ट्रेडमार्कचा वाद - मॅकडोनाल्ड्स पुन्हा बाद

विवेक मराठी    28-Jun-2024   
Total Views |
mcdonald
सुपरमॅक आणि मॅककरी या दोघांनीही मॅकडोनाल्ड्सला चाप लावला आहे. पैसा, कायदेशीर ज्ञान व तज्ज्ञता, वेळेची उपलब्धता अशा सर्वच बाबतीत विषम स्तरावर कायदेशीर लढाई होती; परंतु मॅकडोनाल्ड्सचा दावा अवाजवी होता. ट्रेडमार्कमुळे मिळणार्‍या एकाधिकारशाहीचा, तो वापरण्याच्या गैरहेतूचा विचार या केसेसमध्ये झाला. यातून मॅकडोनाल्ड्ससारख्या कंपन्यांना योग्य संदेश मिळेल आणि लहान उद्योगांना प्रोत्साहन मिळेल, अशी आशा करू या.
आंतरराष्ट्रीय फास्ट फूड रेस्टॉरंट चेन ‘मॅकडोनाल्ड्स’ यांच्यामार्फत जगभरात 'BIG MAC' या नावाने हॅम्बर्गर विकले जाते. डबल मॅक, मेगा मॅक, बिग बिग मॅक, डेनाली मॅक, महाराजा मॅक, लिटल मॅक, ग्रँड बिग मॅक असे त्याचे वेगवेगळे प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. थोडक्यात, मॅकडोनाल्ड्सचा MAC/Mc हा ब्रँड/ट्रेडमार्क जगभरात प्रसिद्ध आहे; पण आयर्लंडच्या सुपरमॅकने दाखल केलेल्या दाव्यात युरोपियन युनियनच्या जनरल कोर्टाने 5 जून 2024 रोजी निकाल दिला आणि EU मधील खाद्य उत्पादने, पेये आणि रेस्टॉरंट सेवांच्या लांबलचक सूचीवर ’'Mc' ’ शब्द वापरण्याचे मॅकडोनाल्ड्सचे ट्रेडमार्क अधिकार रद्द केले; तथापि, EU बॉडीने चिकन नगेट्स आणि मांस, मासे, डुकराचे मांस आणि चिकन सँडविचसह त्यांच्या सँडविच उत्पादनांच्या श्रेणीवरील 'Mc' ट्रेडमार्कच्या मालकीचे हक्क अबाधित ठेवले. एका अर्थाने मॅकडोनाल्ड्सने आपला MAC हा ट्रेडमार्क अंशतः का होईना गमावला आहे.
 
ट्रेडमार्कचे एवढे महत्त्व का?
 
ग्राहकांना वस्तू खरेदी करताना दर्जाची खात्री पाहिजे असते, तर दुसरीकडे स्पर्धेच्या बाजारपेठेत उत्पादक आणि वितरकांनाही आपला माल इतरांपेक्षा वेगळ्या दर्जाचा व गुणवत्तेचा आहे याची ओळख ग्राहकांना पटवून द्यायची असते. ग्राहकांच्या व उत्पादक आणि वितरकांच्या या गरजेवर उपाय आहे ‘ट्रेडमार्क’. आपण बाजारातील अनेक वस्तूंवर एखादे विशिष्ट अक्षर, चिन्ह, खूण, शब्द, आकडा पाहतो आणि त्यावर 'TM'असे लिहिलेलेही वाचतो. त्यालाच ट्रेडमार्क म्हणतात. झपाट्याने विस्तारलेल्या प्रसिद्धिमाध्यमांद्वारे ट्रेडमार्क सतत ग्राहकांसमोर ठेवणे स्पर्धेच्या बाजारपेठेत आवश्यक झाले. ट्रेडमार्कशी वस्तूच्या विशिष्ट दर्जाची खात्री व उत्पादकाची ख्याती जोडलेली असते. कंपनीला ग्राहक मिळवणे व टिकवणे ट्रेडमार्कमुळे सुलभ होते.
 
 
ट्रेडमार्क ही बौद्धिक संपदा आहे व तिला कायद्याने संरक्षण दिलेले आहे. ट्रेडमार्क कायद्यानुसार ट्रेडमार्कची नोंदणी केली जाते. नोंदणी करणार्‍यास तो ट्रेडमार्क वापरण्याचा एकाधिकार मिळतो. ट्रेडमार्कधारकाची परवानगी न घेता जसाच्या तसा किंवा त्याच्याशी साधर्म्य असलेला ट्रेडमार्क मुद्दाम किंवा ग्राहकांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने अन्य कोणी वापरला तर ट्रेडमार्क एकाधिकाराचे उल्लंघन होते व ट्रेडमार्कधारक त्यासाठी कोर्टातून मनाई घेऊ शकतो. तसेच नुकसानभरपाईसुद्धा मागू शकतो. थोडक्यात, ट्रेडमार्क ही धंदा व नफा वाढवण्यासाठी मदत करणारी कायदेशीर बौद्धिक संपदा आहे.
 
 
 
मॅकडोनाल्ड्स आणि MAC (Mc) हा ट्रेडमार्क
 
1940 साली अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे मॅकडोनाल्ड्सने आपल्या उद्योगास सुरुवात केली. 1996 मध्ये कंपनीने 'BIG MAC' असे ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन घेतले. सध्या त्यांची 120 देशांत 37855 इतकी फास्ट फूड रेस्टॉरंट्स आहेत. कंपनी दररोज 69 दशलक्ष ग्राहकांना सेवा देत आहे. कंपनीची वार्षिक विक्री सुमारे 25 अब्ज डॉलर्स असून नक्त नफा सुमारे 6 अब्ज डॉलर्स आहे. मॅकडोनाल्ड्सचे जागतिक ब्रँड मूल्यांकन सहाव्या क्रमांकाचे आहे. अशा या महाकाय आणि प्रचंड ब्रँड व्हॅल्यू असलेल्या बहुराष्ट्रीय कंपनीने आपला ट्रेडमार्क संरक्षित ठेवण्यासाठी बरेच काही केले. त्यातील एक उदाहरण म्हणजे बेंगळुरूस्थित सॅनिटरीवेअर डीलर पीसी मल्लाप्पा अँड कंपनी यांच्याविरोधात मॅकडोनाल्ड्स कंपनीने कर्नाटक कोर्टात लावलेला 1994 मधील दावा. मॅकडोनाल्ड्स या अमेरिकन फास्ट-फूड कंपनीने त्यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय अशा ’गोल्डन एम’ लोगोचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आणि पूर्णपणे भिन्न व्यवसाय क्षेत्रात असूनही, पीसी मल्लाप्पा अँड कंपनीला आपला लोगो सोडावा लागला. कर्नाटक उच्च न्यायालयाने नमूद केले की, लोगोमधील समानतेमुळे ग्राहकांना असे वाटू शकते की, पीसी मल्लाप्पा कोणत्या तरी प्रकारे मॅकडोनाल्ड्सशी संबंधित आहे.
 

mcdonald  
सुपरमॅकची यशस्वी कायदेशीर लढत
 
या पार्श्वभूमीवर तुलनेने लहान असलेल्या सुपरमॅकने बलाढ्य मॅकडोनाल्ड्सशी कायदेशीर लढत देत मॅकडोनाल्ड्सचे (MAC) ट्रेडमार्क अधिकार अंशतः रद्द केले. आयर्लंडमधील 100 हून अधिक फास्ट-फूड रेस्टॉरंट्सच्या मालकीच्या सुपरमॅकने धंदाविस्तार योजनेअंतर्गत युरोपियन युनियन बौद्धिक संपदा कार्यालयाकडे आपल्या कंपनीचे नाव नोंदविण्यासाठी अर्ज केला. त्याला मॅकडोनाल्ड्सने हरकत घेतली. BIG MAC हा आपला नोंदविलेला ट्रेडमार्क आहे आणि Super Mac या नावाने ग्राहकांचा गोंधळ होईल, असे म्हटले. सुपरमॅक आणि बिग मॅक या नावांतील समानतेबद्दल मॅकडोनाल्ड्सने 2017 मध्ये लढाई अंशतः जिंकली होती आणि सुपरमॅक केस अंशतः हरले. निकाल असा होता की, ते त्याच्या रेस्टॉरंटचे नाव Super Mac ठेवू शकतात; परंतु त्याच्या मेनूवरील आयटमची विक्री करण्यासाठी Mac लेबल वापरू शकत नाही.
 
त्याविरोधात सुपरमॅकने अपील केले. McDonald's ने असा युक्तिवाद केला होता की, ’ 'Mc'’ हा आमचा कायदेशीर ट्रेडमार्क आहे आणि त्या शब्दाचा दीर्घ आणि सतत वापर केल्यामुळे, ग्राहकांना तो माहीत आहे; परंतु सुपरमॅकचा असा युक्तिवाद होता की, 'Mc' हा आयर्लंड, युनायटेड किंगडम आणि इतरत्र संपूर्ण युरोपियन युनियनमध्ये आडनावांसाठी एक सामान्य उपसर्ग आहे. आडनावाचा भाग म्हणून 'Mc' हा उपसर्ग असलेल्या पब, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्यपदार्थांची मोठी संख्या असल्याचे त्याने निदर्शनास आणले. आयरिश फर्मने असा दावा केला की, मॅकडोनाल्ड्सने 'Mc' हा उपसर्ग स्वतंत्र अर्थाने कधीही वापरला नाही, शिवाय युरोपियन युनियनच्या कायद्यानुसार ट्रेडमार्कचा वापर सतत पाच वर्षे केलेला असला पाहिजे. सुपरमॅकने मॅकडोनाल्डची बिग मॅक ट्रेडमार्क नोंदणी रद्द करण्यासाठी EU च्या बौद्धिक संपदा कार्यालयाकडे 2017 मध्ये विनंती दाखल केली. EU बौद्धिक संपदा कार्यालय (EUIPO) ने सुरुवातीला सुपरमॅकचा अर्ज मंजूर केला; परंतु नंतर मॅकडोनाल्डच्या अपिलावर निकाल देताना मॅकडोनाल्डच्या बिग मॅक हॅम्बर्गर्ससाठी ट्रेडमार्कला संरक्षण दिले. यावर सुपरमॅकने जनरल कोर्टात धाव घेतली.
 
 
त्याचा निकाल 5 जून 2024 रोजी लागला. सुपरमॅकने कोर्टाला सांगितले की, मॅकडोनाल्ड्स त्याच्या चिकन बर्गरसाठी, ड्राइव्ह थ्रू आणि टेक अवे सेवांसाठी त्यांचा बिग मॅक ट्रेडमार्क वापरत नाही. हे EU च्या ट्रेडमार्क कायद्याचे स्पष्ट उल्लंघन आहे, कारण कायद्यात सतत पाच वर्षे ट्रेडमार्क वापरण्याची अट आहे. तसे न केल्यास, न वापरलेला ट्रेडमार्क रद्द होऊ शकतो.
 
जगभरात मांस आणि पोल्ट्री हे वेगवेगळे घटक मानले जातात आणि मॅकडोनाल्ड्सने EU मधील मेनूमध्ये चिकन बिग मॅकवर पुरेसा भर दिला नाही. आपल्या पोल्ट्री उत्पादनांसाठी बिग मॅक ट्रेडमार्कचा खर्‍या अर्थाने वापर करत असल्याचे मॅकडोनाल्ड्स न्यायालयात सिद्ध करू शकले नाही. सबब मॅकडोनाल्ड्स आपला 'BIG MAC' हा ट्रेडमार्क बीफ बर्गरसाठी वापरू शकेल; पण चिकन बर्गरसाठी नाही.
 
 
निकालाचा बोध
 
सुपरमॅक या तुलनेने छोट्या कंपनीने मॅकडोनाल्ड्स या महाकाय बहुराष्ट्रीय कंपनीवर दावा करून अंशतः का होईना कायदेशीर मार्गाने ट्रेडमार्क रद्द करवला. या निकालाने 2009 सालच्या एका निकालाची आठवण होणे स्वाभाविक आहे. तो खटला मॅकडोनाल्ड्सने मलेशियातील मॅककरी (McCurry) या एका भारतीयाच्या मालकीच्या अगदी छोट्या आणि एकमेव रेस्टॉरंटवर लावला होता. ‘मॅक’ हा उपसर्ग मॅककरीने लावू नये, कारण ‘मॅक’ लावण्याचा अधिकार आमचा आहे, असा दावा मॅकडोनाल्ड्सने मलेशियाच्या कोर्टात केला होता. MC शब्द म्हणजे मलेशियन चिकनचे संक्षिप्त रूप आहे, असे मॅककरीने मांडले. शिवाय मॅकडोनाल्ड्सचा ट्रेडमार्क केवळ 'M' आहे, 'MC' नाही, हा तर्क आणि भिन्न पदार्थांचा व्यापार या तीन आधारांवर मॅककरीने मॅकडोनाल्ड्सच्या दाव्याला कसून विरोध केला. 2001 साली मॅकडोनाल्ड्सने केलेल्या दाव्याचा निकाल 2006 साली मॅकडोनाल्ड्सच्या बाजूने लागला आणि मॅककरीला ‘मॅक’ ही अक्षरे वापरण्यास प्रतिबंध करण्यात आला. त्यावर मॅककरीने अपील केले. एप्रिल 2009 मध्ये कोर्ट ऑफ अपीलने 2006 चा निकाल रद्द केला आणि पूर्वस्थिती कायम केली. यावर मॅकडोनाल्ड्स सर्वोच्च न्यायालयात गेली. तीन सदस्यांच्या खंडपीठाने 8.9.2009 रोजी एकमुखाने निर्णय दिला की, मॅकडोनाल्ड्सच्या दाव्यात कोणतेही तथ्य नाही. मॅक या अक्षरांवर मॅकडोनाल्ड्सचा एकाधिकार असू शकत नाही. अन्य कोणीही मॅकडोनाल्ड्सपेक्षा भिन्न खाद्यपदार्थ पुरविण्याचा धंदा करत असेल तर त्याला मॅक ही अक्षरे वापरण्यास प्रतिबंध करता येणार नाही.
 
 
ट्रेडमार्क, पेटंट्स असे बौद्धिक संपदा अधिकार मिळवून बाजारात एकाधिकारशाही मिळवायची आणि त्या जोरावर छोट्या स्पर्धकांना बाजारात प्रवेश करू द्यायचा नाही, या वृत्तीला सुपरमॅक काय किंवा मॅककरी काय, यांनी चाप लावला. पैसा, कायदेशीर ज्ञान व तज्ज्ञता, वेळेची उपलब्धता अशा सर्वच बाबतीत विषम स्तरावर कायदेशीर लढाई होती; परंतु मॅकडोनाल्ड्सचा दावा अवाजवी होता. ट्रेडमार्कमुळे मिळणार्‍या एकाधिकारशाहीचा, तो वापरण्याच्या गैरहेतूचा विचार या केसेसमध्ये झाला. त्यातून मॅकडोनाल्ड्ससारख्या कंपन्यांना योग्य संदेश मिळेल आणि लहान उद्योगांना प्रोत्साहन मिळेल, अशी आशा करू या.

सी.ए. डॉ. विनायक म. गोविलकर

डाॅ. विनायक म. गोविलकर हे मराठीत अर्थशास्त्रावर सोप्या भाषेत ललित लेखन करणारे लेखक आहेत. ते एम.काॅम. एल्एल.बी. एफ.सी.ए. पीएच.डी. आहेत. ते अनेक परीक्षांत पहिला नंबर मिळवून गुणवत्ता यादीत आले आहेत.