दक्षिणान्वयार्थ

विवेक मराठी    08-Jun-2024   
Total Views |
2019 च्या तुलनेत दक्षिणेत सत्ताधारी भाजपाच्या जागांमध्ये वाढ झालेली नसली तरी एकूण मतांच्या टक्केवारीत आणि प्रभाव क्षेत्रांचा विचार केला तर त्याची व्याप्ती आणि संदर्भ नक्कीच बदललेत. नवीन जागी उमेदवार जिंकून आले आहेत. पक्ष म्हणून त्यांच्यासाठी ते उत्तमच आहे. या जागा आणखी कशा वाढतील यावर पुढच्या पाच वर्षांत विचार आणि काम करण्याची गरज आहे.

lok sabha election 2024
 
4 जून रोजी तमाम ’एक्झिट पोल’, ’राजकीय पंडित’ ह्यांचा अंदाज चुकवत 18 व्या लोकसभेचे अनपेक्षित निकाल समोर आले. हा धक्का जसा राजकीय पंडितांना होता, तसाच तो राजकीय पक्षाच्या नेत्यांना आणि समर्थकांनादेखील होता. महत्त्वाच्या जागांच्या बाबतीत दक्षिणेतले निकाल उत्तरेतल्या निकालाइतके फारसे धक्कादायक नसले तरी त्याचा ऊहापोह होण्याइतके ते महत्त्वाचे नक्कीच आहेत. 2019 च्या तुलनेत दक्षिणेत सत्ताधारी भाजपाच्या जागांमध्ये वाढ झालेली नसली तरी एकूण मतांच्या टक्केवारीत आणि प्रभाव क्षेत्रांचा विचार केला तर त्याची व्याप्ती आणि संदर्भ मात्र नक्कीच बदललेत. म्हणूनच त्याची राज्यानुसार चर्चा करायला हवी.
 
केरळ
 
केरळ हे तसं कट्टर भाजपाविरोधी राज्य. इतकं की स्वातंत्र्यापासून ते आजपर्यंत गेल्या जवळजवळ आठ दशकांत तिथे भाजपाचा एकही खासदार निवडून आला नाही. 2014, 2019 च्या मोदी लाटेतही नाही! पण यंदा 2024 साली थ्रिसुर म्हणजेच त्रिशुर मतदारसंघात भाजपाचे सुरेश गोपी निवडून आले. कमळाच्या चिन्हावर निवडून आलेले ते तसे पहिलेच खासदार. फक्त त्रिशुर लोकसभा मतदारसंघापर्यंतच भाजपाचं हे यश सीमित नाही. अजून एक नेत्रदीपक कामगिरी होती ती ’आलपुळा’ लोकसभा मतदारसंघात. हा मतदारसंघ तसा परंपरागत ’कम्युनिस्टांचा गड’. 2019 लोकसभा मतदारसंघात आलेली ’एलडीएफ’ची एकमेव जागा ही ’आलपुळा’! 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या शोभा सुरेंद्रन ह्यांना तब्बल तीन लाख मतं मिळाली. हा आकडा बर्‍यापैकी मोठा आहे. आतिंगळ मतदारसंघात भाजपचे ’व्ही. मुरलीधरन’ ह्यांचा फक्त 16,000 मतांनी पराभव झाला. राहुल गांधी ह्यांनी जिथून निवडणूक लढवली त्या वायनाड मतदारसंघातही भाजपाच्या केरळ प्रदेशाध्यक्षांनी निवडणूक लढवली होती, त्यात त्यांना जवळजवळ एक लाख बेचाळीस हजार मतं पडलीत! संपूर्ण देशात भाजपाने दिलेला एकमेव मुस्लीम लोकसभा उमेदवार केरळमधील मलप्पुरम मतदारसंघात, डॉ. अब्दुल सलाम, त्यांना जवळजवळ 85,000 मतं मिळालीत. यंदा केरळमध्ये भाजपाचं मताधिक्य तब्बल 16.68% इतकं झालंय! हे नक्कीच लक्षणीय आहे.
lok sabha election 2024 
  सुरेश गोपी
 
केरळचा विचार करायचा तर केरळ एका राजकीय परिवर्तनातून जातोय. गेली सहा दशकं केरळात डावीप्रणीत एलडीएफ आणि काँग्रेसप्रणीत यूडीएफ ह्या दोनच आघाड्या आलटून पालटून सत्तेत यायच्या. त्याच आघाड्या तेच आरोप; पण केरळी जनता आता वेगळा विचार करायला लागली आहे. त्यांना भाजपा हा सक्षम पर्याय वाटू लागलाय. त्यामुळे कदाचित येत्या काही वर्षांत भाजपा ’एलडीएफ’ची जागा व्यापताना दिसेल! हे फार जबाबदारीने मी बोलतोय; केरळला स्वतः पाच वर्षं केलेल्या कामाच्या अनुभवावरून बोलतोय! येणार्‍या निवडणुकीत ’पिन्नाराई विजयन’ ह्यांच्या राजकीय निवृत्तीनंतर ह्याची प्रक्रिया वेगाने सुरू होईल!
 
 
तमिळनाडू
 
या निवडणुकीत दक्षिणेतील सगळ्यात जास्त चर्चिलं गेलेलं हे राज्य! मोदींच्या सभा, असंख्य दौरे, रोड शो, सगळ्याने परिपूर्ण अशी प्रचार मोहीम, पहिल्याच चरणात निवडणूक आटोपलेलं कदाचित सगळ्यात मोठं राज्य! भाजप, स्वतः पंतप्रधान मोदी ह्यांनी बर्‍यापैकी जोर लावला होता. ’अन्नामलाई के.’ ह्यांच्या रूपाने भाजपाला तरुण तडफदार प्रदेशाध्यक्ष लाभलेला. भाजपाला अपेक्षित असा विजय तमिळनाडूत मिळाला नसला तरी मतांची टक्केवारी जरूर वाढली. भाजपाला 11.2% मतं मिळाली भाजपा आघाडीला मिळालेल्या मतांची टक्केवारी काँग्रेसच्या टक्केवारीपेक्षाही अधिक आहे. तरीही काँग्रेसला नऊ जागा आणि भाजपाला एकही जागा मिळाली नाही. तमिळनाडू हा द्रविड राजकारणाचा उगमस्रोत मानला जातो. त्यामुळे उत्तरेतली समजली जाणारी भारतीय जनता पार्टी इथे हळूहळू रुजतेय ह्यालाही महत्त्व आहे. वाडा चेन्नई (दक्षिण चेन्नई) मध्ये भाजपाच्या साई सुंदर राजन ह्या दुसर्‍या क्रमांकावर राहिल्या! अशा आणखी काही जागा आहेत जिथे भाजपा दुसर्‍या जागी राहिला.
 
 
lok sabha election 2024
 
अम्मांच्या निधनानंतर जयललिता ह्यांचा पक्ष शब्दशः पोरका झाला. मोदींनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला असला तरी जयललितांनंतर शशिकला, दिनकरन, एपीएस पलानीस्वामी, ओपीएस पनीरसेल्वम ह्यात पक्ष विभागला गेला. पुढे ओपीएस वेगळे झाले. त्यांनी आपली वेगळी अपक्ष म्हणून चूल मांडली आणि अण्णाद्रमुक पक्षाचं वाटोळं होण्याचं वर्तुळ पूर्ण झालं! आंध्र प्रदेशात जो निर्णय उशिरा का होईना गेम चेंजर ठरला तोच निर्णय न घेतल्यामुळे तमिळनाडूत भाजपाला हे चित्र बघावं लागलं! अण्णाद्रमुक (ओपीएस, ईपीएससकट) आणि भाजपाचे मित्रपक्ष ही युती डीएमके-काँग्रेस युती समोर गेली असती तर चित्र आज दिसतंय त्याच्या पूर्ण उलटं दिसलं असतं! ह्या राज्यातली जनता मोदी ह्या व्यक्तीवर जरूर प्रेम करते; पण आजही लोक भाजपाला मतं द्यायला उत्सुक नाहीत हे वास्तव लक्षात घेऊन इथे आवश्यक ती पावलं उचलायला लागतील.
 
केरळ आणि तमिळनाडू ह्या राज्यातील सगळ्यात मोठी धोक्याची घंटा ह्या राज्यात मुस्लीम लीगने तीन जागा पटकावल्या, ही आहे. हे खरोखर चिंतनीय आहे.
 
 
कर्नाटक
 
कर्नाटक माझ्यासाठी वैयक्तिकरीत्या दक्षिणेतील सगळ्यात रोचक राज्य होतं! काही महिन्यांपूर्वी तिथे काँग्रेसला दणदणीत बहुमत मिळाले होते. अंदाज होता काँग्रेस ह्या लोकसभा निवडणुकीत उत्तम कामगिरी पार पाडेल; पण विधानसभेच्या दणक्यानंतर भाजपा सावरली आणि त्यांनी उत्तम कामगिरी करत लोकसभेच्या 17 जागा खिशात घातल्या. कर्नाटकात तशा लक्षवेधी ठरल्या दोन जागा. पहिली होती देवेगौडा परिवाराची परंपरागत हासनची जागा, जिथे बलात्काराचे आरोप असणारा देवेगौडांचा नातू प्रज्वल रेवण्णा पराभूत झाला आणि दुसरी जागा बंगलोर ग्रामीण लोकसभा मतदारसंघाची जागा जिथे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे बंधू डी.के. सुरेश यांचा भाजपाच्या डॉ. सीएन मंजुनाथ ह्यांनी केलेला पराभव! हा पराभव शिवकुमार यांना जिव्हारी लागणारा आहे. यामागे मुख्यमंत्री सिद्धरामैय्या ह्यांनी शिवकुमार ह्यांचा केलेला गेम, हे कारण असल्याची चर्चा आहे. यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आणली गेली हे निश्चित!
 
 
lok sabha election 2024
 
कर्नाटकात मुस्लीम आरक्षण, मुस्लीमधार्जिणे घेतलेले काही निर्णय, हेदेखील लोकसभा निवडणुकीत बर्‍यापैकी प्रभाव टाकणारे ठरले! या सगळ्या धावपळीत येडियुरप्पा यांचा मुलगा शिमोग्यातून जिंकला. तिथे भाजपातील बंडखोरीमुळे भाजप धुरीणांची थोडी चिंता वाढली होती; पण बर्‍यापैकी उत्तमरीत्या हा विजय मिळाला. एकूण काय, कर्नाटकातील लोकसभा निवडणुकीचे निकाल खूप दरवाजे उघडे करून गेलेत. नेमके कोणते ते आगामी काळात अधिक स्पष्ट होत जातील.
 
 
lok sabha election 2024
 पवन कल्याण
 
 
आंध्र/तेलंगणा
 
दक्षिणेतली लोकसभेतली हासील-ए-महफिल राज्य ठरली आंध्र आणि तेलंगणा. त्या मागचा सामनावीर निर्विवादपणे ठरला तेलुगू चित्रपटांचा ’पॉवरस्टार पवन कल्याण’! दिवस 9 सप्टेंबर 2023 चा, आंध्रचे मुख्यमंत्री जगनने माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू ह्यांना कौशल्य विकास कार्यक्रमातील भ्रष्टाचाराच्या आरोपावरून जेलमध्ये घातलं! ह्या संधीचं सोनं केलं पवन कल्याणने! तेलुगू देसम आणि पवनचा जनसेना पक्ष तसे विरोधक; पण ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ ह्या फॉर्म्युल्याने पवनने 14 सप्टेंबरला चंद्राबाबूंची थेट तुरुंगात जाऊन भेट घेतली. तो जाऊ नये म्हणून वायएसआर काँग्रेसचेसर्वेसर्वा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी ह्यांनी अख्खी यंत्रणा लावली, तरीही फिल्मी स्टाईल हिरोगिरी करत त्याने बाबूंची भेट घेतलीच! आणि बाहेर येत टीडीपी, जनसेना युतीची घोषणा केली! सबंध आंध्रात रोड शोची धूम पवनने उडवून दिली! पवन हा कापू समाजाचा, तर बाबू हे कम्मा समाजाचे. दोघांचे लक्ष्य तसे आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या बळकट असलेला रेड्डी समाज आणि पर्यायाने रेड्डी राजकारणाशी दोन हात! पवनच्या लढाऊ बाण्याने जगनच्या राजकारणाला आणि सत्तेला हादरे बसायला सुरुवात झाली! पवन हा ’सुपरस्टार चिरंजीवी’चा धाकटा भाऊ! ’प्रजाराज्यम’पासून तो राजकारणात होता. प्रजाराज्यम जेव्हा चिरंजीवीने काँग्रेस पक्षात विसर्जित केला तेव्हाही ते पवनला फारसं रुचलं नव्हतं. आताही भाजपाला टीडीपीसोबत युती करायला लावली आणि त्यासाठी सगळा पुढाकार घेतला तो पवन कल्याणने. टीडीपी-जेएसपी-भाजपा युतीचा शिल्पकारही पवनच! मोदींना मनापासून मानणारा आणि भाजपाची आंध्रातील ताकद ओळखणारा पवन कल्याण 100% स्ट्राइक रेटने विजयी झालाय! लोकसभा (2 जागा) आणि विधानसभेत (21 जागा) त्याच्या पक्षाने उभे केलेले सगळे उमेदवार विजयी झाले, झाडून सगळे. आंध्र प्रदेशात भाजपाची ताकद वाढलीय त्याचबरोबर चंद्राबाबूंवर वचक ठेवायला भाजपाच्या हाती ट्रम्प कार्ड लागलंय त्याचं नाव आहे पवन कल्याण!
 
lok sabha election 2024 
 
तेलंगणाचा विचार केला तर काँग्रेसचे (पूर्वाश्रमीचे अभाविप धारक) रेवंत रेड्डी ह्यांच्या झंझावातासमोरही तेलंगणा लोकसभेतील आपल्या जागा 4 वरून 8 वर पोहोचल्या! सत्तेत नसतानाही भाजपाचं मताधिक्य 35% इतकं आहे आणि काँग्रेसचं मताधिक्य काही महिन्यांपूर्वीच दणदणीत सत्ता मिळवूनही 40%, भारत राष्ट्र समिती (पूर्वाश्रमीची टीआरएस) ह्यांचं 16%, एमआयएमचं 3%. तेलंगणात भाजपाचा ग्राफ अतिशय शिस्तबद्धपणे वाढतोय! तेलंगणातील राष्ट्रीय स्तरावर सगळ्यात चर्चित राहिलेली लढत होती असदउद्दीन ओवैसी विरुद्ध माधवी लता! अनेकांनी माधवी लता ह्यांना हैदराबादच्या स्मृती इराणी म्हणून प्रोजेक्ट करायला सुरुवात केली होती; पण प्रामाणिकपणे सांगायचं तर, ही लढत मुळात बरोबरीची कधीच नव्हती! हैदराबाद लोकसभा मतदारसंघाची भौगोलिक, सामाजिक रचनाच अशी आहे की, जोपर्यंत त्याची पुनर्बांधणी केली जात नाही तोपर्यंत तिथे ओवैसीला हरवणं अशक्य आहे. मी आधीही लिहिलेलं- जर माधवी लता तिथून निवडून आल्या तर भाजपा काश्मीर खोर्‍यातून निवडून येईल इतके चांगले दिवस पक्षाला येतील. त्यामुळे हैदराबादच्या निवडणुकीला लक्षवेधी म्हणणार्‍या लोकांना इतकंच सांगेन सध्याच्या मतदारसंघाच्या संरचनेला अनुसरून मुळात माधवी लता जिंकून येणं शक्यच नव्हतं आणि पुढेही नसणार आहे! दक्षिण भारतातील भाजपाच्या कामगिरीचा अभ्यास केला, तर मताधिक्य निश्चित वाढलं आहे. नवीन जागी उमेदवार जिंकून आले आहेत. पक्ष म्हणून त्यांच्यासाठी ते उत्तमच आहे. फक्त जागा मात्र 2019 इतक्याच जागा दक्षिण भारतात भाजपच्या आल्या आहेत. त्या कशा वाढतील यावर पुढच्या पाच वर्षांत विचार आणि काम करण्याची गरज आहे.
 
 

प्रसाद देशपांडे

प्रसाद देशपांडे, बाय प्रोफेशन SAP आणि सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ आहे. एका MNC त गेली आठ वर्ष काम करत आहेत,  कामाचं क्षेत्र मिडलईस्ट, सौदी, बहरीन, युएई हे आहे. गेली 3, 3.5 वर्ष ह्याच भागात वास्तव्य होतं. टेक्नलॉजी, भारतीय राजकारण, राजकीय विश्लेषण, सायबर सिक्युरिटी, इस्लाम, आंतरराष्ट्रीय राजकारण मुख्यतः मध्यपूर्व हे माझे डोमेन एक्सपर्टीस आहेत. फ्रिलान्सिंग ब्लॉगिंग आणि वृत्तपत्र लिखाणाची आवड.