जिंकलो हे स्वीकारू मग पराभवाचे चिंतन करू

विवेक मराठी    10-Jun-2024
Total Views |
@संतोष माळकर 9870549720

lok sabha election 2024
लोकसभा निवडणुकांचे निकाल पाहता बहुमत मिळाले असले तरी सत्ता स्थापन करण्यास जे संख्याबळ लागते, त्यात ते कमी पडले. खरं तर ही ताकद महायुतीत होती. तसं पाहिलं तर भाजपाची संघटना ही त्यांची ताकद आहे; पण पक्ष कॉर्पोरेट करताना ही संघटनाच खिळखिळी झाल्याचे चित्र होते. या वेळेस मोदींच्या एकखांबी तंबूने भाजपाला तारले आहे; परंतु संघटना म्हणून ते भाजपाचे यश नाही. संघटनात्मक पातळीवर पक्ष सदृढ असेल तरच पक्ष पुढे जाऊ शकतो, याचे चिंतन आवश्यक आहे.
 
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. भाजपा समर्थक हे सर्व निकाल लागल्यापासून काहीसेे निराश, नाराज झाले आहेत, त्रागा करत आहेत. त्यातून मग आपल्याच नेत्यांना नावे ठेवणे, अमक्याने अमके नाही केले, त्याने तसेच का केले, चाणक्य चुकले, असे अनेक काही कानावर पडू लागले आहे. ‘यशाला बाप हजार, पराभव पोरका’, असेच एकंदरीत सध्याचे स्वरूप आहे; पण मला पडलेला प्रश्न, की हे नेमके कशासाठी? भारतीय जनता पार्टीचा निवडणुकीत पराभव झाला आहे का? मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत का? पण नेमकी नाराजी आणि निराशा कशासाठी? भाजपा एनडीए आघाडी म्हणून सत्तेत येणार आहे. मोदी पुन्हा पंतप्रधान होणार आहेत. मग निराशा का? त्यातून होणारा त्रागा का? ही निराशा आणि हा त्रागा भाजपा आणि मोदीविरोधकांच्या हातचे हत्यार होऊ शकतो, याची कल्पना मोदीभक्तांना आहे का? आतापासूनच विरोधकांचा नॅरेटिव्ह सुरू झाला आहे. मोदी सत्तेतून जाणार, राहुल गांधी पंतप्रधान होणार, हे भाजपाविरोधक आणि त्यांचा समर्थक मीडिया बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत आहे. नापास झालेल्या मुलांची शाळा भरू लागली आहे. त्यांचे नेते शरद पवार आहेत. हे कशासाठी? तर पास झालेल्या मोदींना शाळेतून काढून टाकण्यासाठी. अशा वेळी भाजपा आणि मोदीभक्त हातावर हात ठेवून बसले तर विरोधकांना तेच हवे आहे. मोदी हरलेत, त्यांना पंतप्रधानपदी बसण्याचा नैतिक अधिकार नाही, हे विरोधक सातत्याने सांगत असताना निराशाग्रस्त मोदीभक्त आपल्या नैराश्यातून ते प्रतीत करू इच्छित आहेत का? नाही तर, प्रथम भाजपा आणि मोदी समर्थकांनी आपले नैराश्य झटकून कामाला लागले पाहिजे. हो, आम्ही पास झालोत, तुम्ही नापास आहात, हे ठणकावून सांगितले पाहिजे. हा आत्मविश्वास निर्माण झाला, की मग आपण कमी कुठे पडलो, काय चुका झाल्या, याचे योग्य विश्लेषण होऊ शकते. निराशा, त्रागा योग्य विश्लेषण करू देणार नाही, हे पहिले लक्षात घ्यायला हवे. आपण जिंकलोय हे लक्षात घेऊन आपण मागे का पडलो याचे विश्लेषण करणे गरजेचे आहे. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत भाजपा महाराष्ट्रात कुठे कमी पडला?
 
विदर्भ
 
विदर्भात दहा जागांपैकी दोन जागांवर भाजपाला समाधान मानावे लागले, तर शिंदेंच्या शिवसेनेला फक्त एक जागा मिळाली. विदर्भात काँग्रेसला सर्वाधिक म्हणजे पाच जागा मिळाल्या आहेत, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला एक आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक जागा मिळाली. 2019 च्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना युतीला नऊ जागांवर विजय मिळाला होता; पण 2024 च्या निवडणुकीत महायुतीला फक्त तीन जागांवर समाधान मानावे लागले. त्यातही भाजपाला फक्त दोनच जागा मिळाल्या. भाजपा आणि शिवसेना जेव्हा एकत्र लढली होती, तेव्हा म्हणजेच 2014 ला विदर्भातल्या दहाच्या दहा जागा जिंकल्या होत्या. या वेळी विदर्भातल्या दहा लोकसभा मतदारसंघांपैकी फक्त नागपूर आणि अकोला या दोन जागा भाजपाला मिळाल्या, तर बुलढाण्याची जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळाली. रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली चिमूर, भंडारा गोंदिया,
दलित आणि मुस्लीम ही काँग्रेसची पारंपरिक व्होट बँक आहे. या वेळी संविधान बचावचा मुद्दा इथल्या दलित मतदारांपर्यंत पोहोचविण्यात काँग्रेस यशस्वी ठरली.  
अमरावती या पाच जागांवर काँग्रेसने बाजी मारली, तर वर्ध्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी, तर यवतमाळ वाशिममध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला यश मिळाले आहे. विदर्भात बहुजनवादी राजकारण चालते. या वेळीही या बहुजनवादी राजकारणाचा काँग्रेसला फायदा झालेला दिसला. या निवडणुकीत दलित, मुस्लीम आणि कुणबी हे भाजपाच्या विरोधात गेले. विदर्भात दलित, मुस्लीम आणि कुणबी मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. दलित आणि मुस्लीम ही काँग्रेसची पारंपरिक व्होट बँक आहे. या वेळी संविधान बचावचा मुद्दा इथल्या दलित मतदारांपर्यंत पोहोचविण्यात काँग्रेस यशस्वी ठरली. विदर्भात सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत; पण मोदी सरकारच्या काळात या पिकांना भाव मिळाला नसल्याची शेतकर्‍यांची ओरड होती. तसेच या ऐन निवडणुकीच्या काळात सोयाबीन आणि कापसाचे भाव कमी झाले होते. त्यामुळे शेतकरी मोदी सरकारवर नाराज होते, त्याचा फायदा काँग्रेसने घेतला.
 
 
मराठवाडा
 
2019 च्या निवडणुकीत मराठवाडा भाजपाच्या बाजूने उभा राहिला होता. त्या वेळी भाजपा-सेना युती सात आणि एक संभाजीनगरची जागा एमआयएमला मिळाली होती. मात्र तोच मराठवाडा 2024 च्या निवडणुकीत फिरल्याचे दिसून आले. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बीडमध्ये पंकजा मुंडे या बजरंग सोनावणे यांच्याकडून पराभूत झाल्या. लातूर, नांदेड आणि जालना हे मतदारसंघ काँग्रेसने खेचून घेतले. छत्रपती संभाजीनगरचा अपवाद वगळता हिंगोली, परभणी आणि धाराशिव मतदारसंघांत उद्धव ठाकरे गटाने विजय मिळवला.
 मराठवाड्याला या वेळी महायुतीकडून गृहीत धरण्यात आले, ती खरं म्हणजे चूक ठरली.
महायुतीच्या पारड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिष्ठेची केलेली संभाजीनगरची जागा आली. येथून संदिपान भुमरे विजयी झाले. मराठवाड्यात महायुतीच्या पराभवाला मराठा आंदोलन कारणीभूत झाल्याचे सांगितले जाते; पण ते शंभर टक्के खरे नाही, असा माझा अभ्यास आहे. मराठवाड्याला या वेळी महायुतीकडून गृहीत धरण्यात आले, ती खरं म्हणजे चूक ठरली. मराठवाड्यातील कार्यकर्त्यांकडून वारंवार सांगितले जात होते की, ही निवडणूक तितकी सोपी नाही; पण महायुतीच्या नेतृत्वाला त्याची तोड मिळाली नाही. आंदोलनाचा फटका तसेच संघटनात्मक पातळीवर झालेली हेळसांड हे ओळखण्यास महायुतीचे नेतृत्व कमजोर ठरले, हे सत्य स्वीकारावेच लागेल.
 
 
जरांगेंच्या आंदोलनाला थोपवताना कुणबींना दुखावतोय हेही समजण्यात महायुतीचे नेतृत्व असमर्थ ठरले. त्यामुळे मराठवाडा गमवावा लागला.
 
 
उत्तर महाराष्ट्र
 
लोकसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रात महायुतीला मोठा धक्का बसला आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्यासह सहा विद्यमान खासदारांना पराभवाचा सामना करावा लागला. दिंडोरीत माजी केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्यासह नाशिकमधून हेमंत गोडसे, शिर्डीतून सदाशिव लोखंडे, अहमदनगरमधून सुजय विखे पाटील, धुळ्यातून सुभाष भामरे, नंदुरबारमधून हिना गावित या विद्यमान खासदारांना पराभवाचा सामना करावा लागला, तर रावेरमधून रक्षा खडसे या एकमेव विद्यमान खासदारांना मतदारांनी पुन्हा एकदा संधी दिली आहे. तसेच जळगावमध्ये भाजपाच्या स्मिता वाघ या विजयी झाल्या. महाविकास आघाडीकडून नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे, दिंडोरीतून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्कर भगरे, शिर्डीतून शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे, धुळ्यातून काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव, नंदुरबारमधून काँग्रेसचे गोवाल पाडवी, अहमदनगरमधून शरद पवार गटाचे नीलेश लंके विजयी झाले, तर रावेरमध्ये शरद पवार गटाचे श्रीराम पाटील आणि जळगावमधून ठाकरे गटाचे करण पवार पराभूत झाले. दलित आणि मुस्लीम मते, महायुतीकडून उमेदवारी जाहीर करण्यात झालेला विलंब, छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्याने महायुतीच्याच उमेदवारांना केलेला अपशकुन, कांदा प्रश्नामुळे नाराज झालेले शेतकरी, राहुल गांधींचे एक लाख रुपये वर्षाला खटाखट खटाखट देण्याचे आश्वासन, ही उत्तर महाराष्ट्रातील महायुतीच्या अपयशाची कारणे ठरली.
 
 
पश्चिम महाराष्ट्र
 
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, बारामती, मावळ, शिरूर, सातारा, हातकणंगले, कोल्हापूर, माढा, सांगली या नऊ मतदारसंघांपैकी महायुतीला चार मतदारसंघांत यश मिळाले. पुण्यातून भाजपाचे मुरलीधर मोहोळ, बारामतीतून शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे, मावळमधून महायुतीचे श्रीरंग बारणे, शिरुरमधून शरद पवार गटाचे अमोल कोल्हे, सातारातून भाजपाचे उदयनराजे भोसले, हातकणंगलेमधून भाजपाचे धैर्यशील माने, कोल्हापुरातून शरद पवार गटाचे शाहू महाराज, माढातून शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते-पाटील आणि सांगलीतून अपक्ष विशाल पाटील विजयी झाले. पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला; पण 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला या मतदारसंघांपैकी शिरूर, बारामती आणि सातारा हे तीनच मतदारसंघ राखता आले होते. या वेळी मात्र वेळीच त्यांनी मुसंडी मारली आहे. त्याचे कारण महाविकास आघाडीतील एकजूट हे सांगितले जाते. तसेच मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका येथे भाजपाला बसला हे मान्यच करावे लागेल.
 
 
कोकण
 
 
कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो; पण यंदाच्या निवडणुकीत कोकण महायुतीच्या बाजूने ठामपणे उभा राहिल्याचे दिसून येते. कोकणात ठाकरे गटाला एकही जागा मिळवता आलेली नाही. कोकणपट्ट्यात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पालघर आणि कल्याण मतदारसंघांत ठाकरे गटाला यश मिळालेले नाही. ठाणे मतदारसंघात शिंदे गटाचे नरेश म्हस्के विजयी झाले. त्यांनी ठाकरे गटाचे राजन विचारे यांचा पराभव केला. पालघरमध्ये महायुतीचे भाजपाचे उमेदवार डॉ. हेमंत सावरा मताधिक्याने विजयी ठरले आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनील तटकरे विजयी झाले आहेत. सुनील तटकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे अनंत गीते यांना हरवले. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्येदेखील ठाकरे गटाला अपयश आले आहे. तेथे भाजपा नेते आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे विजयी झाले. विजयाच्या दुष्काळात कोकणातील विजय महायुतीला निश्चितच सुखावणारा आहे.
 
 
मुंबई
 
जो राजकीय पक्ष मुंबई जिंकतो तोच महाराष्ट्र जिंकतो, असे म्हटले जाते. 2019 च्या निवडणुकीत मुंबईवर युतीचे निर्विवाद वर्चस्व होते आणि महाराष्ट्रही त्यांनीच जिंकला होता. मात्र 2024 च्या निवडणुकीत तेच वर्चस्व महाविकास आघाडीकडे गेले आणि महायुतीने महाराष्ट्र गमावला. दक्षिण मुंबईत उबाठा सेनेचे अरविंद सावंत विजयी झाले. त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेचा पराभव केला. दक्षिण-मध्य मुंबईत उबाठा सेनेचे उमेदवार अनिल देसाई विजयी झाले. त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांना हरवले. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांचा विजय झाला आहे. वर्षा गायकवाड यांनी भाजपा आणि महायुतीचे उमेदवार अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांचा पराभव केला आहे. ईशान्य मुंबई मतदारसंघात ठाकरे गट आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी विजय मिळवला आहे. संजय दिना पाटील यांनी भाजपा आणि महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांचा पराभव केला आहे. वायव्य मुंबईत ठाकरे गट आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर पराभूत झाले. अमोल कीर्तिकर यांना शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी 48 मतांनी हरवले. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून पीयूष गोयल विरुद्ध भूषण पाटील यांच्यात लढत झाली. यामध्ये पीयूष गोयल विजयी झाले. मुंबईत उबाठा सेनेला मिळालेले यश हे मुस्लिमांकडून झालेल्या एकगठ्ठा मतांचा परिणाम आहे, जे भाजपा आणि हिंदूंसाठी भयावह चित्र आहे. उदाहरण सांगतो, मिहिर कोटेचा हे चार विधानसभा मतदारसंघांत आघाडीवर होते. मात्र केवळ मानखुर्द या विधानसभा मतदारसंघाने या चार मतदारसंघांची आघाडी पुसून संजय पाटील यांना विजयी केले. उबाठा सेनेचा हिरवा विजय म्हणजे मुंबई असेच म्हणावे लागेल.
 
 
या निवडणुकीत एक प्रामुख्याने दिसले ते म्हणजे भाजपा हा संघटनात्मक पक्ष आहे. पक्षाची संघटना ही त्यांची ताकद आहे; पण पक्ष कॉर्पोरेट करताना ही संघटनाच खिळखिळी होत असेल तर मात्र पक्षनेतृत्वाने त्याचा गांभीर्याने विचार करायला हवा, असे मला वाटते. मोदींच्या एकखांबी तंबूने भाजपाला सध्या तरी तारले असले तरी संघटना म्हणून ते भाजपाचे यश नाही. हे यश अर्थातच मोदींचे आहे आणि लाखो-करोडो मोदीभक्तांचे आहे. ही भाजपाच्या दृष्टीने सध्या तरी जमेची बाजू आहे; पण त्यावर भविष्याचे इमले बांधले जाऊ शकत नाही. संघटनात्मक पातळीवर पक्ष सदृढ असेल तरच पक्ष पुढे जाऊ शकतो. भाजपाचे नेतृत्व त्याचा विचार नक्कीच करेल, अशी आशा आहे.