सौहार्दपूर्ण विभाजनाचा ’गोदरेज’ मार्ग!

विवेक मराठी    08-May-2024   
Total Views |

औद्योगिक घराण्यांमधील फूट ही त्राग्यातून होत असेल, तर त्याचे परिणाम केवळ त्या घराण्यापुरते मर्यादित राहत नाहीत. त्याने कर्मचार्‍यांचे मनोधैर्य खचू शकते, ग्राहकांना मिळणार्‍या सेवांवर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि मुख्य म्हणजे या आदळआपटीने अर्थव्यवस्थेलादेखील धक्का बसू शकतो. प्रचंड उद्योगसमूह अर्थव्यवस्थेचा आधार असतात. गोदरेज कुटुंबीयांनी यातले काहीही होऊ न देण्याची परिपक्वता दाखविली. अलीकडच्या काळातील भारतातील तरी हे दुर्मीळ उदाहरण. म्हणूनच गोदरेजच्या विभाजनाची दखल घेणे गरजेचे.

Divisions of Godrej
 
 
तब्बल 127 वर्षे जुन्या गोदरेज उद्योगसमूहाचे विभाजन गोदरेज कुटुंबीयांनीच केले आहे. या घडामोडीने एरव्ही खळबळ निर्माण झाली असती. मात्र गोदरेज कुटुंबीयांनी हे विभाजन ज्या सफाईने आणि सौहार्दाने पार पाडले त्यामुळे वावड्या आणि चर्चांना फारसा वाव राहिला नाही. उद्योग चालविणार्‍या कुटुंबातील कलह चव्हाट्यावर आल्याची उदाहरणे कमी नाहीत. मात्र गोदरेज कुटुंबीयांनी तसे होऊ दिले नाही हे उल्लेखनीय. 127 वर्षांपूर्वी, म्हणजे 1897 साली अर्देशीर गोदरेज यांनी आपला वैद्यकीय उपकरणे तयार करण्याचा व्यवसाय अपयशी ठरल्यानंतर कुलपे तयार करण्याचा व्यवसाय चालू केला होता. व्यवसाय कुलपांचा असला तरी उद्योगविस्ताराची एका अर्थाने गुरुकिल्लीच अर्देशीर गोदरेज यांना मिळाली होती, असे म्हटले पाहिजे. त्यानंतर गेल्या शतकाहून अधिक काळ या उद्योगाने साबणापासून रेफ्रिजरेटरपर्यंत, खाद्यतेलापासून रिअल इस्टेटपर्यंत अनेक क्षेत्रांत घोडदौड केली. याचे श्रेय अर्थातच या उद्योगसमूहाचे नेतृत्व करणार्‍या गोदरेज कुटुंबीयांचे. उद्योग हा नेतृत्वाने घालून दिलेल्या मूल्यांवर चालतो आणि ती मूल्ये किती रुजली आहेत त्यावर त्या उद्योगाची विश्वासार्हता अवलंबून असते. गोदरेजने ती विश्वासार्हता संपादन केली आहे यात शंका नाही. साहजिकच या अवाढव्य उद्योग समूहाचे विभाजन होत असल्याच्या वृत्तांनी ग्राहक हळहळले असतील; पण घराची कालानुरूप विभागणी व्हावी, मात्र त्याची कुरबुरही बाहेर ऐकू येऊ नये अशा पद्धतीने गोदरेजचे विभाजन झाल्याने ग्राहक निर्धास्तदेखील झाले असतील.
 


Divisions of Godrej 
 
औद्योगिक घराण्यांमधील फूट ही त्राग्यातून होत असेल, तर त्याचे परिणाम केवळ त्या घराण्यापुरते मर्यादित राहत नाहीत. त्याने कर्मचार्‍यांचे मनोधैर्य खचू शकते, ग्राहकांना मिळणार्‍या सेवांवर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि मुख्य म्हणजे या आदळआपटीने अर्थव्यवस्थेलादेखील धक्का बसू शकतो. प्रचंड उद्योगसमूह अर्थव्यवस्थेचा आधार असतात. त्यांना बसणार्‍या अंतर्गत कलहाच्या धक्क्यांचे पडसाद स्वाभाविकच अर्थव्यवस्थेला जाणवत असतात. गोदरेज कुटुंबीयांनी यातले काहीही होऊ न देण्याची परिपक्वता दाखविली. अलीकडच्या काळातील भारतातील तरी हे दुर्मीळ उदाहरण. म्हणूनच गोदरेजच्या विभाजनाची दखल घेणे गरजेचे. अर्देशीर गोदरेज आणि त्यांचे भाऊ फिरोजशा गोदरेज यांनी ‘गोदरेज ब्रदर्स’ या कंपनीची स्थापना केली. कुलपे, तिजोर्‍या, साबण यांचे उत्पादन त्यांच्याच काळात सुरू झाले. प्रसंगी परदेशात जाऊनदेखील विकसित तंत्रज्ञानाची माहिती त्यांनी गोळा केली. दादाभाई नौरोजी यांच्याकडून प्रेरणा घेत ते स्वातंत्र्यलढ्याचे समर्थक बनले हे खरे; पण स्वदेशी चळवळीबद्दल मात्र अर्देशीर गोदरेज यांचे काहीसे दुमत होते. ते त्या चळवळीच्या उद्देशाबद्दल नव्हते, तर केवळ स्वदेशी वस्तू आहे म्हणून ग्राहकांच्या माथी दर्जाहीन वस्तू लादणे योग्य नाही, या मताचे ते होते. दर्जाचा आग्रह हा गोदरेज उद्योगसमूहाच्या संस्थापकांनीच ठेवल्यामुळे असेल; पण गोदरेजने ज्या ज्या क्षेत्रात गेल्या शतकभरात विस्तार केला आणि पाय रोवला, तेथे दर्जाशी तडजोड न करण्याचे धोरण राबविले. विश्वासार्हता ही दर्जा आणि सेवा यांच्या सातत्याच्या आधारावर उभी राहते.
 
 
फिरोजशा यांना तीन पुत्र आणि एक कन्या अशी अपत्ये होती. त्यापैकी नवल आणि बर्जरजी गोदरेज यांच्या मुलांकडे सध्या गोदरेज उद्योगाची धुरा होती आणि आहे. त्याच समूहाचे आता विभाजन झाले आहे. आदी गोदरेज आणि नादीर गोदरेज हे बर्जरजी गोदरेज यांचे पुत्र, तर जमशेद आणि स्मिता कृष्ण गोदरेज ही नवल गोदरेज यांची अपत्ये. त्यांच्या पुढच्या पिढ्यादेखील आता या उद्योगसमूहात निरनिराळ्या पदांवर आहेत. कालांतराने त्यांना वेगवेगळ्या उद्योग-केंद्रांची धुरा सोपविण्यात येईल. तूर्तास मात्र आदी गोदरेज, नादीर गोदरेज एकीकडे आणि जमशेद व स्मिता दुसरीकडे असे विभाजन करण्यात आले आहे. अर्थात या सर्वांची वये 70 ते 80 वयोगटातील आहेत. साहजिकच पुढच्या पिढ्यांना लवकरच सूत्रे देण्यात येतील यात शंका नाही. कदाचित आतापर्यंत असलेले सौहार्दपूर्ण कौटुंबिक संबंध कायम ठेवायचे तर वेळीच विभाजन करणे गोदरेज कुटुंबीयांना निकडीचे वाटले असावे. पुढील पिढ्यांमध्ये अनावश्यक स्पर्धा निर्माण होऊन त्याचा प्रतिकूल परिणाम व्यावसायिक हितांवर होणे श्रेयस्कर नाही, अशीही गोदरेज कुटुंबीयांची धारणा असू शकते.
 
 
आता झालेल्या विभाजनानुसार गोदरेज एंटरप्रायझेस आणि गोदरेज इंडस्ट्रीज समूह अशी गटवारी करण्यात आली आहे. यांची मालकी अनुक्रमे जमशेद व स्मिता आणि आदी व नादीर यांच्याकडे असणार आहे. गोदरेज एंटरप्रायझेसअंतर्गत गोदरेज बोयस येते. त्याअंतर्गत डझनभर उपकंपन्या आहेत. गोदरेज इंडस्ट्रीज समूहात गोदरेज इंडस्ट्रीजसह गोदरेज कन्झ्युमर, गोदरेज प्रॉपर्टीज, गोदरेज अ‍ॅग्रोव्हेट, अ‍ॅस्टेक लाइफसायन्सेस या कंपन्या येतात. हे विभाजन सुरळीत झाले असावे असे दिसते. याचे कारण जो करार करण्यात आला आहे त्यातही पुरेशी स्पष्टता आहे. रिअल इस्टेटचे क्षेत्र वगळता अन्य क्षेत्रांत पुढील सहा वर्षे परस्परांशी स्पर्धा करायची नाही यावर कुटुंबीयांचे एकमत आहे. त्यानंतर ते परस्परांच्या क्षेत्रात प्रवेश करू शकतात; मात्र दुसर्‍याच्या क्षेत्रात प्रवेश केला तर त्यांना गोदरेज हा ब्रँड मात्र वापरता येणार नाही. एका अर्थाने कुटुंबीयांनीच परस्परांना आव्हान देण्याच्या काळात दाखविलेला हा समंजसपणा आगळा. उद्योगाचे आणि ब्रँडचे हित आणि प्रतिष्ठा सर्वतोपरी हा त्यामागील विचार दिसतो. सहा वर्षांचा काळ महत्त्वाचा यासाठी, की बाजारपेठीय वर्चस्वाला लगेचच धोका निर्माण होणार नाही याची काळजी उभयपक्षी घेण्यात आली आहे. रिअल इस्टेटचे क्षेत्र परस्परांच्या स्पर्धेसाठी जरी मोकळे ठेवण्यात आले असले तरी दोन्ही बाजू याही क्षेत्रात परस्पर सामंजस्यानेच काम करणार आहेत अशीही शक्यता आहे. गोदरेज कुटुंबीय केवळ संपत्ती आणि मालमत्तेचे विभाजन करून थांबलेले नाहीत, तर पुढच्या पिढीतील सदस्यांना कोणत्या व्यवसायांची सूत्रे द्यायची हेही नक्की करण्यात आले आहे. त्यानुसार आदी गोदरेज यांचे पुत्र फिरोजशा ऑगस्ट 2026 मध्ये गोदरेज इंडस्ट्रीज समूहाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. 43 वर्षीय फिरोजशा सध्या गोदरेज प्रॉपर्टीजचे व्यवस्थापकीय अध्यक्ष आहेत. स्मिता गोदरेज यांची कन्या निरिका होळकर या गोदरेज एंटरप्रायझेस समूहाचे नेतृत्व करतील. गोदरेज बोयसच्या मालकीचे मुंबईत जे तीन हजार एकरचे भूखंड आहेत त्यांवर बांधकामाचे हक्क आता जमशेद गोदरेज आणि स्मिता गोदरेज यांना बहाल झाले आहेत. भूखंड हा या विभागणीत वादाचा मुद्दा होता; मात्र रिअल इस्टेट क्षेत्रात परस्पर सहकार्याने काम करण्याचे निश्चित केल्याने बहुधा त्यावरील वाद चिघळण्यापूर्वीच सोडवण्यात यश आले असावे.
 
 स्मिता गोदरेज
Divisions of Godrej
 
जेवढी अधिक संपत्ती आणि जेवढे जास्त भागीदार तेवढी त्याची विभागणी कठीण. गोदरेज अब्जावधींची मालमत्ता असणारा समूह. मात्र आपल्या प्रतिष्ठेला धक्का न लावता, परंतु तरीही काळाची पावले ओळखत गोदरेज कुटुंबीयांनी विभाजन केले आहे. त्याला त्यांनी मालकी पुनर्रचना असे नाव दिले आहे. त्यामुळे भांडवली नफा कर (कॅपिटल गेन टॅक्स) लागू होणार किंवा नाही यावर चर्चा माध्यमे करीत आहेत. शेअर बाजाराने या विभाजनाला संमिश्र प्रतिसाद दिला आहे. मात्र तो चिंता वाढविणारा नाही, ही गोदरेज समूहांना दिलासा देणारी बाब; परंतु प्रश्न केवळ तेवढाच नाही. गोदरेज यांचे हे उदाहरण एका अर्थाने वस्तुपाठ हे अधिक महत्त्वाचे. या विभाजनाचे भविष्यात कसे पडसाद उमटतात हे पाहणे औत्सुक्याचे असले तरी तूर्तास तरी कुटुंबातून दुमताचा पुसटसाही स्वर उमटू न देता त्यांनी विभाजन घडवून आणले आहे. अन्य अनेक औद्योगिक घराण्यांना यातून शिकण्यासारखे आहे. रेमंडचे मालक विजयपत सिंघानिया आणि त्यांचे पुत्र गौतम सिंघानिया यांच्यातील वाद चव्हाट्यावर आले होते आणि आपल्याला गौतम यांनी घराबाहेर काढले, असा आरोप वडील विजयपत यांनी करण्यापर्यंत हा वाद पोहोचला होता. भारत फोर्जची मालकी असणार्‍या कल्याणी कुटुंबातील संपत्तीचा वाद अद्याप मिटलेला नाही. बाबा कल्याणी यांच्या भगिनी सुगंधा यांची मुले समीर आणि पल्लवी यांनी हिंदू अविभक्त कुटुंब कायद्याच्या अन्वये आपल्याला एक नवमांश संपत्ती मिळावी, अशी मागणी केली आहे. किर्लोस्कर कुटुंबातील वाद शंतनुराव किर्लोस्कर यांच्या निधनानंतर सुरू झाला आणि निवासस्थानाला फाटक करणे हे त्या वादाला निमित्त ठरले, असे म्हटले जाते. अर्थात ती केवळ सबब. खरे कारण पुढच्या पिढ्यांमधील एकोप्याचा अभाव. अतुल आणि राहुल किर्लोस्कर यांच्या मालकीच्या किर्लोस्कर इंडस्ट्रीज आणि संजय किर्लोस्कर यांच्या मालकीच्या किर्लोस्कर ब्रदर्समध्ये वाद आहेत आणि ते प्रकरण राष्ट्रीय कंपनी कायदा लवादापर्यंत पोहोचले आहे. मुरुगन उद्योग समूहात झालेला कलह हा मुरुगन यांचे वारसदार कोण यावरून होता. मुरुगन यांनी आपल्या मृत्युपत्रात सर्व संपत्ती आपली पत्नी आणि कन्या यांना देण्याची इच्छा प्रकट केली होती; पण त्यांच्या कंपन्यांमध्ये कार्यरत पुरुष हे त्याच कुटुंबाशी निगडित असूनही ते मृत्युपत्र मानण्यास राजी नव्हते. अखेरीस कुटुंबीयांनी कोर्टाबाहेर तोडगा काढला आणि ते प्रकरण संपुष्टात आले. धीरुभाई अंबानी यांच्या निधनानंतर अंबानी कुटुंबात उफाळून आलेला वाद सर्वश्रुत आहे. धीरुभाई यांच्या पत्नी कोकिलाबेन यांच्या मध्यस्थीने अखेरीस रिलायन्सची विभागणी करण्यात आली होती. मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांना वेगवेगळ्या कंपन्यांची मालकी देण्यात आली. अर्थात मुकेश यांच्या तुलनेत अनिल अपयशी ठरले हा भाग निराळा. मात्र अशी उदाहरणे पावलीला पसाभर असताना गोदरेज कुटुंबाने मात्र समंजसपणे आणि बिनबोभाट वाटण्या केल्या हे उठून दिसणारे.
 
 
यानिमित्ताने कुटुंबाच्या मालकीच्या उद्योगांवर अशी वेळ का येते याचीही धावती का होईना चर्चा व्हायला हवी. कोणत्याही कुटुंबाच्या मालकीचा उद्योग हा सामान्यतः तीन पिढ्यांपर्यंत टिकतो असे मानण्याची रीत आहे. त्याला ठोस आधार कोणताही नाही; पण असा दाखला दिला जातो तो अमेरिकेतील इलिनॉय येथे झालेल्या एका पाहणीचा. 1980 साली झालेल्या या पाहणीत नमुनादाखल काही कंपन्या त्या संशोधनासाठी निवडण्यात आल्या. त्यातील किती कंपन्या या हे संशोधन सुरू असताना चालू आहेत याची सूची तयार करण्यात आली आणि त्या कंपन्यांची गटवारी 33 गटांत करण्यात आली. त्यातून असे आढळले की, कुटुंबाच्या मालकीच्या असणार्‍या एकतृतीयांश कंपन्या त्या कुटुंबाच्या दोन पिढ्यांपर्यंत तग धरू शकल्या, तर तिसर्‍या पिढीपर्यंत पोहोचलेल्या कंपन्यांचे प्रमाण अवघे 13 टक्के होते. त्यामुळे कौटुंबिक मालकीचे उद्योग तीन पिढ्यांच्या पलीकडे चालत नाहीत; त्यांचे विभाजन तरी होते किंवा ते लयास तरी जातात असे सरसकट मानले जाऊ लागले. मात्र त्या पाहणीत असणार्‍या त्रुटींकडे अनेकांनी लक्ष वेधले. तद्वत त्या पाहणीचा दाखला देऊन चुकीचे निष्कर्ष काढणार्‍यांनादेखील लक्ष्य करण्यात आले. वास्तविक त्या पाहणीतून असे आढळले होते की, एकतृतीयांश कंपन्या या त्या कुटुंबाच्या दुसर्‍या पिढीच्या शेवटापर्यंत तग धरू शकतात. याचाच अर्थ हा काळ सुमारे साठ वर्षांचा होतो. मात्र असे एखाद्या पाहणीचे निष्कर्ष म्हणजेच अंतिम सत्य असे मानण्याचा प्रघात पडला की अनेक अनावस्था प्रसंगदेखील उद्भवतात. उद्योग लयास जाऊ नये म्हणून मग कुटुंबाच्या पुढच्या पिढीकडे सूत्रे देऊच नयेत का; ती बाहेरील कोणा व्यक्तीकडे द्यावीत का इत्यादी प्रश्न उपस्थित झाल्याची परदेशातदेखील उदाहरणे आहेत.
 
 
मात्र मुळात एवढ्या प्रचंड संपत्तीची मालकी असणार्‍या कुटुंबांत कलहाची ठिणगी नेमकी कशी पडते हेही तपासून पाहणे आवश्यक. हॅरी लेव्हिनसन यांनी ‘हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू’मध्ये 1971 साली ’कॉन्फ्लिक्ट्स दॅट प्लेग फॅमिली बिझनेसेस’ हा निबंध लिहिला होता. इतक्या वर्षांनंतरदेखील तो तंतोतंत लागू पडतो असाच. जिज्ञासूंनी तो निबंध अवश्य वाचावा असा. वडील-मुलगा, भावंड, धाकटा आणि थोरला भाऊ, नातेवाईक असे या कलहाचे अनेक स्तर लेव्हिनसनने दाखविले आहेत. यातून तयार होणारे कलुषित वातावरण आणि कटुता त्या उद्योगाच्या मुळावरच येण्याची शक्यता असते. ते टाळणे हे त्या कुटुंबीयांच्याच हातात असते. मुख्य म्हणजे कुटुंबात आपला स्पर्धक वाटतो त्याच्याशी मनमोकळा संवाद साधला तर कटुतेची तीव्रता कमी होऊ शकेल; कदाचित त्यातून समस्या सोडविण्याचे पर्याय समोर येऊ शकतील आणि मार्गही निघू शकेल, असे लेव्हिनसनने सुचविले आहे. गोदरेज कुटुंबाने तेच केले. कटुता येऊ न देता, सौहार्दपणे उद्योगसमूहाचे विभाजन केले आणि व्यावसायिक हितालादेखील बाधा येऊ दिली नाही. व्यवसायांना घातक ठरणारे कौटुंबिक संघर्ष सामोपचाराने सोडविण्याचा हा गोदरेज मार्ग अनेकांना वस्तुपाठ ठरू शकेल!राहुल गोखले

विविध मराठी / इंग्लिश वृत्तपत्रांतून राजकीय, सामाजिक व आंतरराष्ट्रीय विषयांवर नियमित स्तंभलेखन
दैनिक / साप्ताहिक / मासिकांतून इंग्लिश पुस्तक परिचय सातत्याने प्रसिद्ध
'विज्ञानातील सरस आणि सुरस' पुस्तकाला राज्य सरकारचा र.धों. कर्वे पुरस्कार