युरोपियन युनियन निवडणुका - राष्ट्रवादाचे नवे वारे

विवेक मराठी    15-Jun-2024   
Total Views |

European elections 2024
2024 च्या युरोपियन युनियनच्या निवडणुकांमुळे युरोपात राजकीय बदल घडून येतील. युरोपियन राष्ट्रवादाचे नवे वारे वाहतील. या निवडणुकांचे परिणाम भारत- युरोपमधील व्यापार, आंतरराष्ट्रीय संबंध आणि द्विपक्षीय सहकार्यावर होतील. युरोपियन युनियन हा भारताच्या सर्वात मोठ्या व्यापारी भागीदारांपैकी एक आहे. त्यामुळे नवीन राजकीय घडामोडी आणि युरोपियन युनियनची व्यापार धोरणे, आणि बाजार प्रवेशाचे नियमांचा भारत-युरोप आर्थिक संबंधांवर मोठा प्रभाव पडेल. राष्ट्रीय सार्वभौमत्वावर जोर देणारा ब्रदर्स ऑफ इटली हा राजकीय पक्ष आणि त्याचा युरोपियन युनियन मध्ये वाढलेला प्रभाव हा भारतासाठी अतिशय महत्त्वाचा आहे.
दर पाच वर्षांनी होणारी युरोपियन युनियनची निवडणूक, ही आंतरराष्ट्रीय राजकारणातील मोठी घडामोड आहे. युरोपियन संसदेची रचना आणि वाटचाल या निवडणुका निश्चित करतात. 2024 मधील युरोपियन युनियनच्या निवडणुकांचे निकाल येणार्‍या 5 वर्षांत युरोपात घडणार्‍या मोठ्या बदलाची नांदी आहेत.
 
 
युरोपियन युनियनच्या निवडणुका एका विशिष्ट कालावधीत सर्व सदस्य राज्यांमध्ये विशिष्ट दिवस ठरवून घेतल्या जातात. प्रत्येक सदस्य राज्य युरोपियन युनियनच्या निवडणुकांसाठी स्वतःची निवडणूक प्रणाली वापरतो. एखाद्या पक्षाने जिंकलेल्या जागांची संख्या त्याला मिळालेल्या मतांच्या संख्येच्या प्रमाणात असते. दोन मुख्य प्रकारच्या निवडणूक प्रणालींचा वापर या निवडणुकांदरम्यान होतो. बंद यादी प्रणाली: या प्रणालीमध्ये, मतदार वैयक्तिक उमेदवारांऐवजी पक्षाला मते देतात. पक्ष नंतर त्यांच्या पूर्वनिर्धारित यादी क्रमानुसार उमेदवारांना जागा वाटप करतात. ही प्रणाली स्पेन आणि युनायटेड किंगडम (ब्रेक्झिटपूर्वी) सह अनेक सदस्य देशांद्वारे वापरली जाते. दुसरी प्रणाली म्हणजे ओपन लिस्ट सिस्टम: ह्यात मतदारांना पक्षाच्या यादीतील वैयक्तिक उमेदवार निवडण्याची परवानगी असते. यात पक्षापेक्षा उमेदवाराकडे पाहून मतदान केले जाते. स्वीडन आणि फिनलंड सारखे देश ही प्रणाली वापरतात. युरोपियन युनियन निवडणुकांसाठी प्रचाराचा कालावधी हा राजकीय पक्षांसाठी त्यांचे विचार व्यक्त करण्याचा महत्त्वपूर्ण कालावधी असतो. विविध राजकीय पक्ष हे डावे, मध्यवर्ती आणि राष्ट्रवादी गटांपर्यंत युरोपियन युनियनच्या भविष्यासाठी त्यांच्या अजेंड्याची रूपरेषा देऊन मतांसाठी स्पर्धा करतात. मतदानाचा कालावधी संपल्यानंतर, मतांची मोजणी केली जाते आणि राष्ट्रीय आणि युरोपीय स्तरावर निकाल संकलित केले जातात. जागा वाटप प्रत्येक पक्षाला मिळालेल्या मतांच्या प्रमाणावर आधारित आहे. निवडणुकीचे निकाल निश्चित झाल्यानंतर, युरोपियन संसदेचे निवडून आलेले सदस्य (MEPs) सामान्यत: सामायिक विचारधारा आणि धोरणात्मक उद्दिष्टांवर आधारित राजकीय गटांसोबत युती करतात. हे राजकीय गट विधान प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, निर्णयांवर प्रभाव पाडतात आणि संसदेच्या धोरणात्मक कार्यक्रमाला आकार देतात.
 
 
विविध विचारधारांच्या 7 युत्या सध्या युरोपियन संसदेत आहेत. 2024 च्या युरोपियन संसदेत, युरोपियन युनियनच्या सदस्य राज्यांच्या किमान एक चतुर्थांश भागातून राजकीय गटांमध्ये किमान 23 सदस्य असणे आवश्यक आहे. संसदेतील सर्वात मोठे दोन गट म्हणजे मध्य-उजवे युरोपियन पीपल्स पार्टी (EPP)आणि मध्य-डावे सोशालिस्ट आणि डेमोक्रॅट्स (S&D). EPP ने 177 जागा मिळवल्या, तर S&Dला 144 जागा मिळाल्या. संपूर्ण युरोपमधील वैविध्यपूर्ण राजकीय गरजांचे नेतृत्व करून, युरोपियन युनियनची धोरणे आणि कायदे तयार करण्यात हे गट महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
 

European elections 2024 
  मेलोनी यांच्या ‘ब्रदर्स ऑफ इटली’ या राजकीय पक्षाचा युरोपियन युनियनमध्ये प्रभाव वाढला.
 नुकत्याच झालेल्या युरोपियन निवडणुकांमध्ये, इटलीच्या अति-उजव्या नेत्या, पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचा देशांतर्गत तसेच युरोपियन युनियनमध्ये राजकीय प्रभाव लक्षणीयरीत्या वाढल्याचे दिसून आले आहे. नुकत्याच समोर आलेल्या आकड्यांनुसार मेलोनी यांच्या ब्रदर्स ऑफ इटली या पार्टीने 2022 पेक्षा 2 टक्के मते जास्त मिळवली आहेत. जॉर्जिया मेलोनी यांच्या नेतृत्वाखाली ब्रदर्स ऑफ इटलीने एक मजबूत अति-उजवा राष्ट्रवादी पक्ष म्हणून युरोपियन राजकारणात आपले स्थान बळकट केले आहे. त्यांचा अजेंडा राष्ट्रीय सार्वभौमत्व जपणे, इमिग्रेशनला आळा घालणे आणि युरोपियन युनियनसमोर असणार्‍या आव्हानांना आळा घालणे आहे. मेलोनी यांचे नेतृत्व पारंपारिक कौटुंबिक मूल्ये, कायदा आणि सुव्यवस्थेविषयक कठोर भूमिका आणि इटालियन कामगारांना प्राधान्य देणारी आर्थिक धोरणे या मुद्यांवर आधारित आहे. युरोपिअन युनियन निवडणुकांमध्ये यांच्या पक्षाला मिळालेले लक्षणीय जनमत हे इटालियन मतदारांमध्ये वाढत्या राष्ट्रप्रेमाला अधोरिखित करणारे आहे.
 
 
अलीकडच्या युरोपियन निवडणुकांमध्ये जॉर्जिया मेलोनी यांच्या नेतृत्वाखालील इटलीचा अतिउजवा पक्ष ब्रदर्स ऑफ इटली हा एक महत्त्वपूर्ण युरोपियन शक्ती म्हणून उदयास आल्याचे दिसून येते आहे. युरोपियन संसदेत इटलीकडे 76 जागा आहेत आणि इटलीच्या ब्रदर्सने या जागांपैकी 24 जागा मिळवल्या आहेत. ब्रदर्स ऑफ इटलीचा अजेंडा राष्ट्रवाद, राष्ट्रीय सार्वभौमत्व आणि कडक इमिग्रेशन नियंत्रणांवर केंद्रित आहे. ब्रदर्स ऑफ इटली या पक्षाचा उदय युरोपियन युनियन मधील मध्यवर्ती आणि डावीकडे झुकलेल्या पक्षांचा पारंपरिक प्रभावाला मोठा आव्हान देणारा ठरणार आहे. कारण या पक्षामुळे युरोपियन युनियनच्या भविष्याची दिशा ठरणार आहे. सत्तेवर अतिउजवे बसणार की मध्यवर्ती विचारांची युती हे हा पक्ष कोणत्या गटासोबत गठबंधन करणार यावरून ठरणार आहे.
  
 
युरोपियन संसदेत ब्रदर्स ऑफ इटली ह्या पक्षाचे सदस्य युरोपियन राष्ट्रवादाला बळकट करण्याची शक्यता आहे. सदस्य राष्ट्रांवरील युरोपियन युनियनचा अधिकार कमी करण्यासाठी, सीमा सुरक्षा वाढविण्यासाठी आणि सामूहिक युरोपियन युनियनच्या निर्णयांपेक्षा राष्ट्रीय हितांना प्राधान्य देणार्‍या निर्णयांची बाजू घेतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. या भूमिकेमुळे विशेषत: इमिग्रेशन, आर्थिक नियम आणि राष्ट्रीय सार्वभौमत्व यासंबंधी महत्त्वपूर्ण वादविवाद येणार्‍या काळात युरोपियन संसदेत पाहायला मिळू शकतात. अतिउजव्या पक्षांची या निवडणुकांमधील दमदार कामगिरी संपूर्ण युरोपमध्ये उजव्या विचारसरणीच्या वाढत्या प्रवृत्तीचे संकेत आहेत. युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डर लेयन मध्य-उजव्या युरोपियन पीपल्स पार्टी ( EPP) च्या आहेत. युरोपियन युनियनची धोरणे तयार करण्यात आणि सदस्य राज्यांमध्ये निर्णयांची अंमलबजावणी करण्यात त्यांचे गठबंधन महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. लेयन यांचे नेतृत्व स्थिरता, आर्थिक वाढ आणि युरोपीय एकता वाढवण्यावर भर देते. तर मरीन ले पेन, फ्रान्सच्या अतिउजव्या नॅशनल रॅलीच्या नेत्या ह्या राष्ट्रवाद, कठोर इमिग्रेशन धोरणे आणि युरोपियन युनियनमध्ये मोठ्या राष्ट्रीय सार्वभौमत्वाचे समर्थन करतात. त्यांची भूमिका ही कमिशनद्वारे समर्थित युरोपियन युनियनच्या एकीकरण धोरणांच्या अगदी विरुद्ध आहे. पेन यांच्या पक्षाने देखील ह्यावेळी चांगली कामगिरी केल्याने मेलोनी यांच्या सोबत मिळून नॅशनल रॅली एक प्रभावशाली दबावगट बनवू शकते. आणि म्हणूनच इटलीच्या अत्यंत उजव्या ब्रदर्स ऑफ इटली पक्षाच्या नेत्या जॉर्जिया मेलोनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत किंगमेकर म्हणून उदयास आल्या आहेत. वॉन डर लेन आणि ले पेन यांचे पक्ष युरोपियन युनियनमध्ये आपला प्रभाव वाढवण्याच्या दृष्टीने मेलोनी यांच्या पाठिंब्यासाठी प्रयत्न करत आहेत. युरोपियन संसदेतील शक्तीचे संतुलन आणि युरोपियन युनियनच्या प्रशासन संरचनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मेलोनी यांचे समर्थन गरजेचे आहे.
 
 
2024 च्या युरोपियन युनियनच्या निवडणुकांमुळे युरोपात राजकीय बदल घडून येतील. युरोपियन राष्ट्रवादाचे नवे वारे वाहतील. या निवडणुकांचे परिणाम भारत- युरोपमधील व्यापार, आंतरराष्ट्रीय संबंध आणि द्विपक्षीय सहकार्यावर होतील. युरोपियन युनियन हा भारताच्या सर्वात मोठ्या व्यापारी भागीदारांपैकी एक आहे. त्यामुळे नवीन राजकीय घडामोडी आणि युरोपियन युनियनची व्यापार धोरणे, आणि बाजार प्रवेशाचे नियमांचा भारत-युरोप आर्थिक संबंधांवर मोठा प्रभाव पडेल. राष्ट्रीय सार्वभौमत्वावर जोर देणारा ब्रदर्स ऑफ इटली हा राजकीय पक्ष आणि त्याचा युरोपियन युनियनमध्ये वाढलेला प्रभाव हा भारतासाठी अतिशय महत्वाचा आहे. यामुळे, डिजिटल परिवर्तन, दहशतवादविरोधी धोरण आणि जागतिक आरोग्य उपक्रमांसह विविध आघाड्यांवर युरोपियन युनियन आणि भारत यांचे सहकार्य मजबूत होऊ शकते. इटलीच्या पंतप्रधान मेलोनी आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील राजकीय संबंधही या संदर्भात महत्वाची भूमिका बजावतात. मेलोनीसह युरोपियन नेत्यांशी असलेला मोदींचा संपर्क यामुळे 2014 नंतर आपले व्यापार, संरक्षण आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यासारख्या क्षेत्रात युरोपाशी सहकार्य वाढले आहे. भारत आणि प्रमुख युरोपियन देशांमधील चांगले राजकीय संबंध, युरोपातील राजकीय बदलांमुळे भारतावर होणारे प्रतिकूल परिणाम कमी करण्यास मदत करू शकतात आणि भारत युरोप यांचातील परस्पर सहकार्य आणि वाढीसाठी प्रेरक ठरू शकतात.

शांभवी थिटे

सध्या जेएनयू येथे आंतराष्ट्रीय संबंध या विषयात पीएचडी करत आहेत. मागील पाच वर्षांपासून आंतरराष्ट्रीय राजकारणावर अध्ययन करत असून मध्य आशिया हा संशोधनाचा विषय आहे. यापूर्वी आंतरराष्ट्रीय घडामोडी विश्लेषक म्हणून कॉर्पोरेटमध्ये अनुभव. आशियाई राजकारणा सोबतच इतिहास अभ्यासाची विशेष आवड.