पी.एम. किसान सन्मान निधी एक कृतिशील योजना

विवेक मराठी    25-Jun-2024
Total Views |
@रोहित जाधव - 7972964120

vivek
शासनाच्या कार्यासाठी मार्गदर्शक असणारी क्रिया म्हणजे धोरण. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात कल्याणकारी धोरणे राबविली जात आहेत, काही धोरणे व्यापक होत चालली आहेत. यातील पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही एक कृतिशील योजना म्हणून नावारूपाला आली आहे. शेतकर्‍यांना निश्चित उत्पन्न मिळण्यासाठी, कृषी निविष्ठा खरेदी करता यावी यासाठी केंद्र शासनाने 24 फेब्रुवारी 2019रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी सुरू केला. या योजनेच्या माध्यमातून केंद्र शासन शेतकर्‍यांना 6हजार रूपयांची आर्थिक मदत करत असते. हा निधी शेतकर्‍यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (डीबीटी प्रणाली) जमा केला जातो. ज्यांच्या नावे भूमी अभिलेखामध्ये वहितालायक क्षेत्र आहे, अशी सर्व शेतकरी कुटुंबे या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत. मागील वर्षात आयकर भरलेल्या व्यक्ती, जमीन धारण करणारी संस्था, संवैधानिक पद धारण करणारी व्यक्ती (आजी, माजी, व्यक्ती), केंद्र व राज्य शासनाचे कार्यरत व निवृत्त अधिकारी, कर्मचारी आदी या निधीस पात्र नाहीत. गावपातळीवर पात्र शेतकरी कुटुंबांचे निश्चितीकरण करून लाभार्थ्यांची यादी करण्याचे काम महसूल विभागातील तलाठी यांच्यामार्फत केले जाते. हा निधी उपलब्ध होण्यासाठी शेतकर्‍यांनी जमिनीची पडताळणी, नाव, लिंग, आधार कार्ड क्रमांक यामध्ये काही चुका झाल्या असतील तर त्या पुन्हा अद्ययावत करणे आवश्यक आहे. याशिवाय ज्या शेतकर्‍यांनी अद्यापही ई-केवायसी अपडेट केले नाही, त्यांनी त्वरित ई-केवायसी अपडेट करावे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यस्तर, जिल्हास्तर, तालुकास्तर व ग्रामस्तरावर संनियंत्रण समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महसूल विभाग, तलाठी, कृषी व ग्रामविकास विभागाशी संपर्क साधावा, अधिक माहितीसाठी https://pmkisan.gov.in
या संकेतस्थळाला अवश्य भेट द्यावी.