एकल अभियानाचे उपक्रम - सामाजिक समरसतेचा केंद्रबिंदू!

विवेक मराठी    15-Jun-2024   
Total Views |
vivek
सामाजिक समरसता हा केंद्रबिंदू मानून एकल अभियानाचे प्रकल्प (एकल विद्यालय व सत्संग/संस्कार केंद्र) शृंखला घोटीसह नाशिक जिल्ह्यात विणलेली आहे. एकल अभियान भारतातील ग्रामीण आणि आदिवासी भागांत लोकांमध्ये साक्षरतेचं प्रमाण वाढावं, या उद्देशानं कुठलाही नफा-तोटा न पाहता राबविले जाते.
खडकेद पाड्यावरच्या स्थानिक वनवासी बंधू-भगिनींनी पारंपरिक पद्धतीने केलेल्या स्वागताने वनयात्रेकरू भारावून गेले. दुर्गम भागातील वनवासी बांधवांची लोकसंस्कृती अभ्यासण्याची, अनुभव घेण्याची संधी यानिमित्ताने वनयात्रेकरूंना मिळाली.
 
 
घोटीजवळ या दुर्गम भागातील वनवासींना साक्षर आणि शोषणमुक्त करण्याच्या उदात्त हेतूने एकल अभियानातर्फे सुरू असलेल्या कार्याची शहरवासीय देणगीदार सभासदांना व इतर समाजबांधवांना जवळून ओळख व्हावी, या उद्देशाने एकल श्रीहरी, मुलुंड उपसमिती (मुंबई) तर्फे दि. 2 जून रोजी एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक समरसता हा केंद्रबिंदू मानून एकल अभियानाचे प्रकल्प (एकल विद्यालय व सत्संग/संस्कार केंद्र) शृंखला घोटीसह नाशिक जिल्ह्यात विणलेली आहे.
 
 
घोटीजवळ शगुन रिसॉर्टमध्ये झालेल्या या उपक्रमाला संयोजक अनिल बालकृष्ण मानसिंहका (राष्ट्रीय महामंत्री, एकल श्रीहरी), राजेंद्र अग्रवाल (अध्यक्ष, मुलुंड उपसमिती, मुंबई चॅप्टर), आशीष कानोडिया (कार्याध्यक्ष, मुलुंड उपसमिती, मुंबई चॅप्टर), जागृती मानसिंहका (समूह सदस्य, राष्ट्रीय महिला समिती, एकल श्रीहरी) आदी मान्यवर व अनेक सदस्य, देणगीदार, हितचिंतक उपस्थित होते. एकल अभियानांतर्गत खडकेद येथे एकल विद्यालय अर्थात ग्राम शिक्षा मंदिर सुरू आहे. या एकल विद्यालयाद्वारे आदिवासी बांधवांच्या मुला-मुलींना साक्षरतेचे धडे गिरविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यालयाच्या आचार्य मीरा बबन खातेले यांनी वनयात्रेत आलेल्यांसाठी या एकल विद्यालयातील विद्यार्थ्यांचा विविध विषयांचा पाठ सादर केला. या वेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रश्नांची आत्मविश्वासाने उत्तरे दिली. स्वागतगीत, श्लोक, गाणी सादर केली. येथे आदिवासी चिमुकली सायंकाळी गावातील मंदिरात एकत्रित येतात. त्या ठिकाणी त्यांना महिला शिक्षिका प्रेरणादायी गोष्टी सांगतात, गाणे म्हणायला लावतात. अनेकदा नाचत, गात संस्कृतीपर माहितीदेखील देतात.
 
vivek 
 
चिमुकल्यांनी आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सकाळी जो काही अभ्यास केला त्या अभ्यासाची उजळणीदेखील करून घेतली जाते. विशेष म्हणजे भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मातील चालीरीतींची माहितीदेखील शिक्षक विद्यार्थ्यांना देतात. राष्ट्रभक्तीपर गाणी एकल विद्यालयात गायली जातात. गणितासारखा किचकट विषय अगदी हसतखेळत आणि गाणी म्हणत अनेक गावांतील शिक्षक अगदी आनंदात शिकवतात. सहा वर्षांवरील विद्यार्थ्यांना एकल शाळेत प्रवेश मिळतो. आदिवासी भागात गरीब विद्यार्थी कोठे शिकवणी लावू शकत नाहीत. या एकल विद्यालयाच्या माध्यमातून सायंकाळी दोन तास चालणार्‍या वर्गाद्वारे त्यांचा शाळेतील अभ्यासदेखील चांगल्या प्रकारे घेतला जातो, अशी माहिती नंतर झालेल्या चर्चेत ग्रामसमिती सदस्यांनी तसेच ग्रामस्थ स्त्री-पुरुषांनी दिली. एकल अभियान ही राष्ट्रनिर्माणात योगदानासाठी कटिबद्ध असून एकल विद्यालयाच्या माध्यमातून तेच काम केले जाते, अशी माहिती परिषदेचे अनिल मानसिंहका यांनी दिली.
 
 
ज्ञानमंदिराच्या माध्यमातून ग्रामविकास  
एकल विद्यालय सुरळीत चालावे यासाठी देणगीदार जी काही देणगी देतात त्यातून नेमके कसे काम सुरू आहे, याची पाहणी करण्यासाठी अधूनमधून वनयात्रेचे आयोजन करण्यात येते. संयोजक, पदाधिकारी, देणगीदार, सभासद, हितचिंतक पाड्यावरच्या एकल विद्यालयाला एकत्रित भेट देऊन योग्य पद्धतीने कारभार सुरू आहे किंवा नाही याची पाहाणी करतात. आवश्यक असतील त्या सूचना देऊन सुयोग्य बदल घडवून आणतात. त्याचेच दर्शन खडकेद पाड्यावर ज्ञानमंदिरात झाले. आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी असे अनेक उपक्रम ज्ञानमंदिराच्या माध्यमातून राबविले जातात, ग्रामविकास साधला जातो. आदिवासींना स्वाभिमानी, आत्मनिर्भर बनविण्यासाठी हरिकथा सांगितली जाते. रथ उत्सव योजना, बाल संस्कार केंद्र, सत्संग, गौ ग्राम, सूर-ताल, महिला सबलीकरण, कौशल्यविकास उपक्रम यांचे आयोजन करण्यात येते. या सार्‍यांचे मूल्यशिक्षण भारतीय सांस्कृतिक परंपरेचे जतन करून दिले जाते.”
 
 
देशभरात सध्या 90 हजार गावांमध्ये एकल विद्यालये सुरू असून, विशेषत: घोटी परिसरात 270 ठिकाणी अशी ज्ञानमंदिरे चालवली जातात. शिक्षण, आरोग्य, संस्कृती, जागरण व ग्रामविकास या पाच मुद्द्यांची मांडणी या विद्यालयांत आणि एकलच्या अन्य आयामांद्वारे केली जाते. राष्ट्रउभारणीसाठी योगदान देऊ शकेल, असा नागरिक घडवणे हे एकल अभियानाचे उद्दिष्ट आहे. आदिवासी पाड्यावरील चिमुकल्यांना संस्कृती, धर्म शिकवण्यासोबतच मोठ्यांचा आदर राखणं, त्यांच्यासोबत कसं बोलावं यासंदर्भात विनम्रतेचे धडेदेखील दिले जातात. धार्मिक आणि सामाजिक जागृती, आरोग्यसंदर्भात जनजागृती, ग्रामविकासाचं महत्त्व, प्राथमिक शिक्षण अशा महत्त्वाच्या विषयांवरदेखील चिमुकल्यांना संस्काराचे धडे देणारे आचार्य व सेवाव्रती कार्यकर्ते ’एकल विद्यालय’ अभियानांतर्गत काम करतात.
 
vivek
 
एकल अभियान भारतातील ग्रामीण आणि आदिवासी भागांत लोकांमध्ये साक्षरतेचं प्रमाण वाढावं, या उद्देशानं कुठलाही नफा-तोटा न पाहता राबविले जाते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय सरसंघचालक पू. बाळासाहेब देवरस यांचे बंधू भाऊराव देवरस यांनी गावागावांत झाडाखाली भरणार्‍या गुरूकुल पद्धतीच्या शाखा सुरु करण्याचे स्वप्न पाहिले आणि एकल विद्यालयाची संकल्पना मांडली. या संकल्पनेअंतर्गत देशातील ग्रामीण आणि आदिवासी भागामध्ये शैक्षणिक आणि सांस्कृतिक चळवळ राबवणं हा मुख्य उद्देश होता. 1986 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक श्याम गुप्त यांच्या माध्यमातून ही चळवळ पुढे देशभरात मोठी झाली. आज एकल अभियानांतर्गत आदिवासी बालकांमध्ये आणि एकूणच आदिवासी संस्कृतीमध्ये बराच बदल जाणवताना दिसतो. दुर्गम, जंगल परिसरात वसलेल्या पाड्यांमध्ये एकल विद्यालय म्हणजे एकशिक्षकी शाळा आहेत.
 
 
हे शिक्षक प्रामुख्याने ज्या गावात एकल विद्यालय आहे, त्याच गावातील मूळ रहिवासी आहेत. या शिक्षकांना वेळोवेळी प्रशिक्षण दिलं जातं. 30 शाळांवर एक संचप्रमुख नेमण्यात येतो. हा संचप्रमुख महिन्यातून काही दिवस प्रवास करून प्रत्येक शाळेला भेट देऊन शाळेत सुरू असलेल्या कामाची पाहणी करतो. या संचप्रमुखावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक समिती कार्यरत असते. हे एकल विद्यालय चालवण्यासाठी लागणारा खर्च हा वनबंधू परिषदेच्या वतीनं समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून देणगी स्वरूपात आलेल्या निधीद्वारे केला जातो. सर्व शिक्षक आपल्या गावात सुसंस्कृत नवी पिढी घडविण्यावर भर देतात. एकल विद्यालयांसाठी वनबंधू परिषदेच्या वतीने अनेक देणगीदार पैसे देतात. काही देणगीदारांनी वैयक्तिक स्वरूपात काही शाळा दत्तक घेतल्या आहेत, तर कुठे पाच ते दहा जणांनी एकत्रित येऊन काही शाळांची जबाबदारी स्वीकारली आहे. अतिशय सुसंघटित पद्धतीने हे कार्य देशभर सातत्याने सुरू आहे. त्याची ओळख घोटी येथे सुरू असलेल्या उपक्रमातून झाली.
 
लेखक वरिष्ठ पत्रकार व आदिवासी कलासंस्कृती अभ्यासक, नाशिक येथील आहेत.
 

संजय दामोदर देवधर

  • ज्येष्ठ पत्रकार, आणि आदिवासी वारली चित्रशैली अभ्यासक.

  • नाशिक येथे दैनिक गावकरीमध्ये 34 वर्षे कलाविभाग प्रमुख, वार्ताहर, कलासमीक्षक व उपसंपादक पदावर काम करून निवृत्त. सध्या फ्रिलान्स पत्रकारिता सुरु.

  • शैक्षणिक अर्हता - जी.डी.आर्ट ( ऍप्लाईड ) 1982 साली जे जे स्कुल ऑफ आर्ट येथून अव्वल श्रेणीत उत्तीर्ण.

  • अनेक सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक संस्थांशी निकटचे संबंध व पदाधिकारी म्हणून कार्य. विविध स्पर्धांच्या परीक्षणाचा अनुभव.

  • संशोधनपर कार्य- आदिवासी वारली चित्रशैलीविषयी विशेष संशोधन. कार्यशाळांचे आयोजन करुन अनेकांना वारली कला शिकविण्याचा उपक्रम सुरु. आत्तापर्यंत ५ ते ७५ वयोगटातील हजारो कलाप्रेमींना वारली चित्रकलेचे मार्गदर्शन. परदेशी पर्यटक देखील येऊन वारली कलेचे धडे गिरवतात.

  • वारली चित्रकलेच्या प्रसार व प्रचारासाठी वारली चित्रसृष्टी हे पुस्तक लिहून प्रकाशित केले. त्याच्या चार आवृत्त्या लोकप्रिय झाल्या आहेत. Warli Art World या इंग्लिश पुस्तकाच्या दोन आवृत्ती परदेशातही पोहोचल्या आहेत. रसिक वाचकांचा या पुस्तकांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो.

  • चित्रसहल या आगळ्यावेगळ्या उपक्रमात आदिवासी पाड्यांवर शहरी कलाप्रेमींना नेऊन वारली जीवनशैली, त्यांची कला यांचे सुरेख दर्शन घडवले जाते. आतापर्यंत अनेकजण सहकुटुंब सहलीत सहभागी झाले.

  • विश्वविक्रम - ऑगस्ट 2018 मध्ये 1100 पेक्षा अधिक स्पर्धकांची ऑन द स्पॉट वारली चित्रस्पर्धा घेतली व दोन विश्वविक्रम प्रस्थापित केले. सर्वाधिक सहभागाबद्दल जिनियस वर्ल्ड रेकॉर्ड तर चित्रांद्वारे सामाजिक संदेश दिल्याने वंडरबुक वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आले.

  • पत्रकारितेत विविध प्रकारचे पुरस्कार मिळाले आहेत. राज्य सरकारने सन 2019 मध्ये वारली कलेतील योगदानाबद्दल राज्यस्तरीय आदिवासी सेवक पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले.