दोम्माराजू गुकेश जगज्जेतेपदाचा दावेदार

विवेक मराठी    04-May-2024   
Total Views |


vivek
डिसेंबर 2023 मध्ये गुकेश कॅन्डिडेट्स 2024 स्पर्धेसाठी पात्र ठरला आणि पुन्हा एकदा आणखी एक विक्रम त्याच्या नावावर नोंदवला गेला. ही स्पर्धा खेळणारा तो सर्वात लहान खेळाडू आहे. कमी वयाचा जगज्जेता होण्याचं दोम्माराजू गुकेश याचं स्वप्न आहे. आता चाहतेही त्याच्या स्वप्नपूर्तीची वाट बघू लागले आहेत. ह्या लेखात जाणून घेऊ या, जागतिक बुद्धिबळात भारताचा झेंडा अभिमानाने उंचावलेल्या डी. गुकेशचा आत्तापर्यंतचा प्रवास.
2017 मध्ये 11 वर्षांखालील वयोगटात राष्ट्रीय विजेता ठरलेला एक लहानसा मुलगा; स्पर्धेनंतर झालेल्या एका मुलाखतीत अगदी आत्मविश्वासाने त्याच्या मोठ्या स्वप्नाबद्दल बोलला होता. हे स्वप्न होतं सर्वात कमी वयाचा जगज्जेता होण्याचं आणि तो मुलगा आहे दोम्माराजू गुकेश. स्वप्नपूर्तीपासून आता थोडासाच दूर. आत्ताच ह्याबाबत बोलणं कदाचित चुकीचं किंवा घाईचं वाटेल; पण कॅन्डिडेट्स स्पर्धा जिंकून गुकेशने अशीच एक अवघड गोष्ट नुकतीच साध्य केली आहे आणि म्हणूनच आता त्याच्या स्वप्नपूर्तीची त्याचे चाहतेही वाट बघू लागले आहेत.
 
गुकेशची जडणघडण आणि कारकीर्द
 
29 मे 2006 ह्या दिवशी गुकेशचा जन्म झाला झाला. अगदी लहान वयातच त्याने बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. वडील कान-नाक-घसातज्ज्ञ आणि आई मायक्रोबायोलॉजिस्ट. आईवडिलांनी नेहमीच प्रत्येक गोष्टीत गुकेशला खंबीर आधार दिला आणि आज त्यांचा विश्वास सार्थ ठरताना दिसतोय.
2018 मध्ये गुकेश 12 वर्षांखालील गटात जगज्जेता झाला. त्याच वर्षी आशियाई युवा बुद्धिबळ स्पर्धेत त्याने तब्बल पाच सुवर्ण पदके पटकावली. 2019 मध्ये 12 वर्षे 7 महिने आणि 17 दिवस वयाच्या गुकेशने जगातील दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात लहान बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरण्याचा बहुमान मिळवला. (आता तो तिसर्‍या क्रमांकावर आहे.)
सप्टेंबर 2022 मध्ये पहिल्यांदाच त्याने 2700 रेटिंग पॉइंट्सचा टप्पा पार केला. ऑगस्ट 2023 मध्ये 2750 रेटिंग ओलांडणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरण्याचा पराक्रम त्याच्या नावावर नोंदला गेला. विश्वचषक 2023 मध्ये गुकेश उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला होता, तिथे त्याला मॅग्नस कार्लसनकडून पराभव पत्करावा लागला. सप्टेंबर 2023 मध्ये 37 वर्षांत पहिल्यांदाच विश्वनाथन आनंदला मागे टाकून गुकेश भारताचा पहिल्या क्रमांकाचा खेळाडू ठरला. डिसेंबर 2023 मध्ये गुकेश कॅन्डिडेट्स 2024 स्पर्धेसाठी पात्र ठरला आणि पुन्हा एकदा आणखी एक विक्रम त्याच्या नावावर नोंदवला गेला. ही स्पर्धा खेळणारा तो सर्वात लहान खेळाडू आहे.
कॅन्डिडेट्स 2024
 
ही स्पर्धा दोन गटांत खेळली जाते. खुला गट आणि महिला गट. दोन्ही गटांत प्रत्येकी आठ खेळाडू सहभागी होतात. स्पर्धेत एकूण 14 फेर्‍या असतात. प्रत्येक खेळाडू एकदा पांढर्‍या आणि एकदा काळ्या मोहर्‍यांसह खेळतो. ह्या स्पर्धेचे पात्रता निकष जागतिक बुद्धिबळ संघटना जाहीर करते. विविध स्पर्धांचे विजेते/उपविजेते, सर्वाधिक रेटिंग असणारा खेळाडू इत्यादी निकष ह्यात समाविष्ट आहेत. त्याबाबत फार जाणून न घेता आपण थेट ह्या स्पर्धेबद्दल माहिती घेऊ या. ह्या वर्षी खुल्या गटात भारताचे तब्बल तीन खेळाडू खेळणार होते. ही घटनादेखील भारतासाठी ऐतिहासिक होती; कारण ह्याआधी केवळ विश्वनाथन आनंदच कॅन्डिडेट्स स्पर्धेत खेळला होता. विश्वचषकाची अंतिम फेरी गाठून सगळ्यात आधी स्पर्धेसाठी पात्र ठरलेला प्रज्ञानंद, ग्रँड स्विस स्पर्धा जिंकणारा विदित गुजराथी आणि सगळ्यात शेवटी पात्र ठरलेला डी. गुकेश. स्पर्धा सुरू होताना कुणी स्वप्नातही विचार केला नसेल, की गुकेश अशी काही कामगिरी करू शकेल. सध्याचा जगातील आघाडीचा खेळाडू मॅग्नस कार्लसन तर ‘गुकेशसाठी ही स्पर्धा अत्यंत निराशाजनक असेल’ असं भाकीत वर्तवून मोकळा झाला होता. भारतीय प्रसारमाध्यमांचाही काही प्रमाणात प्रज्ञानंदवर विश्वास दिसत होता. गुकेश मात्र तितकासा चर्चेत नव्हता. स्पर्धा सुरू झाली, एक एक फेरी मागे पडत गेली आणि पूर्ण चित्रच पालटलं. 1-2 फेर्‍यांचा अपवाद वगळता गुकेश प्रत्येक वेळी संयुक्तरीत्या प्रथम स्थानी होता. 13 व्या फेरीत त्याने निर्विवाद आघाडी घेतली आणि त्यानंतर सर्वांसमोर एकच नाव आणि चेहरा होता- डी. गुकेश.
 

vivek 
ह्या स्पर्धेत हिकारू नाकामुरा, इयान नेपोमाची, फॅबिआनो कारुआना असे दिग्गज खेळाडू सहभागी होते. रेटिंग पॉइंट्स आणि अनुभव ह्या दोन्ही दृष्टीने हे तिघे इतरांपेक्षा वरचढ ठरत होते. साहजिकच ह्यांच्यापैकीच कुणी तरी ही स्पर्धा जिंकणार, अशी बहुतेक सर्वांनाच खात्री होती. नेपोमाची पहिल्या फेरीपासून कायमच एकटा किंवा संयुक्तरीत्या आघाडीवर होता. अपवाद होता शेवटच्या दोन फेर्‍यांचा. नाकामुरा अगदी सुरुवातीलाच विदित गुजराथीकडून पराभूत झाला; त्यामुळे स्पर्धेची सुरुवात काहीशी अडखळत झाली. स्पर्धेच्या दुसर्‍या टप्प्यातही त्याला विदितने पराभूत केलं. मात्र नाकामुराने आपला अनुभव आणि कौशल्य पणाला लावत उर्वरित सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करून अगदी शेवटच्या फेरीपर्यंत आपलं आव्हान टिकवून ठेवण्यात यश मिळवलं. शेवटच्या फेरीत वेगवेगळी समीकरणे निर्माण झाली होती. गुकेश तेराव्या फेरीनंतर निर्विवाद आघाडीवर होता; पण ही आघाडी केवळ अर्ध्या गुणाचीच होती. हिकारू, फॅबी आणि नेपो ह्या तिघांकडेही स्पर्धेचा निकाल बदलण्याची संधी होती. नेमके हेच चार खेळाडू अंतिम फेरीत एकमेकांविरुद्ध खेळणार होते. त्यामुळे स्पर्धेची रंगत अधिकच वाढली होती. गुकेश विरुद्ध हिकारू हा सामना बरोबरीत सुटला आणि गुकेशने काही प्रमाणात सुटकेचा निःश्वास सोडला. आता हिकारू स्पर्धेबाहेर गेला होता. फॅबी आणि नेपो ह्या सामन्यावर आता स्पर्धेचा निकाल अवलंबून होता. स्पर्धेअंती एकाहून जास्त खेळाडू समान गुणसंख्येवर असतील तर टायब्रेकर फेरी खेळावी लागली असती. फॅबी आणि नेपो ह्यापैकी कुठलाही खेळाडू जिंकला असता तर त्याला गुकेशविरुद्ध टायब्रेकर खेळावा लागला असता; पण हा सामना अनिर्णित संपला आणि गुकेशच्या नावावर आणखी एक विक्रम जमा झाला- कॅन्डिडेट्स स्पर्धा जिंकणारा सर्वात लहान वयाचा खेळाडू; विश्वनाथन आनंदनंतरचा केवळ दुसरा भारतीय खेळाडू. ह्या स्पर्धेतला एकमेव पराभव गुकेशसाठी टर्निंग पॉइंट ठरला. स्पर्धा जिंकल्यानंतर झालेल्या मुलाखतीत त्याने ही बाब नमूद केली. सातव्या फेरीत धक्कादायकरीत्या गुकेश पराभूत झाला, त्याचं संयुक्त अग्रस्थान त्याच्या हातून निसटलं; पण त्याच वेळी आपण ही स्पर्धा जिंकू शकतो, हा विश्वास त्याच्या मनात निर्माण झाला होता. वाईटातून कधी कधी चांगलं घडतं ते असं.
 

vivek 
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी
 
कॅन्डिडेट्स स्पर्धेचा विजेता हा आधीच्या जगज्जेत्याला आव्हान देतो म्हणजेच आता सध्याचा जगज्जेता चीनचा डिंग लिरेन आणि कॅन्डिडेट्स 2024 स्पर्धा जिंकणारा भारताचा गुकेश ह्यांच्यामध्ये ‘वर्ल्ड चॅम्पियनशिप फायनल’ रंगेल. ही अंतिम फेरी बहुतेक नोव्हेंबरमध्ये खेळली जाईल. तारखा आणि स्पर्धेचे ठिकाण अजून निश्चित झालेले नाही. आणखी एक चांगली बातमी म्हणजे ह्या स्पर्धेच्या आयोजनासाठी भारताकडूनही बोली लावली जाणार असल्याचे भारतीय बुद्धिबळ संघटनेने जाहीर केले आहे. ह्याआधी एकदा विश्वनाथन आनंद आणि मॅग्नस कार्लसन ह्यांच्यामध्ये चेन्नईत जगज्जेतेपदाचा सामना खेळला गेला होता. आनंद त्या वेळी पराभूत झाला होता. ह्या वेळी पुन्हा जर भारताला संधी मिळाली आणि गुकेश डिंग लिरेनवर मात करू शकला तर तो दिवस आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाचा असेल. गेल्या काही वर्षांत मोठ्या संख्येने भारतीय बुद्धिबळपटू पुढे येताना दिसत आहेत. त्या सर्वांसाठीही गुकेश एक प्रेरणास्थान ठरेल ह्यात शंका नाही. नव्या पिढीला एक नवा नायक मिळेल.
 

vivek 
पडद्यामागचे कलाकार
 
यशस्वी होणारा माणूस सर्वांसमोर येतो तेव्हा तो एकटा दिसतो; पण त्याच्यामागे तू पुढे जा, आम्ही तुझ्याबरोबर आहोत, हा विश्वास देणारे पालक किंवा मार्गदर्शक नेहमीच असतात. ते नसतील तर प्रवास अवघड होईल. स्वतःचा व्यवसाय सोडून पूर्णवेळ गुकेशबरोबर राहणारे, त्याला स्पर्धेसाठी देशविदेशात घेऊन जाणारे त्याचे वडील आणि त्याच वेळी घराच्या आर्थिक जबाबदार्‍या खंबीरपणे उचलणारी त्याची आई हे गुकेशचे दोन मुख्य आधारस्तंभ आहेत. पूर्णवेळ खेळावर लक्ष देता यावं ह्यासाठी शाळेत जाणं बंद करण्याचा निर्णय हा नक्कीच फार धाडसी किंवा आततायी वाटू शकतो; पण गुकेशच्या आईवडिलांनी मुलावर विश्वास ठेवला आणि त्याच विश्वासाची गोड फळे आज त्यांना चाखायला मिळत आहेत. इतक्या लहान वयात इतक्या सगळ्या गोष्टी गुकेशच्या आयुष्यात घडल्या आहेत; पण तो मात्र आता त्याच्या पुढील आव्हानाचा विचार करत आहे.
गुकेश 11 वर्षांचा असल्यापासून ग्रँडमास्टर विष्णू प्रसन्नाकडे खेळाचं प्रशिक्षण घेत आहे. गुकेशने कॅन्डिडेट्स स्पर्धा जिंकल्यामुळे विष्णू प्रचंड खूश आहे हे सांगायलाच नको. आपल्या शिष्याबद्दल सांगताना तो म्हणाला, की अगदी सुरुवातीपासूनच गुकेश वयाच्या मानाने जास्तच समंजस आहे. इतर वेळी मित्रांबरोबर मजामस्ती करणारा हा मुलगा खेळाचे धडे गिरवताना मात्र कायम गंभीर असतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी विष्णू आणि विश्वनाथन आनंदनेही सांगितली ती अशी, की गुकेश यंत्रापेक्षा जास्त विश्वास मानवी मेंदूवर ठेवतो. त्याच्या पिढीतील इतर खेळाडू संगणकाचा जास्त वापर करतात; पण गुकेश रेटिंग पॉइंट्स 2500 होईपर्यंत संगणकापेक्षा प्रशिक्षक किंवा इतर खेळाडूंबरोबर सामना करून जास्तीत जास्त गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत होता. खेळात यश मिळायला लागलं तसं इतर महत्त्वाच्या गोष्टी शिकायलाही त्याने सुरुवात केली, ज्यात ध्यान किंवा शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीसाठी आवश्यक अशा अनेक गोष्टी समाविष्ट होत्या. ह्या सगळ्याचा त्याच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम घडला. अनेकदा सलग पराभवांनंतर त्यातून बाहेर पडणं खेळाडूंसाठी अवघड होतं; पण गुकेश अपयश मागे सारायला शिकला आहे, त्याच वेळी विजयानंतर शांत राहणंही त्याला जमायला लागलं आहे. स्पर्धेदरम्यान सतत मुलाखती देणं किंवा चाहत्यांमध्ये वेळ घालवणं त्याच्या स्वभावाच्या विरुद्ध आहे, ह्यामुळे काही वेळा कटूपणाही येऊ शकतो ह्याची त्याला जाणीव आहे; पण अनेकदा इतर काही पर्याय नसतो.
गुकेशच्या वाटचालीत भारताचा पहिला ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद आणि आनंदची पत्नी अरुणा ह्यांचाही मोठा वाटा आहे. आनंद आणि अरुणा शक्य तितक्या सर्व प्रकारे ह्या गुणी उदयोन्मुख भारतीय खेळाडूंना मदत करत असतात. गुकेशने कॅन्डिडेट्स स्पर्धा तर जिंकली आहे; पण अजिंक्यपदाचा मुकुट परिधान करायचा असेल तर आता त्याला आणखी मेहनत घ्यावी लागणार आहे. ह्या मार्गावर विश्वनाथन आनंदसारखा वाटाड्या सोबत असेल तर गुकेश हे आव्हानही सहज पार करू शकेल, अशी आशा बाळगायला काहीच हरकत नाही. गुकेशला त्याच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.