मोदी तर पुढे निघाले...

विवेक मराठी    08-Jun-2024   
Total Views |
राष्ट्रधर्माची आराधना करणार्‍या व त्यासाठी अथक, अविरत साधना करणार्‍या संघविचारांचीच एक उत्कृष्ट अभिव्यक्ती नरेंद्र मोदींच्या व्यक्तित्वातून जगापुढे झालेली आहे. जी परंपरा मागील शंभर वर्षांपासून असंख्य संकटे, अपमान, दुस्वास, आक्रमणे झेलत आज देशाच्या केंद्रस्थानी आली आहे त्याच परंपरेचे मोदी प्रतिनिधी आहेत. त्यांना जसे खचून जाणे ठाऊक नाही तसेच संभ्रमित होऊन थांबणेही ठाऊक नाही.

bjp
 
जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या निवडणूक निकालांचे विश्लेषण एकीकडे देशविदेशात सुरू असतानाच दुसरीकडे या राष्ट्राचा आजघडीचा सर्वाधिक लोकप्रिय नेता ’एनडीए’च्या उभारणीसाठी मार्गस्थदेखील झाला. हे सरकार एनडीएचे आहे आणि एनडीएचा अर्थ ’न्यू इंडिया, डेव्हलप्ड इंडिया आणि अ‍ॅॅस्पिरेशनल इंडिया’ असल्याचे नरेंद्र मोदी यांनी संसदीय दल बैठकीत स्पष्ट केले. मोदींचे येथील भाषण व त्यात मांडलेला हा व्यापक विचार ’राष्ट्र प्रथम’ विचार मांडणार्‍या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आज विविध स्तरांतून जाणीवपूर्वक निर्माण केल्या जात असलेल्या शंकाकुशंका, संभ्रमाचे मळभ दूर करणारा आहे. आजच्या सोशल मीडियाच्या भाषेत आपण सहजपणे ’लेट्स मूव्ह ऑन’ म्हणून पुढील कामाला लागतो त्याचप्रमाणे मोदींनीही आपल्या कोट्यवधी कार्यकर्त्यांना या भाषणातून जणू ’लेट्स मूव्ह ऑन’ अशी साद दिली, जिची आज नितांत आवश्यकता होती.
 
 
लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या कोट्यवधी समर्थकांना अपेक्षित असलेले निकाल लागले नाहीत. भाजपाचे स्पष्ट बहुमत यंदा काठावर हुकले आणि त्यामुळे आता या सरकारमध्ये भाजपाऐवजी नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स अर्थात एनडीएमधील घटक पक्षांचा भाव वधारणार अशा प्रकारची मांडणी अनेक स्वयंघोषित राजकीय विश्लेषक, पत्रकार मंडळींनी 4 जूनच्या संध्याकाळपासूनच सुरू केली. काही मोजक्या राज्यांत अपेक्षित निकाल न लागल्याने बहुमतापासून लांब राहिलेल्या, परंतु जवळपास अडीचशे जागा जिंकणार्‍या भाजपाचा हा जणू पराभवच आहे आणि सलग तिसर्‍या निवडणुकीतही शंभरी न गाठू शकलेल्या काँग्रेसचा हा खूप मोठा विजय आहे, अशाही प्रकारचे अजब नॅरेटिव्ह पेरणे सुरू झाले. मागील दोन निवडणुकांतील स्पष्ट बहुमतासह मिळवलेल्या विजयामुळे यंदा सवातीनशे, साडेतीनशेच्या अपेक्षेत असलेल्या मोदी समर्थकांच्या मनात या निकालांमुळे आणि या नॅरेटिव्हमुळे काहीशी चलबिचल निर्माण झाली. वास्तविक, सारे काही करूनही मोदीरूपी विजयरथाला आवर घालणे सोडाच त्याच्या जवळपासही फिरकत येत नसल्यामुळे यंदा असतील नसतील तेवढे सारे राष्ट्रीय, प्रादेशिक,
 
सारी मंडळी पुन्हा एकदा विसरली की, आपण हे सारे ज्या व्यक्तीच्या विरोधात करतो आहोत त्या व्यक्तीचे नाव नरेंद्र मोदी आहे आणि ही व्यक्ती अंतर्बाह्य संघ स्वयंसेवक आहे.
उपप्रादेशिक पक्ष जमवून ’इंडी’ आघाडीचा प्रयोग मोदीविरोधकांनी करून पाहिला. विदेशी प्रसारमाध्यमे, जगभरातील डावे, कथित लेफ्ट-लिबरल्स यांना हाताशी धरून भारताची प्रतिमा मलिन करणे, मुसलमानांना पुन्हा एकदा ’इस्लाम खतरे में’चा बागुलबुवा दाखवणे, समाजातील वंचित घटकांमध्ये ’संविधान खतरेमें’ हा अपप्रचार करणे, असे सारे काही करूनही या इंडी आघाडीला एकट्या भाजपाइतक्याही जागा मिळवता आल्या नाहीत. त्यामुळे या पराभवानंतर करायचे काय, या प्रश्नाचे उत्तर म्हणून हा भाजपाचा ’नैतिक पराभव’ असल्याचा प्रचार इंडी व इंडीच्या समर्थक-सहानुभूतीदार घटकांनी 4 जूनपासून जोमाने सुरू केला. देशभरात शक्य तितकी अस्वस्थता, संभ्रमावस्था निर्माण करणे व त्यातून रालोआमध्ये काही फाटाफूट करण्यासाठी एखादा केविलवाणा प्रयत्न करून पाहणे, हा यामागील हेतू; परंतु ही सारी मंडळी पुन्हा एकदा विसरली की, आपण हे सारे ज्या व्यक्तीच्या विरोधात करतो आहोत त्या व्यक्तीचे नाव नरेंद्र मोदी आहे आणि ही व्यक्ती अंतर्बाह्य संघ स्वयंसेवक आहे.
 
नरेंद्र दामोदरदास मोदी नावाच्या एका संघ प्रचारकाने प्रचारक ते मुख्यमंत्री, मुख्यमंत्री ते लोकनेता, लोकनेता ते भारतासारख्या खंडप्राय देशाचा पंतप्रधान अशी थक्क करणारी वाटचाल गेल्या चार दशकांत केली. मागील दहा वर्षांत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाशी, त्यामागील विचारांशी येथीलच नव्हे तर जगभरातील हिंदू समाज एकरूप आणि समरस झाला. मोदी हे व्यक्तित्व भारतीयांच्या आशाआकांक्षांचा चेहरा बनले. जागतिक नेतृत्व म्हणून उदयास येऊनही मोदींमधील स्वयंसेवकत्व, त्यामागील प्रेरणा व ऊर्जा कधीही कमी झालेली नाही, किंबहुना ती वाढतच गेल्याचे आपल्याला दिसते.
 
 
पूर्ण विजय संकल्प हमारा, अनथक अविरत साधना,
निशिदिन प्रतिपल चलती आयी, राष्ट्रधर्म आराधना।
 
 
या संघगीतातील पंक्तींप्रमाणेच राष्ट्रधर्माची आराधना करणार्‍या व त्यासाठी अथक, अविरत साधना करणार्‍या संघविचारांचीच एक उत्कृष्ट अभिव्यक्ती नरेंद्र मोदींच्या व्यक्तित्वातून जगापुढे झालेली आहे. जी परंपरा मागील शंभर वर्षांपासून असंख्य संकटे, अपमान, दुस्वास, आक्रमणे झेलत आज देशाच्या केंद्रस्थानी आली आहे त्याच परंपरेचे मोदी प्रतिनिधी आहेत. त्यांना जसे खचून जाणे ठाऊक नाही तसेच संभ्रमित होऊन थांबणेही ठाऊक नाही. काही राज्यांतील काही जागा कमी झाल्या असल्या तरी भारतीय जनतेने आपल्याच हाती देशाची सूत्रे दिली आहेत आणि सोबतच विश्वासही दिला आहे, याची मोदींना स्पष्ट जाणीव आहे. म्हणूनच ते ’एनडीए’चे सलग तिसरे सरकार कसे चालवतील याचा प्रत्यय त्यांनी ’एनडीए’च्या नव्या व्याख्येतून देशवासीयांना दिला. संसदीय दल बैठकीच्या त्यांच्या भाषणात राजकीय टीकाटिप्पण्या जरूर होत्या, काँग्रेससह इंडी आघाडीवर कठोर वार जरूर होते; परंतु त्यासह मोठा भाग होता तो विकसित भारताच्या संकल्पाचा. म्हणूनच पंतप्रधानपदाची शपथही घेण्यापूर्वी त्यांनी भारतीय अर्थव्यवस्था पाचवरून तिसर्‍या स्थानी आणण्यासाठीची व्हिजन, औद्योगिक विकास, माहिती-तंत्रज्ञान, डिजिटलायझेशन, पर्यटन विकास, कृषी, पायाभूत सुविधा, हरित-अक्षय्य ऊर्जा, गरीब कल्याण आदी विषयांवर भर दिला. या युगाचे नेतृत्व भारत करेल आणि जगात भारताचे सामर्थ्य सिद्ध होईल, असा विश्वास व्यक्त केला. थोडक्यात, एनडीएचे काय होणार, घटकपक्ष सोबत राहतील का, इंडी आघाडी काही राजकीय कुरघोड्या करेल का, याबाबतच्या अंदाजांचे पतंग उडवण्यात माध्यमे व विश्लेषक मंडळी मश्गूल असताना मोदी त्यांच्या तिसर्‍या टर्ममधील संकल्पांच्या पूर्ततेसाठी कामालाही लागलेले आहेत.
bjp 
राहता राहिला प्रश्न निवडणूक निकालांचा. मुळात इथे मोदींसह भाजपाच्या अनेक नेत्यांनी निकालांनंतर मांडलेला मुद्दा लक्षात घेणे आवश्यक आहे. तो म्हणजे, इंडी आघाडीच्या काँग्रेससह तमाम लहानमोठ्या पक्षांना एकत्रित मिळूनही जेवढ्या जागा मिळाल्या त्याहून अधिक जागा एकट्या भाजपाने मिळवल्या आहेत. याशिवाय मतांच्या टक्केवारीत काँग्रेसपेक्षा भाजपाला जवळपास दुप्पट मते अधिक मिळालेली आहेत. 2014 आणि 2019 मध्येही मोदींचे सरकार हे रालोआ म्हणजेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीचेच सरकार होते आणि आताही याच रालोआला स्पष्ट बहुमत मिळालेले आहे. निकालानंतर व्हॉट्सअ‍ॅॅप, फेसबुकवर नितीशकुमार वा चंद्राबाबू यांच्यावरील ’मीम्स’मुळे कितीही मनोरंजन झाले असले तरी आज हे दोन्ही पक्ष व एनडीएमधील इतर सर्व घटक पक्ष मोदींच्या मागे भक्कमपणे उभे आहेत. आपणापैकी अनेकांनी संसदीय दल बैठकीत नितीशकुमारांनी मोदींचे चरणस्पर्श करण्याचा केलेला प्रयत्न पाहिला असेलच. त्यामुळे विरोधी बाजूच्या मंडळींनी कितीही ओरड केली, कितीही अपप्रचार केला तरी भारताचा जनादेश हा मोदींनाच आहे हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आणि स्पष्ट आहे. अरुणाचल, मध्य प्रदेश, हिमाचल, उत्तराखंड, दिल्ली, त्रिपुरासह राज्ये व केंद्रशासित प्रदेश मिळून एकूण सात ठिकाणी भाजपाने तेथील सर्वच्या सर्व जागा जिंकल्या.
विरोधी बाजूच्या मंडळींनी कितीही ओरड केली, कितीही अपप्रचार केला तरी भारताचा जनादेश हा मोदींनाच आहे हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आणि स्पष्ट आहे.
ओडिशासारख्या आजवर प्रचंड अवघड राहिलेल्या राज्यात भाजपाने 21 पैकी तब्बल 20 जागा जिंकल्या. 370 कलम हटवल्यानंतर पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जाणार्‍या जम्मू-काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्ती, ओमर अब्दुल्ला आदी सरंजामी घराणेशाहीच्या प्रतिनिधींना तेथील जनतेने दोन लाखांहून अधिक मतांनी पराभूत केले. आजवर कायमच दुर्लभ राहिलेल्या तमिळनाडूत भाजपाला 11 टक्क्यांहून अधिक मते मिळाली, अण्णामलाईंसारख्या उदयोन्मुख नेत्याला साडेचार लाखांहून अधिक मते मिळाली. काँग्रेसशासित तेलंगणसारख्या राज्यात 17 पैकी आठ जागा भाजपने जिंकल्या. काँग्रेसचीच सत्ता असलेल्या कर्नाटकातही काँग्रेसहून जवळपास दुप्पट म्हणजे 17 जागा भाजपाने जिंकल्या. ईशान्य भारतात आसाम, अरुणाचल, त्रिपुरासह बहुतांश सर्व ठिकाणी भाजपाचाच विजय झालेला आहे. शिवाय अरुणाचल आणि ओडिशा विधानसभांत भाजपला स्पष्ट बहुमत मिळवण्यात यश आले. डाव्या, हिंदुत्वविरोधी कंपूकडून ज्या भाजपाची हेटाळणी उत्तरेतील पक्ष वा कथित ’गोपट्ट्यातील पक्ष’ म्हणून होत आली आहे त्या पक्षाचा हा देशाच्या कानाकोपर्‍यात होत असलेला हा विजयी विस्तार या निवडणुकीत स्पष्टपणे जाणवतो.
 
bjp 
 
असा हा घवघवीत विजय संपादन करूनही राष्ट्रीय विचारांच्या कार्यकर्त्यांमध्ये काहीशी चलबिचल होण्याचे कारण अर्थातच उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि राजस्थानात झालेले भाजपाचे मोठे नुकसान. या चार राज्यांत मिळून भाजपाच्या तब्बल 59 जागा घटल्या. त्यापैकी निम्म्या जागा जरी भाजपाने जिंकल्या असत्या, तर भाजपा स्पष्ट बहुमत प्राप्त करू शकला असता. यातील पश्चिम बंगालमध्ये मागील पाच-सात वर्षांत भाजपाने जम बसवण्यास सुरुवात केली आहे आणि त्यातही त्यांचा सामना आहे तो अत्यंत उग्र, हिंस्र व अराजकतावादी प्रवृत्तीच्या तृणमूल व डाव्यांशी. शिवाय उघडउघड राष्ट्रविरोधी कारवायांत, गुन्हेगारीत गुंतलेल्या मुस्लीम गटांचे बंगाल जणू माहेरघर बनला आहे. त्यामुळे अशा बंगालमध्ये भाजपाला आणखी मोठ्या संघर्षांना सामोरे जावे लागेल, त्यासाठी आणखी काही अवधी द्यावा लागेल; परंतु उत्तर प्रदेश व महाराष्ट्रासारख्या दोन राज्यांत झालेली मोठी घसरण दुर्लक्षित करण्यासारखी निश्चितच नाही. अपयशाची जबाबदारी कोणाची, पक्षांतर्गत रचनेचे काय होईल, हा सर्वस्वी भाजपाचा अंतर्गत प्रश्न. त्यात ’विवेक’ने भाष्य करण्याचे काही कारण नाही. राजकीय पक्ष माध्यमांच्या सल्ल्यावर चालत नाहीत; परंतु निकाल पाहिल्यावर जे काही स्वाभाविक प्रश्न उपस्थित होतात, ते येथे मांडणे आवश्यक ठरते. लेखात आधी उल्लेखल्याप्रमाणे नरेंद्र मोदी हे व्यक्तित्व भारतीयांच्या आशाआकांक्षांचा चेहरा बनले आहे. ती भारताची आवश्यकताही आहे; परंतु निवडणुकीच्या राजकारणात केवळ मोदींच्या चेहर्‍यावर मते मिळतील, या आत्मविश्वासामुळे काही ठिकाणी स्थानिक उमेदवारांची निवड चुकली का? अनेक ठिकाणचे उमेदवारही अशा आशेवर विसंबून राहिले का? अनेक ठिकाणी पक्ष संघटनेतील पदाधिकारी प्रचारात हवे तितके सहभागी होत नाहीत, युतीतील घटक पक्षांचे सहकार्य मिळत नाही, अशा स्वरूपाच्या तक्रारी सुरुवातीपासून पाहायला मिळत होत्या. त्या खर्‍या होत्या का? व असल्यास त्यावर काही पावले उचलली गेली होती का? ’मोदी राज्यघटना बदलणार आहेत’ अशा पद्धतीचा खोटा आणि खरे तर राष्ट्रविरोधी प्रचार विरोधकांकडून करण्यात आला आणि तो प्रचार प्रभावीपणे झाला, हे भाजपा नेतेही मान्य करत आहेत. वास्तवात राष्ट्रीय विचारांप्रति बांधिलकी असलेल्या रा. स्व. संघ परिवाराने ‘संविधान’ या विषयावर गेल्या काही वर्षांत इतर कोणाहीपेक्षा सर्वाधिक जनजागृतीचे काम केले आहे. संघ स्वयंसेवक असलेले अनेक अभ्यासक-विचारक गेली अनेक वर्षे संविधान, भारतरत्न डॉ. आंबेडकरांचे विचार व कार्य यावर व्यापक स्तरावर काम करत आहेत. या मंडळींशी संवाद-संपर्क साधून या अपप्रचाराला उत्तर देण्यासाठी तळागाळात काही प्रयत्न झाले का? याकरिता भाजपामधून कोणी पुढाकार घेतला का? हे व असे अनेक प्रश्न या काही मोजक्या ठिकाणांच्या अपयशातून निर्माण होतात. त्यांची उत्तरे शोधण्यासाठी वरिष्ठ ते कनिष्ठ अशा सर्व स्तरांतून प्रयत्न होतील व या बाबतीत काही चुका घडल्या असल्यास येत्या काळात त्याची पुनरावृत्ती टळेल, अशी अपेक्षा बाळगण्यास काही हरकत नाही.
bjp 
मुस्लीम मतदान हा या निवडणुकीत पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. यामध्ये काही पॅटर्न्सदेखील अभ्यासण्यासारखे आहेत. जसे की, धुळे लोकसभा मतदारसंघात मालेगाव मध्य या मुस्लीमबहुल विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवाराला झालेले एकगठ्ठा मतदान आश्चर्यकारक आहे. अशाच प्रकारे देशभरात अनेक ठिकाणी मतदान झाले आहे. म्हणजेच भाजपाविरोधात जिथे काँग्रेस वा इंडी आघाडीचे हिंदू उमेदवार आहेत तिथे मुस्लीमबहुल भागात या हिंदू उमेदवारांना मतदान झाले. याउलट बंगालमध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेते, लोकसभेतील गटनेते अधीररंजन चौधरी यांना त्यांच्या मुस्लीमबहुल मतदारसंघात माजी क्रिकेटपटू युसूफ पठाणने हरवले. अधीररंजन हे येथे सलग पाच वेळा खासदार राहिले होते आणि समोरचा मुस्लीम उमेदवार हा अत्यंत नवखा, इतर राज्यातून आणलेला (थेट गुजरातेतून) व बिगर-राजकीय होता. तरीही 85 हजारांच्या मताधिक्याने चौधरी पराभूत झाले. त्यामुळे देशातील मुस्लीम मतदान, मुस्लिमांमध्ये निवडणुकीच्या काळात झालेला प्रचार, यात कार्यरत असलेले ज्ञात-अज्ञात घटक या सार्‍या गोष्टी स्वतंत्रपणे व अतिशय बारकाईने अभ्यासण्याची पुन्हा एकदा गरज निर्माण झाली आहे.
 
 
भाजपाविरोधात जिथे काँग्रेस वा इंडी आघाडीचे हिंदू उमेदवार आहेत तिथे मुस्लीमबहुल भागात या हिंदू उमेदवारांना मतदान झाले. याउलट बंगालमध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेते, लोकसभेतील गटनेते अधीररंजन चौधरी यांना त्यांच्या मुस्लीमबहुल मतदारसंघात माजी क्रिकेटपटू युसूफ पठाणने हरवले.
 
येथे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निकालानंतर मोदी समर्थक मंडळींपैकी काही अतिउत्साही लोक ज्या प्रकारे सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत, त्याला आवर घालणे नितांत आवश्यक ठरते. एका निवडणुकीत पराभव झाल्यामुळे ’आज हिंदू हरला’ म्हणत त्या क्षेत्रातील सार्‍या हिंदू समाजाला अपमानित करणे म्हणजे हिंदुत्वासाठी गेली 100 वर्षे त्याग-तपश्चर्या करणार्‍या लाखो-कोट्यवधी कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांना धक्का लावण्याचे काम आपण करतो आहोत, हे या सर्व मंडळींनी लक्षात घेणे आवश्यक आहे. अयोध्येतील नागरिकांवर, लहान-मोठ्या व्यावसायिकांवर बहिष्कार घालण्याबाबत होत असलेली वक्तव्ये हिंदुत्व विचार-परंपरेला शोभणारी नाहीत. त्यामुळे अशा अतिउत्साही मंडळींनी आपल्या जिभेला व सोशल मीडियावरील अभिव्यक्तीला आवर घालणेच पुढील वाटचालीच्या दृष्टीने हितावह ठरेल. जातिभेद हा हिंदू समाजासमोरील प्रश्न कालही होता, आजही आहे व भविष्यातही काही काळ राहणार आहे. हिंदू म्हणून आपल्याला या प्रश्नाशी लढावेच लागणार आहे. किंबहुना मोदींच्या यशामुळे बिथरलेल्या हिंदूविरोधी शक्ती आता अधिक त्वेषाने कारवाया सुरू करण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे या लढ्यात असे काही अडथळे आल्यास भलत्याच दिशेने जाण्यापेक्षा ते अडथळे दूर करून पुढे मार्गक्रमण करणे, तळागाळातील काम वाढवणे व राजकीय सत्तेच्या शीर्षस्थानी हिंदुत्ववादी व्यक्तींना भक्कम पाठिंबा देणेच सद्यःस्थितीत क्रमप्राप्त ठरेल. या सर्व त्रुटी, चुका इत्यादी लक्षात घेता आपल्या हे लक्षात येते की, या काही मोजक्या ठिकाणी भाजपाच्या कमी झालेल्या जागा या ’इंडी आघाडीने मिळवलेल्या’ जागा नसून ’भाजपाने गमावलेल्या’ जागा आहेत. त्या का गमावल्या यावर भाजपा विचारमंथन करेल व भविष्यात नव्या व्यूहरचनेसह नव्या दमाने मैदानात उतरेलच. तूर्तास हे मात्र निश्चित आहे की, 2024 चे निकाल हे स्पष्ट यश आहे. या यशाची जबाबदारी ओळखत ’मोदी 3.0’चा आरंभ स्वतः मोदींनी अत्यंत ऊर्जेने केला आहे आणि कामाला सुरुवातही केली आहे. एनडीएच्या भक्कम साथीमुळे संभ्रम-संशयाचे मळभदेखील दूर झाले आहे. मोदींच्या कार्याला धर्माचे अधिष्ठान आहे. तो धर्म राष्ट्रधर्म आहे आणि ’यतो धर्मस्ततो जयः’ हे त्रिकालाबाधित सत्य आहे. त्यामुळे सारे किंतु-परंतु दूर सारत नव्या आत्मविश्वासाने मोदी तर पुढे निघाले, आपण केव्हा निघणार?
 
 

निमेश वहाळकर

सा. विवेकमध्ये कार्यकारी संपादक (डिजिटल) म्हणून कार्यरत.  मूळचे कोकणातील चिपळूण येथील रहिवासी. सर परशुरामभाऊ कॉलेज पुणे येथून पदवी (राज्यशास्त्र) तर रानडे इन्स्टिट्यूट (सा.फु. पुणे विद्या.) येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण.