कणेरी मठाचे कृषी कार्य

24 Jun 2024 18:11:11
कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र सिद्वगिरी महासंस्थान मठ विविध उपक्रमांसाठी प्रसिद्ध आहे. मठाधिपती प.पू.श्री.काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम राबविले जातात. आध्यात्मिक कार्यासोबतच सामाजिक व कृषी कार्यात कणेरी मठ महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.

Shri Siddhagiri Math in Kaneri,Kolhapur
 
कोल्हापूरपासून बारा किलोमीटर अंतरावर कणेरी (ता.करवीर) गाव आहे. या गावात काडसिद्धेश्वराचे मठ आहे. या मठाच्या माध्यमातून ग्रामसंस्कृतीचे दर्शन घडविणार्‍या सुंदर वस्तू संग्रहालयाची उभारणी करण्यात आली आहे. सेंद्रिय शेती, देशी गायीचे जतन व संवर्धन, आदर्श गाव उपक्रम, कृषी विज्ञान केंद्र अशा विविध आयामाद्वारे कणेरी मठाने दिशादर्शक कार्य उभे केले आहे.
 
देशी गायीचे रक्षण व जतन
 
देशी गायीपासून दूध, दही, तूप यापासून जमीन आणि मनुष्य दोघांनाही फायदे आहेत. हे वैज्ञानिक सत्य समोर ठेऊन सिद्धगिरी मठ येथे सिद्धगिरी गो-तीर्थ व गो-विज्ञान केंद्रामध्ये 22 प्रजातीच्या 850 हून जास्त देशी गायींचे संगोपन केले जाते. देशी गायींची शुद्धता राखण्यासाठी भ्रूण प्रत्यारोपण केंद्रही सुरू करण्यात आले आहे.
 
गो परिक्रमा
 
देशी गाय पालनाचे महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी सन 2013 पासून सिद्धगिरी मठामार्फत गो-परिक्रमा हा उपक्रम राबविण्यात येतो. घरोघरी गो-पालनाचा संदेश दिला जातो. वर्षातून एकदा 100खेड्यांमध्ये देशी गायीचे महत्त्व व त्याचे फायदे व अर्थकारण या गोष्टींची जनजागृतीसाठी होण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला जातो.
 
आदर्श गाव उपक्रम
 
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील शेळकेवाडी गाव सिद्धगिरी मठाच्यावतीने आदर्श ग्राम करण्यासाठी निवडण्यात आले होते. गावात शिक्षण, आरोग्य, स्वच्छता , पर्यावरण, शेती, युवक आणि उद्योगधंदे इत्यादी सर्व व्यवस्था गावकर्‍यांच्या माध्यमातून आदर्श करण्यात आलेल्या आहेत. स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था, गोबर गॅस, वृक्षारोपण करण्यात आले असून कोणत्याही सरकारी मदतीशिवाय शेळकेवाडी गाव आदर्श गाव करण्यात आले आहे.
 
गोबरगॅसपासून वीजनिर्मिती
 
देशी गाईच्या शेणापासून तयार होणार्‍या बायोगॅसपासून जनित्र चालवून वीज तयार केली जाते. दरदिवशी 4 ते 6 तासांकरीता 30 केव्हीए वीज तयार होते. त्यामुळे विजेची व पैशांची बचत केली जाते . या उपक्रमातून पर्यावरणपूरक घटकांच्या उपयुक्ततेविषयी संदेश दिला जातो व मार्गदर्शन दिले जाते.
 
 
पंचगव्य प्रकल्प
 
 
या प्रकल्पातून शेण, गोमूत्र, दूध,दही आणि देशी तूपा पासून अनेक औषधी तयार केली जातात. दैनंदिन वापरात येणार्‍या अनेक गोष्टी येथे तयार करण्यात येतात. पंचगव्य धूप, तक्रारीस्ट, गोमूत्र अर्क, मलम, साबण, धुपबत्ती, फिनाईल, दंतमंजन इत्यादी वस्तू कमी खर्चात उपलब्ध होतात.
 

Shri Siddhagiri Math in Kaneri,Kolhapur
 
देशी गायीचे शेण आणि मूत्र पासून नैसर्गिक पेंट
 
देशी गोमूत्र आणि शेणापासून बनवलेले नैसर्गिक रंगाचे युनिटही व्यावसायिकरित्या सुरू केले आहे. हे पर्यावरण आणि मानवी आरोग्यासाठी खूप चांगले आहे आणि इतर रासायनिक पेंट्सपेक्षा स्वस्त आहे. तसेच ग्रामीण युवकांसाठी उद्योजकता विकासाच्या कल्पनादेखील ठेवल्या जातील.
 
हायड्रोपोनिक्स चारा प्रकल्प
 
20 ते 40 फूट जागेत नियंत्रित तापमानात 1 किलो धान्यापासून 7 ते 8 किलो हिरवा चारा करण्यासाठी मठावर हायड्रोपोनिक्स हे तंत्रज्ञान वापरले जाते. या चार्‍यामुळे जनावरांमधील प्रजननाची समस्या दूर होण्यासाठी मदत होते. तसेच दूधाची गुणवत्ता व वाढ झाल्याचे दिसून येते. अतिपावसाच्या व दुष्काळी भागातील जनावरांसाठी हे तंत्रज्ञान एक वरदान आहे यासाठी याचे मार्गदर्शन सिद्धगिरी गोतीर्थ केंद्रामार्फत दिले जाते.
 
लखपती शेती प्रकल्प
 
शेतकर्‍यांसाठी शाश्वत शेती म्हणून ’लखपती शेती’ ही एक संकल्पना समोर ठेवून एका एकरात एका वर्षाला 100 पेक्षा जास्त पिके (भाजीपाला, फळपिके, मसाले पिके, वेलवर्गीय पिके, तृणधान्य पिके, दालवर्गीय पिके, गळीत धान्य पिके , फुलपिके इत्यादी ) सेंद्रीय पद्धतीने लागवड करून एक लाखपेक्षा जास्त निव्वळ नफा कसा मिळवता येईल याचा एक यशस्वी प्रकल्प सिद्धगिरी मठावर प.पू. श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला असून ही संकल्पना 100 शेतकर्‍यांमध्ये प्रत्यक्ष राबविण्यात आली आहे. या शेतीला दरवर्षी लाखो शेतकरी भेटी देतात व मार्गदर्शन घेत आहेत.
 
 
सेंद्रीय शेती कार्यशाळा
 
आरोग्यदायी व विषमुक्त शेती उत्पादनासाठी सेंद्रीय शेतीचा प्रचार व प्रसार करण्याचे महत्त्वपूर्ण काम प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली निरंतर सुरु आहे. सिद्धगिरी मठावरील सर्व शेती सेंद्रीय पद्धतीने केली जाते. दरवर्षी 2 महिन्यांच्या अंतराने 2 दिवसांची सेंद्रीय शेती कार्यशाळा आयोजित केली जाते. प्रत्येक कार्यशाळेला 200 शेतकर्‍यांची उपस्थिती असते. यामध्ये सेंद्रिय शेतीसाठी निविष्ठा तयार करण्याचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण दिले जाते.
 

Shri Siddhagiri Math in Kaneri,Kolhapur 
 
सेंद्रिय गूळनिर्मिती प्रकल्प
 
कोल्हापूर म्हणजे गुळ आणि साखरेची जननी. सिद्धगिरी मठाच्यावतीने सुधा सेंद्रिय ऊसापासून स्वच्छ व आरोग्यदायी सेंद्रीय गूळ आणि काकवी तयार केली जाते. आधुनिक तंत्रज्ञानाचे गुर्‍हाळ मठात उभारण्यात आले आहे. इथे उत्पादित करण्यात आलेल्या गुळाची विक्री सिद्धगिरी नॅचरल्स, सिद्धगिरी प्रॉडक्टस तसेच सिद्धगिरी मॉलच्या माध्यमातून केली जाते.
 
सिद्धगिरी नॅचरल्स शेतकरी कंपनी
 
सिद्धगिरी मठाच्या वतीने सेंद्रीय शेतीसाठी शेतकर्‍याला प्रोत्साहित केले जाते. पण सेंद्रीय मालाला बाजारपेठ व हमी भाव मिळणे शेतकर्‍याला कठीण जात होते. प.पू.श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी सिद्धगिरी नॅचरल्स (फार्मर्स प्रोड्युसर कंपनी) स्थापना केली. या कंपनीद्वारे शेतकर्‍यांना सेंद्रीय भाजीपाला पिकवण्यास सांगितले जाते व हमीभावात तो खरेदी केला जातो. सेंद्रिय भाज्यांचे महत्त्व आता बर्‍याच लोकांना माहिती झाल्याने विश्वास व खात्रीशीर उत्पादन या आधारे सिद्धगिरी नॅचरल्सच्या माध्यमातून कोल्हापूर व उपनगरात सेंद्रीय भाजीपाला ग्राहकाला घरपोच केला जातो.
 
 
कृषी विज्ञान केंद्र
 
 
शेतीला बळ येण्यासाठी भारतीय कृषी अनुसंधान केंद्र , दिल्ली पुरस्कृत सिद्धगिरी मठ कणेरी येथे कृषी विज्ञान केंद्रास मंजुरी मिळाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 6 तालुक्यांमध्ये याचा कार्यविस्तार आहे. प्रत्येक तालुक्यात एक गाव या कृषी विज्ञान केंद्रामार्फत दत्तक घेण्यात आले आहे. या गावामध्ये प्रक्षेत्र चाचणी प्रयोग, प्रथम दर्शनी प्रात्यक्षिके, शेती व महिला प्रशिक्षण कार्यक्रम इ. यशस्वीरित्या राबविले जात आहेत. एक वरिष्ठ शास्त्रज्ञ व 6 विशेष तज्ज्ञ यांच्या मार्गदर्शनाचा लाभ शेकडो शेतकर्‍यांना मिळतो आहे. शंभर टक्के सेंद्रीय शेतीच्या विकासासाठी काम करणारे सिद्धगिरी येथील कृषि विज्ञान केंद्र हे देशातील एकमेव केंद्र आहे. केंद्राकडून पिकांचे नवीन वाण प्रचार प्रसिद्धी व बीजोत्पादनाचे कार्यक्रम, गांडूळ खत निर्मिती, महिला व बचतगटांसाठी लहान उद्योग उभारणी, मशरूम (अळंबी) उत्पादन, नैसर्गिक शेती प्रोत्साहन देण्यासाठी प्रशिक्षण असे कार्यक्रम शेतकर्‍यांसाठी करतात.
 
सिद्धगिरी कृषि पर्यटन केंद्र
 
सिद्धगिरी मठ परिसरात एक कृषी पर्यटन केंद्रही सुरू करण्यात आले आहे, ज्यामध्ये लोकांना विविध कृषी आणि संबंधित क्षेत्रातील उपक्रमांची ओळख करून घेता येईल. येथे कुटुंबासाठी राहण्याची आणि जेवणाची व्यवस्थाही सुरू करण्यात आली आहे.
 
संपर्क
श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र, कणेरी मठ, कोल्हापूर
डॉ. रवींद्र सिंह -वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख - 7906314421
श्री.सुनील कुमार- कृषी विस्तार - 8510900511
Powered By Sangraha 9.0