कर्णम मल्लेश्वरी

विवेक मराठी    24-Jun-2024   
Total Views |
ऑलिम्पिक पदकविजेती पहिली भारतीय महिला खेळाडू
(1 जून 1975)
अर्जुन पुरस्कार, राजीव गांधी खेल रत्न आणि पद्मश्री या नागरी बहुमानानं कर्णम मल्लेश्वरीलागौरवण्यात आलं. ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्य पदक मिळालं ते या तीनही सर्वोच्च सन्मानानंतरच. एकूण 240 किलो वजन उचलल्यामुळे मल्लेश्वरी भारतासाठी भारोत्तोलन स्पर्धेत कांस्य पदक मिळवणारी पहिली महिला ठरली. तिच्या या पोलादी शरीरयष्टीचं कौतुक झालं आणि तिला आंध्र प्रदेशाची ‘आयर्न गर्ल‘ म्हणून गौरवण्यात आलं.
 
Karnam Malleswari
 
व्यक्तीचं खरं नाव बाजूला राहतं आणि प्रचलित नावानं व्यक्ती ओळखली जाते. असं अनेकदा आणि अनेकांच्या बाबतीत घडतं. ते चित्रपटसृष्टीत तर घडतंच घडतं; परंतु अनेकदा ते राजकीय, सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रातही घडतं. क्रीडा क्षेत्र मात्र याला अपवाद असावं; पण ऑलिम्पिक पदकविजेती मल्लेश्वरी हिच्या नावाबाबतीत मात्र हा अपवाद बाजूला पडलेला दिसतो. तिचं मूळ नाव कर्णम मल्लेश्वरी; पण माध्यमांनी, क्रीडा समालोचकांनी आणि वृत्तनिवेदकांनी तिचं नाव उच्चारताना कर्णमचं करनाम मल्लेश्वरी करून टाकलं आणि तेच तिचं अपभ्रष्ट नाव व्यवहारात रूढ झालं.
 
 
कर्णम मूळची आंध्र प्रदेशातली, श्रीकाकुलमची. श्रीकाकुलम हे जिल्ह्याचं स्थान असलं तरी गाव छोटंच. 2011च्या जनगणनेनुसार श्रीकाकुलमची लोकसंख्या अवघी दीड लाख; पण गावची नगर परिषद स्थापन झाली ती 1856 साली. रामदास हे तिच्या वडिलांचं नाव. ते रेल्वे संरक्षण दलात हवालदार होते. चार बहिणींमधील कर्णम ही दुसरी. तिचा जन्म 1 जून 1975चा. तिचं लहानपण तसं गरिबीतच गेलं. हवालदाराच्या पगारात सहा जणांचं कुटुंब चालणं तसं अवघडच होतं, त्यामुळे मुलींना उदरनिर्वाहासाठी आई-वडिलांना मदत करावी लागे. तो काळ कोळशावर चालणार्‍या रेल्वेगाड्यांचा होता. गाडी गेली की इंजिनातून बाहेर फेकला गेलेला कोळसा वेचण्यासाठी मुलं रेल्वे रुळांवर फिरत. गोळा केलेला कोळसा मग आई-वडील बाजारात विकत आणि चार पैसे मिळवत. कर्णमला आणि तिच्या बहिणींनाही असा कोळसा वेचावा लागला; पण तसं असलं तरी चारही बहिणींनी आपल्या आवडीनिवडी जपल्या. चौघी बहिणींना खेळाची आवड होती. आईनेच त्यांना व्यायामशाळेत जाण्याची प्रेरणा दिली. वयाच्या 12 व्या वर्षापासूनच मोठी बहीण नरसम्मा हिच्याबरोबर कर्णमही व्यायामशाळेत जात असे. कृष्णाकुमारी ही तिची आणखी एक बहीण. तीही आज राष्ट्रीय स्तरावरची भारोत्तोलक आहे.
 
 
नीलमशेट्टी अप्पन्ना यांचं मार्गदर्शन कर्णमला प्रारंभिक वर्षात लाभलं; पण बहिणीचं लग्न झालं, ती दिल्लीत स्थायिक झाली आणि तिच्याबरोबर मल्लेश्वरीही दिल्लीला गेली. त्यानंतरच्या काळात अर्जुन पुरस्कार विजेता राष्ट्रीय कोच श्यामलाल सालवान यांनी कर्णममधील गुणवत्ता सर्वप्रथम हेरली. ही घटना 1990ची. कर्णम आपल्या बहिणीबरोबर बंगलोर कॅम्पला गेली होती. श्यामलाल यांनी तिला वेटलिफ्टिंगमध्ये करीअर करण्यास सुचवलं. तो क्षण होता तिच्या मनात वेटलिफ्टिंग हेच आयुष्यभराचं ध्येय निवडण्याची ठिणगी पडण्याचा.
 
 
अवघ्या 14व्या वर्षी ती भारोत्तोलनाच्या क्षेत्रात आली आणि वर्षभरातच ती राष्ट्रीय संघात आली. 54 किलो वजनी गटाच्या ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेपासून तिचा स्पर्धांच्या जगात प्रवेश झाला आणि 1992 साली थायलंडमध्ये भरलेल्या आशियाई स्पर्धेत तिने तीन रजत पदकं प्राप्त केली. त्यानंतर 1994 साली तुर्कीमध्ये झालेल्या वैश्विक भारोत्तोलन स्पर्धेत तिनं भाग घेतला आणि इतिहास रचला. तिनं तिथेही तीन पदकं प्राप्त केली- दोन सुवर्ण आणि एक कांस्य. त्यानंतरची स्पर्धा 1995ची कोरियात भरलेली. त्या आशियाई स्पर्धेत 54 किलो वजनी गटात 113 किलो वजन उचलून तिनं तीन सुवर्णपदकं जिंकली. 1994, 1995, 1996 अशी सलग तीन वर्षं मल्लेश्वरीनं जगज्जेतेपद पटकावलं. वर्षभराच्या ब्रेकनंतर 1998मध्ये बँकॉक येथे भरलेल्या आशियाई स्पर्धेत तिला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. 1999 ची अथेन्स जागतिक स्पर्धा तर तिला पदकाविना घालवावी लागली. तिचं खरं यश हे सिडनीमधलं. तिथल्या पदकांबरोबर ती यशाच्या शिड्या चढतच गेली.
 
 
सप्टेंबर 2000 साली सिडनी येथे भरलेल्या ऑलिम्पिक स्पर्धांसाठी कुंजाराणीला वगळून मल्लेश्वरीची निवड करण्यात आली तेव्हा त्यावर सडकून टीका झाली. सरकारी पैशाने पर्यटन करायला पाठवण्यात येते आहे, असा सूर टीकाकारांनी लावला. प्रत्यक्षात 19 सप्टेंबरला 69 किलो वजनी गटात भारोत्तोलनासाठी मल्लेश्वरीने भाग घेतला तेव्हा तर ही काय दिवे लावणार, असाच निरीक्षकांचा आणि भारतीय पत्रकारांचा सूर होता; पण प्रत्यक्षात स्पर्धा झाली. मल्लेश्वरीने स्नॅच प्रकारात 110 किलो वर्गात आणि क्लीन अँड जर्क प्रकारात 130 किलो वजन उचललं. अशा प्रकारे एकूण 240 किलो वजन उचलल्यामुळे मल्लेश्वरी भारतासाठी भारोत्तोलन स्पर्धेत कांस्य पदक मिळवणारी पहिली महिला ठरली.
 
 
मल्लेश्वरीचं यश तिला विविध पुरस्कार प्राप्त करून देण्यास कारणीभूत ठरलं. 1994 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी तिला अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं, तर वयाच्या 24 व्या वर्षी तिला राजीव गांधी खेलरत्न आणि पद्मश्री या नागरी बहुमानानं गौरवण्यात आलं. गंमत म्हणजे मल्लेश्वरीला ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्य पदक मिळालं ते या तीनही सर्वोच्च सन्मानानंतरच. तिच्या या पोलादी शरीरयष्टीचं कौतुक झालं आणि तिला आंध्र प्रदेशाची ‘आयर्न गर्ल‘ म्हणून गौरवण्यात आलं. हरियाणातील यमुनानगरच्या राजेश त्यागी यांच्याशी मल्लेश्वरीचा विवाह झाला. ही घटना 1997 ची. चार वर्षं ती स्पर्धांच्या विश्वात अशी काही गुंतून गेली की, सांसारिक जबाबदार्‍यांचाही तिला विसर पडला. ती आई झाली ती तब्बल चार वर्षांनी 2001 मध्ये. तिनं एक वर्ष विश्रांती घेतली. 2002 मध्ये पुन्हा स्पर्धाविश्वात उतरण्याचा निश्चय तिनं केला; पण वडिलांच्या निधनामुळे तिला पुन्हा थांबावं लागलं. मल्लेश्वरी आजही यमुनानगरमध्ये पती आणि मुलगा तसेच सासू-सासर्‍यांसह राहते. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये चीफ जनरल मॅनेजर म्हणून ती नोकरी करते. जून 2021 मध्ये दिल्ली सरकारनं क्रीडा विद्यापीठाचं कुलगुरुपद तिला बहाल केलं.

सुधीर जोगळेकर

  सुधीर जोगळेकर हे ज्येष्ठ पत्रकार आहेत..