रोपवाटिकांचे गाव तमदलगे

विवेक मराठी    25-Jun-2024
Total Views |
@रावसाहेब पुजारी  9322939040
 nursery
कोल्हापूर जिल्हा हा ऊस क्षेत्रात अग्रेसर आहे. ऊसशेतीमध्ये रोप लागणीने उत्पादनात मोठा फरक पडतो हे लक्षात येताच अनेक कारखानदारांनी या रोपवाटिका व्यवसायिकांना प्रोत्साहन देण्यास सुरूवात केली. यातून ह्या व्यवसायाचा व्याप वाढत गेला आहे. आज या व्यवसायात तमदलगे (ता.शिरोळ) गावामध्ये 80 रोपवाटिका आहेत. रोपवाटिकांचे गाव म्हणून तमदलगे गावाचा नवा लौकिक तयार झाला आहे.
शिरोळ तालुका म्हटले की पाच नद्यांच्या आवारातील संपन्न परिसर. साखर कारखानदारीमुळे सगळीकडे ऊसमळे आणि केळीच्या बागा तर काही भागात भाजीपाला पाहायला मिळतो. मात्र, याला अपवाद ठरणारी चार-पाच गावे म्हणजे तमदलगे, निमशिरगाव, चिपरी, जैनापूर, कोंडिग्रे आदी. सह्याद्रीच्या डोंगरकडांपैकीच एका मोठ्या डोंगराची पार्श्वभूमी आणि वारणा-पंचगंगा नदीपासून कोसोदूरचा हा परिसर. पण येथील शेतकरी कष्टाळू, कल्पक आणि जिद्दी.
 
 
 
तमदलगे हे दोन अडीच हजार लोकसंख्येचे गाव. गेल्या 25-30 वर्षांमध्ये या गावांनी आपली शेती बागायती करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. ही गावे एकत्र येत पाणीपुरवठा योजना साकारल्या. स्वतःच्या रानात विहिरी खोदल्या, कूपनलिकांतून पाणी घेऊन कोरडवाहू शेतीला आठमाही-बारमाही बागायतीकडे वळविले. पाण्याची सोय होताच, अनेकविध पिके येथील शेतकरी घेऊ लागले.
 
 nursery 
 
1990 च्या दरम्यान कारंदवाडीहून बाबूराव कचरे यांनी तमदलगे येथे शेती घेतली आणि त्यांनी त्या ठिकाणी पहिल्यांदा भाजीपाल्याची रोपवाटिका सुरू केली. खरे म्हणजे रोपवाटिका, नर्सरी व्यवसायाचा या भागातील श्रीगणेशा होता. कचरे यांना त्यांच्या गावी नर्सरी व्यवसायाचा अनुभव होता. त्यांनी स्वतःचा व्यवसाय उभारून अनेकांना काम दिले, अनेकांना या व्यवसायात उभे केले. प्रशिक्षण दिले. नव्या संकल्पना दिल्या.
 
 
तमदलगे पुरस्कारप्राप्त शेतकर्‍यांचा गाव
शेतीतील वेगळेपण या गावाने पहिल्यापासून जपलेले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा 1952 साली देशाचा पहिला कृषिपंडित पुरस्कार याच गावाच्या भीमगोंडा दादा पाटील या शेतकर्‍याला कार ज्वारीच्या (स्थानिक वाण) विक्रमी उत्पादनासाठी दिला होता. देशाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते ट्रॅक्टर भेट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता. यानंतर या गावाने शासनातर्फे दिले जाणारे विविध पुरस्कार पटकाविले आहेत. यामध्ये कै. बाबूराव कचरे (कृषिभूषण), शिवाजी बाबूराव कचरे (उद्यान पंडित), राजकुमार आडमुठे (उद्यान पंडित), वैजंयतीमाला वझे (जिजामाता कृषिभूषण पुरस्कार), रावसाहेब पुजारी (कृषि मित्र पुरस्कार) अशा पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. याशिवाय वैयक्तिक अनेक पिकांत येथील शेतकर्‍यांनी विक्रम नोंदविलेले आहेत.
 
 
पुढे संग्रामसिंह देसाई यांनी आपल्या शेतावर प्लास्टिक पिशव्यामध्ये उसाची रोपे तयार करून ती विक्रीस सुरुवात केली. हे दोन अध्याय यशस्वी झाल्याने आणि त्यात पैसे बर्‍यापैकी मिळतात हे लक्षात आल्यानंतर अनेक तरुण पुढे आले. भाजीपाला, केळी रोपांचे हार्डनिंग आणि सोबतच उसाची रोपे तयार करण्यास या गावात सुरूवात झाली. ’एकमेका सहाय्य करू’ अशा पद्धतीने या व्यवसायात काही धाडसी तरुण उतरले. त्यांनी मागणीचा विचार करून मोठ्या प्रमाणात रोपांची निर्मिती केली. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला. परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र आहे. ऊसशेतीमध्ये रोप लागणीने उत्पादनात मोठा फरक पडतो हे लक्षात येताच अनेक कारखानदारांनी या रोपवाटिका व्यवसायिकांना प्रोत्साहन देण्यास सुरूवात केली. यातून ह्या व्यवसायाचा व्याप वाढत गेला आहे. आज या व्यवसायात तमदलगे गावामध्ये 80 रोपवाटिका आहेत. रोपवाटिकांच गाव म्हणून तमदलगे गावाचा नवा लौकिक तयार झाला आहे.
 
 
ऊसशेतीत कांडे लागवड पद्धती आता जवळजवळ बंद झालेली आहे. बहुतांशी शेतकरी रोपांची लागण करतात. या पद्धतीचे काही विशेष फायदे आहेत. बेणे बदल सहज करता येतो, एकसारखी उगवण आणि वाढ साधता येते, काणी रोग टाळता येतो, कारखाने किमान एक महिना लागणीच्या अगोदरची लागणीची तारीख देतात. महापुरासारख्या काळात दीर्घकाळ लागणी करता येत नव्हत्या. परंतु, रोपांच्या लागणी अल्प कालावधीत करता येतात. याकडे इन्स्टंट ऊस लागणीसाठी रोपांचा पर्याय शेतकरी निवडतात. यामुळे उसाच्या रोपांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. आपल्या आजूबाजूच्या परिसराबरोबरच अनेक राज्यांतून घाउक (बल्क) प्रमाणात साखर कारखानदारांकडून उसाच्या रोपांना मागणी येऊ लागली आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांबरोबरच कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात, आंध्रप्रदेशातील अनेक भागातील कारखान्यांना तमदलगे आणि परिसरातील रोपवाटिकांतून रोपांचा पुरवठा केला जातो. यासाठी प्रत्येक व्यवसायिकांनी स्वतःची वाहतूक यंत्रणा उभी केली आहे. थेट शेतकर्‍यांच्या बांधावर रोपे पोहोच दिली जातात. याचबरोबर शेतकर्‍यांना विक्रीपश्चात सर्व प्रकारचे मार्गदर्शन दिले जाते. थेट शेतकर्‍यांच्या प्लाटवर भेटी देऊन मार्गदर्शन केले जाते. लागवड पद्धत, आळवण्या, फवारण्या, खतांचे डोसेस यांचे मार्गदर्शन केले जाते. यामुळे या व्यवसायाला मोठी गती आहे.
 
 nursery 
 
दुसर्‍याची चाकरी-नोकरी करण्यापेक्षा अल्पभूधारक तरूण शेतकरी स्वतःची रोपवाटिका सुरू करतो. ज्यांना मार्केटिंग जमत नाही, ते केवळ रोपांची निर्मिती करतात. विक्रीसाठी दुसर्‍यांचे सहकार्य घेतात. कुटुंबातील सर्व सदस्य यामध्ये राबतात. त्यामुळे उत्पादन खर्चात मोठी बचत केली जाते. गावातील आणि परिसरातील पुरुष आणि महिला मजुरांना पूर्णवेळ रोजगार निर्माण झालेला आहे.
 
 
रोपवाटिका व्यवसायावर आधारित अनेक व्यवसायांना बहर आलेला आहे. ऊस तोडणी टोळ्या, ऊस वाहतूकीसाठी वाहने, उसाचा डोळा काढणारी मशिनरी, प्लास्टिक ट्रे निर्मिती, कोकोपीठ, कोकोपीठ भरणी यंत्रे, बियाणे टोकणी यंत्रांना मोठी मागणी राहू लागली आहे. यातून हे व्यवसाय मोठ्या प्रमाणात तयार झालेले आहेत. भाजीपाल्याच्या रोपवाटिका तुलनेने कमी असल्या तरी त्यामध्येही अनेक परिवर्तने आलेली आहेत. या ठिकाणी महिना-महिना रोपांसाठी अ‍ॅडव्हान्स बुकींग करावे लागते. मागणीनुसार उत्तम दर्जाची रोपे तयार करून दिली जातात. आवश्यकतेनुसार सर्व प्रकारचे मार्गदर्शन शेतकर्‍यांना केले जाते. बदलत्या हवामानामुळे भाजीपाल्याच्या शेतीवर विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे काही प्रमाणात या व्यवसायावरही परिणाम झालेला आहे. तरीही मोठ्या नेटाने हा व्यवसाय चालविला जातो आहे. यामधील आधुनिक तंत्रज्ञान आणले जाते. बियाणे कंपन्यांचा मोठा व्यवसाय या ठिकाणावरून होत असतो. त्यामुळे नवनवीन वाण बाजारात येताना पहिल्यांदा या ठिकाणी त्याचे डेमो प्लाट घेतले जातात. त्यासाठी शेतकर्‍यांचे मेळावे, चर्चासत्रे या ठिकाणी घेतले जातात.
 
 
रोपवाटिका व्यवसायामध्ये एक व्यावसायिक साधारणपणे 30-40 लाख रूपयांचा व्यवसाय करतो. याशिवाय काहीजणांचे व्यवसाय कोटीच्या घरामध्ये आहेत. बहुतेक सगळ्या व्यावसायिकांच्या दारासमोर आता चारचाकी वाहने आहेत. ही प्रगती केवळ रोपवाटिका व्यवसायातून साधलेली आहे. एक शेती क्षेत्रात परिवर्तन घडविणारे गाव म्हणून तमदलगे गावांने मोठा लौकिक मिळविलेला आहे.
 
 
गेल्या दोन वर्षांत पावसाने दगा दिल्याने ऊसशेती धोक्यात आलेली आहे. त्याचा परिणाम या व्यवसायावरही झालेला आहे. उसाच्या लागणी थांबल्याने रोपांना उठाव नाही. परिणामी काही काळ या व्यवसायात मंदीचे वातावरण होते. मात्र यंदा पुन्हा मोठ्या पावसाच्या अंदाजाने नव्याने मोठ्या हालचाली आणि उलाढाली सुरू झालेल्या आहेत.
लेखक कोल्हापूर येथील ज्येष्ठ पत्रकार आहेत.