हिंदुत्वाचे खंदे पुरस्कर्ते दादूमियां

विवेक मराठी    01-Jun-2024
Total Views |
चिरायू पंडित - 8000137555
 
Dadumiya 
ज्या काळी हिंदुत्वाचा प्रकट उच्चार करणेही राजकीय पाप समजलं जाई त्या वेळेस दादूमियांनी आपली लेखणी हिंदुत्वासाठी निर्भीडपणे चालवली होती. तसेच त्यांनी वेळोवेळी लिहिलेली पुस्तके ही भारताच्या आत्तापर्यंतच्या इतिहासावरचे त्यांचे भाष्यच आहे.
दादूमियां हे नाव नव्या पिढीतल्या हिंदुत्ववाद्यांना कदाचित माहीतही नसेल; परंतु जेव्हा हिंदुत्वाचा प्रकट उच्चार करणेही राजकीय पाप समजलं जाई त्या वेळेस दादूमियांनी आपली लेखणी हिंदुत्वासाठी निर्भीडपणे चालवली होती. डॉ. दामोदर नेने उपाख्य दादूमियां यांनी 92 वर्षांचे आयुष्य जगून 21 मे 2024 रोजी इहलोकीची यात्रा संपवली.
 
 
लेखक हिंदुत्ववादी आणि टोपणनाव दादूमियां... असे कसे? हा प्रश्न स्वातंत्र्यवीर सावरकरांनाही पडला होता. तेव्हा तरुण डॉक्टर नेने यांनी दोनच शब्दांत उत्तर दिले... ‘शत्रूच्या शिबिरात!’ आणि त्यावर सावरकरांनी शाबासकी दिली होती.
 
 
दादूमियांप्रमाणे त्यांचे पूर्वजही अकल्पनीय वाटाव्यात अशा ऐतिहासिक महत्त्वाच्या घडामोडींमध्ये सामील होते. त्यांचे वडील आणि आजोबा हे दोघेही महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे खासगी सचिव होते आणि क्रांतिकार्यात सहभागी होते. त्यांचे आजोबा महर्षी अरविंदांबरोबर सुप्रसिद्ध गंगनाथ विद्यालय प्रकरणात सहभागी होते, तर दुसर्‍या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर महाराजा सयाजीराव आणि हिटलर यांच्यामध्ये झालेल्या बडोदा बर्लिन पॅक्टसारख्या थरारक प्रकरणामध्ये त्यांचे वडील सहभागी होते.
 
 
दादूमियांच्या लहानपणीच त्यांचे वडील वारल्यामुळे त्यांचं बालपण खूप खडतर गेलं. त्यांच्या आईने त्यांना शिकवून मोठं केलं. बडोदा मेडिकल कॉलेजच्या प्रथम बॅचचे विद्यार्थी म्हणून बडोद्यात ते प्रसिद्ध होते.
 
 
परंतु बडोद्यापेक्षा ते देशात आणि त्यातही खास करून महाराष्ट्रात जास्त प्रसिद्ध होते ते त्यांच्या लेखनामुळे. त्या वेळची सगळी प्रसिद्ध नियतकालिके ‘इंडिया टुडे’, ‘ब्लिट्झ’, ‘धर्मयुग’, ‘केसरी’, ‘सामना’, ‘सोबत’, धर्म भास्कर अशा इंग्रजी, हिंदी, मराठी नियतकालिकांमध्ये त्यांचे लेख नियमित प्रसिद्ध व्हायचे.
 
 
Dadumiya
 
त्यांना पाहून मला नारद ऋषींची आठवण व्हायची. ते कोणत्याही परस्परविरोधी गटांत सहज वावरू शकायचे. काँग्रेसी, हिंदुत्ववादी ते मार्क्सवादी म्हणजे सेंटर, राइट, लेफ्ट अशा कोणत्याही कंपूमध्ये त्यांना मज्जाव नव्हता. आणीबाणीच्या वेळेस अनेक नेते डॉक्टरांच्या घरी अतिथी म्हणून आले होते.
 
 
मोरारजी देसाई, अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांची घनिष्ठ मैत्री होती. त्यांच्या सोबतच्या दादूमियांनी सांगितलेल्या अनेक घटना या इतिहासाच्या प्रचलित जाणिवेला धक्का पोहोचवणार्‍या आहेत. त्या इतक्या अजब आहेत की, त्यांना कोणी कॉन्स्पिरसी थिअरी म्हणून फेटाळून लावू शकतो.
 
 
स्वातंत्र्यपूर्व इतिहासातल्या अशा अनेक घटना ते सांगायचे, की ज्या प्रथमत: सत्य आणि कपोलकल्पिताचे मिश्रण वाटायच्या; परंतु जसजसा माझा अभ्यास वाढत गेला तसतसे मला त्यांच्या म्हणण्याला आधारभूत ठरतील असे अस्सल पुरावे सापडत गेले.
 
 
मी एक प्रकारे त्यांचा मानसपुत्रच होतो. त्यांच्या पत्नी डॉ. वैजयंती नेने यांचासुद्धा मला खूप स्नेह लाभला. दादूमियांच्या ग्रंथालयातली कितीही, कोणतीही पुस्तके घेऊन जाण्याची मला परवानगी होती. ‘सावरकर आणि फाळणी’ विषयावर माझे पुस्तक झाले त्याचे श्रेय दादूमियांनासुद्धा जाते. पुस्तकांपेक्षाही त्यांनी दिलेली इतिहास अभ्यासण्याची दृष्टी ही अधिक मूल्यवान होती. ते म्हणायचे की, प्रत्येक व्यक्ती, विचारधारेला दोन बाजू असतात. इतिहास लेखनाविषयी बोलताना त्यांचा आवडता शब्द होता गुड, बॅड, अग्ली. ते म्हणत, ‘इतिहास हा महर्षी व्यासांसारखा लिहावा ज्यांनी पंडू, भीष्म आणि युधिष्ठिरांसारख्या नायकांच्याही उणिवा दाखवण्यात कमतरता केली नाही.’ दादूमियांनीही हा आदर्श पाळला.
 
 
त्यांनी वेळोवेळी लिहिलेली पुस्तके ही भारताच्या आत्तापर्यंतच्या इतिहासावरचे त्यांचे भाष्यच आहे. महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे चरित्र आणि ’हंड्रेड इअर्स ऑफ मुस्लीम अपीजमेंट: इफ सरदार वोस द फर्स्ट प्राइम मिनिस्टर’, स्वातंत्र्यानंतरच्या काळावर ’कॅन इंदिरा एक्सेप्ट धिस चॅलेंज?’, ’दलितस्तान झालंच पाहिजे’ आणि ’दलितांचे राजकारण’सारखी पुस्तके व आधुनिक शतकावर ’जेव्हा गुजरातला जाग येते’, ’मोदी एक झंझावात’ आणि ’धास्तावलेले मुसलमान’ ही पुस्तकं घटनांकडे वेगळ्या रीतीने पाहायचा दृष्टिकोन देतात.
 
 
दादूमियांनी इतिहासाचे अनेक नवे नियम (!) शोधले होते, ज्याला ते दादूमिया’स लॉ (Dadumiya's law) म्हणायचे. उदाहरणार्थ इस्लामिक इतिहासाचा कुठलाही कालखंड घ्या, कॉमन वर्ड आहे महंमद. मग तो महंमद घोरी असो की जिन्ना असो. हिंदू इतिहासाचा कॉमन वर्ड आहे अनफॉर्च्युनेट. उदाहरणार्थ आपण मध्ययुगीन युद्धाचे वर्णन वाचतो की, संध्याकाळपर्यंत आपण युद्ध जिंकत होतो; परंतु दुर्भाग्याने (अनफॉर्च्युनेटली) घात झाला आणि हिंदू हरले.
 
 
दादूमियां चिन्मय मिशनच्या स्वामी चिन्मयानंद यांच्या संपर्कात आले. चिन्मयानंद यांनी सांगितले, “ब्रिटिश दृष्टिकोनातून जग दाखवणारा एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका आहे तसा हिंदू दृष्टीने विश्वाकडे पाहणारा एखादा एन्सायक्लोपीडिया का नसावा? डॉक्टर आपणच हे काम हातात घेऊ शकता.” आणि मग जन्म झाला एन्सायक्लोपीडिया हिंदुस्थानिका प्रकल्पाचा. शेवटची पंचविसेक वर्षं तरी दादूमियांनी या कोशासाठी स्वतःला वाहून घेतले. एका प्रकारे ते या कोशात अडकून पडले. त्यामुळे त्यांच्या भेटीगाठी कमी नाही झाल्या; पण वृत्तपत्रीय/नियतकालिकांमधील लेखन कमी झाले आणि ते मोठ्या वाचकवर्गापासून दुरावले गेले. त्यांच्या परिश्रमाने हा कोश तयार झाला. पुढे प्रकाशित करण्याच्या गोष्टीही चालू होत्या; परंतु कोरोना काळाच्या जवळपास त्यांनी घर शिफ्ट केले, तेव्हा त्या डेटाचे बॅकअप कुठे गेले ते ’अनफॉर्च्युनेटली’ कुणाला माहीत नाही.
 
 
त्यांच्याकडचा पाचेक हजार दुर्मीळ ग्रंथांचा संग्रह पुणे येथील गोविंदगिरी स्वामींच्या संस्थेत हलविलेला असून अभ्यासकांसाठी तो उपलब्ध आहे. माझ्या माहितीप्रमाणे अजून त्याला ’दादूमियां दालन’ किंवा ’दादूमियां कलेक्शन’ असे नाव दिले गेलेले नाही; परंतु ज्या पुस्तकाच्या पानोपानी लाल-हिरव्या पेनांनी रेघा केलेल्या असतील आणि शेवटच्या पानांवर नोट्स असतील ते पुस्तक दादूमियांचे, हे ओळखणे अवघड नाही. आयुष्यातसुद्धा त्यांनी मजकुरातून मर्म शोधून त्याला नव्याने अर्थ दिला. याहून वेगळे त्यांनी काही केले नाही.
 
 
लेखक बडोदे येथील महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटीत इतिहासाचे अध्यापक आहेत.