ओळख एक प्रश्नचिन्ह?

विवेक मराठी    26-Jun-2024
Total Views |
@गौरी साळवेकर
 
 
transgender
स्त्री-पुरुष हा निसर्गनिर्मित लिंगभेद न मानणारी एक मोठी चळवळ जगभरात सुरू झाली आहे. या चळवळीचे लोण भारतातही पोहचले आहे. त्यांना आपण जी सर्वनामे स्त्री व पुरुष यांसाठी वापरतो ती मान्य नाहीत. आपल्या भारतीय संस्कृतीत तसेच प्राचीन ग्रीक व इतर संस्कृतींमध्येदेखील याचे उल्लेख सापडतात. मात्र चर्चच्या प्रभुत्वामुळे समलैंगिकता पाश्चात्त्य संस्कृतीत आणि त्या आधारित धर्मांत स्वीकारली गेली नाही. त्यामुळे जे दडपले जाते ते उफाळून वर येते. आपल्याला पाश्चात्त्य संस्कृतीचे अपार आकर्षण असल्याने या व्यक्तिस्वातंत्र्याच्या मुद्द्यातील फटी न जाणताच त्याचे उदात्तीकरण करण्याकडे कल दिसतो.
कधी जेन झी जिथे जमते अशा कॅफेमध्ये गेलात? गेलात तर त्यांचं मोकळंढाकळं वागणं बघून आपली म्हणजे आता पन्नाशीकडे वाटचाल करायला लागलेल्या म्हणजे बर्‍यापैकी सोवळे असलेल्या पिढीचं धाबे दणाणल्याशिवाय राहत नाही. चिल यार, ब्रो (हे मुली मुलींनाही म्हणतात, का ते एक ब्रोच जाणे!), हिया, ओकीज, स्ले, बर्न द हाऊस, बुट्स डाऊन, STFU, सिच्युएशनशिप हे आणि असे अनेक शब्द तुम्हाला कितीही अगम्य वाटले तरी ते या जेन झीच्या नव्या शब्दकोशात सहज समाविष्ट झाले आहेत. परवा सहज एका ठिकाणी कॉफी प्यायला थांबलेले असताना मुलामुलींच्या एका टोळक्याने माझ्या मेंदूतील इंग्रजी भाषिक संकल्पनांना धडधडीत सुरुंग लावत मुलींना आणि मुलांनाही एकमेकांनी सरसकट they, them, theirs म्हणायला सुरुवात केल्यावर माझ्या लक्षात आलं की, काही तरी गडबड आहे. मुलांची नुसती भाषाच नव्हे तर एकूणच देहबोली वेगळी, बेफिकीर होती.
 

vivek 
 बर्लिन स्टेशनवर लोकांचा एक मोठा समूह ‘आम्हाला कुत्रा म्हणून मान्यता द्या’ या मागणीसाठी जोरजोरात भुंकतानाचा व्हिडीओ
 
घरी आल्यावर याबाबत थोडी माहिती घेण्याचा प्रयत्न केला आणि जे समोर आलं ते धक्कादायक होतं. स्त्री-पुरुष हा निसर्गनिर्मित लिंगभेद न मानणारी एक मोठी चळवळ जगभरात सुरू झाली आहे आणि त्यांना आपण जी सर्वनामे स्त्री व पुरुष यांसाठी वापरतो ती मान्य नाहीत म्हणे! म्हणून सरसकट they, theirs, them किंवा अशीच सर्वनामे आम्ही वापरणार, असं ते म्हणत आहेत. आम्हाला कोणतंही जेंडर नकोच, भेद करणारी कोणतीही ओळख आम्हाला नको, असं ते म्हणतात. आधी मला वाटलं की, हे खूळ फक्त अमेरिकेत असावं; पण हा विचार मनात यायला आणि बर्लिन स्टेशनवर लोकांचा एक मोठा समूह ‘आम्हाला कुत्रा म्हणून मान्यता द्या’ या मागणीसाठी जोरजोरात भुंकतानाचा व्हिडीओ (शब्दशः अर्थ घ्यावा. व्हिडीओ इंटरनेटवर आहे.) नजरेस पडायला एकच गाठ पडली. पाठोपाठ भारतातदेखील या संकल्पनांना डोक्यावर घेणारा एक मोठा वर्ग तयार होतोय असं दिसलं आणि खरं सांगते, ते बघितल्यावर माझ्यातली पालक अंतर्बाह्य गोंधळली आणि हादरून गेली!
 
 
जगभरातील हे लोण इथे माझ्या उंबरठ्यावर पोहोचेल, असं मला वाटलं नाही तरी हळूहळू या बेगडी व्यक्तिस्वातंत्र्याचा राक्षस कोवळ्या पिढीला गिळंकृत करायला सरसावतो आहे. मेंदूत रासायनिक बिघाड झाला, की स्किझोफ्रेनिया हा आजार होतो.त्या वेळी माणूस छिन्न व्यक्तिमत्त्व म्हणून जगत असतो; पण जेव्हा सर्वार्थाने ’नॉर्मल’ म्हणावी अशी लोकं ’आम्ही माणूस आहोत, पण आम्ही स्त्री किंवा पुरुष नाही. आम्ही निसर्ग मानत नाही किंवा आम्हाला कुत्रा, मांजर म्हणून मान्यता द्या,’ अशा चळवळी उभारत असेल तर ही बाब दुर्लक्ष करण्यासारखी नाहीये.
 
 
 
नॉन बायनरी, ट्रान्सजेंडर किंवा सेक्स नॉट कन्फर्मड (TNGC) या संकल्पना आता जगभरात जोर धरू पाहत आहेत. अशा चळवळीचा मूळ हेतू बाजूलाच राहतोय आणि पीअर प्रेशरखाली किंवा गोंधळातून, कुतूहलातून अनेक स्ट्रेट मुलंमुलीदेखील या आडनिड्या वाटांवर चालण्याचा मार्ग अनुसरत आहेत. कुटुंब आणि समाज यापासून तुटलेली, एकेकटी बेटं झालेली ही मुलं आपापले अजेंडे रेटणार्‍या लोकांसाठी इझी टार्गेट्स न ठरली तरच नवल!
 
 
समता आणि समानता यात नेहमीच गल्लत करणार्‍या आपल्या समाजाने व्यक्तिस्वातंत्र्य या मुद्द्यावर अनेक घोळ घालून ठेवलेत. आपली निसर्गनिर्मित ’ओळख’ हळूहळू पुसून एक नवीन, ओळखविहीन, कोणत्याही अर्थाने ’नॉर्मल’ न दिसणारी, निसर्गाने आखून दिलेल्या मार्गावरून पथभ्रष्ट होणारी पिढी परदेशात तर फोफावते आहेच; पण हेच आता इथेही पसरत चाललं आहे. (की पसरवलं जात आहे?) थोडं खोलात जाऊन बघाल तर समलैंगिकता या मुद्द्यावर तुम्हाला 20+ प्रकार आणि त्यांचे वेगवेगळे झेंडे इंटरनेटवर दिसतील.
 
 
transgender
 
इथे प्रश्न भाषेचा किंवा व्याकरणाचा नसून सरसकटीकरण करण्याचा आहे आणि काही गणितं मुद्दाम बदलण्याचा आहे. LGBTQ, सेक्सश्युअल, नॉन-सेक्सश्युअल हे शब्द आता आपल्याला नवीन नाहीत. आपल्या समाजात फार पूर्वीपासून समलैंगिक लोक अस्तित्वात आहेत आणि दोन हजार वर्षांपासून आपल्या संस्कृतीमध्ये या जेंडर फ्लुडिटीची उदाहरणे सापडतील.खजुराहो, बौद्ध लेणी, मंदिरे, शिल्प या सगळ्यांमध्ये दोन स्त्रिया किंवा दोन पुरुष एकमेकांना स्पर्श करताना दिसतील. भगीरथाचा दोन स्त्रियांपासून झालेला कथित जन्म, शिखंडी, समलैंगिकता या विषयांवर ‘कामसूत्रा’तील प्रकरण अशा अनेक ठिकाणी, तसंच साहित्य, इतिहास यांच्यात याविषयीचे उल्लेख सहज सापडतात. आपल्याच कशाला, प्राचीन ग्रीक व इतर संस्कृतींमध्येदेखील याचे उल्लेख सापडतात, कारण निसर्गाच्या दोन अधिक दोन बरोबर चार या गणितात क्वचित ठिकाणी झालेली गडबड; पण या गडबडीमुळे समलैंगिक लोकांची संख्या लक्षणीय वाढली किंवा अनेक जण स्वतःला तसंच समजू लागले असं झालं नाही.
 
 
मात्र चर्चच्या प्रभुत्वामुळे समलैंगिकता पाश्चात्त्य संस्कृतीमध्ये सहज स्वीकारली गेली नाही. त्या संस्कृतीचे जे कॉपी पेस्ट धर्म आहेत त्यांनीही याला मान्यता देणं शक्य नव्हतं. जे दडपले जाते ते उफाळून वर येणार, या तत्त्वाला अनुसरून आता ही मान्यता मिळवण्याची चळवळच सुरू झाली. उदात्तीकरण केल्याने ती फोफावण्यास मदतच झाली. आपल्याला पाश्चात्त्य संस्कृतीचं अपार आकर्षण असल्याने या व्यक्तिस्वातंत्र्याच्या मुद्द्यातील फटी आपण बघत नाही.
 

वोकिझमच्या हल्ल्याला ओलाचा टोला..

https://www.evivek.com//Encyc/2024/5/15/wokeism-culture.html

 
 
 
 
मी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी राहिले. काही ठिकाणी, विशेषतः कोल्हापूर, सांगली भागांत अनेकदा बायका स्वतःबद्दल बोलताना मी आलो, मी गेलतो, असं म्हणतात. विदर्भात त्याला, तिलाऐवजी ’तेला’ प्रचलित आहे; पण म्हणून त्यामुळे स्वतःची ओळख आणि अस्तित्व पुसून टाकण्याची गरज या लोकांना वाटत नाही. त्यामुळे इथे प्रश्न फक्त भाषेचा नाहीये.
 
  
तुम्ही कधी ट्रान्सजेंडरची भाषा ऐकलीत? ऐका. तेदेखील स्त्री किंवा पुरुष यातील सर्वनामे आपली जी काही लैंगिक ओळख आहे त्यानुसार वापरताना दिसतील.
 
 
तुमची सध्याची ओळख पुसून टाकावी, असं तुम्हाला केव्हा वाटतं? एक तर तुम्हालाच ती धड झालेली नसते किंवा जेव्हा त्या ओळखीबाबत शरम व अपराधगंड या दोन भावना प्रबळ असतात तेव्हा. तुमच्या अस्तित्वाला काहीही किंमत नाही, हे जेव्हा तुमच्या मनावर ठसत जातं तेव्हा आहे ते अस्तित्व झुगारून देण्याची, संपविण्याची इच्छा बळावते. निसर्गनिर्मित शरीराला मेंदूने नाकारून बंड करणं हा भाग वेगळा आणि शरीर-मेंदू-समाज यांनी मिळून समक्रमण (sync) झालेली आपली ओळख पुसावीशी वाटणं हे वेगळं.
 
समलैंगिक, नॉन बायनरी असणं किंवा त्याला जोरदार समर्थन करणं हे आता ’कूल’ समजलं जाण्याचं साधन आहे आणि आपण कूल वाटलो नाही तर या FOMO मधून अनेक मुलंमुली याकडे वळत आहेत. 
 
ज्यांची ओळख ही प्रश्नचिन्ह असते, असे किती टक्के लोक एकूण लोकसंख्येत सापडतील? हा टक्का मुळातच फार कमी आहे आणि बहुधा स्वतःचं संतुलन साधण्यासाठी हीदेखील निसर्गाने खेळलेली एक खेळी तर नव्हे?
 
 
कॉस्मोपॉलिटन वर्तुळात बर्‍यापैकी वावर असणार्‍या एका मैत्रिणीने सांगितलं की, समलैंगिक, नॉन बायनरी असणं किंवा त्याला जोरदार समर्थन करणं हे आता ’कूल’ समजलं जाण्याचं साधन आहे आणि आपण कूल वाटलो नाही तर या FOMO मधून अनेक मुलंमुली याकडे वळत आहेत.
 
का होत असेल असं? समाजमाध्यमांमुळे शरीर लवकर एक्सप्लोर करण्याची उत्सुकता जबरदस्त असते. एका क्लिकसरशी न झेपणारी, भावना चेतवणारी माहिती, साहित्य मुबलक उपलब्ध असते. त्यातून जेन झीमध्ये सहज पार्टनर उपलब्ध असणं आणि सेक्स करण्याचं अपार कुतूहल किंवा अनेकदा प्रेशरदेखील असतं. त्यामुळे फक्त इंटेग्रिटीच नव्हे, तर व्यक्तीचं लिंग हा मुद्दा गौण ठरत चालल्याचं दिसायला सुरुवात झाली आहे. जे पूर्वी एखाद्या मोठ्या शहरात शक्य होतं, ते आता अगदी लहानशा गावातदेखील उपलब्ध असतं.
 
 
उपलब्धता, नावीन्य आणि आपल्या मुळांपासून सुटत चाललेली माती हे तीन प्रमुख मुद्दे असावेत असं वाटतं.
 
 
मुलांना त्यांची खरी लैंगिकता नीट उमगण्याचं खरं वय हे दहा वर्षांच्या पुढे असतं, असं गृहीत धरू. त्या वेळी हा विषय ऑप्शनला टाकून न देता मुलांशी मुद्दाम वेळोवेळी बोलणं, हा एक उपाय आहेच; पण त्यांच्या मनात याविषयी जे प्रश्न असतील त्यांना शास्त्रीय पद्धतीने उत्तरं देण्याचा प्रयत्न करणं, त्यासाठी आपल्या डॉक्टर, मित्रमंडळी, समविचारी पालक, प्रशिक्षित कौंसेलर्स यांची मदत घेता येईल.
 
 
निसर्गाच्या निर्मितीत आपण कुठवर ढवळाढवळ करू शकतो आणि त्याचे काय परिणाम येणार्‍या पिढीवर होतील यावर सोप्या, समजेल अशा भाषेत लिहिणारी तज्ज्ञ मंडळी आजूबाजूला हवी आहेत. आपल्याकडे पूर्वीपासूनच सहज असलेल्या, पण नंतरच्या काळात सहज न स्वीकारल्या गेलेल्या जेंडर फ्लुडिटीबद्दल आपण त्यांना जरूर सांगायला हवं.
 
 
घरात असणारी एकेकटी बेटं थोडा वेळ तरी एकमेकांना एकत्र भेटायला हवीत. किमान एक जेवण एकत्र घेण्याचा निर्णय, समविचारी पालकांनी एकमेकांना आणि आपल्या मुलांना या मुद्द्यावर बोलतं करणं, योग्य माहिती मिळवणं आणि याला टॅबू न समजता या मुद्द्याशी शांतपणे डील करणं आवश्यक आहे. एखाद्या वेळी ’कन्फेक्शन डे’ ठेवून पालकांनीही या वयात केलेल्या चुका, त्यामुळे त्यांच्या मनावर, शरीरावर आणि शिक्षण, नातेसंबंध यावर झालेल्या परिणामांबद्दल बोलायला काय हरकत आहे? आपले आईवडील चुकले होते; पण ते तिथून मागे फिरू शकले आणि सुखात आयुष्य जगत आहेत, हे मुलांना जेव्हा समजतं तेव्हा घरट्याची दारं आपल्यासाठी नेहमी उघडी राहतील, हा विश्वास त्यांना वाटतो.
 
 
पॉर्नचं व्यसन, त्यातून होणारे आर्थिक गुन्हे, तिथे काम करणार्‍या लोकांच्या आयुष्यातील प्रश्न, या इंडस्ट्रीमध्ये चालणारा ड्रगचा वारेमाप वापर, याविषयी वेळोवेळी स्पष्ट बोलणं, ही आता निकड आहे.
 
 
एखादी गोष्ट वाटणं आणि ती खरोखरच असणं यातला भेद स्पष्ट करण्याचं काम आपलं आहे. आपल्या मुलाची लैंगिकता वेगळी असल्यास तीही शांतपणे आणि सहज स्वीकारणे हे महत्त्वाचे आहे.विरोध वा उदात्तीकरण या दोन्हींचा परिणाम फारसा बरा होणार नाही.
 
 
या मार्जिनलाइझ्ड लोकांच्या सामाजिक समस्या याबद्दल बोललं जाणं आवश्यक आहे. त्यांना असे प्रश्न असणार्‍या लोकांशी जरूर बोलू द्या. समाज म्हणून आपल्याला काय करावं लागेल याची जाणीव त्यांना आणि आपल्यालाही होईल.
 
 
आपल्या मुलांचे मित्रमैत्रिणी काय बोलतात, त्यांची देहबोली, भाषा, आयडेंटिटी यात काही वेगळेपण आहे का? याकडे वेळीच लक्ष द्यायला हवं.
 
यात संस्थाचालक, शाळा, शिक्षक यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यांना विश्वासात घेऊन शाळेत पालक मदतगट स्थापन करता आले तर शाळेलाही पालकांचा आधार मिळेल.
 
 
विशेषतः यात डॉक्टर, समाजसेवक वा संबंधित खात्यातील व्यक्ती असतील तर फारच उत्तम. याचा फायदा इतर पालकांना होईल.
 
 
शिक्षणाचा त्रिकोण हा मूल, पालक व शाळा असाच असल्याने यावर भरपूर वैचारिक घुसळण होणं, काही प्रयोग होणं अत्यावश्यक आहे.
 
 
शासन याबाबत काय करेल याची कल्पना नाही. मात्र पालक म्हणून अत्यंत कौशल्याने, पारदर्शीपणे, नाजूकपणे, मुख्य म्हणजे भारतीय एथॉसचा विचार करून आपण या मुद्द्याबद्दल सुशिक्षित झालो तरच याचा फायदा आहे. शेवटी, मूल हे मूलच आहे.
 
And EVERY child counts!