‘परममित्र’ माधव

विवेक मराठी    22-Jun-2024
Total Views |
संघ संस्काराचे बीज व्रतासारखे जोपासलेले माधव जोशी यांनी आर्थिक कमाईसाठी जी माध्यमे निवडली ती ही राष्ट्रीय वृत्तीच्या जोपासनेला आणि राष्ट्रहिताच्या कार्यविस्ताराला पूरक ठरावी अशी. मुळातच नोकरी करावी ही मानसिकता नसल्यामुळे त्याने ’आपला परममित्र’ नावाचे द्वैमासिक सुरू केले आणि त्यातूनच पुढे ’परममित्र पब्लिकेशन्स’ ही प्रकाशन संस्था सुरू केली. परममित्र पब्लिकेशन्सलाही आता 25 वर्षे पूर्ण होत आली आहेत. ’पॉप्युलिस्ट आणि पेइंग’ पुस्तक प्रकाशनाच्या दिशेने न वळण्याचा कटाक्ष माधवने बाळगला. राष्ट्रीय-सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या वैचारिक विषयांना प्राधान्य देणार्‍या पुस्तकांचे व ग्रंथांचे प्रकाशन-प्रसारण करण्याचा निश्चय त्याने केला आणि सातत्याने निभावलाही.
 
madhav joshi
 
अरुण करमरकर
9321259949
 
परममित्र माधवच्या अकाली अघटित मृत्यूच्या बातमीचा हादरा सुन्न करून गेला. आयसीयूच्या दाराशीच त्याविषयी डॉक्टरांनी केलेल्या अधिकृत निवेदनाची वार्ता घेऊन आलेली मुदिता (माधवची कन्या) भेटली आणि डोळ्यासमोर घनघोर अंधारात उमटणारी भेसूर प्रश्नचिन्हे विद्रूप नृत्य करू लागली. केवळ पाच-सहा दिवसांपूर्वीच अर्धवट उघडलेले डोळे, अर्धसावध अवस्था आणि कळेल न कळेल असे जाणवलेले मूक स्मित या रूपात झालेले माधवचे दर्शन आता शेवटचे समजायचे..? अगदी कायमचे? जसजसा या प्रश्नांच्या भोवंडातून सावरू लागलो, तसतसा मनात आठवणींचा कल्लोळ उमटला, दाटून आला. त्याच्या घर-कम-ऑफिसच्या खोलीत एका कोपर्‍यात मांडलेल्या टेबलासमोर बसून केलेल्या प्रदीर्घ चर्चा, गप्पा आठवू लागल्या. आता त्या टेबलामागील ती त्याची खुर्ची ही रिकामी राहणार आणि चर्चेत त्याने केलेल्या मार्मिक टिप्पणीही कानावर पडणार नाहीत..त्या करतानाची त्याची मिश्किल मुद्रा, प्रसंगी आवेशाने व्यक्त होणारा आविर्भाव हे तर आता अदृश्यच झाले. ओळख अगदी लहान प्राथमिक शालेय वयापासूनची असली, तरी आमचे सख्य घनिष्ठ झाले ते 1980 च्या दशकाच्या प्रारंभिक काळापासून. 1980 ते 1983 अशी अडीच-तीन वर्षे मुंबईत विद्यार्थी परिषदेच्या कामात आम्ही एकत्र होतो. परिषदेच्या आणि कार्यकर्त्यांच्या जडणघडणीच्या दृष्टीने तो अत्यंत महत्त्वाचा काळ होता. एकूणच समाजजीवन, सार्वजनिक वातावरण, सामाजिक काम, त्यातील तरुण पिढीची भूमिका इत्यादी गोष्टींची जाण आम्हा कार्यकर्त्यांच्या मनात उमलत होती आणि रुजतही होती. माधव यावेळी नुकतीच एमएची पदवी प्राप्त करून प्रथम विस्तारक आणि नंतर पूर्णवेळ कार्यकर्ता या नात्याने सक्रिय होता. संघटन मंत्री म्हणून क्रमश: पूर्व मुंबई (मुलुंड ते शीव उपनगरे), दादर विभाग (बांद्रा ते परळ हा भाग) आणि मध्य मुंबई (करी रोड, भायखळा, कॉटन ग्रीन, वडाळा, काळाचौकी इत्यादी प्रामुख्याने कामगार वस्तीचा भाग) या क्षेत्रामध्ये पूर्णवेळ कामात राहिला. महाविद्यालयात, वस्त्यांमध्ये कॉलेज विद्यार्थी वर्गाशी संपर्क, त्यांना परिषदेच्या कामाशी जोडून घेणे, आपल्या कार्यक्षेत्राची संघटनात्मक रचना सिद्ध करणे, विविध कार्यक्रम उपक्रम यांची आखणी करून समाजसेवेचे काम करण्यात आणि विशिष्ट ध्येयवादाचा अंगीकार करण्यात तन्मय होण्याचे आवाहन विद्यार्थी वर्गाला करणे असे संघटनमंत्र्याच्या कामाचे सर्वसाधारण स्वरूप. ते आपल्या कार्यक्षेत्रात सिद्ध करताना मित्र माधवने अंगीकारलेली दृष्टी आपल्या मनाशी आखलेली उद्दिष्टे, प्राधान्यक्रम यांचा प्रत्यय त्याच्या कामातून व्यक्त होत राहिला. भटवाडी तसेच रेल्वे स्थानकालगतची झोपडपट्टी (घाटकोपर), गोवंडी, मानखुर्द, धारावी, काळा किल्ला, वरळी बीडीडी चाळी, काळाचौकी, अभ्युदय नगर अशा वैशिष्ट्यपूर्ण वस्त्यांमध्ये जाणता संपर्क उभा करून तेथील अनेक तरुणांना परिषदेत सहभागी करून घेण्याकडे त्याचा कटाक्ष राहिला. विशुद्ध राष्ट्रीय दृष्टीकोनातून परिषदेतर्फे समाजकारणाचा घेतला जाणारा वेध, दृष्टीकोन आणि कार्यक्रम समाजाच्या सर्व स्तरातील तरुणांपर्यंत यथार्थ स्वरूपात पोहोचविणे, आणि त्यांना या कामात सहभागी करून घेणे यासाठी सर्वस्पर्शी संपर्काचा आटापिटा करण्याचा आग्रह प्राध्यापक यशवंतराव केळकरांसारखे धुरीण सातत्याने प्रतिपादन करीत असत. त्याविषयीची सूक्ष्म जाण बाळगून आपल्या प्रयत्नांद्वारे हे प्रत्यक्षात उतरविण्याचा मनोमय प्रयत्न माधवने कसा केला, याचा प्रत्यय त्याच्या संपर्कातून परिषदेत आलेल्या आणि रुळलेल्या अनेक तरुण विद्यार्थ्यांच्या यादीतून प्रत्यक्ष घेण्यासारखा आहे. त्या काळात मुंबईच्या औद्योगिक विश्वात - विशेषतः गिरणी कामगारांच्या संपामुळे वातावरण प्रक्षुब्ध होते. अनेक कामगारांची कुटुंबे आर्थिक दुरवस्थेच्या खाईत भेलकांडू लागली होती. अशा कुटुंबातील विद्यार्थी वर्गाला दिलासा देणे, त्यांच्या शिक्षणाचा मार्ग अडखळू नये यासाठी यथाशक्ती प्रयत्न करणे, दिवाळीसारख्या सणावाराच्या दिवसात आवर्जून त्यांच्या घरी जाऊन, आत्मीयतेने विचारपूस करणे अशा कामात आम्ही सर्वच कार्यकर्ते सहभागी होतो. माधव अर्थातच त्यात अग्रेसर होता. या काळात समाजस्थितीचे प्रत्यक्ष दर्शन आणि वरिष्ठ कार्यकर्त्यांकडून होणारे मार्गदर्शन यांच्या परिणामामधून अंत:करणात खोलवर रुजलेली सामाजिक कृतज्ञतेची आणि उत्तरदायित्वाची भावना आम्हाला आयुष्यभर खुणावत राहिली आहे. माधवने पुढच्या काळात आपल्या व्यक्तिगत जीवनाचे अग्रक्रम निश्चित करताना ही जाण सदैव जोपासली.
madhav joshi 
 
मुंबईनंतर काही काळ त्याने गुजरातमध्ये राजकोट येथे विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ काम केले. ते थांबवून घरी परतल्यानंतर व्यक्तिगत जीवनाची मांडणी करणे अत्यावश्यक होते. वय तिशीच्या जवळ आले होते. तत्त्वज्ञान विद्यापीठात आचार्य असलेले वडील निवृत्त झाले होते. अनुषंगाने तिथून स्थलांतरित होणे आणि ठाण्यात निवासाची नवी सोय उभी करणे आवश्यक होते. स्वाभाविकपणेच चरितार्थासाठी काहीतरी ’वेगळे’ करण्याची इच्छा काही काळासाठी मनातच दाबून नोकरीचा खटाटोप करण्याचे त्यानी ठरवले.
 
 
नोकरीचा प्रयत्न सुरू करतानाही त्याने धडपड केली ती पूर्वोत्तर भारताच्या क्षेत्रात नोकरी मिळावी यासाठी. 1983 च्या ऑक्टोबरमध्ये बांगलादेशी घुसखोरीविरुद्ध देशभरातील विद्यार्थ्यांना संघटित करून परिषदेने गुवाहाटी येथे जो सत्याग्रह केला, त्यात माधव सहभागी झाला होता. तेव्हापासूनच ईशान्य भारताच्या सात प्रदेशांमधील वातावरण, निसर्ग, इतिहास, तेथे विघटनकारी शक्ती-प्रवृत्तीच्या समस्या यांच्याविषयी त्याच्या मनात विशेष आकर्षण आणि आस्था निर्माण झाली होती. आर्थिक कमाईसाठी जे माध्यम निवडायचे तेही राष्ट्रीय वृत्तीच्या जोपासनेला आणि राष्ट्रहिताच्या कार्यविस्ताराला पूरक ठरावे ही भूमिका अंगिकारून त्यांने विनय सिमेंट्स या शिलाँग (मेघालय) येथील कंपनीत व्यवस्थापकीय विभागात नोकरी पत्करली. मात्र आई-वडिलांचे वार्धक्य, आजारपण यांचा विचार करून तिथून त्याला काही काळाने परत यावे लागले. त्यानंतर तरुण भारत असोसिएट्समधील मुंबई तरुण भारतमध्ये त्याने काही काळ काम केले. परंतु मुळातच नोकरीत रमावे अशी त्याची मानसिकता नव्हतीच. त्यामुळे त्याने ’आपला परममित्र’ नावाचे द्वैमासिक सुरू केले आणि त्यातूनच पुढे ’परममित्र पब्लिकेशन्स’ ही प्रकाशन संस्था सुरू केली. परममित्र पब्लिकेशन्सलाही आता 25 वर्षे पूर्ण होत आली आहेत. या काळात परममित्रने जाणीवपूर्वक अंगिकारलेला वैशिष्ट्यपूर्ण दृष्टीकोन ध्यानात घेण्यासारखा आहे. ’पॉप्युलिस्ट आणि पेइंग’ पुस्तक प्रकाशनाच्या दिशेने न वळण्याचा कटाक्ष माधवने बाळगला. राष्ट्रीय-सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या वैचारिक विषयांना प्राधान्य देणार्‍या पुस्तकांचे ग्रंथांचे प्रकाशन-प्रसारण करण्याचा निश्चय त्याने केला आणि सातत्याने निभावलाही. परममित्रच्या त्या विशेष वाटचालीचा इतिहास हा स्वतंत्रपणे दखल घेण्याजोगा विषय आहे. येथे त्याची काही प्रातिनिधिक उदाहरणे नमूद करण्यासारखी आहेत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दलितेतर कवींनी वाहिलेली काव्यमय भावांजली संकलित करणारे ’प्रिय भीमास’ हे पुस्तक, कविवर्य नामदेव ढसाळ यांच्या ’सारे काही समष्टीसाठी’ या लेखांचा संग्रह, ज्येष्ठ इतिहासकार गजानन भास्कर मेहेंदळे यांनी सखोल अभ्यासातून साकार केलेले शिवचरित्र (Shivaji - His Life and Times), अमेरिका-रशिया-ब्रिटन- इस्रायल आदी देशांच्या गुप्तहेर यंत्रणांचे अभ्यासपूर्ण विवेचन करणार्‍या पुस्तकांची मालिका, लोकमान्य टिळक: आठवणी आणि आख्यायिका या त्रिखंडात्मक ग्रंथांची पुन:निर्मिती, जगद्गुरु संत तुकाराम (दोन खंड), अहिल्यादेवी होळकर चरित्र, वारी.... परममित्रने जपलेल्या, जोपासलेल्या वैचारिक दर्जाच्या संदर्भात ही यादी पुरेशी बोलकी ठरावी. The Myth of Hindu terror या स्फोटक पुस्तकाचा मराठी अनुवाद (हिंदू दहशतवाद नावाचे थोतांड) प्रसिद्ध करण्याचा निर्णय काहीसा धाडसाचाच होता. तसेच Water या शेठ सीगल या ज्यू लेखकाने लिहिलेल्या पुस्तकाचा मराठी अनुवाद (जल इस्रायल) प्रकाशित करण्याचा निर्णयही आर्थिकदृष्ट्या अजिबात आकर्षक नव्हता. ही दोन्ही कामे त्याने माझ्याकडून आग्रहाने करून घेतली. प्रकाशन क्षेत्रात परममित्रने दीर्घकाळ निभावलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण भूमिकेची दखल साहित्यिक वैचारिक आणि सामाजिक वर्तुळातील मान्यवर संस्थांच्याकडून घेतली गेली नसती तरच नवल. अनेक मानाचे पुरस्कार परममित्र पब्लिकेशन्सने संपादित केले, अगदी अलीकडे ठाण्याच्या रोटरी क्लब इलेक्ट्रिसिटीच्या मानाच्या पुरस्काराने माधव जोशी यांना गौरविण्यात आले. कौटुंबिक स्तरावर काहीशी स्थिरता हळूहळू प्राप्त होऊ लागली होती. दोन्ही मुले हुशार आहेत. कन्या मुदिता डाटा सायन्स सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कर्तबगारी गाजवू लागली आहे. मुलगा भास्वानही पदवी शिक्षण पूर्ण करून व्यावसायिक क्षेत्रात उमेदवारी करू लागला आहे. मात्र स्थैर्य, समाधान आणि सार्थकता याचे सान्निध्य पूर्णपणे अनुभवण्याआधीच नियती दबा धरून बसल्यासारखी पुढे सरसावली. साध्या वाटणार्‍या व्याधीने उचल खाल्ली आणि प्रकृती इतकी वेगाने घसरत गेली की कुणाच्या ध्यानीमनी नसताना थेट ’व्हेंटिलेटर’पर्यंत पोचली. तिथेही फार काळ न टिकता काही तासातच श्वास थंडावला. अवघ्या पाचसहा दिवसांचा रुग्णालय निवास..अन खेळ संपला..! अजूनही विश्वास बसणे अनेकांना शक्य होत नाहीये.. जाण्याआधी रा.स्व.संघाची शताब्दी, पूर्वोत्तर भारताच्या इतिहासातील काही अभिमानास्पद विषय प्रकाशनरूपात हाताळण्याचे सूतोवाच माधवने केले होते. आणखी काय काय आपल्या अंतरंगाच्या कुपीत साठवून तो निवृत्त झाला हे गूढच आहे. मात्र ज्या उत्कट वृत्तीने आणि विशिष्ट दिशेने त्याने वाटचाल केली त्याच प्रकारच्या कामानेच त्याला उचित श्रद्धांजली वाहता येईल..!