गांधीपाराचा ‘गंभीर’ संदेश

विवेक मराठी    04-May-2024   
Total Views |
मेघालयातील पश्चिम गारो हिल जिल्ह्यात आसामचा त्रिकोणी टापू अशा प्रकारे शिरला आहे, की या भौगोलिक स्थितीचा फायदा घेत रोहिंग्या मुसलमान इथल्या लहान लहान गावांमध्ये घुसखोरी करून आपलं बळ वाढवत आहेत. वेगवेगळ्या वेळी एकाच पद्धतीने, एकाच दिवशी झालेल्या अल्पवयीन दोन मुलींच्या बलात्काराच्या घटना खूप गंभीर संदेश देतात... आपण भारतीय म्हणून, हिंदू म्हणून याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे.

vivek
 
पश्चिम बंगालच्या संदेशखाली गावातील हृदय हेलावणार्‍या घटनेच्या धक्क्यातून आपण सावरतोय तोपर्यंत मेघालयमधील अशीच एक घटना कानावर येऊन आदळली.
 
पश्चिम गारो हिल्स जिल्ह्यातील ’गांधीपारा’ गावात 16 एप्रिलला पुन्हा एकदा हिंदूंच्या सहिष्णुतेचे वाभाडे काढले गेले.
 
दोन अल्पवयीन मुलींवर (इयत्ता नववीमध्ये शिकणार्‍या) बलात्कार करून आणि त्यांना जखमी करून वेदनांनी तळमळत फेकून देण्यात आलं. वरवर पाहता दोन कोवळ्या मुलींवर बलात्कार झाला अशी दिसणारी घटना.
 
पण या घटनेला अनेक कंगोरे आहेत. त्याकडे दुर्लक्ष झालं तर काश्मिरी हिंदूंना घाटीतून हद्दपार करून 70 वर्षे जो क्रूर खेळ खेळून त्यांच्या वंशविच्छेदाचा पुरस्कार केला गेला त्याची ही पूर्वांचलातील नांदी आहे की काय असं वाटू लागतं.
 
 
माघ अष्टमी आणि नवमी या दोन दिवसांना पश्चिम गारो जिल्ह्यातील गांधीपारा गावात विशेष महत्त्व आहे. अष्टमीला कोच जनजातीचे बांधव त्यांच्या परंपरागत देवदेवतांचं पूजन करतात.
 
 
निसर्गाचा समतोल साधणारा अन् माणसा-माणसांत प्रेमाचा बंध जोडणारा ’भगवान पाबुनी’, संपूर्ण गावाचं आजारापासून रक्षण करणारी देवता ’माता शीतुली’, विद्येची देवता ‘माता कातुली’ यांच्यासह ’लोखी आमे’, ’चोराबुरी’, ’बारो’ इत्यादी देवदेवतांची पूजा या दिवशी परंपरागत पद्धतीने केली जाते.
 
 
या दोन दिवसांत इथला निसर्गरम्य परिसर ’चिंगा बिंगा’ यात्रेने दुमदुमून जातो.
 
 
आसाम तसेच मेघालयातून या यात्रेमध्ये हजारो लोक हजेरी लावतात.
 
 
धार्मिक परंपरांचं आणि मोकळ्याढाकळ्या, निरागस मनाच्या जनजातीय समाजाच्या सामाजिक जीवनाचं उत्तम दर्शन घडवणारा हा दोन दिवसांचा उत्सव.
 
या उत्सवादरम्यान वनवासी समाजातल्या दोन अल्पवयीन मुलींना वेगवेगळ्या ठिकाणी गाठून, कोंडीत पकडून त्यांच्यावर बलात्कार केला जातो. त्यांच्यासोबत असणार्‍या मित्रांना जखमी करून झाडाला बांधलं जातं. या मुलींवर पाच जणांकडून अमानुष बलात्कार होतो आणि त्यातील एकीला गळ्यावर वार करून फेकलं जातं.
 
 
वेगवेगळ्या वेळी एकाच पद्धतीने, एकाच दिवशी झालेल्या या दोन घटना खूप गंभीर संदेश देतात... आपण भारतीय म्हणून, हिंदू म्हणून आपल्याला याची जाणीव होते की नाही हे महत्त्वाचं आहे.
 
 
हे सर्व बलात्कारी रोहिंग्या मुस्लीम आहेत. यांचा वयोगट 22 ते 25 वर्षे आहे.
 
मेघालयातील पश्चिम गारो हिल जिल्ह्यात आसामचा त्रिकोणी टापू अशा प्रकारे शिरला आहे, की या भौगोलिक स्थितीचा फायदा घेत हे रोहिंग्या इथल्या लहान लहान गावांमध्ये घुसखोरी करत आहेत आणि आपलं बळ वाढवत आहेत.
 
 
दक्षिण सालमारा आणि मानकाचार इथले मुस्लीम मासेमारी, शेती यानिमित्ताने मेघालयात येऊन आर्थिकदृष्ट्या ताकदवान होत आहेत.
 
ही घटना ज्या गांधीपारा गावात घडली ते मानकाचारपासून अवघं 50 कि.मी.वर आहे.
 
 
पश्चिम गारो हिल परिसरात रोहिंग्यांचा प्रभाव इतका वाढतो आहे की, तिथल्या जंगलांचे, जमिनीचे मालक असणार्‍या वनवासींच्या लेकींवर त्यांच्याच परंपरागत उत्सवादरम्यान हे गलिच्छ कर्म करण्याची हिंमत त्यांच्यात आली आहे.
 
मेघालयातील असा जनजातीय समाज; जिथे स्त्रीला सन्मानाची वागणूक आहे; तिला निर्णयांचं, व्यवहाराचं स्वातंत्र्य आहे; तिथे प्रेमाचे मुखवटे पांघरून दरवर्षी दहा ते पंधरा मुलींना लग्न करून धर्मांतरित केलं जातं. दोन-तीन मुलं जन्माला घातल्यावर तिला घराबाहेर काढलं जातं. त्यातील काही जणी भीक मागण्यास विवश होतात. आत्मसन्मान हरवलेल्या आपल्या समाजातून प्रेमाची झिंग असताना बाहेर पडणार्‍या आणि पोटच्या गोळ्याला उपाशी मरायला लागू नये म्हणून मिळेल ते काम करणार्‍या या मेघालयातील जनजातीय मुली...
 
 
जिहाद हा केवळ शारीरिक पातळीवर नाही, तर तो प्रामुख्याने व्यक्तीच्याच नाही, तर समाजाच्या मानसिकतेच्या खच्चीकरणासाठी, त्यांना घाबरवून शरण आणण्यासाठी पद्धतशीरपणे लढला जातोय हे इथे आपण सर्वप्रथम लक्षात घ्यायला हवं.
प्रत्येक समाजाचा एक ढांचा असतो. त्यांच्या परंपरा, मतं- मान्यता असतात. कुटुंबव्यवस्था असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा आत्मसन्मान असतो. जिहादमध्ये ज्याला जसं जमेल तसं त्याने ते तोडायचं, मोडायचं, चुराडा करायचा. मग ती एखादी मूर्ती असो, एखादी मान्यता असो किंवा हाडामांसाचा देह असलेली स्त्री.
 
सूत्र तेच!!
 
यासाठी त्या भागात येऊन पसरायचं, लहानसहान कामं करायची, भंगार खरेदीविक्री, भाजी-फळेविक्री, वाहन चालवणं या माध्यमांतून तिथल्या समाजाची रेकी करायची.
 
 
कोण, कुठे, किती, कसं या सार्‍या कुंडल्या तयार करायच्या आणि मग विविध पातळ्यांवर कामाला लागायचं.
 
 
गाईगुरांची चोरी करावी, जमिनी मिळवण्यासाठी युक्त्या-प्रयुक्त्यांनी गरीब वनवासींना जेरीला आणावं, हळूहळू तिथल्या समाजाला आवश्यक अशा गोष्टींच्या व्यापारात असे पाय रोवावे, की त्या समाजाला ’व्यापारी आणि ग्राहक’ हे समीकरण डोक्यात बसू लागेल. तिथल्या निवडून- निवडून ठरवलेल्या मुलींसोबत लग्न करावं, त्यांचं धर्मांतरण करावं आणि मुस्लीम बापाची ‘पोरकी’ मुलं जन्माला घालून त्यांना वार्‍यावर सोडून द्यावं. वर्षानुवर्षं या अनुभवातून जेव्हा समाजाचा साधेपणा, अगतिकता, विखुरलेपणा निश्चितपणे दिसायला लागेल तेव्हा एक पायरी वरचढ होत, एक क्लीअर कट संदेश द्यावा- तुमच्या मुली या आमच्या हातातलं खेळणं आहेत, हवं तेव्हा, हवं तिथे वापरू आणि फेकू... मारू... तुकडे करू... गाडून टाकू...
 
हे सारं घडतंय...
 
 
या घटनेकडे केवळ दोन मुलींवर झालेला बलात्कार म्हणून पाहण्याची चूक आपण करू नये, कारण हा बलात्कार ‘मला काय त्याचे’ या आपल्या मानसिकतेवर आहे.
 
 
‘आपल्या घरातल्या मुलींपर्यंत आलं नाही ना, मग काय झालं? इकडे असं होत नाही’ या बेसावधपणावर आहे. आपल्या ’ते व्यापारी - आपण ग्राहक’ या स्वार्थी किंवा अज्ञानी मानसिकतेवर आहे.
 
 
आपल्या समाजाचा भूगोल कसा बदलतोय, लोकसंख्यात्मक बाबींबद्दल आपल्याला घेणंदेणं नसण्याच्या ‘ढ’पणाच्या वृत्तीवर आहे.
आपण समाज म्हणून ’असे प्रश्न समाजाचे न मानता’ केवळ व्यक्तिगत पातळीवर पाहून ’थोडी हळहळ’, ’एखादा सुस्कारा’ टाकून निकालात काढतो त्यावर हा बलात्कार आहे.
 
 
चिंगा बिंगा परिसर हा उत्तम पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला येणारं ठिकाण आहे.
 
 
इथे पर्यटन आलं तर आज काश्मीरचा, लडाखचा विकास होतोय तसा इथेही होईल म्हणून ’देशाच्या नजरेत आणि स्मृतीत गांधीपाराला ही नकारात्मक ओळख देण्याचादेखील हा प्रयत्न’ असू शकतो.
 
 
या सर्व घटनांचा अभ्यास करताना लक्षात आलेली आणखी एक गोष्ट म्हणजे या 22-25 वयाच्या पाच व्यक्तींनी दोन्ही घटना एकाच दिवशी घडवून आणल्या, हे जणू आजकाल काही गेम शोमध्ये जे टास्क दिले जातात त्याप्रमाणे केलेले आहेत.
 
 
पुढच्या पिढीला ‘जिहाद’साठी तयार करण्यासाठी, त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी हे सर्व केलं असेल का? क्रूरतेच्या बाबतीत आपले सैनिक कमी पडू नयेत यासाठी हे लाइव्ह ट्रेनिंग किंवा प्रॅक्टिकल एक्झाम घेतली आहे का?
 
कारण इतकं रानटी धाडस यायला त्यांच्यावर तसे वर्षानुवर्षांचे कुसंस्कार झालेले असणारच.
 
शिवाय त्या भागात ’आपलं कोणी काही बिघडवू शकणार नाही’ इतकं सामाजिक वजनदार नेतृत्व असायला हवं.
 
त्यामुळे मेघालयातील गांधीपाराबाबतीत काय घडलं हे शोधायचं नसून ते का घडलं आणि या घटनेच्या मागे काय काय घडलंय हे खरं तपासकार्य आहे.
 
 
हे पोलिसांचं काम आहे; परंतु वरील प्रकारात केवळ तक्रार लिहून घेण्याव्यतिरिक्त मेघालय पोलिसांनी सुरुवातीला कोणतीही कृती केली नाही. पुढे मोठ्या प्रमाणात आलेल्या दबावानंतर नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.
 
 
15 वर्षांच्या दोन कोमेजलेल्या मुली शरीर-मनावर आयुष्यभरासाठी झालेल्या जखमा भरून येण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
तर यंत्रणा एक केस म्हणून तपास करत आहे.
 
 
पण काळ आपल्याकडे आशेने पाहतो आहे की, हे सारं वाचून-ऐकून आपण काय करणार आहोत?