लडाख, काश्मीर आणि पंजाब चिंता वाढली

विवेक मराठी    08-Jun-2024   
Total Views |


lok sabha election 2024
निवडणूक राज्य फेररचनेनंतर आणि लडाख जम्मू आणि काश्मीरपासून वेगळे केंद्रशासित राज्य झाल्यावर झालेली पहिलीच निवडणूक असताना योग्य उमेदवार निवड, प्रादेशिक अस्मिता, सीमेकडील प्रदेशांचे महत्त्व हे जाणून घेऊन येथील निवडणुकांकडे पाहिले असते, तर आज चित्र वेगळे असते, हे निश्चित.
काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्ती आणि उमर अब्दुल्ला हे दोघे माजी मुख्यमंत्री पराभूत झाले, हा चिंतेचा विषय नक्कीच नाही. निवडणूक म्हटल्यावर असे चढउतार होतच असतात; पण तिथे जे कोणी निवडून आले आहेत त्यांच्यापैकी एक जण तर पक्का दहशतवादी आहे आणि तो अटकेत आहे. तो दहशतवाद्यांना पैसा पुरवणार्‍यांपैकी एक आहे आणि पैशाची सर्व पोच पाकिस्तानमधून होते, त्याचा तो सूत्रधार आहे.
 
  रशीद इंजिनीअर हा गेली पाच वर्षे दहशतवाद्यांना आर्थिक मदत पुरवठा करण्याच्या प्रकरणात तुरुंगात आहे. त्याच्यावर तातडीने खटला दाखल होऊन त्याला शिक्षा झाली असती आणि ती दोन वर्षांपेक्षा अधिक काळाची असती, तर त्याला निवडणुकीस उभे राहण्यास मज्जाव करता आला असता; पण तो केवळ तुरुंगात आहे म्हणून त्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापासून परावृत्त करता आले नाही.
 
निवडणुकीचे निकाल मी टीव्हीवर पाहात असताना एका निवेदकाने ‘माय डिअर फ्रेन्ड फ्रॉम काश्मीर गॉट इलेक्टेड’, असे उद्गार काढले. हा ‘माय डिअर फ्रेंड’ कोण ते मी चपापून पाहू लागलो तेव्हा असे लक्षात आले की, रशीद इंजिनीअर नावाने ओळखला गेलेला हा दहशतवाद्यांचा दोस्त शेख अब्दुल रशीद इंजिनीअर बारामुल्लातून विजयी झाला आहे आणि त्याने माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा पराभव केला आहे. तोही एक लाखांपेक्षा अधिक मतांनी त्यांचा पराभव करू शकला हे तितकेच धक्कादायक आणि चिंतेचे आहे. रशीद इंजिनीअर हा गेली पाच वर्षे दहशतवाद्यांना आर्थिक मदत पुरवठा करण्याच्या प्रकरणात तुरुंगात आहे. त्याच्यावर तातडीने खटला दाखल होऊन त्याला शिक्षा झाली असती आणि ती दोन वर्षांपेक्षा अधिक काळाची असती, तर त्याला निवडणुकीस उभे राहण्यास मज्जाव करता आला असता; पण तो केवळ तुरुंगात आहे म्हणून त्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापासून परावृत्त करता आले नाही. रशीद याला बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंधक) कायद्याखाली अटक करण्यात आली आहे. याच मतदारसंघातून जम्मू आणि काश्मीर पीपल्स कॉन्फरन्सचा उमेदवार सज्जाद लोन हाही एक उमेदवार होता आणि त्याला 96 हजार मते पडली आहेत. नॅशनल कॉन्फरन्सच्या अब्दुल्लांना 1 लाख 37 हजार 377 मते पडली, तर रशीद इंजिनीअरला 2 लाख 57 हजार 523 मते पडली. पाच लाखांपेक्षा जास्त मतदान बारामुल्लामध्ये झाले म्हणून समाधान मानावे, की त्या रशीदला अडीच लाख मते पडतातच कशी म्हणून वाईट वाटून घ्यावे?
 

lok sabha election 2024 
काश्मीरमधील रशीद इंजिनीअरचा विजय म्हणजे दहशतवादाला पोषक वातावरण
 
 
हे काहीच नाही, असा पराभव हा लडाखमधला आहे. तो कसा झाला, असे आता वाटून घेण्यात अर्थ नाही. याचे कारण निवडणुकीच्या तयारीतच आहे. तिथे भारतीय जनता पार्टीने ताशी ग्यालसन यांना उमेदवारी दिली होती. याआधी या मतदारसंघातून जामयांग त्सेरिंग नामग्याल हे भारतीय जनता पार्टीचे लडाख शाखेचे अध्यक्ष घवघवीत मतांनी निवडून आले होते. लडाख हा भौगोलिकदृष्ट्या क्षेत्रफळाने सर्वात मोठा असलेला मतदारसंघ आहे. 59 हजार चौरस किलोमीटरचा हा प्रदेश आहे. तिथून नामग्याल हे वयाच्या 25 व्या वर्षी 9 नोव्हेंबर 2018 रोजी लोकसभेवर निवडून गेले होते. तेव्हा ते लडाख स्वायत्त विकास महामंडळाचे अध्यक्ष होते. लडाख राज्य फेररचना विधेयकावर तसेच जम्मू आणि काश्मीर या राज्याचा खास दर्जा काढून घेण्याच्या विधेयकाला पाठिंबा देत असताना त्यांनी लोकसभेत केलेल्या भाषणाने सर्वांनाच चकित करून सोडलेले होते. त्या वेळी त्यांनी आपल्या भाषणात ‘आम्ही लडाखवासी कायम आम्हाला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा द्या अशी मागणी करत आलो आहोत; पण आमच्या या मागणीकडे कायम दुर्लक्षच होत राहिले आहे,’ असे म्हटले होते. त्या भाषणात त्यांनी 1947 पासून झालेल्या चुकांची आणि त्यास जबाबदार असलेल्यांची यादीच सादर केली होती. आपल्या भाषणात त्यांनी बौद्धांचे ज्येष्ठ नेते कुशक बकुला यांचा तसेच श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदानाचा अनेकदा उल्लेख करून 370 वे कलम हटविण्याचे स्वागत केले होते. त्यांनी आम्ही लडाखवासी म्हणजे ‘आन देश की, शान देश की, देश की है संतान, तीन रंगोंसे रंग तिरंगा अपनी है पहचान’ या स्फूर्तिदायक काव्यपंक्तींनी शेवट केला होता. त्यांच्या या भाषणाचे खुद्द नरेंद्र मोदींनी तोंडभरून कौतुक केले होते. असे असताना त्यांना बदलून त्यांच्या जागी ताशी ग्यालसन यांना उमेदवारी का दिली? असे दिसते आहे की, नामग्याल हे आपल्याला उमेदवारी नाकारली जाते आहे असे पाहून काँग्रेस पक्षात दाखल झाले आणि त्यांना उमेदवारी दिली गेली आणि दोघेही पराभूत झाले. त्यांचा पराभव महमद हनिफा यांनी केला. एक मुसलमान व्यक्ती दोन बौद्धांचा पराभव करून निवडून येते म्हणून हे दु:ख वाटून घ्यावे असे नक्कीच नाही. कदाचित हनिफा हे त्या जागेसाठी अधिक पात्र असतील, अशीही शक्यता आहे. मुद्दा तो नाहीच, मुद्दा असा आहे की, चांगल्या पदरात असलेल्या जागेवरील उमेदवार बदलून त्या जागी दुसर्‍या नवख्या व्यक्तीला उमेदवारी देऊन काय साध्य झाले? 20 मे रोजी झालेल्या मतदानात हनिफा यांना 65 हजार मतांपेक्षा जास्त मते पडली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी ताशी ग्यालसन यांना 31 हजार 956 मते पडली आणि काँग्रेसचे नामग्याल यांना 37 हजार 397 मते पडली. या दोघांच्या मतांची बेरीज केली तर ती हनिफा यांच्या मतांपेक्षा नक्कीच जास्त आहे; पण मग तर तेव्हा उमेदवारी न बदलायचा निर्णय झाला असता तर प्रचाराची दिशा बदलली असती आणि काही तरी भरघोस मतदान हाती लागून एका जागेचा फायदाच झाला असता. त्यातही ही निवडणूक राज्य फेररचनेनंतर आणि लडाख जम्मू आणि काश्मीरपासून वेगळे केंद्रशासित राज्य झाल्यावर झालेली पहिलीच निवडणूक असताना हे घडून येणे आवश्यक होते. हनिफा हेही नॅशनल कॉन्फरन्सचे लडाखचे अध्यक्ष होते; पण जेव्हा ही जागा इंडिया आघाडीअंतर्गत काँग्रेस पक्षासाठी सोडायची तयारी नॅशनल कॉन्फरन्सने दाखवली तेव्हा हनिफा यांनी अपक्ष या नात्याने अर्ज दाखल करण्याचे निश्चित केले. ही बंडखोरी असली तरी ते आता परत आपल्या मूळ पक्षात जातील यात संदेह नाही.
 
lok sabha election 2024
                                  महमद हनिफा (विजयी)                   नामग्याल                   ताशी ग्यालसन
 
 
महमद हनिफा हे हाजी आहेत आणि ते स्वत: कारगिलचे प्रतिनिधित्व करणारे शियापंथी आहेत. ते हाजी हनिफा जान म्हणून ओळखले जातात. त्यांच्या उमेदवारीमुळे त्यांच्या विरोधात उभे राहू इच्छित असणार्‍या दोघा मुस्लीम उमेदवारांनी माघार घेऊन त्यांना पाठिंबा दिला. त्या दोघांमध्ये सज्जाद कारगिल हा कारगिलचा नेताही होता. जे देशात इतरत्र चित्र दिसले तसेच ते कारगिल भागात दिसले. कारगिलमधल्या सर्व मुस्लिमांनी हाजी हनिफांना भरभरून मते दिली. इतकेच काय, पण त्यांच्यासाठी इस्लामिया स्कूल कारगिल आणि इमाम खोमेनी मेमोरिअल ट्रस्टनेही फतवे काढले. आता प्रश्न असा उपस्थित व्हायला हवा की, इमाम खोमेनी यांच्या नावाचा विश्वस्त निधी इथे उभाच कसा राहू शकतो? महमद अली जिना ट्रस्ट नावाची पाटी कुठे लागली तर आपली प्रतिक्रिया काय असेल? लक्षात घ्या. खोमेनी यांच्या निधनानंतर चाळिसाव्या दिवशी कारगिलमध्ये काही मौलवींनी आणि तरुणांनी एकत्र येऊन हा विश्वस्त निधी उभारला. त्याचे महत्त्वाचे काम म्हणजे कारगिल आणि लेह-लडाखमधल्या बौद्धांचे धर्मांतर घडवून आणणे हे होय. त्यासाठी लागणारा पैसा त्यांना इराणकडून मिळतो, असे उघडपणे सांगितले जाते. सध्या कारगिलमध्ये 88 टक्के शिया आणि 12 टक्के बौद्ध, हिंदू, शीख आहेत. देशाच्या सरहद्दीवर असलेल्या भागात हे काम केले जाते. तिथले शिया हे भारताला मातृभूमी मानतात आणि पाकिस्तानच्या कारवाया त्यांनीच अनेकदा उघडकीस आणलेल्या आहेत. तरीही काही प्रश्न अनुत्तरितच राहतात.
 

political 
देशाच्या सर्वोच्च अशा भागात अकरा हजार फूट उंचीवर आणि थंडीत उणे 30 ते उणे 35 अंश सेल्सियस तापमानात देशाचे सैन्य अशा परिस्थितीत तळहातावर प्राण घेऊन काम करत असताना या हालचालींकडे दुर्लक्ष होऊ नये, एवढीच इच्छा. लडाख आणि कारगिलमध्ये मिळून 1 लाख 62 हजार मतदार आहेत. त्यापैकी एक लाख चाळीस हजारांनी मतदान केले हा चांगला भाग झाला; पण त्याचा परिणाम काय झाला हेही लक्षात घेतले पाहिजे. भारतीय जनता पार्टीचा प्रचार करताना केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी लडाखच्या जनतेला प्रगतीचे आश्वासन दिले; पण त्यांनी बौद्धांच्या महत्त्वाच्या मागण्या निवडणुकीत चर्चेचा विषय होऊ नये म्हणून टाळल्या. काँग्रेसने लडाखची सहाव्या परिशिष्टात घालण्याची मागणी आपल्या जाहीरनाम्यात मान्य केली; पण लडाखला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्याबाबत मौन साधले. या निवडणुकीत कारगिल आणि लेह-लडाखमध्ये राहणार्‍या जनतेच्या मनात वेगळेपण निर्माण केले गेले. प्रथमच त्या भागात कारगिल विरुद्ध लेह, लडाख असे चित्र निर्माण झाले. ते दु:खद आणि चिंताजनक आहे. तिथे जनतेत निर्माण झालेली खाई चिंतेत भर घालणारी आहे.