनाथ पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात बळीराजाची प्रतिमा व लोखंडी नांगराचे पूजन करून आणि त्रिनगरे यांनी गायिलेल्या वैयक्तिक झाली.
 
 
या वेळी दादा लाड म्हणाले, “परभणी जिल्हा हा काळ्या व कसदार जमिनीसाठी प्रसिद्ध आहे; परंतु उत्पादन आणि उत्पादकतेच्या दृष्टीने मागे आहे. परिणामी पश्चिम महाराष्ट्रातला तीन एकरांतला शेतकरी सुखी असतो; पण परभणी जिल्ह्यातला 10 एकर शेती असलेला शेतकरी सुखी का नाही याचे उत्तर शोधण्याची गरज आहे. पश्चिम महाराष्ट्राला जे वैभव प्राप्त झाले आहे तशा प्रकारचे वैभव मराठवाड्याला मिळाले पाहिजे. शेतीत शेतकरी स्वतः राबला तर शेती परवडते. मजुरावरची शेती आता राहिली नाही. शेतकरी, त्याची बायको, मुले यांनी कष्ट करून शेतीतील उत्पन्न वाढवावे व सुखी व्हावे”
 
 
कृषिभूषण कांतराव देशमुख यांनी आपल्या मनोगतातून शेती, झरी गावाचा विकास, पाणी प्रश्न, ग्रामविकास याचा धांडोळा घेतला. शेतकरी हा कष्टाळू आहे; पण त्याच्याकडे नियोजनाचा अभाव आहे. शेती हा पटीने उत्पन्न देणारा उद्योग आहे. बाजारात जे विकले जाते तेच पिकविण्याचे तंत्र शेतकर्‍यांनी अवगत केले पाहिजे. त्यामुळे शेतकर्‍यांनी नियोजनबद्ध शेती केली तर शेतकरी समृद्ध होईल. मुख्य म्हणजे कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी पिके घेतली पाहिजेत, असे देशमुख यांनी शेतकर्‍यांना आवाहन केले. प्रथम मी शेतीला प्राधान्य दिले. त्यानंतर शिक्षण आणि वकिली व्यवसायाकडे लक्ष दिले, असे अ‍ॅड. माधवराव भोसले यांनी सांगितले. डॉ. रामेश्वर नाईक यांनी आपल्या मनोगतातून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ ही परभणीची ओळख आहे असे सांगून विद्यापीठाने विकसित केलेले वाण व तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त प्रसार होणे गरजेचे आहे, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.
 
 
‘कृषी विवेक’चे संचालक आदिनाथ पाटील म्हणाले, “शेतकरी बांधवांना नव्या तंत्रज्ञानाची, धोरणांची व योजनांची माहिती मिळावी व शेतकरी बांधवांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी ’कृषी विवेक’ची निर्मिती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याची कृषी बलस्थाने समोर यावीत यासाठी ‘कृषी विवेक’तर्फे जिल्हानिहाय कृषी उद्योग विशेष पुरवणी प्रकाशित करण्याचा संकल्प हाती घेतला आहे,” असे त्यांनी सांगितले.
 
 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन ‘कृषी विवेक’चे परभणी जिल्हा समन्वयक गणेश शिंदे यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय ‘विवेक’चे जिल्हा प्रतिनिधी सुभाष आंबट यांनी करून दिला. या वेळी ‘कृषी विवेक’चे कार्यकारी संपादक विकास पांढरे, वर्गणी व विक्री विभाग प्रमुख प्रदीप निकम, ‘विवेक’चे जिल्हा प्रतिनिधी दिलीप देशपांडे यांच्यासह कृषी, शिक्षण, वकील, राजकारण, उद्योग आदी क्षेत्रांतील मंडळी उपस्थित होती. सूत्रसंचालन आनंद देशमुख यांनी केले. राधा आजेगावकर यांनी गायिलेल्या वंदे मातरम् गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.