कोविशिल्डची भीती आणि वास्तव

विवेक मराठी    09-May-2024
Total Views |

@डॉ. प्रिया देशपांडे

 
CoviShield vaccine
 

कोणत्याही औषधाची किंवा लशीची सुरक्षितता ही सापेक्ष असते. या कृतींनी होणारा फायदा होऊ शकणार्या त्रासाची जोखीम यांचा एकत्रित विचार करून निर्णय घेतला जातो. कोविशिल्डचा डोस घेण्याहून किती तरी अधिक धोकादायक कामे आपण अगदी सहजपणे करतो. आता लसीकरण पूर्ण होऊन दोन वर्षे उलटून गेल्याने कोणालाही TTSचा धोका उद्भवत नाही. त्यामुळे जीवघेण्या जागतिक साथीमध्ये आपण सुरक्षित राहिल्याबद्दल विज्ञानाचे आभार मानू या.

 

आपण 2020 मध्ये आपल्या आयुष्यात भूतो भविष्यतिअशा घटनेचे साक्षीदार बनलो. आत्ता हे लिहिण्यासाठी मी आणि हे वाचण्यासाठी तुम्ही जिवंत आहात म्हणजे आपण नशीबवान ठरलो आहोत.

 

आधुनिक जगातील जिला खर्या अर्थाने जागतिक महासाथ म्हणता येईल अशी महासाथ आपण अनुभवली. 2003 मधील सार्स-1 या आजाराच्या साथीमध्ये जगभरात केवळ आठ हजारच्या आसपास रुग्ण होते आणि त्या विषाणूला प्रसारापासून रोखण्यात जग यशस्वी झाले होते. आता या विषाणू संसर्गाचे रुग्ण आढळून येत नाहीत. या आजाराचा मृत्युदर 10% म्हणजे गंभीर होता.
 

2019-20 मध्ये मात्र सार्स-2 या कोविड-19 च्या नूतन विषाणूला रोखण्यात जगाला अपयश आले आणि आता हा नवा विषाणू आपल्या जगाचा आयुष्याचा भाग बनला आहे. 13 एप्रिल 2024 अखेर जगभरात या आजाराचे एकूण 70.4 करोड रुग्ण नोंदले गेले आणि 70 लाखांहून अधिक लोक मृत्युमुखी पडले. या आजाराचा सर्वसाधारण मृत्युदर 1-2% असला तरी 2020 च्या सुमारास तो 8% एवढा उच्च नोंदवला गेला होता आणि साधारण सात करोड व्यक्तींना लाँग कोविडचा त्रास सहन करावा लागत आहे असा अंदाज आहे. अजूनही कोविडचा प्रसार सुरू असला तरी आता लसीकरणामुळे किंवा संसर्गामुळे प्रत्येकाकडे काही प्रमाणात इम्युनिटी उपलब्ध आहे महासाथीचा धोका टळला आहे.

 

2003-04 च्या अनुभवानंतर पुढील महासाथदेखील एखाद्या कोरोना विषाणूच्या नव्या उपप्रकाराने येण्याची संभावना शास्त्रज्ञांच्या लक्षात आली आणि त्यांनी सार्स-1 विषाणूचे रोगी नसले तरी कोरोना विषाणूविरुद्ध लशीवर संशोधन सुरू ठेवले होते. या संशोधनाचा उपयोग लस कमी वेळेत उपलब्ध होण्यासाठी झाला. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार 2012 नंतर MERS या नूतन कोरोना विषाणूमुळे विविध देशांमध्ये उद्रेक घडून आले. या आजाराचा मृत्युदर 35% आहे म्हणजे गंभीरता लक्षात येईल.

 

सार्स-1 आणि MERS विरुद्ध औषध किंवा लस उपलब्ध नाही. मात्र साथनियंत्रणाच्या विविध उपायांनी जसे अलगीकरण विलगीकरण केल्याने या साथी लवकर आटोक्यात आल्या. कोविड-19 मात्र तुलनेने सौम्य असला तरी करोडो लोकांना बाधित करत असल्याने मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी मृत्युसंख्या लाखांमध्ये असल्याने ही साथ थांबवणे अत्यावश्यक होते. लक्षणविहीन प्रसारामुळे मोठ्या रुग्णसंख्येमुळे यापूर्वी कामी आलेले अलगीकरण विलगीकरण हे उपाय या वेळी जास्त प्रभावी ठरले नाहीत. तसेच या वेळी सोशल मीडियामुळे योग्य माहितीऐवजी अयोग्य माहिती अधिक पसरल्याने लोकांकडून सहकार्यदेखील कमी होते. अशा वेळी साथ नियंत्रण जीवरक्षणासाठी औषधे आणि लस अत्यावश्यक होती. विषाणू हे इतर सजीवांप्रमाणे नसल्याने विषाणूविरुद्ध औषधे सहजपणे उपलब्ध वा निर्माण करता येत नाहीत. अशा औषधांची संख्या मर्यादित आहे. मात्र गेल्या दोन दशकांत झालेल्या वैज्ञानिक तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे लसनिर्मिती करणे मात्र शक्य होते. त्या वेळी हा एकच उपाय होता ज्यामुळे लाखो जीव वाचवणे शक्य होते.
 

CoviShield vaccine 

परिस्थितीची गंभीरता निकड लक्षात घेता जगभरातील लस कंपन्यांनी एकूण 482 विविध प्रकारच्या लशींच्या चाचण्या संशोधन सुरू केले. यापैकी 183 लशी माणसांमधील क्लिनिकल चाचण्यांच्या टप्प्यापर्यंत पोहोचल्या 199 लशी प्री-क्लिनिकल म्हणजे प्राण्यांमधील चाचणी या टप्प्यावरच आहेत. या 183 लशी कोणत्या प्रकारच्या आहेत आणि तीन क्लिनिकल टप्प्यांवर कोठपर्यंत पोहोचल्या आहेत याची सखोल माहिती WHO च्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. आपण तेथून एक एक्सेलची फाइल डाऊनलोड करून प्रत्येक लशीचे विविध टप्प्यांवर कसे प्रयोग झाले आणि त्यांचे काय निष्कर्ष निघाले याविषयी माहिती प्रत्यक्ष बघू शकतो. सर्व 183 लशींविषयीही माहिती उपलब्ध आहे. लशींनी त्यांच्या तीन क्लिनिकल टप्प्यांतील चाचण्यांचे समाधानकारक निष्कर्ष WHO कडे सुपूर्द केल्यानंतरच या लशींना मान्यता देण्यात आली आहे. अजूनही बर्याच लशी पहिल्या किंवा दुसर्या टप्प्यावरच आहेत.

 

इतर आजाराच्या लशींपेक्षा कोविड-19 च्या लशी कमी वेळेत उपलब्ध झाल्या हे खरे असले तरी आवश्यक ते सर्व तीन टप्पे सुरक्षेचे निकष या लशींनी पूर्ण केले होते. इतर कोणत्याच आजाराविरुद्ध 482 लशींच्या चाचण्या सुरू झाल्या नव्हत्या. त्यातील फक्त 3-4 लशी सुरक्षित निघाल्या, यात आश्चर्य ते कसले? महत्त्वाची बाब म्हणजे विविध देशांमध्ये एकाच वेळी साथ सुरू असल्याने लस सुरक्षा देते की नाही हे तपासायला महिनोन्महिने वाट बघावी लागली नाही. तसेच जागतिक स्तरावर परवानगी मिळवण्यासाठीदेखील वाट बघावी लागली नाही, कारण दिवसेंदिवस मृत्युसंख्या वाढत असल्याने परवानग्यांमध्ये विनाकारण वाया जाणारा वेळ वाचवून लस कमीत कमी वेळेत उपलब्ध करून देण्यात आली. मात्र लस तातडीने वर्षाच्या आत उपलब्ध झाल्याने सोशल मीडियामधून लशींच्या सुरक्षेबाबत चुकीची माहिती पसरली आणि लोक लस घेण्यासाठी कचरू लागले. अर्थात ज्यांना या शास्त्रीय प्रक्रियेबाबत माहिती नव्हती असे लोकच गैरसमज पसरवत होते. मिसइन्फर्मेशनच्या मार्यामुळे सर्वसामान्य जनता गोंधळून गेली.
 

त्यातच एका शास्त्रज्ञाच्या नावाने एक मेसेज पसरला आणिदोन वर्षांत लस घेणारे मृत्यू पावणारया शब्दांची भीती लोकांच्या मनात बसली. या मेसेजबाबत शास्त्रीय स्पष्टीकरण देणारा लेख मी सोशल मीडियावर लिहिला होता त्यातील विविध भविष्यवाणी चुकीच्या आहेत हेही साधार सांगितले होते. तो शास्त्रज्ञ anti-vaxxer गटाचा सक्रिय सदस्य असल्याने त्याचे लसविरोधी वक्तव्य आपण काळजीपूर्वक तपासायला हवे.

ज्या लशींनी तीन टप्पे समाधानकारकरीत्या पार पाडले मान्यता मिळवली त्या लशींचा वापर करून 2020-21 पासून लसीकरण सुरू झाले. यामध्ये मुख्य वाटा mRNA   प्रकारच्या Viral Vector (Non replicating) प्रकारच्या लशींचा होता. हे दोन्ही तंत्रज्ञान नवे असल्याने पुन्हा जनता साशंक होती. मात्र mRNAची जरी ही पहिलीच लस असली तरी Viral Vector तंत्रज्ञानाची लस वापरून 2020 पूर्वी इबोलाविरुद्ध लसनिर्मिती झाली होती आणि इबोलाची साथ आटोक्यात आणण्यात यश मिळाले होते. तसेच डेंग्यू जापनीज इंकेफेलायटीस या आजारांविरुद्धदेखील लशी उपलब्ध होत्या. कोविशिल्ड/ऑक्सफर्ड लस बनवताना हेच viral vector तंत्रज्ञान वापरले गेले.

 

जेव्हा लसीकरण सुरू होते तेव्हा चौथा टप्पा सुरू होतो ज्यामध्ये प्रत्यक्ष जनतेमध्ये लशीचे काही अवांछित परिणाम आहेत का हे बघितले जाते. यासाठी असे परिणाम ओळखून त्यांची नोंद विविध मार्गे करायची असते त्यानुसार या लशींची शास्त्रीय माहिती वेळोवेळी अद्ययावत केली जाते. सध्या जेवढ्या लशी उपलब्ध आहेत त्या सर्वांचा चौथा टप्पा सुरू आहे तो सुरू राहील. परवानगी मिळण्यापूर्वी कोणतीही लस वा औषध चौथा टप्पा सुरू करू शकत नसते. चौथा टप्प्पा हा नेहमीच post marketing चा असतो.

 

लसीकरणाची संख्या वाढल्यानंतर या लशींचे दुर्मीळ परिणाम समोर येऊ लागले. लाखो डोस दिल्यानंतर दुर्मीळ परिणाम समोर आला म्हणजे जाणूनबुजून असुरक्षित लस दिली, असा त्याचा अर्थ होत नाही. मात्र असे परिणाम सामोरे आले, की त्यानुसार लसीकरणानंतर योग्य ती काळजी घ्यायची असते किंवा काही गटांमध्ये लसीकरण टाळायचे असते. हे उदाहरणांसह पाहू या.
 

mRNA लशीमुळे किशोरवयीन तरुण मुलांमध्ये हृदयदाह (myocarditis) होतो असे आढळून आले. यामुळे लसीकरण थांबवण्याऐवजी योग्य ती काळजी घेण्याचा पर्याय पाश्चिमात्य देशांनी निवडला, कारण ाठछअ लशीएवढी उपयुक्त सुरक्षित दुसरी लस उपलब्ध नव्हती .

 

कोविशिल्ड इतर adinovirus लशी दिल्यानंतर VITT  किंवा TTS या प्रकारच्या रक्तातील गुठळ्या तयार होतात असे एप्रिल 2021 मध्ये आढळून आले होते. लस दिल्यानंतर बहुतांश लोकांमध्ये कोविड विषाणूविरुद्ध अँटिबॉडीज तयार होतात; पण लाखातील काही 1-2 लोकांमध्ये मात्र रक्तातील झऋ-4 या प्रथिनाविरुद्ध अँटिबॉडीज तयार होतात ज्यामुळे रक्तबिम्बिका (platelets) कार्यान्वित होऊन रक्ताच्या गुठळ्या सहसा शरीरातील विविध ठिकाणच्या नीलांमध्ये दिसून येतात. (पुढील चित्र पाहा.) या गुठळ्या मेंदू, फुप्फुसे, यकृतामधील नीलाsplanchnic vein पायाच्या पोटर्यातील नीलांमध्ये आढळून आल्या. (यामध्ये हृदयासंबंधी गुठळ्या समाविष्ट नाहीत याची नोंद घ्यावी.) या VITT च्या घटना विविध देशांमध्ये दिसून आल्या. या घटना मुख्यतः तरुण स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात आढळून आल्या. या अँटिबॉडीज का तयार होतात याचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. हा दुर्मीळ परिणाम समोर आल्यानंतर पाश्चिमात्य देशांनी आपल्या तरुण नागरिकांना mRNA लस देण्याचा निर्णय घेतला. भारतासारख्या विकसनशील मोठ्या लोकसंख्येच्या देशांमध्ये mRNA लस उपलब्ध नसल्याने ही लस उणे 70 डिग्री सेल्सियस तापमानाला साठवण्याची यंत्रणा नसल्याने योग्य ती काळजी घेऊन कोविशिल्डचे लसीकरण सुरू ठेवण्यात आले.

 

असे गंभीर कधी कधी जीवघेणे परिणाम दिसूनदेखील लस सुरक्षित आहे, असे कसे सांगितले जाते, हा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. कोणत्याही औषधाची किंवा लशीची सुरक्षितता ही सापेक्ष असते. या कृतींनी होणारा फायदा होऊ शकणार्या त्रासाची जोखीम यांचा एकत्रित विचार करून निर्णय घेतला जातो. आपल्या दैनंदिन जीवनातदेखील आपण प्रत्येक क्षणी जोखीम घेत असतो; पण आपल्याला त्याची जाणीव नसते. हेदेखील उदाहरणाने समजून घेऊ या.

 

कोविशिल्ड लस घेतल्यानंतर पहिल्या डोसनंतर VITT पहिल्या 4 ते 40 दिवसांत दिसून येतो, त्यानंतर नाही आणि याचा धोका 1-2 घटना प्रति एक लाख लशीचे डोस एवढा आहे. या घटनांमध्ये मृत्यूचा धोका 47% असल्याने मृत्यूचा धोका निम्मा म्हणजे 0.5-1 मृत्यू प्रति लाख डोस एवढाच आहे. याचा अर्थ असा की, तुम्ही कोविशिल्डच्या लशीचा पहिला डोस घेऊन 40 दिवस उलटून गेले असतील, तर आता तुम्हाला VITT मुळे रक्तातील गुठळ्या होणार नाहीत याविषयी तुम्ही निश्चिंत असू शकता.

 

तुलनात्मकदृष्ट्या 1 प्रति एक लाख डोस हा मृत्यूचा धोका कमी आहे की जास्त हे बघू या. भारतात रस्त्यावरील अपघाती मृत्यूचा धोका 107 प्रति एक लाख लोकसंख्या एवढा आहे तरी आपण दररोज रस्त्यावर प्रवास करतोच. भारतामध्ये माता-मृत्यू म्हणजे गरोदरपणामुळे होऊ शकणार्या मृत्यूचा धोका 2020 अखेर 97 प्रति लाख जिवंत जन्म एवढा जास्त आहे तरी कोणतीही स्त्री बाळाला जन्म देणे मरणाच्या भीतीने टाळत नाही. यापेक्षा लशीचा डोस घेणे अधिक सुरक्षित नाही का? आणि लसीकरण उपचार उपलब्ध नसलेल्या कोविडमृत्यूचा धोका कमी करत होते हा मुख्य फायदा तर होताच.

 

अर्थात याहून सुरक्षित लस निर्माण होणे ती सर्वांसाठी उपलब्ध होणे हे सयुक्तिक आहेच; पण महासाथ सुरू असताना त्या त्या वेळी उपलब्ध संसाधने वापरूनच आपल्याला सर्वांची सुरक्षा सुनिश्चित करायची असते, नाही का? या अनुभवांचा वापर करून पुढील नूतन आजाराविरुद्ध अधिक चांगली लस नक्कीच निर्माण करता येईल.

 

2021 मध्ये TTS चा हा परिणाम लक्षात आल्यानंतर Astrazeneca आणि SII या कंपन्यांनी लशीच्या माहितीपत्रकामध्ये या  rare adverse eventचा समावेश करून ती माहिती त्यांच्या website वर प्रसिद्ध केली होती. गेल्या आठवड्यात astrazeneca कंपनीने कोर्टात दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये या परिणामाचा उल्लेख केल्याने याविषयी पुन्हा उलटसुलट चर्चा सुरू झाली. 2021 मध्ये याविषयी मीडियामध्ये जास्त चर्चा झाल्याने लोकांना ही नवी बातमी असल्याचे वाटले पुन्हा भीतीचे वातावरण पसरले.

 

आता प्रश्न पडतो की VITT/TTS मध्ये हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होत नाहीत, भारताखेरीज जिथे ऑक्सफर्डची लस दिली होती तिथे हृदय अचानक बंद पडून मृत्युसंख्या वाढल्याचे दिसून आले नाही, हृदयदाह करणारी mRNA प्रकारची लस भारताने वापरली नाही; पण तरीही भारतात हृदयरोगाने मृत्यू पावण्याच्या घटना का दिसून येत आहेत?

 

याबाबत पुढील बाबी लक्षात घ्यायला हव्यात. आपण कोविड लसीकरण झाले हे लक्षात ठेवतो; पण आता साथीच्या तीन ते चार लाटा येऊन गेल्यानंतर आपल्यातील प्रत्येकाला एकदा तरी कोविड संसर्ग झाला आहे हे आपण विसरतो. विशेषतः कोविडची तपासणी केली नसेल तर कोविड झाला हे समजणार नाही. कोविडचा परिणाम हृदयावर रक्तवाहिन्यांवर होतो असे दिसून आले आहे. भारतात हृदयरोगाचे प्रमाण कोविडआधीपासूनच जास्त होते. मात्र तेव्हा याविषयी मीडियामध्ये बातम्या येण्याचे प्रमाण कमी होते. कोविडनंतर आता अशा प्रत्येक घटनेला सर्वदूर प्रसिद्धी मिळते. या घटनांचे मुख्य कारण वाढते वजन, बैठे काम, मधुमेहाचे जास्त प्रमाण वाढती व्यसने आहे. तसेच sudden cardiac death syndrom म्हणजे अचानक होणारे मृत्यू हे रक्तातील गुठळ्यामुळे नसून अचानक हृदयक्रिया बंद पडल्याने दिसून येतात. हृदयरोगाचा झटका मात्र रक्तवाहिन्या बंद झाल्याने येतो यामुळे अचानक मृत्यू होण्याचे प्रमाण कमी आहे.

 

त्यामुळे सोशल मीडियावरील अशास्त्रीय माहितीवर विश्वास ठेवून विनाकारण VITT/TTS याचा संबंध हृदयरोगाशी लावून चिंता करू नका. वरील लेखातून तुमच्या लक्षात आले असेलच की, कोविशिल्डचा डोस घेण्याहून किती तरी अधिक धोकादायक कामे आपण अगदी सहजपणे करतो आणि लसीकरण पूर्ण होऊन दोन वर्षे उलटून गेल्याने आता कोणालाही ढढड चा धोका उद्भवत नाही, भविष्यात पुन्हा बूस्टर घेतले तरीही धोका नाही.

या जीवघेण्या जागतिक साथीमध्ये आपण सुरक्षित राहिल्याबद्दल विज्ञानाचे आभार मानू या आणि योग्य शास्त्रीय माहिती मिळवून इतरांपर्यंतही पोहोचवू या. ही पुढील संकटामध्ये आपल्या सर्वांना सुरक्षित ठेवेल.

लेखिका एम. डी. साथरोगतज्ज्ञ आहेत.

drprdeshpande2@gmail.com


pasting