दशकपूर्तीचा ‘योग’!

विवेक मराठी    28-Jun-2024   
Total Views |
‘आंतरराष्ट्रीय योग दिन’च्या गेल्या दहा वर्षांच्या आलेखातून एक स्पष्ट होते ते म्हणजे जगभरात योगाभ्यासाविषयी जागृती वाढत आहे. त्याच्या लाभांबद्दलची जाणीव वाढत आहे आणि मुख्य म्हणजे भारताच्या परंपरेतून आलेल्या या देणगीचे मोल जगाला समजू लागले आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यामागचा हेतू योगाचा प्रसार आणि त्यातून मानवी कल्याण हाच आहे. तो सफल होत असल्याचा दशकपूर्तीचा ‘योग’ भारतीयांना सुखावणाराच आहे, हे निःसंशय.

vivek
 
 
यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमाचे आयोजन श्रीनगरमधील दल लेकच्या काठावर करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे हे दशकपूर्ती वर्ष होते. त्यामुळे या वर्षीच्या कार्यक्रमाला आगळे महत्त्व आले होते. त्यातही श्रीनगरमध्ये हा कार्यक्रम झाल्याने योगाचा संबंध कोणत्या एका धर्माशी नसून उभ्या मानवजातीच्या निकोप आरोग्याशी आहे, हा संदेश जाण्यास मदतच झाली. प्रत्यक्ष या कार्यक्रमात सात हजार जण सहभागी होतील, अशी माहिती जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी अगोदरच दिली होती. वास्तविक या कार्यक्रमाची सुरुवात होताना तेथे पाऊस सुरू झाला होता; मात्र तरीही छत्रीखाली आपल्या योगाच्या मॅट अंथरून त्यावर योगासने करणार्‍यांचे दृश्य उत्साहवर्धक होते. जम्मू-काश्मीरच्या अनेक जिल्ह्यांत योग दिनाचे कार्यक्रम झालेच; पण अगदी नियंत्रण रेषेच्या नजीकदेखील कार्यक्रम झाले आणि हजारो नागरिकांनी त्यात सहभाग घेतला. दल लेकच्या काठी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत योगाभ्यासाचा प्रसार जगभरात कसा वेगाने होतो आहे हे अधोरेखित केले. काश्मीर खोर्‍यात योगाभ्यासाची लोकप्रियता वाढते आहे, असे मोदींनी सांगितले. त्याचा प्रत्यय यंदा तेथे आला असेच म्हटले पाहिजे. अर्थात भारतभरदेखील योग दिनाचे असंख्य कार्यक्रम झाले आणि मुख्य म्हणजे देशांतर्गत राजकीय मतभेद त्यांच्या आड आले नाहीत हे उल्लेखनीय.
 
 
उत्तर प्रदेशात राजभवनाच्या हिरवळीवर राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शेकडो जणांसह योगासने केली. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी त्या राज्यात वर्षभरात 51 योगा स्टुडियो स्थापन करण्यात येतील, अशी घोषणा केली. काही तरुणांनी यमुना नदीच्या पात्रात तराफावर योगासने केली. हैदराबादेत मुस्लीम महिलांनी योगाभ्यास केला. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे पोलीस अधिकार्‍यांनी आणि कर्मचार्‍यांनी योग दिनाच्या कार्यक्रमात भाग घेतला. पश्चिम बंगालमध्ये खरगपूर आयआयटीमधील तसेच शांतिनिकेतनमधील विद्यार्थी आणि अध्यापक योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. कर्नाटकात राज्यपाल थावरचंद गेहलोत आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह अनेक जण विधानसभेच्या पटांगणात योगासने करीत होते, तर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बेल्लारी येथील कार्यक्रमात भाग घेतला. केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी येत्या वर्षभरात त्या राज्यात दहा हजार योगा-क्लब सुरू करण्यात येतील, अशी घोषणा केली. यापूर्वीच केरळात एक हजार योगा-क्लब सुरू आहेत आणि सहाशे योगा-क्लब हे खास महिलांसाठी आहेत. हे सर्व नमूद करण्याचा हेतू हा की, योगाभ्यासाने आरोग्य निकोप राहते आणि केवळ शरीरच नव्हे, तर मनही निरोगी राहते याची जाणीव आता देशभरात झाली आहे. एवढेच नव्हे तर जगभरात योगाभ्यासाची महती पसरत आहे. अमेरिकेतील न्यू यॉर्कमधील टाइम्स चौकात हजारो जण योगासने करतानाचे दृश्य लक्ष वेधून घेणारे होते. या वर्षीच्या योग दिनाची थीम ‘योग: स्वतःसाठी आणि समाजासाठी’ अशी होती. योग याचाच अर्थ मुळात जोडणे हा आहे. तेव्हा व्यक्ती आणि समाज यांना जोडण्यासाठी योगाचे माध्यम सयुक्तिक ठरेल, अशी त्यामागील कल्पना असावी.जगभरात योगाभ्यासाला मिळणारा प्रतिसाद, स्वीकारार्हता आणि त्यापलीकडे जाऊन मिळणारी लोकप्रियता पाहता दहा वर्षांपूर्वी भारताने आंतरराष्ट्रीय योग दिनाचा जो प्रस्ताव संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठावर मांडला होता तो योग्य होता हे सिद्ध होते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या 69 व्या आमसभेत पंतप्रधान मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रस्ताव मांडला होता. योग ही भारताच्या प्राचीन परंपरेची देणगी आहे, असे त्या वेळी मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटले होते. 2014 सालच्या डिसेंबर महिन्यात संयुक्त राष्ट्रसंघाने 69/131 क्रमांकाच्या प्रस्तावास मान्यता दिली होती आणि तब्बल 175 घटकराष्ट्रांनी त्यावर आपल्या संमतीची मोहोर उमटविली होती. त्यानुसार गेली दहा वर्षे जगभरात 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होत आला आहे. अर्थातच भारताने त्या आयोजनाचे नेहमीच नेतृत्व केले आहे. गेल्या दहा वर्षांतील योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमांवर दृष्टिक्षेप टाकला तर त्यातील वैविध्य लक्षात येईल.
 
 
vivek
 
2015 साली पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला. तो पहिलाच असल्याने त्याविषयी असणारी सार्वत्रिक उत्सुकता स्वाभाविक अशीच होती. त्या वर्षीचा मुख्य कार्यक्रम राजपथावर (आता कर्तव्यपथ) पार पडला आणि मोदी यांच्यासह 84 देशांतील प्रतिष्ठितांच्या उपस्थितीत तो कार्यक्रम झाला होता. छत्तीस हजार जणांनी 35 मिनिटांत 21 आसने करून आंतरराष्ट्रीय योग दिनाची सुरुवात धडाक्यात केली होती. योग दिनाची दखल ख्रिश्चन सायन्स मॉनिटर संकेतस्थळाने घेतली होती आणि म्हटले होते की, पाश्चात्त्य राष्ट्रांचा मिनिटांत संबंध हा कधी तरी एकोणिसाव्या शतकात आला. हेन्री डेव्हिड थोरो हा अमेरिकेतील पहिला योग अभ्यासक, असे काही जण मानतात, तर स्वामी विवेकानंद यांनी 1893 साली अमेरिकेला जागतिक धर्मपरिषदेच्या निमित्ताने भेट दिल्यानंतर त्यांच्या शिकवणीकडे पाश्चात्त्य राष्ट्रांचे लक्ष गेले आणि लिओ टॉल्स्टॉयपासून जे. डी. सॅलिन्जरपर्यंत अनेक जण प्रभावित झाले, असे या संकेतस्थळाने म्हटले होते. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उद्देश योगाभ्यासाला जागतिक स्तरावर मिळालेल्या यशाचा गौरव व्हावा आणि त्याच्या मुळांचे स्मरण व्हावे हा असल्याचे त्या संकेतस्थळाने नमूद केले होते. आंतरराष्ट्रीय योग दिनाने योगाच्या स्वीकारार्हतेची व्याप्ती आणखीच वाढविली.
 
 
2016 साली मोदी यांनी चंदिगड येथील कार्यक्रमात भाग घेतला आणि तेथे सुमारे तीस हजार जणांनी प्राणायामसह योगासने केली. 2017 साली तिसर्‍या योगदिनी मोदी यांनी लखनौ येथील रमाबाई आंबेडकर मैदानात योग दिन कार्यक्रमाचे नेतृत्व केले. 51 हजार जणांनी तेथे प्रत्यक्ष सहभाग नोंदविला होता. चौथ्या योग दिनाचा मुख्य कार्यक्रम डेहरादून येथे वन संशोधन संस्थेत झाला, तर 2019 साली रांची येथे तो संपन्न झाला. 2020 हे साल जगासाठी आव्हानात्मक होते, कारण कोरोनाच्या लाटेने सर्वांना घरात बंदिस्त केले होते. अशा वेळी मैदानात आणि सामूहिकपणे योग करणे शक्य नव्हते. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांद्वारे तो साजरा करण्यात आला. ‘घरोघरी योग आणि कुटुंबासाठी योग’ ही त्या वर्षीची अगदी समर्पक अशी थीम होतीच; पण कोरोना हा आजार श्वसनाशी निगडित असल्याने प्राणायाम आणि योगासने यांचे निकोप आरोग्यासाठीचे असणारे महत्त्व अधोरेखित झाले यात शंका नाही. 2021 साली परिस्थितीत फारसा बदल झालेला नव्हता. मात्र 2022 साली कोरोनाच्या लाटेतून जग बाहेर पडले होते. त्या वर्षी मैसूर येथे मुख्य कार्यक्रम झालाच; पण योगाभ्यासाचे प्रात्यक्षिक करण्याचा ’गार्डियन रिंग’ उपक्रमदेखील राबविण्यात आला. ‘मानवतेसाठी योग’ ही त्या वर्षीची थीम होती आणि हा उपक्रम त्याला साजेसा होता. पृथ्वी जसजशी सूर्याभोवती फिरते तसतसा वेगवेगळ्या ठिकाणी सूर्योदय होतो. त्याच क्रमाने त्या त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे कार्यक्रम व्हावेत, अशी ती संकल्पना होती. 79 देश, भारताच्या परदेशातील वकिलाती, संयुक्त राष्ट्रसंघाच्या अंतर्गत येणार्‍या विविध संस्था त्यात सहभागी झाल्या होत्या. फिजी येथे सुरुवात आणि पश्चिमेचे टोक म्हणून सॅन फ्रान्सिस्को येथे शेवट असा तो उपक्रम होता. जगाला योगाभ्यासाने कवेत घेतल्याचे ते नयनरम्य दृश्य होते. या सर्वांवर कडी केली ती 2023 सालच्या योग दिनाने. न्यूयॉर्कस्थित संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्य कार्यालयाच्या हिरवळीवर योग दिन साजरा झाला. मोदींनी त्याचे नेतृत्व केले. ’वसुधैव कुटुंबकम्’ ही थीम त्या वर्षी होती. त्याचे प्रतिबिंबच जणू संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिसरात झालेल्या योग दिन सोहळ्यात पडले होते. 135 राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी त्यात सहभाग नोंदविला आणि तो गिनीज विश्वविक्रम ठरला.
 

vivek 
 
गेल्या दहा वर्षांच्या या आलेखातून एक स्पष्ट होते ते म्हणजे जगभरात योगाभ्यासाविषयी जागृती वाढत आहे. त्याच्या असणार्‍या लाभांबद्दलची जाणीव वाढत आहे आणि मुख्य म्हणजे भारताच्या परंपरेतून आलेल्या या देणगीचे मोल जगाला समजू लागले आहे. योगाच्या या ’जागतिकीकरणाचे’ नेमके काय परिणाम झाले हे तपासण्यासाठी दोन निबंधांचा आवर्जून आधार घेणे गरजेचे. एक- ’न्यू इंडिया समाचार’च्या जून 2021 च्या अंकात प्रसिद्ध झालेला ’योगा ग्लोबल’ हा निबंध व ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ योगा’च्या जानेवारी ते एप्रिल 2023 या अंकात प्रसिद्ध झालेले ’दिट्रान्सफॉर्मेटिव्ह इम्पॅक्ट ऑफ दि इंटरनॅशनल डे ऑफ योगा’ हे संपादकीय. या दोन्ही निबंधांमध्ये मिळून मांडलेले काही मुद्दे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या झालेल्या अनुकूल परिणामांवर प्रकाश टाकतील. आयुर्वेद, युनानी आणि सिद्ध उपचार पद्धतींना 1995 साली वेगळा विभाग शासकीय स्तरावर मिळाला. अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात 2003 साली त्या विभागाला आयुष असे नाव देण्यात आले; तर मोदी सत्तेत आल्यानंतर आयुष हे स्वतंत्र मंत्रालय करण्यात आले. आयुर्वेद आणि योगाभ्यास यांना जगभरात मान्यता मिळावी, या दृष्टीने मोदींनी 2014 साली संयुक्त राष्ट्रसंघात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रस्ताव मांडला. सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेत योगाभ्यासाला महत्त्वाचे स्थान मिळावे म्हणून स्वातंत्र्योत्तर काळात जरी प्रयत्न झाले तरी त्यांस हवी तशी गती मिळत नव्हती. 1976 साली देशातील पहिल्या केंद्रीय योग संशोधन संस्थेची स्थापना करण्यात आली. त्या संस्थेचे आताचे नाव मोरारजी देसाई योग संस्था असे आहे. 1978 साली योग आणि नॅचरोपॅथी या क्षेत्रांत संशोधन करण्यासाठी केंद्रीय परिषदेची स्थापना करण्यात आली. मात्र आयुष हे स्वतंत्र मंत्रालय 2014 साली तयार करण्यात आल्यानंतर या सर्व प्रयत्नांना अधिक गती मिळाली. नागरिकांना योगाभ्यासाचे प्रशिक्षण मिळावे, या हेतूने 2016 साली ’नॅशनल बोर्ड फॉर प्रमोशन अँड डेव्हलपमेंट ऑफ योगा अँड नॅचरोपॅथी’ची स्थापना करण्यात आली. ग्रामीण भागांत योगाभ्यासाचा प्रसार करण्यासाठी आशा सेविकांना पुण्यात प्रशिक्षण देण्यात आले. 2021 साली देशातील अनेक राज्यांत योगाला खेळाचा दर्जा देण्यात आला, जेणेकरून त्यात सहभाग वाढेल. एनसीईआरटीने बाराशेहून अधिक केंद्रीय विद्यालयांमध्ये आणि राज्य स्तरावरील हजारो शाळांमध्ये योगाभ्यास हा अभ्यासक्रमाचा भाग केला असल्याने लहानपणापासूनच योगाभ्यासाचा सराव होऊ शकेल आणि त्याचे अनुकूल परिणाम आरोग्यावर होतील. काही विद्यापीठांनी योगाभ्यासासाठी स्वतंत्र विभाग स्थापन केले आहेत. या सर्व स्तरांवरील प्रयत्नांचा परिणाम असा झाला आहे की, योगाभ्यास हा केवळ आंतरराष्ट्रीय योग दिनापुरता मर्यादित राहिलेला नसून ती असंख्यांची जीवनशैली झाली आहे.
 
 
vivek
 
‘नागरिक निरोगी तर देश निरोगी’ हे सूत्र लक्षात घेतले तर योगाभ्यासाचा मोठ्या प्रमाणावर अनुकूल परिणाम झाला आहे असे आढळेल. अर्थात योगाभ्यासाचे आकर्षण आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील वाढतेच आहे. कॅलिफोर्निया येथे भारताबाहेरील पहिल्या योग संस्थेने पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केला आहे. अमेरिकाखेरीज चीन, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया येथे काही विद्यापीठांनी योगाभ्यास अभ्यासक्रम सुरू केले आहेत. आंतरराष्ट्रीय योग दिन सुरू होण्यापूर्वीदेखील योगाचे मोल जाणकारांना आणि योग करणार्‍यांना माहीत होते; पण जगभर आता ज्या पद्धतीने योगाभ्यासाची व्याप्ती वाढते आहे त्यावरून गेल्या दहा वर्षांची ती स्वाभाविक परिणती म्हणावी लागेल. विशेषतः कोरोनाच्या काळात टेली-योगासारख्या उपक्रमांना जगभरातून प्रतिसाद मिळाला होता. व्याधी होऊ नये यासाठी योगाभ्यास करावाच; पण कोरोनासारख्या व्याधीतून बरे झाल्यानंतर लवकर सामान्य जीवन जगता येण्यासाठीदेखील योगाभ्यासाचा मार्ग अनेकांनी पत्करला. योगा हा एक उद्योगच आकाराला येत आहे हाही त्याचाच परिणाम. योगा स्टुडियोपासून योगा क्लबपर्यंत अनेक उपक्रम संख्येने वाढत आहेत. योगाभ्यासासाठी लागणार्‍या मॅटपासून अन्य वस्तूंचे उत्पादन आणि विक्री सातत्याने वाढत आहे. ख्रिश्चन सायन्स मॉनिटरने नमूद केल्याप्रमाणे योगा प्रशिक्षण वर्ग, योगासाठी लागणार्‍या मॅट, बॅग, कपडे यांवर अमेरिकेत होणारी उलाढाल 11 अब्ज डॉलर इतकी अवाढव्य आहे. योगाभ्यासाशी निगडित स्टार्ट अपच्या संख्येत वृद्धी होत आहे आणि योगाशी निगडित मोबाइल अ‍ॅपला सुगीचे दिवस आले आहेत. एवढेच काय, योगाचे प्रशिक्षण घेण्यासाठी किंवा योगाभ्यासातून उपचार घेण्यासाठी योग- पर्यटनात वृद्धी झाली आहे. भारतात हृषीकेश, मैसूर, कोईम्बतूर, हरिद्वार येथे जगभरातून पर्यटक येत आहेत ते योगाभ्यासाच्या आकर्षणाने. भारतातच नव्हे तर इंडोनेशियातील बाली, युरोप-अमेरिकेतील काही भागांत अशीच योग-पर्यटकांची संख्या वाढली आहे. योगाभ्यासाचा अंतर्भाव भारतात ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत रीतसर क्रीडा प्रकार म्हणून करण्यात आला असल्याने योगासनांची लोकप्रियता वाढण्यात मदतच झाली आहे. गूगल, नाईकेसारख्या जागतिक कंपन्यांनी आपल्या कर्मचार्‍यांसाठी योगा-वर्ग सुरू केले आहेत, जेणेकरून तणावाखाली असलेल्या कर्मचार्‍यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल. योगाभ्यासाचा हा वाढता पसारा लक्षात घेऊन त्याच्याशी निगडित साहित्य प्रकाशनाच्या संख्येत 1948 ते 2014 च्या तुलनेत त्यानंतर तब्बल 64 टक्के वाढ झाली आहे. याचाच अर्थ सर्व बाजूंनी योगाभ्यासाने चांगल्या अर्थाने जगाला व्यापून टाकले आहे.
 
 
 
भारतात अनेक योगगुरू होऊन गेले आहेत. मात्र परदेशात योगाभ्यासाचे धडे देणारेदेखील अनेक जण आहेत. त्यांतीलचशार्लोट चोपिन या फ्रेंच योगगुरूंचा गौरव नुकताच पद्मश्री किताबाने करण्यात आला. गेल्या चार दशकांहून अधिक काळ त्या योगशिक्षण देत आहेत. आता त्यांचे वय 101 वर्षांचे आहे. योगाभ्यासाचे महत्त्व विशद करण्यासाठी या दीर्घायुषी योगगुरूपेक्षा अधिक योग्य व्यक्ती कोण असू शकते? मूळच्या रशियातील, मात्र भारतात येऊन तिरुमलाई कृष्णमचारी यांच्याकडून योगाभ्यासाचे शिक्षण घेऊन त्याचा प्रसार चीन, अमेरिका अशा देशांत करणार्‍या इंद्रा देवी यांच्या शिष्यगणांत ग्रेटा गार्बोपासून येहुदी मेहूनीनपर्यंत अनेक वलयांकित व्यक्ती होत्या.
 
 
इंद्रा देवी यांनाही 102 वर्षांचे आयुष्य लाभले होते याचे येथे स्मरण होणे अपरिहार्य. योगाभ्यास भारताच्या प्राचीन परंपरेतून आलेला असला तरी पूर्वीपासूनच जगभरात त्याची स्वीकृती होती; मात्र गेल्या काही काळात त्याला जगभरात लाभलेली लोकप्रियता अभूतपूर्व अशीच आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यामागचा हेतू योगाचा प्रसार आणि त्यातून मानवी कल्याण हाच आहे. तो सफल होत असल्याचा दशकपूर्तीचा ’योग’ भारतीयांना सुखावणाराच आहे, हे निःसंशय.

राहुल गोखले

विविध मराठी / इंग्लिश वृत्तपत्रांतून राजकीय, सामाजिक व आंतरराष्ट्रीय विषयांवर नियमित स्तंभलेखन
दैनिक / साप्ताहिक / मासिकांतून इंग्लिश पुस्तक परिचय सातत्याने प्रसिद्ध
'विज्ञानातील सरस आणि सुरस' पुस्तकाला राज्य सरकारचा र.धों. कर्वे पुरस्कार