डॉ. कमला सोहोनी

विवेक मराठी    05-Jun-2024   
Total Views |
विद्यावाचस्पती झालेली भारतातील
पहिली महिला वैज्ञानिक
(18 जून 1911 - 28 जून 1998)
तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी या ताडगोळ्याकडे कमलाबाईंचं लक्ष वेधलं आणि त्यातून जन्माला आलं ते नीरा (अल्प मूल्य पोषण आहार) नावाचं पेय. महामार्गांवर आणि हमरस्त्यांवर उभ्या असणार्‍या नीरा विक्रेत्यांच्या टपर्‍या आपण नेहमीच पाहतो; परंतु त्यामागे कमलाबाईंचं संशोधन दडलेलं आहे हे आपल्याला ठाऊक नसतं.
kamala
 
काळापुढच्या स्त्रियांचा वेध घेताना जून महिन्यावर जिनं आपल्या नावाची अनभिषिक्त मुद्रा उमटवलेली दिसली, अशी स्त्री म्हणजे भारतातील पहिली महिला वैज्ञानिक डॉ. कमला सोहोनी. कमला सोहोनी या मूळच्या भागवत. विदुषी दुर्गा भागवत यांची ही सख्खी बहीण. त्यांचा जन्म इंदूरचा, 1911 सालचा. कमलाबाईंचे वडील नारायणराव भागवत आणि त्यांचे काका माधवराव भागवत हे दोघेही मूळचे बंगलोर येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसचे रसायनशास्त्राचे विद्यार्थी. कमलाबाईंनी हा विज्ञानाचा वारसा जपला आणि वयाच्या 22 व्या वर्षी, 1933 साली, त्या मुंबई विद्यापीठातून रसायनशास्त्र आणि पदार्थविज्ञान हे विषय घेऊन बी.ए.स्सी. पदवी उत्तीर्ण झाल्या.
 
 
विज्ञान विषयातच मूलभूत संशोधन करायचं, असं मनाशी पक्कं ठरवलेल्या कमलाबाईंनी बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सकडे अर्ज केला; पण त्या संस्थेचे तत्कालीन संचालक आणि प्रसिद्ध नोबेल विजेते प्रा. सी. व्ही. रामन यांनी त्यांचा अर्ज फेटाळून लावला. अशा संशोधनासाठी महिला पात्र नाहीत, अशी भूमिका घेत कमलाबाईंचा अर्ज नाकारला गेल्यानं कमलाबाईंनी रामन यांच्या कार्यालयाबाहेर सत्याग्रह पुकारला. मला प्रवेश द्या, मी अत्युच्च श्रेणीत उत्तीर्ण होऊन दाखवीन, असं आव्हानच कमलानं रामन यांना दिलं. त्यांच्या आग्रहापुढे रामन यांना नमावं लागलं. त्यांनी कमलाबाईंना प्रवेश देऊ केला; पण काही आत्यंतिक जाचक अटी घालून.
 
 
कमलाबाईंना इतर विद्यार्थ्यांप्रमाणे सामान्य विद्यार्थी म्हणून प्रवेश मिळणार नाही, पहिलं संपूर्ण वर्ष त्यांचा प्रवेश हा अस्थायी स्वरूपाचा असेल, गाईड सांगेल तसं आणि तेव्हा रात्री-अपरात्री काम करावं लागेल, स्वतः रामन यांना कमलाबाईंच्या संशोधनाची गुणवत्ता पटत नाही, तोपर्यंत त्यांच्या संशोधनाला अधिकृत दर्जा प्राप्त होणार नाही, आपल्याला मिळणार्‍या दुय्यम वागणुकीकडे पुरुषी सहकारी विद्यार्थ्यांचं लक्ष वेधेल असं वागून संस्थेतील शैक्षणिक वातावरण प्रदूषित करणार नाही, अशा काही अटींचा त्यात अंतर्भाव होता..
 
 
बावीस वर्षीय कमलाबाईंना अखेरीस त्या अटींवर प्रवेश मिळाला. संस्थेत प्रवेश मिळालेल्या त्या पहिल्या महिला संशोधक विद्यार्थिनी बनल्या; पण त्यांनी आपला रोष जाहीरपणे प्रकट केलाच. एका सत्कार समारंभात बोलताना त्यांनी आपल्यावरील अन्यायाला जाहीर वाचा फोडली. रामन यांच्यासारखा नोबेल विजेता वैज्ञानिक जर असा महिलांना दुय्यम दर्जा देऊ लागला, तर महिलांनी कोणत्या आशा बाळगायच्या, असा सवाल त्या करू लागल्या. 1931 ते 1938 या आठ वर्षांत पाच महत्त्वाच्या शिष्यवृत्त्या त्यांना प्राप्त झाल्या; पण कमलाबाईंनी श्रीनिवास यांच्या मार्गदर्शनाखाली आपलं संशोधन सुरू ठेवलं. दूध-डाळी-शेंगा यातून मिळणार्‍या प्रथिनांवर त्यांचं संशोधन बेतलेलं होतं. त्या संशोधनाची गुणवत्ता पाहून रामन यांनी आपला पूर्वनिर्णय बदलला आणि 1936 पासून विद्यार्थिनींना प्रवेश देण्यास सुरुवात केली. 1937 मध्ये कमलाबाईंना केम्ब्रिज विद्यापीठात डॉ. डेरेक रिख्टर यांच्या मार्गदर्शनाखाली फ्रेडरिक हॉपकिन्स लॅबोरेटरीत संशोधन करण्याची संधी मिळाली. मुंबई विद्यापीठाच्या ’स्प्रिंगर रिसर्च’ आणि ’सर मंगलदास नथूभाई’ या शिष्यवृत्त्या मिळवून त्या इंग्लंडला गेल्या; पण रिख्टर मध्येच विद्यापीठ सोडून गेले आणि डॉ. रॉबिन हिल यांच्या मार्गदर्शनाखाली कमलाबाईंचं संशोधन सुरू झालं. त्यांनी बटाट्यावर संशोधन सुरू ठेवलं आणि बटाट्यातील ‘सायटोक्रोम सी‘ या जैविक उत्प्रेरकाचा शोध त्यांना लागला. अवघ्या 14 महिन्यांत त्यांचं संशोधन पूर्ण झालं आणि त्यांना डॉक्टरेट मिळाली.
1939 मध्ये कमलाबाई भारतात परत आल्या. खरं तर त्यांना भारतात परत यायचं होतं ते महात्मा गांधींची अनुयायी बनून स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्यासाठी; पण त्यांची नवी दिल्लीतील लेडी हार्डींज मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापक आणि बायोकेमिस्ट्री विभागाच्या प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर काही काळ त्यांना कुन्नूरच्या न्यूट्रिशन रिसर्च लॅबोरेटरीमध्ये असिस्टन्ट डायरेक्टर म्हणून काम करण्याची संधी लाभली. कमलाबाई उत्तम टेनिस खेळत, अनेक प्रतिष्ठेच्या सामन्यांत त्या खेळल्या आणि विजेत्या चषकांवर त्यांनी आपले नाव कोरले.
संशोधनाची अशी उज्ज्वल कारकीर्द सुरू असतानाच 1947 साली त्यांचं एम. व्ही. सोहोनी यांच्याशी लग्न झालं. त्या मुंबईत आल्या. सोहोनी अगदी वेगळ्या क्षेत्रात कार्यरत होते. ते अँक्च्युरियन होते. कमलाबाई मुंबईत येताच रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये बायोकेमिस्ट्री विभागात प्रोफेसर म्हणून रुजू झाल्या. वास्तविक पाहता त्या इन्स्टिट्यूटच्या डायरेक्टर व्हायच्या; परंतु पुरुषी मक्तेदारी मध्ये आली आणि त्यांना ते पद मिळायला चार वर्षे रखडावं लागलं. या चार वर्षांत त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांच्या मदतीनं चार अगदी वेगळ्या खाद्यपदार्थांवर काम सुरू केलं. हे चारही पदार्थ निम्नमध्यमवर्गीय माणसांच्या दैनंदिन खाण्यात येणारे होते. त्यातलाच एक होता ताडगोळा.
ताडगोळ्यातील द्रव पदार्थ अ, क जीवनसत्त्व आणि लोहयुक्त असल्यानं त्याचं सेवन प्रकृतीला उपयुक्त ठरणारं. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी या ताडगोळ्याकडे कमलाबाईंचं लक्ष वेधलं आणि त्यातून जन्माला आलं ते नीरा नावाचं पेय. कुपोषित मुलांच्या पोषणासाठी आणि आदिवासी समाजातील गर्भवती स्त्रियांसाठी अल्प मूल्य पोषण आहार म्हणून नीरा या पेयाचा वापर केला जातो आणि त्यांचं आरोग्य त्यानं सुधारतं हे सिद्ध झाल्यानंतर तर कमलाबाईंच्या या संशोधनाची दखल सरकारी पातळीवर घेतली गेली आणि त्यांना राष्ट्रपती पुरस्कारानं गौरवण्यात आलं. महामार्गांवर आणि हमरस्त्यांवर उभ्या असणार्‍या नीरा विक्रेत्यांच्या टपर्‍या आपण नेहमीच पाहतो; परंतु त्यामागे कमलाबाईंचं संशोधन दडलेलं आहे हे आपल्याला ठाऊक नसतं.
निवृत्तीनंतर 1969 साली त्यांनी स्वयंपाकघरात तयार होणार्‍या खाद्यपदार्थांवर संशोधन करून अनेक लेख लिहिले. त्यावरचे त्यांचे पुस्तक ‘आहार-गाथा‘ या नावाने प्रसिद्ध झाले आहे. कमलाबाई मुंबईच्या आरे दुग्ध प्रकल्पाच्या सल्लागारपदी नियुक्त झाल्या. दूध नासू नये यासाठीची एक आदर्श पद्धती त्यांनी विकसित केली, त्या कामाचीही दखल सरकारी पातळीवर घेतली गेली आणि त्यांना राष्ट्रपती सन्मानानं गौरवण्यात आलं. 1966 साली त्या निवृत्त झाल्या आणि त्यांनी आयुष्याच्या उत्तरार्धात ‘ग्राहक प्रबोधन’ हेच आपलं कार्यक्षेत्र बनवलं. कमलाबाईंच्या मार्गदर्शनाखाली 25 जणांना एम.ए.स्सी. आणि 17 जणांना पी.एच.डी. प्राप्त झाली. कमलाबाई कन्झुमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेशी जोडल्या गेल्या. 1982-83 या वर्षी तर त्या सोसायटीच्या अध्यक्ष बनल्या. ‘किमत’ या सोसायटीच्या मुखपत्रासाठी त्यांनी अनेक लेख लिहिले. 1998 साली त्यांचं दुर्दैवी अपघाती निधन झालं. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या एका कार्यक्रमात नवी दिल्लीत एका सत्कार समारंभातच त्या कोसळल्या आणि गेल्या. गूगल या सर्च इंजिनानं 112 व्या जन्मदिनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर गूगल डूडल सादर केलं.

सुधीर जोगळेकर

  सुधीर जोगळेकर हे ज्येष्ठ पत्रकार आहेत..